डोनाल्ड ट्रम्प यांची स्व-प्रतिमा काहीच्या काही अफलातून आहे. ते अजून स्वत:ला ‘नॉन-बायोलॉजिकल’ मानत नसले तरी त्यांची दिशा साधारण तीच आहे. आपणच पृथ्वीतलावरचे सर्वोत्कृष्ट मानव आहोत, अशी त्यांची मनोरचना आहे. त्यामुळेच आपण नोबेल पारितोषिकासाठी सर्वोत्तम उमेदवार आहोत, असं त्यांना सध्या वाटत आहे.
तसं पाहिलं तर २०१६मध्ये ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हापासूनच आपण कुणी तरी थोर आहोत, असा त्यांचा समज झाला होता. पण २०२४मध्ये ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्या भावनेला पारावार उरलेला नाही. रोज सकाळी उठून ते स्वत:बद्दल वाट्टेल ती मुक्ताफळं उधळत असतात. कधी त्यांना आपण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट राष्ट्राध्यक्ष असल्याचा साक्षात्कार होतो, तर कधी आपल्यामुळेच जगात शांतता नांदत असल्याचं वाटत असतं. त्यांच्या प्रत्येक पावलामुळे कधी आफ्रिकेचं भलं होत असतं, तर कधी आखाती प्रदेशाचं. कधी सीरिया-कोसोवो यांच्यातलं युद्ध आपण थांबवलं असं त्यांना वाटत असतं, तर कधी भारत-पाकिस्तान संघर्ष आपल्या एका इशाऱ्यावर थांबला अशी त्यांची खात्री असते. अण्वस्त्रनिर्मिती थांबवा म्हटलं की इराण त्या केंद्रांना कुलंपं लावून गुपचूप बसेल असंही त्यांना वाटतं. ‘चूप’ म्हटलं की युक्रेन गप्प बसेल आणि ‘प्रश्न सोडवा’ म्हटलं की पॅलेस्टाइन-इस्रायल गळ्यात गळे घालतील, असं त्यांना वाटत असतं. मनासारखं झालं नाही की अद्वातद्वा अपमानास्पद बोलण्याचा आंतरराष्ट्रीय परवाना आपल्याकडे आहे, असंही त्यांना वाटत असतं.
दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ज्या एकतर्फी पद्धतीने मेक्सिकोच्या आखाताचं नाव अमेरिकेचं आखात असं करून टाकलं आणि कॅनडाला अमेरिकेचं ५१वं राज्य करण्याचं जाहीर करून टाकलं, तेव्हाच या इसमाच्या मेंदूतील हालचालींचा अंदाज आला होता. पाठोपाठ त्यांनी ग्रीनलँड या डेन्मार्कच्या ताब्यातील बेटावर आपला दावा सांगायला सुरुवात केली. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेले निर्णय मूर्खपणाचे होते आणि आपण त्याला जबाबदार नाही, अशीही भूमिका ते घेऊ लागले. यापूर्वी अमेरिकेने किती मूर्ख निर्णय घेतले होते, तेही सांगून ते अमेरिकेलाच मान खाली घालायला लागू लागले. त्यांची घोषणाच मुळी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन' अशी असल्यामुळे यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांमुळेच अमेरिकेचं खोबरं झालेलं आहे, अशी त्यांची भूमिका आहे. आपण स्वत: ‘ग्रेट’ आहोत, त्यामुळे आपणच अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवणार आहोत, अशी त्यांची मनोरचना आहे.
अशा सगळ्या अवास्तविक स्वप्रतिमेमुळेच नॉर्वेच्या संसदेने एकमुखाने विनाविलंब नोबेल पुरस्कार त्यांना जाहीर करावा आणि त्यांच्या चरणी आणून ठेवावा, असं ट्रम्प यांना वाटत आहे. आपण जगातली किती युद्धं आणि युद्धहानी थांबवली आहे, आपण किती देशांमधील संघर्ष रोखले आहेत, आपण जगात किती शांती करार घडवून आणले आहेत आणि दुरावलेल्या किती देशांमध्ये सामंजस्य घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत, हे तर ते पाढे म्हटल्यासारखे रोज जगाला सांगत आहेत. त्यांचं एक बरं आहे. ते उगाच कुणामार्फत वगैरे आपलं नाव सुचवलं जावं, असा बावळटपणा करत नाहीत. थेट स्वत:च दावा ठोकतात. तोही समोरासमोर जाहीरपणे.
यंदाचा नोबेल पुरस्कार आपल्यालाच मिळायला हवा असं त्यांनी एक ना अनेकदा म्हणून झालेलं असलं, तरी आपल्याला हा पुरस्कार मिळणार नाही याचीही जाणीव त्यांना आहे. तीही त्यांनी बोलून दाखवली आहे. तीही खास आपल्या विभाजनवादी पद्धतीने. ‘माझं नाव बराक ओबामा असतं तर दहा सेकंदांत मला नोबेल दिलं गेलं असतं,’ असं ट्रम्प म्हणाले आहेत. वर्णाने काळ्या लोकांना नोबेल सहजी मिळतं, असं त्यांना सुचवायचं होतं का माहीत नाही, पण आपण कितीही थोर काम केलं तरी आपल्याला नोबेल दिलं जाणार नाही, असं ते आता उद्वेगाने म्हणू लागले आहेत.
खरं तर ट्रम्प यांना नोबेलचं एवढं काय पडलंय हे कळण्यापलीकडचं आहे. नोबेलच्या पलीकडची लोकमान्यता ज्यांना मिळाली आहे अशा अनेकांशी ट्रम्प यांनी स्वत:ची तुलना करून झाली आहे. त्यात बीटल्स, एल्विस प्रिस्ले, मदर टेरेसा इथपासून जॉर्ज वॉशिंग्टन आणि मार्टिन ल्युथर किंग असे सगळे आहेत. दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांच्या कामगिरीबद्दल बोलतानाही त्यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यासोबत स्वतःची तुलना केली होती. एवढंच काय, येशू ख्रिस्तामध्ये आणि आपल्यामध्ये काय साम्य आहे, हेही त्यांनी सांगून झालं आहे. त्यामुळेच एवढ्या महान पदापर्यंत पोहोचलेल्याला नोबेलची एवढी आस का पडली असावी, हा प्रश्नच आहे.
पण कदाचित थिओडर रुझवेल्ट, वुड्रो विल्सन, जिमी कार्टर आणि बराक ओबामा या चार राष्ट्राध्यक्षांना आणि अल गोर या उपराष्ट्राध्यक्षांना यापूर्वी मिळालेली नोबेल पारितोषिकं ट्रम्पना छळत असणार! इतिहासात आपली नोंद कशी होईल याची शाश्वती वाटत नसल्याने किमान नोबेलची मोहोर तरी आपल्या नावावर उमटावी, अशी धडपड त्यामागे असणार. ज्या ट्रम्प यांनी कोणतंही कारण नसताना इराणवर बाँबहल्ला केला, धमकावणीची भाषा केली, गाझावर इस्रायलच्या अमानवी हल्ल्याचं समर्थन केलं, त्यांची नोंद इतिहासात युद्धखोर आणि मस्तवाल अशीच होणार असल्याने ट्रम्प यांना नॉर्वेच्या संसदेचे हात पिरगाळून नोबेल हवं असणार.
आजवर ट्रम्प यांना नोबेल मिळावं अशी शिफारस सहा वेळा झालीय म्हणे. पण नोबेलवाले भीक घालायला तयार नाहीत. यंदा तर जगभरात युद्धखोर आणि अतिरेक्यांचा अड्डा अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानचीच शिफारस ट्रम्प घेऊन आले आहेत. शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी पाकिस्तानची शिफारस घेऊन येण्यासारखा दुसरा विनोद नोबेल पुरस्काराबाबतीत नसावा.
पण ट्रम्प हैं की मानते नहीं! वेळ पडली तर नॉर्वेला विकत घेण्याचा मनसुबा ते जाहीर करतील आणि नोबेल मिळवतीलही. ‘मला एक चानस हवा’ असं त्यांनी ठरवलं असेल तर नोबेलवाल्यांची काही धडगत नाही!
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
