
दक्षिण आफ्रिकेत आढळणारा बाओबाब नावाचा वृक्ष इतका प्रचंड असतो की काही काही झाडांच्या ढोलीत एकावेळी तब्बल चाळीस लोक मावू शकतात. काही ठिकाणी या झाडांमध्येच लोक घर करून राहतात, तर काही ठिकाणी झाडांमध्ये बार आणि दुकानंही चालवली जातात.
‘अंगणात एक बाओबाब झाड असेल तर खाण्या-पिण्याचाच काय, पण राहण्याचाही प्रश्न सुटू शकतो’, असं आफ्रिकेत म्हटलं जातं. बाओबाब या वृक्षाचा घेर दहा मीटरपर्यंत असू शकतो.
हे झाड पाणी साठवण्याचाही उत्तम स्रोत आहे. पावसाळ्यात याचं खोड पाणी शोषून घेतं. पुढे पाण्याच्या टंचाईच्या काळात त्या खोडाला भोक पाडून ते पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकतं. बाओबाबचं फळ वरून टणक आणि आतून रसाळ, गोड, पावासारखं मऊसूत असतं. आफ्रिकेतले लोक ते चवीने खातात. त्यातून मुबलक प्रमाणात स्टार्च, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियम मिळत असल्यामुळे भूकही भागते. बाओबाबच्या बियांपासून खाद्यतेल बनतं. याच्या पानांची भाजी बनवली जाते. तसंच त्याचं सूप, सॅलडही चविष्ट लागतं. याच्या वाळलेल्या पानांचा उपयोग कागद, कपडे आणि दोरी बनवण्यासाठी केला जातो. हे सगळे उपयोग कमी की काय म्हणून या झाडाच्या प्रचंड खोडांचा वापर लोक घर म्हणूनही करतात.
परंतु अलीकडच्या काळात हवामान बदलांमुळे बाओबाब धोक्यात आलं आहे. या झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. बाओबाब जगातून नष्ट होईल की काय असा प्रश्न तयार झाला आहे.
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.