आम्ही कोण?
ले 

कवितांची ‘मिर्झा एक्स्प्रेस’ शांतावली!

  • संतोष अरसोड
  • 29.11.25
  • वाचनवेळ 5 मि.
mirza baig

शेतीच्यान देशाले आकार आला,
शेतकरी मात्र निराधार झाला…

वऱ्हाडी भाषेच्या गोड लहेजातून व्यक्त झालेली ही दर्दभरी ओळ थेट हृदयाला भिडते. सामाजिक जाणिवांच्या अशा कवितांचा मोठा खजिना निर्माण करणारे साहित्यिक म्हणजे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग. नुकतंच २८ नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं. गेली चाळीस वर्षं वऱ्हाडी साहित्याच्या रुळावरून सुसाट धावणारी ‘मिर्झा एक्सप्रेस’ कायमची थांबली.

वर्‍हाडी बोली आणि विनोदाचा बादशाह म्हणून देशपातळीवर ख्यातकीर्त असलेले डॉक्टर मिर्झा यांच्या रक्तात जणू वऱ्हाडी बोलीच सळसळत असे. त्यांनी २० काव्यसंग्रह लिहिले. त्यांनी देशभरात वऱ्हाडी कविता आणि किस्से यांचे जवळपास ५ हजार कार्यक्रम केले. आपल्या कवितांमधून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक व्यंग, शेतीचे प्रश्न, बेरोजगारी, हुंडा यासह विविध विषयांना मर्मभेदी स्पर्श केला. वऱ्हाडी भाषेचा गोडवा त्यांच्या साहित्यातून दिसतो आणि ती भाषा कोणत्याही मराठी जाणणाऱ्या माणसाला आपली वाटते, हे त्यांच्या लिखाणाचं यश म्हणावं लागेल.

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा हे डॉ. मिर्झा यांचं गाव. धनज, माणिकवाडा ही गावं सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर असण्याचं कारणच डॉ. मिर्झा होते. धनज आणि माणिकवाडा ही गावं म्हणजे जुळी भावंडंच जणू! एका छोट्याशा नदीने ही दोन गावं वेगळी झाली असली तरी या गावांतील माणसं ‘दो जिस्म मगर एक जान है हम’ अशी आहेत. गावातल्या फकीरजी महाराज देवस्थानने माणसं एका सूत्रात बांधलेली. अशा या निकोप वातावरणात डॉ. मिर्झा यांची जडणघडण झाली. त्यांचे वडील भाईजी या नावाने परिसरात ओळखले जात होते. ते आणि त्यांच्यानंतर डॉ. मिर्झा फकिरजी महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त होते. त्यामुळे जात-धर्माची बंधनं गळून पडलेली.

डॉ. मिर्झा यांचं पूर्ण नाव ‘मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रज्जाक बेग मिर्झा’ असं लांबलचक होतं. नावाप्रमाणेच मोठा माणूस होता तो!

‘किती मोठा माणूस आहे माहीत नाही तुले’ ही त्यांची प्रसिद्ध कविता एकेकाळी रसिक मनावर अधिराज्य गाजवत होती. या विनोदी कवितेतून त्यांनी स्वतःचंच विडंबन केलं होतं. स्वतःला सोलून काढण्यासाठी काळीज खूप मोठं असावं लागतं. ते त्यांच्याकडे होतं.

डॉ. मिर्झा धामणगावला वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्याचं मन कवितेतच जास्त रमायचं. पुढे आपल्या दवाखान्यात ते रुग्णांना औषधाबरोबर कवितेचाही डोस द्यायचे. सन १९८५ ते १९९५ या दहा वर्षांच्या काळात ग्रामीण तसंच शहरी भागात वऱ्हाडी कवी संमेलनं व्हायची. त्यातून ग्रामीण भागातील लोकांच्या व्यथा आणि वेदनांना विनोदातून वाट मोकळी करून दिली जायची. त्यावेळी विठ्ठल वाघ, डॉ. मिर्झा, शंकर बडे यांच्या तुफान विनोदी मर्मभेदी कविता लोकांच्या काळजावर राज्य करायच्या. ‘पिकानं केली थंडी भाऊ, उलार झाली बंडी भाऊ’, या कवितेतून डॉक्टरांनी कापूस उत्पादक शेतकऱ्याचं दुःख मांडलं. ‘वही’ कविता त्या काळात अनेक तरुणांना तोंडपाठ होती.

१९९६ ते १९९९ या काळात एका वृत्तपत्रात सुरू झालेल्या ‘मिर्झाजी कहींन’ या प्रश्नोत्तराच्या सदरामुळे डॉ. मिर्झा जनमानसापर्यंत पोहोचले. त्या दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली जवळपास ६० हजार पत्रं आजही त्यांच्या घरात पाहायला मिळतील. विनोदबुद्धी व समयसूचकता असलेल्या डॉक्टर मिर्झा यांनी लिहिलेली पुस्तकं ‘धूयमात’, ‘ऊठ आता गणपत’, ‘मिर्झा एक्सप्रेस’, ‘जांगळबुत्ता’ आणि ‘मिर्झायण’ हे आत्मकथन अजूनही रसिकांच्या मनाचा ताबा घेतात. त्यांच्या ऑडिओ कॅसेटही घरोघरी ऐकल्या गेल्या आहेत. झी मराठीवरील ‘हास्यसम्राट’ या कार्यक्रमामुळे त्यांच्या नावाला ग्लॅमर मिळालं. एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निर्माण करणाऱ्या ‘जांगडबुत्ता’ या शब्दाचा वापर डॉ. मिर्झा यांच्यामुळेच सुरू झाला, असं मानलं जातं.

आपल्या सहजसोप्या शब्दांतील कवितांमधून त्यांनी व्यवस्थेवर आणि विषमतेवर प्रखर हल्ले केले. मराठी, उर्दू आणि वऱ्हाडी या भाषांवर त्यांचं खूप प्रेम होतं. धर्म व जातीच्या पलिकडे जाऊन माणसाची माणूस म्हणून ओळख, हे डॉक्टर मिर्झा यांच्या कवितेचं खास वैशिष्ट्य होतं. त्यांच्या कवितेचं महत्त्व आताच्या काळात अधिक जाणवतं. भाषा ही कुठल्याही जाती-धर्माची मक्तेदारी नसते, अशी त्यांची वैचारिक बैठक होती. म्हणून त्यांनी आपल्या कवितेत लिहिलं,

मुसलमान असून येते मले मराठी,
ठोकू नका माही पाठ याच्यासाठी
जो जिथे जन्मला, तेच त्याची भाषा.

धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या नावाखाली देशभर माणसांची होणारी विभागणी टाळता यावी यासाठी त्यांनी कवितेच्या माध्यमातून कायम धडपड केली. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा देश एका सूत्रात बांधला जावा, अशी त्यांची इच्छा होती. एका कवितेतून ते म्हणतात,

धर्माचं अन् भाषेचं काय हाय नातं,
भाषा म्हणजे धान्य, धर्म म्हणजे जातं,
मराठीचा अभिमान मले भारताचा गर्व,
मंदिर मशीद एकच हिंदुस्तानातले सर्व

सध्या धर्माच्या नावावर अधर्माचा विचार केला जातोय, त्याबाबत त्यांनी अत्यंत परखडपणे लिखाण केलं.

धर्माच्या आड, अधर्माचा जयजयकार,
माणसांचे झाले, वेगवेगळे प्रकार,
हिरवा निळा भगवा, अशी झाली वाटणी,
आपापल्या मालाची, अलग दुकान थाटणी.

शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्याचं दुःख त्यांना माहीत होतं. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, सरकार तो देत नाही, यामुळे शेती करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आहे, या पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली होती. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असायचा. अनेक कवितांमधून त्यांनी शेतकऱ्यांचं दुःख उजागर केलं.

त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कवितेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. कवितेने त्यांना नवी ओळख दिली. आर्थिक स्थैर्य दिलं. आणि हीच कविता समाजाला काही सांगतही होती. म्हणून ते एका कवितेत म्हणतात,

कवितेने तारलं कवितेने मारलं,
जवा होतो उपाशी, कवितेनेच चारलं,
पुढचं सारं जीवन कवितेने भिजावं,
कविता म्हणतानी दिवा माहा थिजावं,
स्टेजवर कवी गेल्याचा चमत्कार घडावा,
लढता लढता सैनिक धारातीर्थी पडावा.

अखेरच्या श्वासापर्यत कविता जगणाऱ्या डॉ. मिर्झा यांचं मन जणू नियतीने वाचलं. कविता करता करताच त्यांना मृत्यू आला.

संतोष अरसोड







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 4

दिनानाथ 08.12.25
डॉ मिर्झाजीना ऐकण्यात भयाण मज्जा होती. त्यांचं मिर्झाजीकहीन लोकमतच्या गुरुवारच्या पुरवणीत यायचं, अख्खा आठवडा त्याची वाट बघण्यात जायची आणि गुरुवारी शाळेत हमखास त्याच्यावरच किस्से घडायचे. भावपूर्ण श्रद्धांजली

Mangesh Agre 02.12.25
Aamla khup Dukhh hot aahe ki dr. Mirza sir aamla sodun gele ...

Dnyaneshwari Dhanraj Kute30.11.25
आजच्या तरुण पिढीला या विचाराची खूप जास्त गरज आहे सर आजची ही तरुण पिढी इंग्रजी माध्यमांच्या मागे लागून आपली मराठी माय विसरत चाललीय . असे अनेक मिर्झा परत जन्म घेवो आणि या आजच्या पिढीला आपल्या मातृभाषेत असणार प्रेम , गोडवा , माधुर्य शिकवावं .. मी होईन मिर्झा दाखवेल या जगा माझ्या मराठीची शोभा प्रत्येकाला हा लेख मला खूप प्रेरणादायी ठरलाय .

Shantrakshit Gawande29.11.25
आदरांजली लेखात....चांगला वेध

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results