
पुण्यातल्या ‘गिरिप्रेमी' गिर्यारोहण संस्थेच्या मावळ्यांनी २०१९च्या मे महिन्यात जगातल्या तिसऱ्या आणि आपल्या देशातल्या सर्वोच्च शिखराची, कांचनजुंगाची मोहीम फत्ते केली. या आव्हानात्मक मोहिमेत आपल्याच नव्हे तर कांचनजुंगाच्या चढाईसाठी आलेल्या इतरही टीम्सचा डॉक्टर म्हणून काम केलेल्या गिर्यारोहकाचा अनुभव.
१५ मे २०१९ हा दिवस भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.
या दिवशी आमच्या ‘गिरिप्रेमी' संस्थेच्या १० शिलेदारांनी कांचनजुंगा या जगातील तिसऱ्या सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. एकाच दिवशी एकाच संघातील सर्व सदस्यांची अशी कामगिरी ‘कांचनजुंगा पर्वत' प्रथमच पाहत होता. हे यश आम्हा सहभागी सदस्यांना सुखावणारं तर होतंच; पण त्याहीपेक्षा दीड महिना त्याच्या अंगाखांद्यावर खेळताना आलेला अनुभव आमच्या गिर्यारोहण कौशल्याचा कसही वाढवणारा होता. माझ्यासाठी तर ही मोहीम विशेष महत्त्वाची ठरली. कारण डॉक्टर असल्यामुळे मोहिमेचा वैद्यकीय अधिकारी म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. पण परिस्थिती अशी होती, की मी फक्त आमच्याच टीमचा नव्हे तर कांचनजुंगा चढण्यासाठी आलेल्या देशी-परदेशी सर्वच गिर्यारोहकांचा डॉक्टर बनलो.
कांचनजुंगा चढताना आमच्या गिर्यारोहणाचा कस वाढला असं मी म्हणतोय त्यामागे तसंच कारण आहे. ते समजण्यासाठी कांचनजुंगा या शिखराबद्दल थोडं जाणून घ्यायला हवं. आजवरच्या शिखर मोहिमांमधली सर्वांत अवघड आणि तांत्रिक चढाई मला कांचनगंगा शिखर आरोहणावेळी करावी लागली. इतरांचाही थोड्याफार फरकाने तोच अनुभव होता. आपल्याकडे गिर्यारोहणाची कमाल पातळी म्हणजे एव्हरेस्ट अशी समजूत आहे. नगाधिराज एव्हरेस्ट हा जगातील सर्वोच्च पर्वत असल्यामुळे त्याला वलय असणं साहजिकच आहे; पण प्रत्यक्षात हिमालयातल्या गिर्यारोहणात अनेक शिखरं तांत्रिकदृष्ट्या एव्हरेस्टपेक्षाही अवघड आहेत. अगदी सहा ते सात हजार मीटर उंचीची ब्रह्मा, शिवलिंग, मेरू यांसारखी शिखरं भल्या भल्या गिर्यारोहकांची कसोटी पाहतात.
बेभरवशाचं शिखर कांचनजुंगा
अष्टहजारी शिखरांमध्ये कांचनजुंगाही असंच अतिशय अवघड आणि बेभरवशाचं शिखर आहे. हे शिखर नेपाळ आणि भारताच्या सीमेवर आहे. खरं तर हे भारतातलं सर्वोच्च शिखर, पण या शिखरावर भारताच्या बाजूने चढाई करण्यास बंदी आहे. भारताकडून चढाईचा मार्ग अतिशय अवघड आहे. त्या बाजूने हवामानामध्ये सतत बदल होत राहतात. व्हॅलांच, म्हणजे हिमकडे कोसळण्याचं प्रमाणही त्या बाजूला जास्त आहे. पूर्वी भारताच्या बाजूने चढाई करताना अनेक गिर्यारोहकांचे मृत्यू झालेले आहेत. कांचनजुंगा हा आमचा देव असून त्याच्यावर चढाई केल्यामुळे त्याचा कोप होत आहे, अशी सिक्कीमच्या नागरिकांची भावना आहे. त्यामुळे सिक्कीम सरकारने भारताकडून चढाई करण्यास बंदी घातलेली आहे. त्यामुळे नेपाळच्या बाजूनेच शिखरचढाई करावी लागते.
अर्थातच तो मार्गही फारसा सोपा नाही. एक तर कांचनजुंगाच्या पर्वतरांगांमध्ये हवामान सतत बदलत असतं. त्यामुळे एव्हरेस्ट चढाईसाठी गिर्यारोहकांना जेवढी वेदर विंडो मिळते तेवढी इथे मिळत नाही. कांचनजुंगाच्या पायथ्यापर्यंत पोहोचणं हीदेखील सोपी गोष्ट नव्हे. एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्यासाठीही बऱ्याच दिवसांचा ट्रेक करावा लागतो हे खरं. पण एव्हरेस्टच्या लोकप्रियतेमुळे नेपाळ सरकारने तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक सोई-सुविधा केल्या आहेत. लुक्ला ते एव्हरेस्ट हा मार्गही कांचनजुंगाच्या तुलनेत कमी खडतर आहे. कांचनजुंगाच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचायला दहा दिवसांचा ट्रेक करावा लागतो. त्यातही शेवटचे दोन दिवस मोरेन म्हणजे मोठ्या आकाराच्या ओबडधोबड दगडांमधून प्रवास करावा लागतो. हा प्रवास इतका थकवणारा असतो की कधी कधी मोहिमांचे पोर्टर्स सामान तिथेच टाकून मागे फिरतात. एव्हरेस्टवर रूट ओपन करण्यासाठी (मार्ग खुला करून गिर्यारोहकांसाठी दोर लावण्याचं काम) शेर्पांची मोठी फौजच असते. एव्हरेस्ट मोहिमांवर नेपाळ सरकारचं उत्पन्न अवलंबून असल्यामुळे शेर्पांना वेगळे पैसे देऊन रूट ओपनिंगसाठी पाठवलं जातं. एव्हरेस्ट चढण्यासाठी जगभरातून आलेल्या टीम्सचे शेर्पाही असतातच. कांचनजुंगा चढताना मात्र ती सोय नाही. शिखरचढाईसाठी आलेल्या टीम्समधल्या शेर्पांनाच रूट ओपनिंगचं काम करावं लागतं.
कांचनजुंगामधलं रॉक क्लायंबिंग
कांचनजुंगावरचा सर्वांत मोठा धोका म्हणजे शेवटच्या टप्प्यात करावं लागणारं प्रस्तरारोहण, म्हणजेच रॉक क्लायंबिंग. हिमशिखरांवरच्या चढाईसाठी गिर्यारोहकांनी क्रॅम्पॉन्स (खालून खिळे असलेले विशिष्ट बूट) घातलेले असतात. क्रॅम्पॉन्सचे खिळे बर्फात रुतून चढाई करणं सोपं जातं. पण हेच क्रॅम्पॉन्स प्रस्तरारोहणासाठी मोठाच अडथळा ठरतात. शिवाय साडेसात हजार मीटरवर, जिथे एकेक पाऊल टाकणं आव्हान असतं, तिथे शूज बदलणंही अशक्य होऊन बसतं. त्यामुळे ही शेवटची चढाई अतिशय तरबेज गिर्यारोहकांचीही परीक्षा पाहते.
या सर्व कारणांमुळे कांचनजुंगा अतिशय आव्हानात्मक शिखर ठरतं. आकड्यांच्या भाषेत सांगायचं तर कांचनजुंगाच्या पहिल्या शिखरचढाईनंतर गेल्या वर्षीपर्यंत केवळ ३०० गिर्यारोहकांनी या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. एव्हरेस्टच्या बाबतीत हाच आकडा ६००० आहे. २०१४ ते २०१७ या तीन वर्षांमध्ये एकही गिर्यारोहक काचंनजुंगाच्या शिखरावर पोहोचण्यात यशस्वी झालेला नाही, म्हणजे बघा.
अर्थात ‘गिरिप्रेमी'ने या सर्व बाबींचा विचार करूनच कांचनजुंगा मोहिमेची आखणी केली होती. दहा दिवसांचा ट्रेक करून १७ एप्रिल २०१९ रोजी आम्ही ५,४०० मीटर उंचीवर असणाऱ्या बेस कॅम्पवर पोहोचलो. या वर्षी कांचनजुंगा चढाईसाठी जगभरातून आम्ही केवळ ३२ गिर्यारोहक आलो होतो. आमचे शेर्पा आणि आम्ही मिळून फक्त ६० लोकांचा तळ बेस कॅम्पला पडला होता. (एव्हरेस्ट शिखरचढाईसाठी बेस कॅम्पवर मुक्काम ठोकलेल्यांची संख्या त्या वेळी ६००हून अधिक होती!) उमेश झिरपे यांच्या (मामा) नेतृत्वाखाली आलेला आमचा ‘गिरिप्रेमी'चा दहाजणांचा संघ हा बेस कॅम्पवरचा सर्वांत मोठा संघ होता. त्यामुळे शिखरचढाईसाठी रूट ओपनिंगची (दोर लावण्याची) जबाबदारी ‘गिरिप्रेमी'ने स्वीकारली होती.
बेस कॅम्प
बेस कॅम्पवर माझ्यावर दुहेरी जबाबदारी होती. मला माझ्या सरावाकडे, तब्येतीकडे लक्ष द्यायचं होतं. शिवाय मोहिमेचा डॉक्टर असल्याने इतरांचीही काळजी घेण्याचं काम माझ्याकडे होतं. ‘चो यू' या जगातील सहाव्या अष्टहजारी शिखरावर यशस्वी आरोहण केल्यानंतर कांचनजुंगा ही माझी दुसरी अष्टहजारी मोहीम होती.
चो यू आणि इतरही सात-आठ हिमालयीन मोहिमांमध्ये मी आमच्या टीमचा डॉक्टर म्हणून काम केलं होतं. त्यामुळे ही जबाबदारी माझ्यासाठी नवी नव्हती. पण कांचनजुंगा मोहिमेच्या सुरुवातीला ही भूमिका निभावणं मात्र काहीसं कठीणच गेलं. कारण साडेपाच हजार मीटर उंचीवर असणाऱ्या या बेस कॅम्पवर मी एकमेव डॉक्टर होतो. त्यामुळे माझ्या संघाबरोबरच बेस कॅम्पवरील इतर आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक, शेर्पा, किचन स्टाफ, पोर्टर या साऱ्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींचं निराकरण मलाच करावं लागत होतं. मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक गिर्यारोहक विरळ हवामानाशी समरस होत असतात. त्यामुळे डोकेदुखी, मळमळ, झोप न लागणं अशी लक्षणं सर्वांमध्येच हमखास दिसतात. त्यामुळे घाबरून जाऊन अनेक विदेशी गिर्यारोहक रात्री-अपरात्री माझ्याकडे उपचारांसाठी येत होते. पर्यायाने माझीही झोप व्यवस्थित होत नव्हती. कांचनजुंगा शिखराची आव्हानात्मक चढाई माझी चिंता अधिक वाढवत होती.
अर्थात या जबाबदारीला एक चांगली बाजूही होती. बेस कॅम्पवर वावरताना शेर्पा आणि इतर विदेशी गिर्यारोहकांसोबत माझं लवकरच एक नातं तयार झालं. आम्ही सगळेच चांगले मित्र बनलो. विदेशी गिर्यारोहकांच्या कॅम्पमधून मला जेवणाची आमंत्रणं येत होती. ‘गरज सरो आणि वैद्य मरो' या उक्तीला छेद देणारी माणसं मला या पर्वतशिखरांवर भेटली. मी करत असलेल्या कामाची गरज पाहता ‘गिरिप्रेमी'ने बेस कॅम्पवर क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. हिमालयीन रेस्क्यू असोसिएशन (एचआरए) या संस्थेचं एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सुसज्ज असं क्लिनिक आहे. या एचआरए क्लिनिकचा लाभ अनेक गिर्यारोहक घेतात; पण वैद्यकीय सल्ला आणि उपचारांसाठी तेथे ‘डॉलर्स'मध्ये पैसे मोजावे लागतात. कांचनजुंगाच्या बेस कॅम्पवर असणाऱ्या आमच्या ‘गिरिप्रेमी'च्या क्लिनिकमध्ये मात्र पूर्णपणे मोफत उपचार केले जात होते. रोज दुपारपर्यंत माझी ओपीडी सुरू असायची. बल्गेरियाच्या टनासला तर माझ्याशिवाय चैनच पडत नव्हतं. रोज नवीन दुखणं घेऊन तो माझ्याकडे यायचा. अर्थात त्याचं हे दुखणं काहीसं मानसिक होतं. एके दिवशी तर त्याने मला भलतीच तक्रार सांगितली. तो म्हणाला, “रात्री थंडी जास्त असल्यामुळे झोपताना मी डाऊन जॅकेट, स्वेटर, थर्मल असे कपडे घालून स्लीपिंग बॅगमध्ये झोपतो. थोड्या वेळाने मला खूप गरम होऊ लागतं. मग मी जॅकेट काढतो, स्लीपिंग बॅग उघडतो आणि मग मला पुन्हा थंडी वाजू लागते. मी यावर काय करू?” अशा प्रश्नांपुढे मात्र मी निरुत्तर व्हायचो. अर्थात, हाय अल्टिट्यूड असलेल्या ठिकाणी असे त्रास होणं साहजिक असतं.
एकुणात, कांचनजुंगा शिखराच्या चढाईचं अघोषित नेतृत्वच गिरिप्रेमीकडे आलं होतं. त्यामुळे आमच्या कॅम्पमध्ये शेर्पा आणि विदेशी गिर्यारोहकांचा सतत वावर असायचा. कधी कधी बेस कॅम्पच्या दवाखान्यात शेर्पांचा अड्डा जमायचा. एकेक शेर्पा म्हणजे गिर्यारोहणातल्या ज्ञानाचा आणि अगणित थरारक प्रसंगांचा खजिनाच. त्यामुळे मीही त्यांच्यासोबत गप्पांमध्ये रंगून जायचो. गंमत म्हणजे शेर्पा मंडळी नातेवाइकांच्या आजाराबद्दलही माझ्याकडे सल्ला मागायची. मीही आनंदाने तो द्यायचो.
ऍक्युट माउंटन सिकनेस म्हणजेच अति उंचीमुळे होणाऱ्या नेहमीच्या आजारांबरोबरच खोकला, सर्दी, नाकातून आणि गुदातून होणारा रक्तस्राव, अपचन यासारखी लक्षणंही मला या वेळी अनेक रुग्णांमध्ये बघायला मिळाली. या सर्व लक्षणांचं कारणही अति उंचीवरील विरळ हवामान आणि असह्य थंडी हेच होतं. त्यातही कोरड्या खोकल्याचा त्रास ७० टक्के गिर्यारोहकांना होत होता. या खोकल्यावर उपचार म्हणून मी एक आयुर्वेदिक युक्ती वापरली. मी ज्येष्ठमधाच्या काड्या सोबत आणल्या होत्या. त्याचा गिर्यारोहकांना खूपच फायदा झाला. शेर्पांना तर त्या इतक्या आवडल्या की खोकला गेल्यावरही तो पुन्हा येऊ नये म्हणून ते माझ्याकडे ज्येष्ठमध मागू लागले. विदेशी गिर्यारोहकांच्या तोंडीही ज्येष्ठमधाची गोडी उतरली होती आणि त्यांच्या च्युइंगमची जागा आपल्या ज्येष्ठमधाने घेतली होती. ही मागणी एवढी वाढली की नंतर खरोखर गरज पडली तर असू दे म्हणून मला ज्येष्ठमधाच्या काड्या लपवून ठेवाव्या लागल्या. मोहीम संपल्यावर दावा फिंजोक या शेर्पाने आपल्या गायक बायकोला भेट देण्यासाठी त्या माझ्याकडून आवर्जून मागून घेतल्या. थोडक्यात काय, तर एकीकडे चढाईसाठी सराव आणि दुसरीकडे बेस कॅम्प ओपीडी अशा दोन्ही स्तरांवर माझी मोहीम सुरू होती.
बेस कॅम्प ते शिखर
कांचनजुंगाच्या चढाईसाठी कॅम्प-१ (६३०० मी), कॅम्प-२, (६२०० मी), कॅम्प-३ (७००० मी) आणि कॅम्प-४ (७४०० मी) असे एकूण चार कॅम्प लावावे लागतात. एव्हरेस्टप्रमाणेच इथेही बेस कॅम्प ते शिखर अशी थेट चढाई करणं शक्य नसतं. (कांचनजुंगा शिखराकडे जाण्याचा मार्ग अतिशय चढउताराचा आहे. त्यामुळे कॅम्प-२ ची उंची कॅम्प-१ पेक्षा कमी आहे!) अतिविरळ हवामानाशी जुळवून घेण्यासाठी (अक्लमटायझेशन) सुरुवातीला कॅम्प-१ आणि कॅम्प-२ च्याही वर, म्हणजे साधारण ६४०० मीटरपर्यंत चढाई करून पुन्हा बेस कॅम्पला परतावं लागतं. त्यानंतर वेदर विंडो मिळेल त्यानुसार शेवटची चढाई सुरू करावी लागते. बेस कॅम्पला पोहोचल्यानंतर आम्ही लगेचच सराव सुरू केला आणि दहा दिवसांनंतर अक्लमटायझेशनसाठी चढाईला सुरुवात केली.
त्यातलं कॅम्प-१ ते कॅम्प-२ हे अंतर तसं कमी आहे. या चढाईसाठी साधारणपणे पाऊण तास लागतो. पण या छोट्या टप्प्यातच आम्हाला नेमका रॉक फॉलचा सामना करावा लागला. माझे सहकारी भूषण हर्षे आणि आनंद माळी तर अगदी थोडक्यातच बचावले. सूर्य वर येऊ लागला की त्यामुळे हिमशिखरावरचं बर्फ वितळतं आणि त्यात अडकलेले सुटे दगड खाली कोसळू लागलात. प्रत्येक शिखरावर अशा दगडांचं प्रमाण कमी-अधिक असतं. कांचनजुंगावर ते बरंच जास्त आहे. कांचनजुंगाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या गिर्यारोहकांचं प्रमाण एवढं कमी का आहे ते आम्हाला चढाई सुरू केल्याकेल्याच समजलं. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत या रॉक फॉलचं रौद्र संगीतकांचनजुंगाच्या दऱ्यांमधली नीरव शांतता भंग करत होतं. या रॉक फॉलमध्ये जखमी झाल्यामुळे अनेकदा गिर्यारोहकांना मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावं लागतं. आम्ही मात्र सुदैवी ठरलो. त्यामुळे कॅम्प-२ वर दोन दिवस मुक्काम करून आम्ही सुखरूप बेस कॅम्पला परतलो.
बेस कॅम्पवर परतल्यावर कमी झालेली शरीराची ताकद पुन्हा वाढवून, विश्रांती घेऊन अंतिम चढाईसाठी निघायचं होतं. मधल्या काळात आलेल्या फनी वादळाने या भागातही प्रभाव दाखवला होता. त्यामुळे हिमालयाच्या रांगांमधली हवा खराब झाली होती. आम्हालाही त्यामुळे बेस कॅम्पवर थांबून राहण्याखेरीज पर्याय नव्हता. चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर ११ मे रोजी आम्ही अंतिम चढाईसाठी बेस कॅम्पहून निघालो. रॉक फॉलचा धोका टाळण्यासाठी पहाटे चार वाजताच निघण्याचा निर्णय आम्ही घेतला. १५ मे रोजी आठ हजार मीटरच्या वर, म्हणजे शिखराजवळ वाऱ्याचा वेग तुलनेने कमी असेल असा हवामानाचा अंदाज होता. याला गिर्यारोहणाच्या भाषेत वेदर विंडो म्हणतात. या अष्टहजारी शिखरमाथ्यावरून वर्षभर ताशी शंभर ते दीडशे किलोमीटर या वेगाने वारे वाहतात. ज्या दोन-तीन दिवसांसाठी वाऱ्याचा वेग कमी होतो तो कालावधी म्हणजे वेदर विंडो. १५ मे रोजी शिखरावर चढाई करता यावी यासाठी आम्हाला इथून पुढे रोज सहा तासांची चढाई करावी लागणार होती.
या मोहिमेत मला औषधांचं व्यवस्थापनही करायचं होतं. आपत्कालीन परिस्थितीत देण्यासाठी काही इंजेक्शन्स आणि सलाइन यांचा साठा मी पहिल्या फेरीत कॅम्प-२ ला नेऊन ठेवला होता. कॅम्प-२ हून पुढे अंतिम चढाईच्या वेळी औषधांची गरज भासली, तर बेस कॅम्पहून मागवण्यापेक्षा कॅम्प-२ वरून ती आणणं सोपं जाणार होतं. पण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘फनी' वादळाच्या तडाख्याने एव्हरेस्टचा कॅम्प-२ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. तशीच परिस्थिती मधल्या काळात कांचनजुंगाच्या कॅम्प-२ ची झाली नसेल ना याची काळजी आम्हाला लागून राहिली होती. तसं झालं असतं तर सगळी औषधं काठमांडूहून नव्याने मागवण्याची वेळ आली असती. तीही हेलिकॉप्टरने. म्हणजे पाच हजार रुपयांची औषधं मागवण्यासाठी कमीत कमी सहा लाख रुपये खर्ची पडले असते. त्यामुळे औषधांचा साठा कॅम्प-२ ला ठेवून आपण चूक तर केली नाही ना, या धास्तीने माझा जीव दडपून गेला होता. पण हुश्श! सुदैवाने कांचनजुंगाचा कॅम्प-२ सुरक्षित होता.
जसजसे आम्ही अधिकाधिक उंची गाठत होतो, तसे हवेतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचे प्रतिकूल परिणाम आमच्या शरीरावर दिसत होते. मंदावलेली भूक आणि अपचन यामुळे केवळ सूप, कॉफी, चहा, चॉकलेट्स आणि चिक्की असे ऊर्जा देणारे पदार्थ खाऊन आमची चढाई सुरू होती. विरळ हवामान आणि कडाक्याची थंडी यामुळे रात्रीची झोपही व्यवस्थित होत नव्हती. त्यामुळे पहिल्या दिवसाचा शिणवटा जातो न जातो तोच दुसऱ्या दिवशीच्या अवघड चढाईचं आव्हान आमच्यासमोर उभं असायचं. या दोन्ही बाबींच्या एकत्रित परिणामामुळे आमची चाल मंदावली होती. कॅम्प-2ला जाताना वीस पावलं चालल्यानंतर लागणारी धाप कॅम्प-३ वर दहा पावलांवरच लागत होती.
कॅम्प-३ ते कॅम्प-४ या टप्प्यात चढाई सोपी असल्यामुळे आम्ही चार तासांतच कॅम्प-४ गाठला. कॅम्प-४ वर पोहोचलो तेव्हा हवा स्वच्छ होती. या टप्प्यावरून आग्नेय दिशेला ढगांची चादर ओढलेलं दार्जिलिंगचं ‘क्वीन ऑफ हिल्स' दिसत होतं. काबू, तालूंग, कुंभकर्ण या सप्तहजारी शिखरांचा माथाही इथून नजरेच्या सरळरेषेत होता. ते दृश्य नजरेचं पारणं फेडत होतं.
शिखरमाथ्याकडे कूच
१४ तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही शिखरमाथ्याकडे कूच केलं. मुख्य माथा आता खूप जवळ दिसत होता. आता आलंच की शिखर, असं वाटत होतं. पण दुरून डोंगर साजरे ही उक्ती हिमालयात तंतोतंत लागू होते. कारण इथून पुढे होता कांचनजुंगा शिखर चढाईचा सर्वांत अवघड टप्पा म्हणजे कॅम्प चार ते शिखर माथा आणि पुन्हा कॅम्प चार म्हणजेच ‘समिट पुश'. या टप्प्यासाठी सलग २२ तास चालावं लागतं, तेही कृत्रिम प्राणवायूचा वापर करून. शिवाय आधी उल्लेख केल्याप्रमाणे या भागात उघडे पडलेले खडक असल्यामुळे क्रॅम्पॉन्स घालून त्यावरून चालणं हेही अतिशय धोकादायक आणि कसबी गिर्यारोहकाचं काम होतं. या प्रवासादरम्यान अति थकवा, थंडी, डीहायड्रेशन या तीनही जीवघेण्या त्रासांशी गिर्यारोहकाला सामना करावा लागतो. जर तुमचं शरीर त्यांच्याशी योग्य प्रकारे सामना करून शकलं नाही, तर हाय अल्टिट्यूड पल्मोनरी एडिमा (फुफुसाला सूज येणे) किंवा हिमदंशासारखे आजार होतात आणि मृत्यूही ओढवू शकतो. या साऱ्या गोष्टी ध्यानात ठेवून मी समिट पुशच्या वेळेस गिरिप्रेमीच्या प्रत्येक सदस्याकडे काही इंजेक्शन्स देऊन ठेवली होती; पण ती घेण्याची वेळ आली नाही. चढाई अत्यंत थकवणारी आणि गिर्यारोहक म्हणून आमचं सगळं कसब पणाला लावणारी होती.
पण १५ मे रोजी पहाटे आम्ही गिरिप्रेमीचे सर्व दहा सदस्य अखेर कांचनजुंगाच्या शिखरमाथ्यापाशी पोहोचलो. अर्थातच शिखरावर पोहोचल्याचा आनंद व्यक्त करण्याएवढा वेळ नव्हता आणि तशी आमची परिस्थितीही नव्हती. लवकरात लवकर खाली उतरून कॅम्प-४ ला पोहोचणं हे आमचं ध्येय होतं. कुठलीही मोहीम शिखरावर पोहोचल्यावर नव्हे तर सुखरूप खाली उतरल्यावरच फत्ते होत असते, हे लक्षात ठेवणं प्रत्येक गिर्यारोहकाचं काम असतं. त्यात हयगय झाली तर दुर्घटना घडायला वेळ लागत नाही. त्यामुळे आम्ही झपाट्याने खाली उतरलो आणि कॅम्प-४ ला येऊन पोहोचलो.
सर्वांत अवघड टप्पा पार पाडल्याच्या समाधानात आम्ही झोपलो खरे; पण तेव्हा मला माहीत नव्हतं की मोहीम अजून संपलेली नव्हती.
मोहिमेतला सर्वांत थरारक अनुभव अजूनही बाकी होता,
त्याचं झालं असं, की कांचनजुंगाच्या मोहिमेसाठी आलेल्या इतर टीम्समध्ये चार बंगाली गिर्यारोहक होते. ते आमच्या आधी एक दिवस म्हणजे १० मे रोजी बेस कॅम्पवरून अंतिम चढाईसाठी निघाले होते. आम्हाला ते कॅम्प-२ ला भेटले. आम्ही कॅम्प-२ वरून एकत्रच प्रवास सुरू केला, पण त्यांची चाल खूपच मंद होती. कॅम्प-३ पर्यंत पोहोचायला त्यांना १० तास, तर कॅम्प-४ वर पोहोचायला सात तास लागले. त्यामुळे त्यांची जबरदस्त दमछाक झाली होती. या परिस्थितीत शिखरचढाईचा प्रयत्न करू नका, असा सल्ला त्यांना त्यांच्या शेर्पांनीही दिला होता; पण तरीही त्यांनी मोहीम थांबवली नाही. ते कसेबसे शिखरावर पोहोचले खरे, पण परतताना त्यांना अति थकवा जाणवू लागला. त्यातच त्यांच्याकडचा कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठाही संपल्यामुळे दोघांचा वाटेतच मृत्यू झाला. इतर दोघंही गलितगात्र झाले होते. खाली उतरण्याचं त्राणही त्यांच्यात उरलं नव्हतं.
त्या वेळी आम्हीही आमच्या कॅम्प-४ च्या तंबूंमध्ये अक्षरशः मेल्यासारखे झोपलो होतो; पण वरच्या घडामोडी बेस कॅम्पला कळल्या होत्या. मामांनी ताबडतोब सॅटेलाइट फोनवरून आमच्यातल्या चार शेर्पांना त्या दोन बंगाली गिर्यारोहकांच्या मदतीसाठी वर जायला सांगितलं. फुर्बा, तेनसिंग, पासांग आणि चेपाल हे चौघं तत्काळ ऑक्सिजन सिलिंडर आणि पाणी सोबत घेऊन बंगाली गिर्यारोहकांपाशी पोहोचले. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना कॅम्प-४ वर आणण्यात या शेर्पांना यश मिळालं. हे सगळं नाट्य सुरू होतं तेव्हाही आम्ही झोपलेलेच होतो. पासांगने त्या दोघांवर उपचार करण्यासाठी मला उठवलं तेव्हा काय चाललं आहे हेही काही क्षण समजत नव्हतं, पण लगेचच परिस्थितीचा अंदाज आला. सर्वांत पहिल्यांदा मी आणि पासांगने त्या दोघांना त्यांच्या तंबूमध्ये नेलं. दोघांपैकी एकजण थोडंफार चालू शकत होता. दुसऱ्या गिर्यारोहकाला मात्र शेर्पांनी अक्षरशः हात आणि पाय बांधून खाली आणलं होतं. त्याची परिस्थिती फारच गंभीर होती. त्याच्या हाताला हिमदंश झालेला होता. हाताची बोटं कापावी लागणार यात शंका नव्हती. तसंच त्याच्या फुफ्फुसालाही सूज आलेली आहे, हे त्याच्या खोकल्यावरून आणि अति थकव्यावरून स्पष्ट जाणवत होतं. मी कामाला लागलो.
हाय अल्टिट्यूड पल्मोनरी एडिमा
याचे रुग्ण मी याआधीही तपासले होते. चो यू आणि स्तोक कांग्री या दोन्ही मोहिमांमध्ये तशी वेळ आली होती. पण फरक एवढाच होता की तेव्हा मी बेस कॅम्पवर होतो. इथे कॅम्प-४ वर ७५०० मीटरवर आणि शून्याच्या किती तरी खाली गेलेल्या तापमानात या दोन रुग्णांचा जीव आपल्या हातात आहे याची जाणीव कापरं भरवणारी होती. समिट पुशच्या सलग २१ तासांच्या चढाईमुळे मी स्वतःही खूप थकलेलो होतो. त्यामुळे माझ्यासाठी ही अग्निपरीक्षाच होती. त्यात थंडीत गोठल्यामुळे दोन इंजेक्शन्स वाया गेली; पण काही इंजेक्शन्स मी माझ्या डाऊन जॅकेटमध्ये ठेवली होती, त्यातलं एक इंजेक्शन मला वापरता आलं. मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या गिर्यारोहकाला रीहायड्रेट करणंही खूप महत्त्वाचं होतं. फुरबा शेर्पाने पाणी तयार करायला घेतलं. आमच्याकडच्या छोट्या स्टोव्हवर बर्फ वितळवून एक लिटर पाणी तयार करण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागणार होता. दुसरीकडे पासांग शेर्पा त्या गिर्यारोहकाचे बूट काढून त्याला स्लीपिंग बॅगच्या आत ढकलण्याचा प्रयत्न करत होता. त्या बंगाली गिर्यारोहकांना जिवंत ठेवण्यासाठी आणि तिथून खाली उतरण्यासाठी ऑक्सिजनची नितांत आवश्यकता होती; पण त्यांच्याकडील ऑक्सिजन सिलिंडर फक्त निम्मा शिल्लक राहिला होता. माझा सहकारी जितेंद्रने कॅम्प-४ वर सर्वांच्या तंबूंमध्ये शोधाशोध करून अर्धा शिल्लक राहिलेला ऑक्सिजन सिलिंडर मिळवला. जे काही तातडीने करणं शक्य होतं ते सगळं करून झालं होतं. आता सकाळपर्यंत वाट पाहणं एवढंच आमच्या हातात होतं. दोन्ही गिर्यारोहकांसाठी रात्र वैऱ्याची होती.
त्यांच्या तंबूमध्ये आमच्यासाठी जागा नसल्यामुळे आम्ही नाइलाजाने रात्री आपापल्या तंबूत परत गेलो. रात्र कशीबशी सरली. सकाळी आम्ही सर्वांनी पुन्हा एकदा बंगाली गिर्यारोहकांच्या तंबूकडे धाव घेतली. नशिबाने दोघंही जिवंत होते; पण धोका अजून टळलेला नव्हता. त्यांना लवकरात लवकर कमी उंचीवर नेणं आवश्यक होतं. पण अति थकव्यामुळे त्यांना चालणंही कष्टदायक ठरत होतं, विशेषतः त्यातल्या एका गिर्यारोहकाची तब्येत अगदीच ढासळली होती. त्यामुळे मी त्याला पुन्हा एक इंजेक्शन दिलं. आता तो कसाबसा कॅम्प-२ गाठेल असा माझा अंदाज होता. त्यांनी उतरायला सुरुवात केली. कॅम्प-३ वरून हेलिकॉप्टरने त्यांना खाली आणण्याचा प्रयत्न केला गेला; पण तो फसला. जोरदार वारं आणि ढगाळ हवामानामुळे हेलिकॉप्टर तिथे उतरू शकलं नाही. नाइलाजाने त्यांना कॅम्प-२ वरून हेली-रेस्क्यू करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे त्यांना कॅम्प-२ पर्यंत चालतच उतरणं भाग होतं.
बेस कॅम्पवरून रेस्क्यू मोहिम
तिकडे खाली बेस कॅम्पवरून रेस्क्यू मोहिमेची सूत्रं मामाच हलवत होते. जसं आमची मोहीम यशस्वी होण्याचं श्रेय मामांना आहे, तसंच बंगाली गिर्यारोहकांचा जीव वाचवण्याचंही. पर्वतामधले संभाव्य धोके ओळखून त्यावर उपाययोजना करणं हा त्यांचा हातखंडा आहे. त्यांची दूरदृष्टी या वेळीही कामी आली. बंगाली गिर्यारोहकांना कॅम्प-२ ला येण्यास संध्याकाळ होणार होती. हिमालयात दुपारनंतर हवामान बिघडतं, याचा अनुभव असल्यामुळे मामांनी सकाळीच हेलिकॉप्टरद्वारे ऑक्सिजनचे दहा सिलिंडर्स आणि खाद्यपदार्थ कॅम्प-२Sवर पाठवून ठेवले होते. झालंही तसंच. खराब हवामानामुळे संध्याकाळी हेलिकॉप्टर तिथे उतरू शकलं नाही; पण आधी पोहोचलेल्या ऑक्सिजन आणि पाण्यामुळे त्या गिर्यारोहकांचे प्राण वाचले. जेवढा आनंद कांचनजुंगा मोहीम फत्ते झाल्याचा होता, तेवढाच आपल्या मदतीमुळे दोघा गिर्यारोहकांचे प्राण वाचल्याचाही होता.
आमची कांचनजुंगा मोहीम यशस्वी होण्यामागे आमची सांघिक कार्यक्षमता हे मुख्य कारण होतं. तसंच बंगाली गिर्यारोहकांची बचाव मोहीमही सांघिक प्रयत्नांमुळेच यशस्वी झाली. आमचे सर्व शेर्पा, जितेंद्र, मामा अशा सर्वांनीच त्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. माझ्यासाठी तर ही मोहीम खूपच मोलाचे अनुभव देऊन गेली. कारण माझ्यातला गिर्यारोहक आणि डॉक्टर या दोन्ही भूमिकांची या मोहिमेने चांगलीच कसोटी पाहिली. आपण या दोन्ही भूमिकांना न्याय देऊ शकलो याचा मला आनंद होता. समिट झाल्यानंतर प्रचंड थकलेलो असतानाही या दोन्ही भूमिका मला माझ्या कर्तव्यासाठी प्रेरित करत होत्या. गिर्यारोहणातील एव्हरेस्ट भलेही मी अजून गाठू शकलेलो नाही, पण या मोहिमेत मला जे वैद्यकीय योगदान देता आलं त्यामुळे मला जणू एव्हरेस्ट चढल्याएवढाच आनंद झाला. कांचनजुंगा शिखराचं हे दुहेरी यश मला गिर्यारोहणातील एव्हरेस्ट गाठण्यासाठी नक्कीच प्रेरित करत राहील.
या साऱ्या पार्श्वभूमीवर मला आयुर्वेदामध्ये चिकित्सेची महती सांगणाऱ्या सूत्राची आठवण होते.
क्वचिदर्न्नः क्वचिद्धर्मः क्वचिन्मैत्री क्वचित् यशः।
कर्माभ्यासः क्वचिच्चेति चिकित्सा नास्ति निष्फला।
याचा अर्थ असा, की चिकित्सा करत असताना वैद्याला अर्थप्राप्ती होते, धर्मप्राप्ती होते, नवीन मित्र जोडले जातात आणि कधी त्या चिकित्सेतून यशप्राप्तीही होते. कधी अपयश आलंच, तरीही प्रात्यक्षिकाचा अनुभव तर मिळतोच. म्हणून चिकित्सा कधीच निष्फळ ठरत नाही. यात थोडासा बदल करून मला म्हणावंसं वाटतं, की गिर्यारोहण एवं चिकित्सा नास्ति निष्फला।
डॉ. सुमित मांदळे | drsumitmandale91@gmail.com
डॉ. सुमित मांदळे हे पट्टीचे प्रस्तरारोहक, गिर्यारोहक आणि गिरिप्रेमी संस्थेचे कार्यकर्ते आहेत.