आम्ही कोण?
लेखमालिका : पुढच्या हाका

बिनसुळयांचे हत्ती आणि बिनशिंगांचे गेंडे

  • मेघश्री दळवी
  • 11.09.25
  • वाचनवेळ 3 मि.
mozambique

मोझांबिक हा आफ्रिकेमधला एक देश. पर्यटक दुरून दुरून इथले हत्ती पाहायला येतात. दुर्दैवाने या हत्तींची बेकायदा शिकारही होते. हस्तिदंताची छुपी जागतिक बाजारपेठ इतकी मोठी आहे की त्या पैशांची भुरळ इथल्या लोकांना न पडली तर नवल.

मोझांबिकमध्ये १९७०-८० च्या काळात यादवी युद्ध सुरू होतं. त्याला या हस्तिदंताच्या व्यापाराचा आधार होता. त्या काळात हत्तींची अफाट शिकार झाली. तिथलं गोरोनगोसा नॅशनल पार्कही त्यातून सुटलं नाही. तिथे जेमतेम १० टक्के हत्ती उरले. विशेष म्हणजे या उरलेल्या हत्तींच्या पुढच्या पिढ्यांमध्ये सुळे नसलेले हत्ती जास्त दिसायला लागले. एरवी हत्तीच्या दोन ते चार टक्के माद्या बिनसुळ्यांच्या असतात. पण मोझांबिकमधल्या गोरोनगोसा नॅशनल पार्कमध्ये ३० टक्के माद्या बिनसुळयांच्या निपजल्या.

शेन कॅम्पबेल-स्टेटन या जीवशास्त्रज्ञाने सुळे नसलेल्या माद्यांचं प्रमाण दहापट का झालं याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. जैविक उत्परिवर्तन (म्यूटेशन) की छोट्या समूहात जवळच्या नात्यात होणारं प्रजनन (इनब्रीडिंग)? फक्त माद्याच बिनसुळ्यांच्या का? अशा माद्यांच्या पिल्लांना सुळे येतात का? असे असंख्य प्रश्न घेऊन त्याने नेटाने अभ्यास केला. जिनोम सीक्वेन्सिंग आणि कम्प्युटर सिम्युलेशन यांचीही मदत घेतली. त्याचे निष्कर्ष भयंकर धक्कादायक आहेत. आईकडून येणाऱ्या एक्स गुणसूत्रावर सुळे असणं किंवा नसणं ठरतं. त्यातले दोन जीन्स उत्परिवर्तित झाले तर माद्यांना सुळे येत नाहीत. सुळे असलेल्या हत्तींची बेसुमार शिकार झाल्यामुळे हे उत्परिवर्तन झालेले जीन्स त्या बिनसुळयांच्या समूहात वेगाने पसरत गेले. नरांमध्ये असं उत्परिवर्तन झालं तर ते मरून जातात. त्यामुळे बिनसुळयांचे प्रौढ नर हत्ती दिसले नाहीत.

हेलसिंकी विद्यापीठातले ऑस्कर विल्सन यांनी गेंड्यांवर संशोधन केलं असून त्यांचा निष्कर्ष आहे, की गेल्या शतकात गेंड्याच्या शिंगाचा आकार घटला आहे. गेंड्यांच्या शिंगाला चीन आणि व्हिएतनाममध्ये भरपूर मागणी आहे. त्यामुळे मोठं शिंग असलेले गेंडे शिकारीला बळी पडतात, तर छोटं शिंग असलेले गेंडे तुलनेने वाचतात. हे गुण पुढच्या पिढीत जात राहतात.

हे प्रकरण एवढ्यावर थांबत नाही. मोठ्या शिंगांच्या एडक्यांची जास्त शिकार होते म्हणून अवघ्या ३० वर्षांत एडक्यांच्या शिंगांचा आकार लहान झाल्याचा कॅनडातला अभ्यास आहे. चीनमधील एक विशिष्ट प्रकारची लिली औषधासाठी वापरली जाते. अशा लिलींचे रंग वेगाने फिके झाल्याचं दिसून आलं आहे. भडक रंगाच्या लिली चटकन नजरेत भरतात आणि खुडल्या जातात, तर फिक्या लिली वाचतात म्हणून. प्रदूषण आणि हवामानबदलाने पक्षी आणि मासे यांचे आकार थोडे लहान झाल्याच्याही नोंदी आहेत. ड्रॅगनफ्लाय नरांच्या पंखांवरची नक्षी याच कारणाने कमी झाली आणि त्याचा नर-मादी मीलनावर परिणाम दिसून आलेला आहे.

माणूस नैसर्गिक संतुलनात अतोनात हस्तक्षेप करतो. पण त्याच्याशी जुळवून घ्यायची कसरत इतर जीवांना करावी लागते. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार प्राणी, पक्षी जैविक बदल (बायोलॉजिकल ॲडाप्टेशन) करून परिस्थितीशी जुळवून घेतात. आपला रंग, आकार, अन्न, वागणूक यांच्यात बदल करून तग धरतात. पण या बदलाला मर्यादा आहेत. आजवर अशी उत्क्रांती पिढ्यापिढ्यांमधून संथपणे होत आलेली आहे. मात्र आता अशा बदलांचा वेग प्रमाणाबाहेर वाढायला लागला आहे आणि तो सर्व प्राणी-पक्ष्यांना झेपणारा नाही.

अजूनही दरवर्षी २० हजार हत्तींची आणि साधारण एक हजार गेंड्यांची शिकार होते. इतर अनेक प्राण्यांचीही होत असते. उत्क्रांतीत अशीच ढवळाढवळ सुरू राहिली तर यापुढे काय चित्र दिसेल? सरसकट बिनसुळ्यांचे हत्ती आणि बिनशिंगांचे गेंडे दिसतील. वाघ-सिंहांच्या कित्येक प्रजाती नामशेष झालेल्या असतील. फुलपाखरं आणि मधमाशांच्या प्रजातींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उरलेली असेल. फुला-फळांचे रंग आणि आकार बदललेले असतील. प्राणिसंग्रहालयं असतील का, शंका आहे. असलीच तर तिथे बहुधा प्राण्यांचे फोटो, व्हिडीओ, होलोग्राम्स, रोबॉटिक मॉडेल्स यावरच समाधान मानावं लागेल.

भविष्यातल्या जगाची कल्पना एरवी रोमांचक वाटली, तरी याबाबतीत ती रोमांचक असेल का? 

मेघश्री दळवी

मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results