आम्ही कोण?
अनुभव 

'नागामानूं'चा योग

  • मुकुंद कुलकर्णी
  • 01.12.25
  • वाचनवेळ 6 मि.
man rutale kshan

मी देशभर खूप फिरलो. ही फिरस्ती अगदी तरुणपणीच सुरू झाली. या उटपटांग फिरस्तीत मी परिस्थितीच्या थपडा झेलत, गोंधळाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात, हाती गवसेल ते धरत तगण्याचा प्रयत्न करत आलो. नशिबाने साथ दिली, जिवलगांनी हात दिला आणि जगण्याला चाल मिळाली. या चालीतून मला काय मिळालं हे 'बॅलन्स शीट'च्या भाषेत नाही सांगता येणार; मात्र व्यक्त झालेल्या आणि अव्यक्त राहिलेल्या या घटना-क्षणांनी एरवी सर्वसामान्य या सदरात मोडणाऱ्या माझ्या जगण्याला श्रीमंती दिली.

ज्यांना आपण वंचित घटक म्हणतो, ते बहुसंख्येने असलेल्या प्रदेशात माझी फिरस्ती अधिक झाली. त्यातही देशाच्या आदिवासी पट्ट्यांत मी जास्त रमलो आणि मनापासून भटकलो. ईशान्येत अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये सहा वर्षं मुक्कामी होतो, तेव्हा असाम आणि ईशान्येतली इतर राज्यं पालथी घालण्याची संधी मिळाली. ही भटकंती मी वेगवेगळ्या भूमिकेत आणि भिन्न भिन्न संस्था आणि संघटनांच्या पाट्या हाती घेऊन केली. कधी कुणाचा पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून शिक्षक, मुख्याध्यापक झालो. तर कधी प्रकल्प समन्वयक, नंतर कधी पत्रकार, संपादक होऊन 'इशू' शोधत भटकलो. तळागाळातले प्रदेश आणि समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्यापैकी एक बनून राहण्याचा प्रयत्न केला. ते जे खातात ते खाल्लं, जे पितात ते प्यायलो. त्यांच्या उत्सवात आनंदाने नाचलो. त्या अतरंगी अनुभवांच्या गाठोड्यातले हे 'मन रुतले क्षण'..

दिमापूर सेंटरची सकाळ भारी सुरेख असायची. सेंटरच्या एका प्रशस्त कोपऱ्यात रामकृष्णांचं आखीव-रेखीव असं मंदिर होतं. मोठं सभागृह अन् त्यांच्या भिंतीजवळ रामकृष्ण, शारदामाँ आणि विवेकानंदांच्या तसबिरी होत्या. ३०- ३५ लोक मोकळेपणानं वावरू शकतील असा हा हॉल होता. मंदिराच्या अवतीभवती आमरा नामक फळांची मोठी झुपकेदार झाडं, बेलाचे ताडमाड वाढलेले वृक्ष आणि पिवळ्या-पांढऱ्या चाफ्याची दाटी असायची. पहाटे पाच वाजताच मंदिर समयांच्या प्रकाशात न्हाऊन निघायचं. मंद हवा आणि सहज स्पर्श करण्याजोगी शांतता, सगळंच वातावरण मनाला एका अपरिचित अशा दुनियेत घेऊन जायचं.

साडेपाचला लोक जमू लागायचे. प्रत्येकाच्या काखेत योगा मॅट असायची. मंदिराच्या सभागृहात ओळीने थोडी दाटी करत प्रत्येकजण आपापली मॅट अंथरून बसायचा. बरोबर पावणेसहाच्या ठोक्याला वर्ग सुरू व्हायचा. २१ दिवसांचं एक शिबिर असायचं. जवळजवळ वर्षभर सकाळचा हा कार्यक्रम असायचा. आम्ही दोन-तीन कार्यकर्ते आलटून-पालटून हे शिबिर घ्यायचो. बऱ्याचदा सेंटरच्या बाहेरदेखील अशी शिबिरं चालायची. नागालँडमध्ये ही आमची 'आऊट-रीच' ॲक्टिव्हिटी होती. दवाखाना आणि शाळा यांमार्फत आम्ही समाजात जायचोच; पण त्याला मर्यादा होत्या. त्यामानाने योगासन शिबिरांद्वारे व्यापारी, लष्करी आणि सरकारी अधिकारी, प्राध्यापक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यापर्यंत आमचा संपर्क होत असे. लोकसहभाग हीच आमची 'लाइफलाइन' होती. त्या वेळी विवेकानंद केंद्राने त्या भागात योगासनांचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात केला होता. आश्चर्य म्हणजे या शिबिरांना सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत असे. अगदी नागा मंडळीदेखील इमानदारीने या शिबिरात भाग घेत असत.

man rutale kshan

नागा मंडळींचं शिबिर म्हणजे धमालच असायची. ताकदीचं काम, कापाकापी, तोडातोडी अन् भोसकाभोसकी ते अगदी सहज करतील, पण संथपणे शारीरिक हालचाली करणं, मांडी घालून शांत बसणं म्हणजे त्यांच्यासाठी महाकठीण काम. तिंबलेल्या मातीसारखी घट्ट शरीरं आसनांच्या चौकटीत यायलाच तयार नसायची. पण पठ्ठे मोठे जिद्दीचे. कण्हत- कुंथत, दम टाकत ते आसनांचे गड चढायचे. बहुतेकांना पोटाच्या तक्रारी, घशातील जळजळ अन् पोटातील ॲसिडिटी वगैरे त्रास. लठ्ठपणा, पोट सुटणं हे प्रकार फार कमी. अन् जी काही टोलेजंग मंडळी यायची ती आसनांच्या केव्हाच पार गेलेली असायची. खाण्याचं बंधन म्हणजे महापाप ! गाय-बैल, डुक्कर आणि कुत्रा असे चवदार पदार्थ सोडून झाडपाला काय खायचा? 'ए तो ना होबो दे!' त्यामुळे पतंजली बाबांची क्षमा मागून आमची खास नागालॅण्डी योगासनं चालत असत. प्राणायाम करताना तर हसून जीव जाईल का अशी भीती वाटत असे. बरं, हसताही येत नसे. आपल्या नाक नामक 'छोटुशा' अवयवावर कष्टाने रापलेल्या भक्कम हाताची 'रिंगफिंगर' आणि हातोडीसारखा अंगठा ठेवून नाडी शुद्धीची कसरत करताना या मंडळींच्या चेहरा नामक सपाट पटलावर जो काही भांगडा होत असे तो बघताना हसून वाट लागत असे.

योगासन शिबिरादरम्यान आहारविहार काय असावा या पारंपरिक आश्रमीय तत्त्वचर्चेला पार खुंटीवर टांगून ठेवावं लागे. आहार म्हणजे सर्वाहार. सम्यक् किंवा सात्त्विक आहार नावाची भानगड आमच्या शिबिरात अजिबात नसायची. 'योगासनासाठी रिकाम्या पोटी यायचं, चहासुद्धा घ्यायचा नाही, रात्री खूप जागरण करायचं नाही, खूप खायचं-प्यायचं नाही, कुठलंही आसन जोर लावून करायचं नाही', वगैरे सर्वसामान्य सूचना शिबिराच्या पहिल्या दिवशी देण्यात येत असत. त्याचं पालन मंडळी प्रामाणिकपणे करत असत.

असंच एक शिबिर होतं. नोव्हेंबरचे दिवस होते. ३५ जणांपैकी तीन-चार जण वगळता बाकी सगळे 'नागामानू' होते. नागा मंडळींचा उत्साह जबर. साडेचार वाजल्यापासूनच 'सर, आई बो दे', म्हणजे 'मी आलो रे' असे हाकारे सुरू व्हायचे. माझी सकाळ चार वाजताच होत असे. त्यामुळे एकदम इम्प्रेशन'! 'आहीबो दे' म्हणून मी स्वागत करायचो. माझी साफसफाईची काम सुरू असायची. न बोलता किंवा विचारता मंडळी माझ्या कामात सामील व्हायची. नागालॅण्डचा हा अगदी सुखावणारा अनुभव. मी झाडू कसा मारू किंवा रामकृष्णांची तसबीर कशी पुसू असा संभ्रम नाही. बरं, काम करताना टकळी सुरू. विवेकानंदांना 'इमान हँडसम असे दे' अशी कॉम्प्लिमेंट मिळे, तर रामकृष्णांना 'देखे परा सेंट लागे दे' अशी. 'प्लेन मानू' मात्र उशिरा उगवायचे.

मग पद्धतशीर आसन, प्राणायाम सुरू व्हायचे. या मोठ्या बाप्यांनाही 'बोलू नका, खसखस करू नका' असं सारखं सांगावं लागे. 'माझं डोकं बघ गुडघ्याला टेकतं. तुझं पोट आडवं येतं... किती खातो!' अशी खेचाखेची सतत चालायची. 'ऐ सर, आसन होते पार स्टमक बिखायसे दे', (आसन केल्यानंतर पोट दुखतं) अशी तक्रार दोन दिवसांनंतर दोन-तीन लोकांनी केली. आदल्या दिवशी काय खाल्लं, केव्हा झोपले वगैरे चौकशी केली; पण त्यात काहीच वावगं नव्हतं. 'रात्री कमीच जेवलो. सकाळी चहासुद्धा घेतला नाही', असं त्यांनी सांगितलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा तीच तक्रार. मग त्यांना दवाखान्यात पाठवलं. चौथ्या दिवशी पुन्हा तोंड वाकडं ते वाकडंच ! मला कळेना, भानगड तरी काय आहे?

बरं, चौघांची ही पोटदुखी साऱ्या शिबिराच्याच चर्चेचा विषय बनली. शेवटी त्या चौघांना समोर बसवलं आणि बारकाईने चौकशी सुरू केली. वस्तीत सध्या पूर्ण वाढ झालेली पाच-सहा यॉर्कशायर डुकरं आणली होती. त्यांचं मांस फारच रुचकर आहे वगैरे त्यांच्या आवडीच्या चर्चा सुरू केल्या. "मग काय आणि किती वेळा खातोस?" या प्रश्नावर त्यातला एकजण लाजला. शांत बसून राहिला. काहीच उत्तर नाही. त्याचा जोडीदार रहस्य सांगितल्यासारखं म्हणाला, "सर, खाटेखालीच टोपलीत मांस असतं. हा केव्हाही खातो." मग माझी ट्यूब लागली. म्हटलं, "सकाळी उठून काय काय करतोस ते सांग." "सर, चहा घेतच नाही. तुम्ही नको म्हणून सांगितलंयत ना. पण रात्री लवकर जेवलो म्हणून उठल्या उठल्या भूक लागली. म्हणून डुक्कर खाल्लं." हा पठ्ठ्या पहाटे चार वाजता डुकराचं कच्चं मांस खाऊन थेट योगासनं करायला बसत होता. पोट दुखेल नाही तर काय !

इतरांशी बोलल्यावर लक्षात आलं की त्यांच्या पोटदुखीमागे हेच कारण होतं. या पठ्ठ्यानेच इतरांना 'स्पेशल' मांस म्हणून डुक्कर दिलं. वरून तुम्ही चहा घेऊ नका हेही सांगितलं. मी त्यांना चहाही घ्यायचा नाही, असं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी चहा घेतला नसल्याचं सांगितलं. पण डुकराविषयी काहीच बोलणं झालं नव्हतं, मग ते कशाला सांगायचं?

त्यानंतर मात्र मी योगासनं करण्याआधी कोणताही द्विपाद किंवा चतुष्पाद प्राणी खाऊ नका, अशा नव्या सूचनांची आळवणी सुरू केली. पण आमचा हा किस्सा ऐकून हिमालयाच्या कुठल्याशा शिखरावर प‌द्मासनात बसलेले पतंजली बाबादेखील गारद झाले असतील यात मला शंका नाही.

(समकालीन प्रकाशनाच्या 'मन रुतले क्षण' या ताज्या पुस्तकातून साभार)

मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com

मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results