मेडिकल क्षेत्रातलं नावाजलेलं जर्नल 'लॅन्सेट' आणि आयसीएमआर ही भारतीय वैद्यकीय संस्था यांनी नुकतेच कॅन्सरबाबत काही रिपोर्ट्स प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार गेल्या ३० वर्षांत आपल्या देशात कॅन्सर होणाऱ्यांची आणि कॅन्सरमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. १९९० ते २०२३ या ३३ वर्षांत भारतात कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत तब्बल २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १९९० मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे ८४.८ लोकांना कॅन्सर होत होता, तो आकडा २०२३ मध्ये १०७.२ वर पोचला आहे.
त्याचप्रमाणे कॅन्सरवरील उपचारांमध्ये प्रगती होऊनही मृत्यूदरात मात्र २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात कॅन्सर झालेल्या दर ५ लोकांपैकी ३ लोकांना जीव गमवावा लागतो. म्हणजे आपल्याकडे मृत्यूदर जास्त आहे. त्यातही कॅन्सरचा धोका स्त्रियांना अधिक असल्याचं, या रिपोर्टमध्ये म्हणलं आहे.
याउलट अमेरिका, चीन या देशांनी कॅन्सरवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. कॅन्सर होणाऱ्यांची आणि कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांची, अशा दोन्ही लोकांची संख्या तिथे गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. तंबाखूवरचे कडक नियम, लसीकरण आणि जनजागृती या माध्यमांतून त्यांनी हे साध्य केलं आहे.
भारतात वाढणाऱ्या कॅन्सरमागे रोजच्या जगण्यातल्या चुकीच्या सवयी आणि बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे, असं एम्स आणि लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. म्हणजे ठरवलं तर कॅन्सरला दूर ठेवणं शक्य आहे.
भारतातील वाढत्या कॅन्सरला कारणीभूत काही मुख्य गोष्टी:
तंबाखू हे कॅन्सरचं सगळ्यात मोठं कारण आहे. सिगारेट, विडी, गुटखा, मावा अशा कोणत्याही रूपातला तंबाखू म्हणजे कॅन्सरला निमंत्रण. त्यासोबत अलीकडे भारतीयांमध्ये पॅकेटमधले तयार पदार्थ तसंच अधिकचं गोड, नमकीन आणि तेलकट खाणं वाढलेलं आहे. यासोबत व्यायामाचा अभाव आणि वाढलेलं वजन हे अनेक प्रकारच्या कॅन्सरचं मूळ आहे, असं तज्ज्ञ मंडळी सांगत असतातच. जास्त दारू पिण्यामुळे लिव्हर, घसा आणि पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. शिवाय अनियंत्रित मधुमेह हा देखील कर्करोगासाठी एक महत्वाचं कारण ठरू शकतो. हिपॅटायटीससारखे जंतुसंसर्ग आणि वाढतं वायू प्रदूषण यांचाही कॅन्सर संसर्गामध्ये वाटा आहे.
स्त्रियांमध्ये कॅन्सरचा वाढता धोका:
भारतीय महिलांमध्ये तीन प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. यामध्ये सर्वात जास्त प्रमाण ब्रेस्ट कॅन्सरचं (स्तनाचा कर्करोग) आहे. ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती नसणं, वेळेत निदान न होणं ही त्याची महत्वाची कारणं आहेत. दुसरं म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग)चं प्रमाणही वाढलं आहे. हा कॅन्सर एचपीव्ही नावाच्या वायरसमुळे होतो. असुरक्षित लैंगिक संबंध आणि स्वच्छतेच्या अभावामुळे हा पसरतो. आणि तिसरा ओव्हरीयन कॅन्सर (अंडाशयाचा कर्करोग) आता ४० ते ५० या वयोगटातील महिलांमध्ये वाढताना दिसतोय. लठ्ठपणा, उशिरा लग्न किंवा उशिरा मुल होणं, पीसीओएससारखे आजार आणि काहीवेळा आई-वडिलांकडून आलेली आनुवंशिकता ही याची कारणं आहेत.
काय करता येईल?
पहिलं म्हणजे भारतीय आरोग्यव्यवस्था, शासन आणि वैयक्तिक स्तरावर, 'कॅन्सर रुग्णांची आणि कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या', या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कॅन्सर होणार नाही याची दक्षता घेणं, कॅन्सरचं वेळेत निदान होईल असं बघणं, आणि कॅन्सरवर वेळेत उपचार मिळणं या तिन्ही आघाड्यांवर काम होणं अपेक्षित आहे.
त्यासाठी लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर कशामुळे होतात आणि ते होऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे, याविषयी प्रचार प्रसार करण्याचं काम करावं लागेल. दुसरं म्हणजे कॅन्सरच्या लक्षणांविषयी जनजागृती घडवून आणणं, नियमितपणे तपासणी करून घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं याही गोष्टी व्हाव्या लागतील. त्यासाठी माफक दरात अद्ययावत निदान यंत्रणा उपलब्ध असायला हवी. निदान झाल्यानंतर उपचारही माफक खर्चात व्हायला हवेत. 'आयुष्मान भारत' सारख्या योजनांमधले अलीकडे उघडकीस आलेले घोटाळे, सरकारी दवाखान्यांची अवस्था, खासगी दवाखान्यांमधले आभाळाला भिडणारे खर्च या गोष्टींचा विचार केला की भारतात कॅन्सर झालेल्या पाच रुग्णांपैकी तीन रुग्ण का मृत्यू पावतात हे लक्षात येईल. वाढत्या कॅन्सरच्या प्रश्नासाठी वर उल्लेख केलेल्या या सगळ्या गोष्टी शासन, आपली आरोग्य व्यवस्था, माध्यमं यांनी मिळून करण्याच्या आहेत. कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणाकडे बघून हे सगळे जागे होतील तेव्हा होतील, पण वैयक्तिक स्तरावर आपण काय करू शकतो ते आपल्या हातात आहे.
भारतातल्या वाढत्या कॅन्सरमागे 'बदलण्यायोग्य धोक्याचे घटक' (मोडीफायेबल रिस्क फॅक्टर्स) जबाबदार आहेत, असं 'द लॅन्सेट'ने अधोरेखित केलं आहे. आपण आपली जीवनशैली आणि सवयी बदलून यातील बहुतांश कॅन्सर टाळू शकतो, असा याचा सरळ अर्थ आहे. भारतात सुमारे ७० टक्के कॅन्सरचे मृत्यू हे अशा बदलण्यायोग्य घटकांमुळे होतात. तंबाखू, दारू यांचं सेवन न करणं, चांगली जीवनशैली आत्मसात करणं या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. त्यामध्ये सकस आणि घरचं जेवण घेणं, ऋतूप्रमाणे फळं, भाज्या खाणं, रोज व्यायाम करणं, वजन नियंत्रणात ठेवणं या गोष्टी आपण करू शकतो. याशिवाय आपल्या डॉक्टरांशी या विषयावर बोलून कॅन्सरविषयी माहिती करून घेऊ शकतो.
वेळोवेळी तपासणी करण्याविषयी आयसीएमआरच्या रिपोर्टमध्ये भर दिला आहे. कारण कॅन्सरचं निदान जेवढं लवकर होईल तेवढा तो बरा होण्याची शक्यता जास्त असते. विशेषत: महिलांनी चाळीशीनंतर स्तनाच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी, सर्व्हायकल कॅन्सरसाठी पॅप स्मीअर टेस्ट न चुकता करून घेतली पाहिजे. एचपीव्हीची लस घेतल्याने सर्व्हायकल कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते, ती वेळेत घेतली पाहिजे. ही लस मुलीला नवव्या वर्षानंतर देता येते, परंतु तिचे कुणाशीही शारीरिक संबंध येण्याआधी ती लस दिली गेली पाहिजे. अंडाशयाच्या कॅन्सरची लक्षणं तर सहजासहजी कळतही नाहीत. पोट फुगल्यासारखं वाटणं, सतत पोटात दुखणं अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. वर्षातून एकदा तरी स्त्री-रोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली पाहिजे, असं तज्ज्ञ मंडळी सुचवतात. पण त्यासाठी भारतीय लोकसंख्येच्या मानाने सरकारी दवाखान्यांची संख्या आहे का, तिथले सर्व डॉक्टर भरले जातात का असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे जागृती होण्याप्रमाणेच तशी यंत्रणाही उभी केली जाणं आवश्यक आहे.
'लॅन्सेट' आणि 'आयसीएमआर'च्या रिपोर्टमधले आकडे बघून नुसताच कॅन्सरचा बागुलबुवा होऊन फायदा नाही. त्याकडे गांभीर्याने बघून सर्वांनी आपल्या आपल्या स्तरावर कॅन्सरशी लढण्यासाठी सज्ज व्हायला हवं आहे. वैयक्तिक स्तरावर काही सवयी बदलून, खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन आणि आरोग्याबद्दल जागरूक राहूनही आपण कॅन्सरचा धोका कमी करू शकतो असंही हे रिपोर्ट सांगताहेत, त्यामुळे ते तरी नक्की आपल्या हातात आहे.
मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com
मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.
