स्वामी विवेकानंद भारत भ्रमणासाठी निघाले तेव्हा ते फक्त २७ वर्षांचे होते. तेव्हा त्यांची ना विशेष ओळख निर्माण झाली होती, ना त्यांच्याभोवती प्रसिद्धीचं वलय होतं. त्यांची एकाकी वाटचाल चालू होती. एकदा ते आग्र्याहून मथुरेकडे निघाले होते. रणरणतं ऊन, धुळीने माखलेले रस्ते, पायांत काही नाही. गरमीने जीव कासावीस झाला होता. ते पार थकून गेले होते. थोडं थांबावं म्हणून ते सावलीसाठी सभोवार बघत होते. बघितलं तर एका खुरटलेल्या झाडाच्या अर्धवट सावलीत एक माणूस निवांतपणे चिलीम ओढत बसला होता. वाढलेली दाढी, डोक्याला बांधलेलं मळकट फडकं, जवळ उलटं केलेलं घमेलं आणि खराटा, अशा अवतारात तो माणूस झाडाच्या खोडाला टेकून झुरके घेत होता.
विवेकानंद त्याच्या जवळ गेले अन् म्हणाले, “एकटेच काय चिलीम ओढताय! मला पण चार-दोन झुरके ओढू द्या ना. खूप थकलो आहे मी.” तो माणूस दचकलाच. धुळीने घामाघूम झालेला पण तेजस्वी संन्यासी त्याला हसत चिलीम मागत होता. तो तिरीमिरीने दूर होत म्हणाला, “स्वामी, दूर व्हा! मी भंगी आहे. लोकांनी केलेली घाण साफ करतो. तुम्ही कोणी साधू-महात्मा दिसता. माझ्या जवळ येऊ नका. माझ्या सावलीच्या स्पर्शानेदेखील तुम्हाला पाप लागेल.” विवेकानंद त्याच्या जवळ जात म्हणाले, “अरे दादा, उलटं घमेलं आणि खराटा यावरून मी ओळखलं की तुम्ही भंगी आहात. मी स्वामी आहे ना? म्हणून तुम्हाला नक्की सांगतो, की भंग्याची सावली आपल्यावर पडू नये, त्याच्याबरोबर बसून चिलीम ओढू नये, असं कुठल्याही धर्मग्रंथात लिहिलेलं नाही. आणा ती चिलीम, जरा वेळ मजेत झुरके घेऊ नि गप्पा मारू! मग तुम्ही तुमच्या कामाला जा, मी माझ्या मार्गाने जातो!” असं म्हणून विवेकानंद त्याच्या शेजारी बसले.
विवेकानंदांनी ना कधी जातिभेद स्वीकारला, ना मानला. ते आयुष्यभर जातिभेदाविरुद्ध बोलत राहिले. त्या काळात त्यांच्या आधी एवढ्या स्पष्टपणे कुणी बोललं नव्हतं. विवेकानंदांचं गौतम बुद्धांवर फार प्रेम होतं. त्या काळी आपल्या देशाच्या गरिबी आणि मागासलेपणाला वर्णव्यवस्था हे एकच मुख्य कारण आहे, हे बुद्धांनी सर्वप्रथम जाणलं होतं. त्यामुळे वर्णव्यवस्था जातिभेद, अस्पृश्यता याबद्दल ते कठोरपणे बोलतच, शिवाय त्याबाबतीत कृतिशीलही असत. त्यांनी आपल्या मठात ब्राह्मण, भंगी, मुसलमान ही सगळी मुलं एकत्र राहतील आणि एकत्र जेवतील अशी व्यवस्था लावली होती.
जातिभेदावर विवेकानंद अक्षरश: आग पाखडत. ते म्हणत, “हिंदू धर्माइतका इतर कोणताही धर्म माणसाच्या मोठेपणाची दवंडी पिटत नाही, पण त्याच वेळी गरीब आणि खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या लोकांना हिंदू धर्म जितका तुडवतो, तितका जगातला इतर कोणताही धर्म तुडवत नाही.”
जातिभेदात भरडलेल्या लोकांबद्दल विवेकानंद कमालीचे व्याकूळ होत. पण तेवढ्यावर न थांबता ते या समाजाच्या हीनदीन अवस्थेवर उपाय शोधण्याच्याही मागे असत. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर बेतलेलं शिक्षण दिलं गेलं तर समाज बदलेल असं त्यांना वाटे. आश्चर्य वाटेल, पण विवेकानंदांनी अस्पृश्यांसाठी १०० टक्के आरक्षण मागितलं होतं. शिवाय “अस्पृश्यांना केवळ आरक्षण देऊन काही उपयोग नाही. कारण आपण अनेक शतकं त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवलं आहे. आपल्याला एका शिक्षकाची गरज असेल तर त्यांना सात शिक्षक लागतील. त्यांच्यासाठी सातपट शिक्षणाची सोय आपण केली पाहिजे. आपल्याला त्यांच्यासाठी १० पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय करावी लागेल,” असं ते म्हणत.
विवेकानंदांचा जातिभेद, अस्पृश्यतेला जसा विरोध होता, तसाच धर्माच्या नावाने होणाऱ्या भेदाभेदालाही होता. हिंदू-मुसलमान असा भेद ते करत नसत. सर्व धर्म एकच संदेश देतात आणि सर्व माणसं समान आहेत यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
त्या वेळी विवेकानंद हिमालयातील अलमोरा गावाकडे निघाले होते. अलमोऱ्याचा छातीवर येणारा पहाड चढताना त्यांची दमछाक होत होती. चक्कर येत होती म्हणून ते अडखळत चालत होते. त्यांची अशी अवस्था बघून कडेला बसलेला एक मुसलमान फकीर म्हणाला, “स्वामी, खडा पहाड आहे. जवळपास विश्रांतीला जागा नाही. काही तरी पोटात टाका.” यावर विवेकानंद फक्त हसले. कारण पोटात टाकायला जवळ काहीच नव्हतं. फकीर काय ते समजला आणि म्हणाला, “माझ्याकडे काकडी आहे, ती खा. थोडी हुशारी येईल. पण मी मुसलमान आहे. माझ्याजवळची, माझ्या हातची काकडी चालेल का तुम्हाला?” त्यावर विवेकानंद त्याला म्हणाले, “आपल्या शरीरावर तू मुसलमान आहेस आणि मी हिंदू आहे असं कुठं लिहिलं आहे का? नाही ना? अरे, मी आणि तू समानच आहोत. आण ती काकडी!”
या घटनेची आठवण कायम राहावी म्हणून पुढे विवेकानंदांच्या अनुयायांनी त्या जागेवर येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी एक छोटं पण उपयोगी विश्रामगृह बांधलं आहे. जवळच त्या फकिराची झोपडीदेखील उभी आहे. आजही तिथे त्या फकिराचे वंशज राहतात.
आणखी अशीच एक घटना सांगता येईल.
भटकंतीच्या फेऱ्यात विवेकानंद अबूच्या पहाडात शिरले होते. काही दिवस तिथे मुक्काम करावा, असा विचार करून त्यांनी एक गुहा निवडली. तिथे तळ ठोकावा, सकाळी उठून भोवतालच्या खेड्यात फिरावं, मिळेल तो भाकरतुकडा खावा, लोकांशी बोलावं, त्यांचं जगणं बघावं, त्यांच्याशी संवाद साधावा आणि परत मुक्कामाला गुहेत यावं, असा त्यांचा दिनक्रम असे.
विवेकानंदांनी ज्या गुहेत आपला मुक्काम ठेवला होता ती गुहा अजब होती. तिथे दिवस-रात्र सतत वारा भणाणत असे. रात्री थंडी मी म्हणे. या गुहेपासून जवळच एक लहान संस्थान होतं. दिलावरखान नावाचा त्या संस्थानचा दिवाण होता. एके दिवशी तो तिथून जात असताना त्याला गुहेत बसलेले विवेकानंद दिसले. दाढी वाढलेली, चेहऱ्यावर प्रेमळ तेज असलेला हा तरुण संन्यासी आपल्याच तंद्रीत पुस्तक वाचत होता. समोर एका घमेल्यात पेटते कोळसे ठेवले होते.
हे दृश्य पाहून दिलावरखानाची उत्सुकता वाढली. त्याने सहज विचारलं, “स्वामी, अशा थंडगार भूत-वाऱ्याच्या जागी का बसला आहात?” यावर विवेकानंद मिस्किलपणे म्हणाले, “अहो, सगळ्या कडेकपारींतून असाच वारा भणाणत असतो. तुम्ही या गुहेच्या तोंडाशी दार बसवून द्या ना!” दु:खी स्वरात दिलावरखान उत्तरले. “आता काय सांगू! दार बसवलं होतं; पण भोवताली इतकी गरिबी आहे, की दोनच दिवसांत चूल पेटवण्यासाठी म्हणून कुणी तरी ते दार उचकटून घेऊन गेलं!” पुस्तकावरची नजर न काढता विवेकानंद म्हणाले, “मला हीच गुहा बरी वाटली. तुम्ही भोवताली कुठे अधिक चांगली गुहा पाहिली असेल तर सांगा. मी तिकडे मुक्काम हलवतो.” दिलावरखान म्हणाले, “महाराज, मग माझ्या घरीच मुक्कामाला का येत नाही? इथून जवळच माझा मोठा वाडा आहे.” विवेकानंद म्हणाले, “चला, लगेच निघू या. ही गळ्यातील धोपटी सोडता माझ्याकडे कधीच काही सामान नसतं.” कदाचित हा हिंदू संन्यासी लगेच तयार होईल, असं दिलावरखानांना वाटलं नसावं. गडबडीने दिलावरखान म्हणाले, “स्वामी, पण एक अडचण आहे. मी मुसलमान आहे.” यावर विवेकानंद म्हणाले, “जवळ या, तुमचा हात बघू द्या. तुम्ही मुसलमान आहात, असं अल्लाने लिहून पाठवलं आहे का? सारी माणसं समान, सारी परमेश्वराची किंवा अल्लाची लेकरं. आपण भाऊ-भाऊच. चला तुमच्या घरी.”
हिंदू-मुसलमान समानता आणि समन्वय यावर विवेकानंद अगदी पोटतिडकीने अन् सहजपणे बोलत. भारतात मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या जुलुमाने किंवा प्रलोभनाने धर्मांतरं झाली नसून इथल्या उच्च- वर्णीयांच्या अत्याचारांमुळे झालीत, हे तोपर्यंत कुणीही इतक्या जाहीरपणे बोललेलं नव्हता, ते विवेकानंद बेधडक बोलत. त्यांनी डोळसपणे इतिहास अभ्यासला होता. “मुगलांच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होतं, त्याचा अंशमात्रसुद्धा पुणे दरबारात दिसत नाही,’’ असं ते बिनधास्त सांगत. पुढे ‘मुसलमान राजवटीचं योगदान' या विषयावर अमेरिकेत बोलताना ‘मुसलमानी राजवटीत गरीब आणि दलितांची स्थिती सुधारली होती, कारण विशेष अधिकार संपवण्यात आले होते,’ असं तथ्यगत निरीक्षण त्यांनी नोंदवलं. हिंदू-मुसलमान यांच्यातील बंधुभाव व समन्वय देशाची प्रगती साधणारा ठरेल, कारण या दोन घटकांनीच मिळूनच भारत बनला आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं होतं. मुसलमान किंवा मुगलांना ते परकीय मानायला तयार नसत. शहाजहान बादशहाला तुम्ही बाहेरचा-परका म्हटलं तर कबरीमध्ये त्याची हाडं खळखळतील, असं ते म्हणत.
(समकालीन प्रकाशनाच्या ‘असे होते विवेकानंद’ या मुकुंद कुलकर्णी लिखित पुस्तकातून साभार.)
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.
