एका ताज्या अभ्यासानुसार, जगभरात कर्करोगामुळे होणाऱ्या बालमृत्यूंपैकी ९४ टक्के मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होत आहेत. 'द लॅन्सेट' या प्रसिद्ध वैद्यकीय मासिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. गरीब आणि विकसनशील देशांतील आरोग्य सुविधांच्या अभावामुळे मुलांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलं आहे. शिवाय लहान मुलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाणसुद्धा याच देशांमध्ये अधिक (८५ टक्के) असल्याची नोंद 'लॅन्सेट'च्या अहवालात आहे.
जगभरात दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन लाख मुलांना कॅन्सरची लागण होते. भारतातील कॅन्सरग्रस्त लहान मुलांचा सरासरी आकडा हा वषार्ला ५० ते ५५ हजारांच्या घरात आहे. म्हणजेच लहान मुलांच्या कॅन्सरचे जगभरातील २० टक्के पेशंट भारतात आहेत. भारतात लहान मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. हे गुणोत्तर २:३ असं आहे. म्हणजेच कॅन्सरबाधित दर दोन मुलींमागे तीन मुलगे कॅन्सरग्रस्त आहेत. भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमधील लहान मुलांमध्ये कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे.
हेही वाचा - कॅन्सरचा वाढता विळखा: उपाय काय?
ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज, इंज्युरी अँड रिस्क फॅक्टर्सच्या (GBD) २०२३ मधील अभ्यासानुसार एका वर्षांत जगभरातील जवळपास ३ लाख ७७ हजार लहान मुलांना कॅन्सरचं निदान झालं. त्यापैकी १ लाख ४४ हजार मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी सर्वाधिक १७ हजार मृत्यू भारतातील आहेत. भारताखालोखाल चीनमध्ये हा आकडा १६ हजार आहे. तर नायजेरिया आणि पाकिस्तानमधील प्रत्येकी ९ हजार मुलं कॅन्सरच्या दुर्धर आजारामुळे मृत्युमुखी पडली.
वैद्यकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे लोकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळू लागल्या आहेत. अनेक दुर्धर आजारांवर संशोधन करून नवीन उपचार पद्धती विकसित झाल्यामुळे आजारांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येतही घट होत आहे. जगभरातील लहान मुलांमधील कॅन्सर मृत्यूंच्या बाबतीत १९९०च्या तुलनेत २७ टक्के घट झाली आहे. पण उलट गरीब देशांची आकडेवारी धक्कादायक म्हणावी अशी आहे. १९९०च्या तुलनेत एकट्या आफ्रिका खंडातील लहान मुलांमधील कॅन्सर मृत्यूचं प्रमाण ५५.६ टक्क्यांनी वाढलं आहे.
हेही वाचा - इवलासा जीव - आभाळाएवढी संवेदना
जगभरात लहान मुलं मृत्युमुखी पडण्याच्या कारणांमध्ये कॅन्सरचं कारण हे आठव्या क्रमांकावर आहे. तर भारतात कॅन्सर हे बालमृत्यूसाठी जबाबदार असलेलं दहाव्या क्रमांकाचं कारण आहे. यामध्ये पहिला क्रमांक न्यूमोनिया सारख्या संसर्गजन्य आजाराचा आहे. याव्यतिरिक्त कुपोषण, मुदतपूर्व प्रसुती, हगवण, मलेरिया ही महत्त्वाची कारणं लहान मुलांच्या मृत्यूमागे आहेत. कॅन्सरच्या बाबतीत विचार करता लहान मुलांमधील सर्वाधिक मृत्यू हे ल्युकेमिया म्हणजेच रक्ताच्या कॅन्सरमुळे (जवळपास ४६ हजार) झाले आहेत. त्याखालोखाल मेंदूच्या कॅन्सरमुळे जवळपास २३ हजार, तर 'नॉन-हॉजकिन्स लिम्फोमा' म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशीतील कॅन्सरमुळे जवळपास १५ हजार मुलांचा मृत्यू झालेला आहे. जगातील काही विकसनशील देशांमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरमधून वाचण्याचं प्रमाण ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत आहे. भारतात मात्र हेच प्रमाण ६० टक्के आहे. उपचारातील त्रुटी हे त्यामागील मुख्य कारण आहे.
गरीब देशांमध्ये कॅन्सरच्या निदानास होणारा विलंब हे तिथल्या मुलांमधील कॅन्सरच्या वाढीचं आणि मृत्यूचं महत्त्वाचं कारण आहे. कॅन्सरच्या पेशींवर मात करतील अशा केमोथेरपी, सर्जरी आणि रेडिओथेरपी या अत्याधुनिक उपचारांची पुरेशी सोय नसल्याने मुलांच्या दगावण्याचं प्रमाण जास्त आहे. याशिवाय दुर्गम भागातून किंवा गावातून चांगल्या दवाखान्यापर्यंत पोहोचण्याची सोय नसणं आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुपलब्धतेमुळे पेशंटसमोरील अडचणी वाढलेल्या आहेत.
हेही वाचा - कृत्रिम साखरेचं खाणार त्याला...
लक्षणं – कोणतंही कारण नसताना सतत कमी होणारं वजन, तीव्र अंगदुखी, वारंवार डोकं दुखणं, सातत्याने उलट्या होणं, कोणत्याही संसर्गाशिवाय सारखा ताप येणं, डोळ्यांवर ताण येणं, सतत जाणवणारा थकवा आणि अशक्तपणा, चेहरा पांढराफटक पडणं, कुठलीही जखम झालेली नसताना शरीराचा काही भाग काळानिळा पडणं म्हणजेच त्या भागातून अंतर्गत रक्तस्त्राव होणं, शरीरावर मांसल गाठी तयार होणं ही लहान मुलांमधील कर्करोगाची प्राथमिक लक्षणं आहेत. ही सर्वसामान्य आजारात दिसून येणारी लक्षणं असली तरी यापैकी अधिक लक्षणं दीर्घकाळ टिकून राहिली तर तो धोक्याची घंटा आहे. अशी कुठलीही लक्षणं दिसून आल्यास घाबरून न जाता तात्काळ बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
लहान मुलांमधील कॅन्सर नियंत्रणात ठेवण्यासाठी गरीब आणि विकसनशील देशांना आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये वेळेवर निदान करणारी अत्याधुनिक यंत्रणा सर्वसामान्यांपर्यंत कमीत कमी पैशांत पोहोचवण्याचं काम प्राधान्याने करावं लागेल. शिवाय कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं विशेष प्रशिक्षण घेणं आणि आजारावर परिणामकारक ठरतील अशा औषधांची उपलब्धता वाढवणं गरजेचं आहे. याव्यतिरिक्त विशेषतः ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांची नोंदणी आणि देखरेख करणारी यंत्रणा अधिक मजबूत करणं आवश्यक आहे.
