आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

तर मी मुंबई पाहिलीच नाही!

  • मधू साबणे
  • 28.12.25
  • वाचनवेळ 11 मि.
madhu sabane mumbai

मॅट्रिक झाल्यावर मला मुंबईला व्ही. जे. टी. आय.मध्ये टेक्स्टाइल इंजिनियरिंगच्या डिप्लोमाला ॲडमिशन मिळाली. तेव्हा मी मुंबईला जायला खूप उत्सुक होतो, पण आई म्हणाली-

“बाळा, मुंबईला आपलं कोणीही नाही. जरी आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून फी माफ झाली तरी तू राहणार कुठे? जेवणाचं काय करशील? आपली ऐपत नाही रे एवढी! नको जाऊस. रेशनिंग ऑफिसचा कॉल आलाय ना? तर उद्यापासून कामावर जा.”

मी दुसऱ्या दिवशी रेशनिंग ऑफिसात जॉइन झालो. साहेबाने मला स्वतंत्र टेबल दिलं, पण त्या टेबलावर फारसं काही कामच नसायचं. मग नुसतं बसून राहायचा कंटाळा यायचा. मग मी ऑफिसला जाताना बरोबर मासिक किंवा पुस्तक घेऊन जाऊ लागलो. वाचायला खूप वेळ मिळायचा. तर वाचता वाचता असं लक्षात आलं, की आपणही यापेक्षा खूप बरं लिहू शकू. आणि मी कथा लिहायला लागलो. पण पाठवायची कुणाला? माझा शाळेतला मित्र क. दि. सोनटक्के याला विचारलं, तर तो म्हणाला-

“सध्या सर्वांत चांगलं मासिक म्हणजे मुंबईत ‘सत्यकथा'च आहे. तर तू ही कथा ‘सत्यकथे'ला पाठव.”

त्याप्रमाणे सत्यकथेला कथा पाठवली. जवळजवळ महिन्याभराने संपादकांचं पत्र आलं : ‘कथा स्वीकारली आहे. यथावकाश सत्यकथेतून प्रकाशित केली जाईल.' पुढे ती कथा प्रसिद्ध झाली. नंतर चार दिवसांनी अंक नि मोबदल्याचा चेक पण आला. त्यासोबत एक पत्रही होतं : ‘मुंबईत आलात की सत्यकथेच्या ऑफिसात जरूर या.' पुढे अशा तऱ्हेने तीन कथा सत्यकथेत प्रकाशित झाल्या. त्याबरोबरच्या पत्रात संपादकांनी लिहिलं होतं, की ‘तुम्ही मुंबईत येतच नाही का?' तर मी त्यांना उलट टपाली पत्र लिहिलं : ‘माझं मुंबईत कोणीही नाही आणि माझं मुंबईत काही कामही नाही. तुम्ही माझ्या गोष्टी छापल्या, मोबदलाही पाठवलात तेवढं मला पुरेसं आहे. सत्यकथेच्या ऑफिसात येऊन मी तुमच्याशी काय बोलणार?' आणि मी मुंबईला गेलोच नाही.

दरम्यानच्या काळात काही वर्षं गेली आणि मुंबईहून ‘स.न.वि.वि.'च्या संपादिकेचं पत्र आलं : ‘दिवाळी अंकासाठी कथा पाठवा आणि आपला मोबदलाही कळवा. मुंबईत आलात तर प्रत्यक्ष भेटही होईल.'

मी त्यांना पत्र लिहिलं : ‘माझा एजंट मुंबईत राहतो. त्याचं नाव अशोक शहाणे. तो कांदिवलीला राहतो. त्याचा पत्ता मिळवा. त्याच्याकडे माझी एक कादंबरी आहे. त्यातील काही प्रकरणं तुम्ही छापू शकत असाल तर बघा. कथेचे मानधन म्हणून मला अडीचशे रुपये पाठवा. संपूर्ण कादंबरी छापणार असाल तर दोन हजार रुपये मोबदला द्या.' त्या संपादिकेची आणि अशोकची ओळख होती. बहुधा अशोकच्या सांगण्यावरून त्यांनी कादंबरीतील एक प्रकरण प्रसिद्ध केलं. मला अंक नि मोबदला मिळाला. मुंबई वारी नेहमीप्रमाणे हुकली.

त्या काळात बाबूराव चित्रे यांचं ‘अभिरुची' मासिक बंद झालं होतं. ते त्यांना पुन्हा सुरू करायचं होतं. पण आता पुण्यातल्या एकाकडे ‘अभिरुची'चं टायटल होतं. त्याचं नाव चव्हाण. हा माणूस मूळचा कोल्हापूरचा. तर टायटल मिळवण्यासाठी बाबूराव पुण्याला येणार आहेत, असं अशोक शहाणे मला म्हणाला होता.

मी शाळेला सुटी असल्याने अशोककडे गेलो, तर दाराला कुलूप. म्हणून मी खाली येऊन फुटपाथवर अशोकची वाट पाहत उभा होतो. तेवढ्यात बाबूराव आले. याआधी अशोककडेच त्यांची ओळख झाली होती. त्यांनी मला ओळखलंन. मला म्हणाले-

“तू खाली का उभा आहेस?”

“अशोक जवळपास कुठं तरी पान खायला गेला असेल. इतक्यात तो येईलच, म्हणून मी त्याची वाट पाहतोय.”

पण बराच वेळ झाला तरी अशोक आलाच नाही. मग मी निघायचा बेत केला. बाबूरावांना म्हणालो,

“तुमचं काही काम होतं का?” तर ते म्हणाले, “मला चव्हाण नावाच्या माणसाला भेटायचं आहे. त्याच्याकडे ‘अभिरुची'चं टायटल आहे. ग. ल. ठोकळ माझे बडोद्याच्या कॉलेजमधले वर्गमित्र आहेत. तर त्यांना बरोबर घेऊन जाऊन मध्यस्थी करून टायटल मिळतं का ते पाहायचं आहे. तुला ठोकळांचं दुकान माहिती आहे का?”

“हो, माहीत आहे.”

“मग मला त्यांच्या दुकानात घेऊन चल.”

मी म्हणालो-“चला, जाऊ या,”

आम्ही दोघं ठोकळांच्या दुकानात गेलो, तर कळलं, की ठोकळ गावाला गेले आहेत. दोन-तीन दिवसांनी येतील. मग काउंटरवरच्या माणसाला विचारलं, की “चव्हाण नावाच्या एका संपादकाचं घर तुम्हाला माहिती आहे का?” तर तो म्हणाला- “ते आमच्या साहेबांकडे नेहमी येतात, पण ते राहतात कुठे ते मला माहिती नाही.”

आता आली का पंचाईत! मग मला अचानक आठवलं, की माझा कॉलेज मित्र विलास मोहिते याच्याबरोबर नारायण पेठेतल्या चव्हाण नावाच्या एका संपादकाकडे मी गेलो होतो. तो लकडी पुलापाशी राहतो. मग मी बाबूरावांना म्हणालो- “चला, माझ्या लक्षात आलंय की चव्हाण कुठे राहतात ते. इथून त्यांचं घर जवळच आहे.” मग मी त्यांना घेऊन चव्हाणच्या घरी गेलो. तो घरातच होता. त्याचं स्वत:चं एक मासिकही होतं. त्यात तो इतर मासिकांतला चांगला मजकूर परवानगी न घेता बिनधास्त छापत होता. माझा ‘असो'- मधला एक प्रदीर्घ मजकूरही त्याने छापला होता. ते मला विलास मोहितेने सांगितलं, तेव्हा मी त्याच्याकडे गेलो होतो. पण तो फार पोचलेला माणूस होता. त्यामुळे मी काहीही करू शकलो नाही. आम्हाला पाहताच तो म्हणाला-

“आपण कोण?”

मी म्हणालो- “हे बाबूराव चित्रे. दिलीपचे वडील.” तर तो चकित झाला. त्याने बाबूरावांना साष्टांग नमस्कार घातला. नि सरळ त्यांचे पाय धरले. नेहमीप्रमाणे सगळा नाटकीपणाच. मग उठला. म्हणाला, “काय आज्ञा आहे?”

बाबूरावांनी त्याला सगळं सांगितलं. तर तो म्हणाला-“टायटल माझ्याकडे आहेच, पण मी मासिक काढलेलं नाही. तुम्हाला ते टायटल हवं असेल तर मी आनंदाने देतो. पुन्हा ‘अभिरुची' सुरू झालं तर सर्वांनाच खूप आनंद होईल. कोर्टात वगैरे जाऊन ॲफिडेव्हिट करायची गरज नाही. मी तुम्हाला टायटल दिलं!” मग चहा पिऊन आम्ही बाहेर पडलो.

बाबूरावांना मी विचारलं, की ‘आता कुठे जाणार?' तर ते म्हणाले-

“मी आता दि. के. बेडेकरांकडे जाणार आणि मग तिथे जेवण करून परस्पर मुंबईला जाणार. तू माझं मोठं काम केलंस. अशोकला पण सांग माझं काम झालं म्हणून. तू अजून मुंबईला कधी आला नाहीस, असं अशोक म्हणत होता. तर पुढल्या खेपेला मी पुण्याला आलो की परत जाताना मी तुला माझ्याबरोबरच मुंबईला घेऊन जाईन. तुझं कोणी नाही मुंबईत, तर माझ्याकडे चार दिवस राहा.”

ह्यानंतर पुण्यातूनच ‘अभिरुची' छापायला सुरुवात झाली. बाबूराव स्वत: मजकूर घेऊन दर महिन्याला पुण्याला यायचे आणि मजकूर छापून घ्यायचे. अर्थात अशोक इथे मासिकाचं छपाईचं सगळं काम पाहायचा. पण बाबूराव कधीही मजकूर वेळेवर पाठवायचे नाहीत. त्यामुळे अंक एक तारखेला कधीच निघायचा नाही. मग अशोक वैतागायचा. वर्षभर अंक पुण्यातून निघाला, पण दुसऱ्या वर्षी अलिबागला छपाई स्वस्त आहे म्हणून अंक त्यांनी तिथून छापायला सुरुवात केली. अंकाच्या निमित्ताने बाबूराव खूप वेळा पुण्यात आले, पण मला परत कधीही ‘मुंबईला चल' म्हणाले नाहीत. आणि मी मुंबईला गेलोच नाही.

एकदा मन्या ओक अचानक पुण्याला आला, तर अशोक सातारला गेलेला. म्हणून मग तो सरळ माझ्याकडे आला. म्हणाला- “अशोक नाहीय, तर मला मुंबईला जायला दहा रुपये दे.” मी अवाक! याआधी मन्याने मुंबईच्या ‘लॉइड्स' बँकेतली चांगली नोकरी सोडलेली होती. आता मित्रांकडून सतत उसने पैसे मागून आपले कवितेचे नि इतर षौक तो भागवत होता. मी म्हणालो, “मन्या, आम्ही जगण्यासाठी नोकरी करतो. नुसता तुझ्यासारखा लेखनाचा षौक करत नाही. तुला नोकरी करायला काय झालं? मी काही तुला पैसे देणार नाही.” यावर मानभावीपणे तो म्हणाला- “मुंबईत आलास की आठ दिवस माझ्या खोलीवर राहा.”

साला, हा दुसऱ्याकडून सतत पैसे मागणार नि मला म्हणतोय- मुंबईत आलास की माझ्या खोलीवर राहा! मन्या लगेच निघून गेला. परत मला कधीच भेटला नाही.

मग अशोक मुंबईला राहायला गेला. पण तो बारा पिंपळावरचा मुंजा. तो सारखा कुणा ना कुणाकडे जाऊन राहायचा. त्याने आता ‘प्रास' नावाने प्रकाशन सुरू केलं होतं. त्याच्या पुस्तकांची छपाई पुण्यात कल्पना मुद्रणालयात तो करून घ्यायचा. पुस्तकं तयार झाली की दुकानदारांकडे पोचवायला मला घेऊन जायचा आणि बिलं मला वसूल करायला सांगून मुंबईला निघून जायचा. माझ्या घरी पुस्तकांचे गठ्ठे पडलेले असायचे. दुकानदारांनी मागितले की मी ते नेऊन द्यायचो. काही मित्र म्हणायचे, “अशोक एवढा मुंबईत असतो, तर तू त्याच्याकडे का जात नाहीस?”

पण अशोकचं बूड स्थिर नाही तर मी अशोककडे कसा जाणार होतो?

पुढे अशोक नि रघूने कांदिवलीला वन-रूम किचन फ्लॅट घेतला आणि ते दोघं स्थिरावले, पण अशोक मला ‘मुंबईला चल' असं कधी म्हणाला नाही. त्यामुळे मी मुंबईला गेलोच नाही.

२०१० साली अशोकचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करण्याचं सर्व मित्रांनी ठरवलं. एके दिवशी अशोकच्या बायकोचा मला फोन आला, “सात तारखेला अशोकचा वाढदिवस आहे, तर तुम्ही जरूर या. तुम्हाला सांगितल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही.” तर मी म्हणालो, “मला मुंबईची काहीच माहिती नाही तर मी समारंभासाठी गोरेगावला कसा येणार?” त्यावर ती म्हणाली, “रघू नि अशोक मुंबईला कांदिवलीला राहत असताना तुम्ही मुंबईला कधीच आला नाहीत का?”

यावर मी म्हणालो- “नाही आलो. अशोकही कधी म्हणाला नाही. आता तर मुंबईला आलो तर मला लोकलमध्येही चढता येणार नाही. आणि समारंभ संपल्यानंतर मी रात्री राहणार कुठे? पुण्यातून समारंभाला जाणाऱ्या कोणाबरोबर आलो तरी रात्री परत जाताना मला लोकलमध्ये चढता येणार नाही.” आणि मी मुंबईला गेलोच नाही.

नोकरीनिमित्ताने मी खेड-शिवापूरला असताना शिवापूरहून रोज ट्रकने भाजीपाला मुंबईला जायचा. ट्रक ड्रायव्हर माझा मित्र होता. मला वाटलं, ट्रक रोज रात्री मुंबईला जातो, तर आपणही ट्रकने मुंबईला अशोककडे जावं. मी ट्रक ड्रायव्हरला म्हणालो, “मला मुंबईला मित्राकडे जायचं आहे.” तर तो म्हणाला,“चल माझ्याबरोबर. फक्त तू ट्रकच्या टपावर- ड्रायव्हरच्या डोक्यावर असलेल्या टपावर बसायचंस. तिथून पोलिस दिसला की पैसे टाकायचे.” त्यांनी शंभर रुपयांची मोड बरोबर घेतली होती. पुण्याच्या मंडईत आत शिरल्या शिरल्या मोडवाले लोक बसलेले असतात. तिथून ते मोड घेतात. मग त्याच्या एकेका नाण्याच्या कागदाच्या पुरचुंडीत पुड्या बांधायच्या. मुंबई रस्त्याला लागल्यावर पोलिस दिसला की एक पुडी त्याच्यापुढे टाकायची. नाही तर तो गाडी थांबवणार, त्यात काय आहे हे पाहणार. मग तुम्हाला मुंबईला पोचायला उशीर होणार. तसं होऊ नये म्हणून ही सोय करावी लागायची. अजूनही करावी लागत असणार. तो पोलिस पर ट्रक पैसे गोळा करायचा. त्याचे भरपूर पैसे गोळा होत असत. सांगायचं म्हणजे पोलिसात पुडी देण्यासाठी ट्रकवाल्याला प्रत्येक ट्रकमागे एक माणूस नेमावा लागत असे. तर ड्रायव्हरने अशा माणसाच्या जागी माझी नेमणूक करून मला मुंबईला घेऊन जायचं ठरवलं. मी म्हणालो- “पोलिसांना पैशांच्या पुड्या वाटणं मला जमणार नाही.” आणि मी ट्रकबरोबर मुंबईला जाण्याचा बेत रद्द केला.

बहिणीचं सासर कल्याणला. तिच्या घराची वास्तुशांत होती. म्हणून आम्ही घरचे लोक कल्याणला गेलो. तिथे कल्याणला येऊन रघू दंडवते मला कांदिवलीला त्याच्या घरी घेऊन जाणार होता. मी कल्याणला पोचल्यावर त्याला फोन केला आणि बहिणीचा पत्ता नि फोन नंबरही दिला. रघू कल्याणला आला, पण त्याला बहिणीचं घर सापडलंच नाही. मग तो परत मुंबईला निघून गेला. त्या वेळी मोबाइल फोन नव्हते. त्यामुळे रघू कल्याणला आल्यावर मला बहिणीकडे फोनही करू शकला नाही, नाही तर तो जिथे होता तिथून मी त्याला बहिणीकडे घेऊन आलो असतो. दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला एस.टी.ने आलो.

मुंबईच्या इतकं जवळ येऊनही मुंबईला जाता आलं नाही.

त्यानंतर ‘युनिक फीचर्स'च्या ‘अनुभव' मासिकासाठी कथा द्यावी म्हणून एकदा त्यांच्या ऑफिसात गेलो. तिथे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहणाऱ्या मनोहर सोनवणे यांना भेटलो. कथा दिली. त्यांनी ती लगेच माझ्यादेखत वाचली. ती गोष्ट नोबेल पुरस्कारप्राप्त मूळचा चिनी लेखक गाओ झिंग जिआन या लेखकाची होती. जरा ऑफबीट होती, त्यामुळे सोनवणे यांना काही शंका आल्या. त्यांचं मी निरसन केल्यावर ते म्हणाले, “मला या कागदावर तुम्ही आत्ता जे म्हणालात ते लिहून द्या, म्हणजे गोष्ट छापताना तो मजकूर मी चौकटीत टाकीन. म्हणजे सर्वांना ती गोष्ट समजून घेताना मदत होईल.” मी त्यांना तो मजकूर लिहून दिला नि निघालो.

दोन दिवसांनी मला ‘अनुभव'च्या संपादकीय विभागातून फोन आला-

“मधू साबणे आहेत का? मी सुहास कुलकर्णी. ‘युनिक फीचर्स'मधून बोलतो आहे.”

“हं, बोला सुहासराव.”

“परवा तुम्ही आमच्या ऑफिसात येऊन गेलात असं कळलं. अहो, मी तुमची ‘घरदार' कादंबरी कॉलेजात असताना वाचली आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या ऑफिसात येऊनही आपली भेट झाली नाही याची मला खूप चुटपूट लागून राहिली. आता परत एकदा या आमच्याकडे.”

त्यानंतर दोन-तीनदा परत सुहासचं नि माझं फोनवरच बोलणं झालं. आम्ही तोवर काही ना काही कारणाने भेटलोच नाही. मग आम्ही भेटीची वेळ ठरवली नि ठरल्या दिवशी मी पुन्हा ‘अनुभव'च्या ऑफिसात गेलो.

सुहास वाटच पाहत होता. त्याने हातातलं काम बाजूला ठेवलं नि तो म्हणाला, “बरं झालं तुम्ही आत्ता आलात ते. आपल्याला निवांतपणे बोलता येईल.” थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर विषय लिट्‌‍ल मॅगेझिन नि अशोक शहाणेवर घसरला. मग सुहास म्हणाला-“घरदारनंतरची तुमची कादंबरी कुठली?” मी म्हणालो- लीळा. अशोककडे मी ती दिली, तर त्याने सतरा वर्षं ती पाडून ठेवली. मला ती या कालावधीत परतही केली नाही. आणि मी मुंबईला येणार नाहीच याची त्याला खात्री होती.”

सुहास म्हणाला, “का?”

“अरे बाबा, मी मुंबई कधी पाहिलीच नाही. त्यामुळे अशोक बिनधास्त होता.”

“पण तुम्ही अजूनपर्यंत मुंबईला का गेला नाहीत?”

“माझं मुंबईत कोणीही नाही. एक-दोनदा वाटलं, जावं, पण काही ना काही कारणानं ते जमलंच नाही.”

“ठीक आहे, आम्ही कामानिमित्त मुंबईला जात असतो. तर एकदा आपण आमच्या गाडीतून मुंबईला जाऊ यात.”

“बाबा रे, असं आश्वासन देणारा तू एकशे एकावा माणूस आहेस! तू मला कसा नेशील?”

या गोष्टीला आता पाच-सहा वर्षं झाली. सुहास मला मुंबईला घेऊन जाणार होता, हे तो सर्वांप्रमाणेच विसरून गेला आहे.

तर सांगायचं काय, मी मुंबई अजून पाहिलेलीच नाही!

(अनुभव, मे २०१३च्या अंकातून साभार )

मधू साबणे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results