
कॅथोलीक धर्मातील सर्वोच्च पोप फ्रान्सिस यांचं नुकतंच निधन झालं. आता पुढच्या पोपची निवड करण्यासाठी वयाची ऐंशी पार न केलेले जगभरातील १३३ कार्डिनल्स व्हॅटिकन सिटीमधल्या ऐतिहासिक सिस्टाईन चॅपेलमध्ये जमतील. पोप फ्रान्सिस हे पहिले दक्षिण अमेरिकी पोप होते. आता यावेळी आशियाई किंवा आफ्रिकन कार्डिनल पोपपदावर निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारतात सध्या एकूण सहा कार्डिनल्स आहेत. त्यापैकी चौघांनी अद्याप वयाची ऐंशी गाठलेली नाही. ते या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत आहेत. त्यामध्ये गोव्याचे कार्डिनल फिलिप नेरी फेराव, केरळमधील कार्डिनल बॅसिलियस क्लेमिस आणि कार्डिनल जॉर्ज जेकब कुव्वकड, तसंच हैदराबादचे कार्डिनल अँथनी पुला यांचा समावेश आहे. अँथनी पुला हे दलित समाजातले असून त्यांच्यामुळे पोपपदाच्या निवडणूक प्रक्रियेत पहिल्यांदाच दलित व्यक्तीचा समावेश होतो आहे.
पोपच्या निवडणुकीची ही प्रक्रिया किती काळ चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही. एक दिवस, एक आठवडा किंवा त्याहूनही अधिक काळ. मताधिक्य होईपर्यंत. कार्डिनलची ही कॉन्क्लेव्ह (बैठक) चालू असताना सेंट पिटर बॅसिलिकाच्या चिमणीतून काळा धूर निघाला म्हणजे नव्या पोपसंदर्भात अजून मतैक्य झालेले नाही. चिमणीतून पांढरा धूर येऊ लागला की सेंट पीटर्स चौकात जमलेल्या हजारो भाविकांना आणि संपूर्ण जगाला कळतं की नव्या पोपची निवड झाली आहे. पांढरा धूर बाहेर आल्यावर काही क्षणांत पोपपदी निवड झालेल्या कार्डिनलना बाल्कनीत आणलं जातं आणि जगाला सांगितलं जातं, ‘‘वूई हॅव अ पोप!’’
पोपपदी निवड झालेले कार्डिनल पोप म्हणून आपलं नवं नाव जाहीर करतात. (पोपपदाची निवड कशी होती याची माहिती देणारा ‘शूज ऑफ द फिशरमॅन’ हा चित्रपट पाहण्यासारखा आहे.) याआधीचे निवृत्त पोप हे बेनेडिक्ट सोळावे यांचं मूळ नाव जोसेफ रॅटझिंगर होतं, तर नुकतेच निधन पावलेले अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज बेर्गोग्लिओ यांनी पोप झाल्यावर फ्रान्सिस नाव धारण केलं होतं. ते फ्रान्सिस नावाचे पहिलेच पोप होते. शिवाय दक्षिण अमेरिकेलाही त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच पोपपदाची संधी मिळाली होती. आता भारतीय किंवा त्यातही दलित कार्डिनल पोप म्हणून निवडले गेले तर इतिहास रचला जाऊ शकतो.
भारतीय समाजव्यवस्थेत दलितांना पौरोहित्याचे अधिकार नसायचे, पण ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर मात्र या उपेक्षित समाजघटकांना धर्मगुरू होण्याचे आणि पर्यायाने धर्मग्रंथ वाचण्याचे, शिकवण्याचे अन पौरोहित्याचे अधिकार मिळाले.
महाराष्ट्रात या समाजातील पहिले धर्मगुरू होण्याचा मान भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे अस्पृश्यता कायद्याने गाडण्याआधीच मिळाला. नगर जिल्ह्यातील राहुरीजवळच्या चिंचोळे गावचे जोसेफ मोन्तेरो हे १९३० साली कॅथोलिक धर्मगुरू बनले. प्रोटेस्टंट पंथांत ही घडामोड आधीच घडली होती. तिथे ब्राह्मण असलेल्या रामकृष्ण विनायक मोडक, हरिपंत रामचंद्र खिस्ती, नारायण वामन टिळक, नारायणशास्त्री शेषाद्री, नीळकंठशास्त्री गोऱ्हे यांच्याबरोबरीने बहुजन समाजातील बाबा पद्मनजी, कृष्णाजी रत्नाजी सांगळे, भास्करराव उजगरे वगैरेंना ‘रेव्हरंड’ पदाची दीक्षा मिळाली होती.
संगमनेर येथील थॉमस भालेराव हे १९६५ साली पहिले स्थानिक येशूसंघीय किंवा जेसुईट धर्मगुरू बनले. हेच फादर भालेराव १९८९ साली या दलित समाजातील पहिले आणि एकमेव कॅथोलिक बिशप बनले. त्यांच्यानंतर इतर कुठलीही स्थानिक दलित व्यक्ती आजपर्यंत कॅथोलिक बिशप बनलेली नाही.
प्रोटेस्टंट पंथात मात्र आज महाराष्ट्रात अनेक दलित बिशप्स आहेत. भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक विविध जातीजमाती आहेत. त्यामध्ये तथाकथित उच्चवर्णीय आहेत, तसंच दलित आणि आदिवासीही मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक दलित आणि आदिवासी बिशप बनले आहेत. पूर्व भारतातल्या आदिवासीबहुल राज्यांतील अनुसूचित जमातीतील काही व्यक्ती कार्डिनल्सही झाल्या आहेत.
भारतात दक्षिणेतील काही राज्यांत कॅथोलिक बिशपांमध्ये अनेक दलित आहेत. मात्र अलीकडच्या काळापर्यंत या कॅथोलिक दलित बिशपांमधून कार्डिनलपदावर कुणीही पोहोचलं नव्हते. पोप फ्रान्सिस यांनी २०२२ साली हैदराबादचे आर्चबिशप अँथनी पुला यांची कार्डिनलपदी नेमणूक केली आणि कॅथोलिक चर्चमध्ये पहिल्यांदाच एखादी दलित व्यक्ती कार्डिनल बनली. हेच कार्डिनल अँथनी पुला आता पोपपदाच्या निवडणुकीतही सहभागी आहेत.