आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

‘सिरम इन्स्टिट्युट': सिर्फ नाम ही काफी है!

  • युनिक टीम
  • 11.10.25
  • वाचनवेळ 10 मि.
serum header

मार्च २०२०मध्ये पुण्यात महाराष्ट्रातला पहिला कोरोना रुग्ण सापडला. आणि पुढे बहुतांश भारतीयांनी याच पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'ने तयार केलेली लस घेतली. ‘सिरम'चे डायरेक्टर डॉ. उमेश शाळिग्राम यांच्याशी बोलून ‘सिरमची कोरोना स्टोरी' जाणून घेतली, त्याबद्दल..

कोविडविरुद्ध लढण्यासाठी मार्च २०२०पासून भारतात टाळेबंदी जाहीर झाली. रस्त्यांवर शुकशुकाट पसरला. हातावरलं पोट असणाऱ्या माणसांची तर दैना झाली. बस-ट्रेन बंद झाल्याने रोजगारासाठी खेडेगावांतून शहरांत आलेली ही माणसं पायी चालत माघारी आपल्या गावी निघाली. रुग्णालयं कोरोनाच्या रुग्णांनी भरून गेली. इतर आजार झालेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देणं घेणं जिकिरीचं होऊ लागलं. तान्ह्या मुलांचं नेहमीचं लशीकरणदेखील लांबणीवर पडू लागलं. कमी-अधिक प्रमाणात जगातील सर्व देशांची अशीच स्थिती होती.

यावर रामबाण उपाय एकच होता, आणि तो म्हणजे लवकरात लवकर कोरोनाची लस विकसित करणं. जगभरातले सर्व शास्त्रज्ञ एक झाले. त्यांनी युद्धपातळीवर लशीच्या संशोधनाला वाहून घेतलं. मे २०२०च्या सुमाराला जागतिक आरोग्य संघटनेने विविध देशांतील वैद्यकीय कंपन्यांच्या लशी प्रमाणित करायला सुरुवात केली.

लस तर मिळाली, पण लशीचं उत्पादन, पुरवठा, वितरण हे एक मोठं आव्हान होतं. फक्त अठरा वर्षांवरील नागरिकांना ही लस द्यायची म्हटलं तरी भारताच्या लोकसंख्येचा विचार करता शंभर कोटींहून अधिक लशींचं उत्पादन करावं लागणार होतं. हे आव्हान स्वीकारणाऱ्यांमध्ये पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया' ही संस्था अग्रस्थानी होती. कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी एकेका आठवड्यात ३०-३० कोटी कोविशील्ड लशीचं उत्पादन केलं. ही गोष्ट एक संस्था म्हणून ‘सिरम'ला आणि एकंदरीत देशालाच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे घेऊन जाणारी होती. ज्या झपाट्याने हे काम झालं ती यंत्रणा एका रात्रीत उभं राहणं शक्य नव्हतं. त्यामागे सायरस पूनावाला या उद्योगपतीची पाच दशकांची दूरदृष्टी होती. कोरोनामधील सिरमची कामगिरी आणि त्यांच्या अविश्रांत विस्ताराचा विचार करता ‘कोरोना लशीचं विक्रमी उत्पादन सिरमने कसं केलं?' आणि ‘सिरम सध्या काय करतेय?' या दोन प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘सिरम'ला भेट द्यायचं ठरवलं.

सायरस पूनावाला यांनी १९६६मध्ये पुण्यात ‘सिरम इन्स्टिट्युट'ची स्थापना केली. तोपर्यंत भारतात लशींची मोठ्या प्रमाणावर आयातच करावी लागत असे. या आयातीची भरमसाठ किंमतदेखील आपण मोजत होतोच. मात्र, सामान्य व्यक्तीला रोगप्रबंधक लशी माफक किमतीत उपलब्ध झाल्या पाहिजेत हा पूनावाला यांचा उद्देश होता. यातूनच धनुर्वात, प्रतिसर्पविष, घटसर्प, डांग्या खोकला इत्यादींच्या लशी ‘सिरम'मध्ये तयार होऊ लागल्या. त्यानंतर गोवर, कांजिण्या या लशींचं उत्पादनदेखील सुरू झालं.

पुण्यातील हडपसर भागात ‘सिरम इन्स्टिट्यूट' आहे. ‘सिरम'चा हा परिसर साधारण ६५ एकरांचा आहे. तिथे पाऊल ठेवताच आपण एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनसंस्थेच्या आवारात प्रवेश केल्याची जाणीव होते. तिथली शिस्त, शांतता आणि स्वच्छता अगदीच ठळकपणे जाणवणारी आहे. आतमध्ये खासगी गाड्यांना मनाई आहे. अंतर्गत वाहतुकीसाठी संस्थेच्या चारचाकी गाड्या, बसेस आणि इलेक्ट्रिक वाहनं आहेत. आतले रस्ते रुंद, स्वच्छ आहेत आणि रस्त्यांच्या दुतर्फा मोठी झाडं लावलेली आहेत. इथे ‘सिरम'चे साधारण दहा हजार कर्मचारी काम करतात. त्यांत विविध देशांची, वंशाची माणसं आहेत. यांपैकी ३००० शास्त्रज्ञ आहेत. संस्थापकांचे विचार घेऊन काम करणारी टीम पाच दशकांनंतरही कार्यरत असणं ही नवलाची गोष्ट आहे, आणि हेच संस्थेच्या यशाचं गमकदेखील आहे. हा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्यांपैकी एक म्हणजे ‘सिरम'चे डायरेक्टर डॉ उमेश शाळिग्राम.

एखाद्या शास्त्रज्ञाला प्रत्यक्ष भेटण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. शास्त्रज्ञ म्हटलं, की एक वयस्कर, वाढलेल्या पांढऱ्या केसांचा, स्वत:मध्येच हरवलेला आणि मग्न होऊन प्रयोग करत बसलेला माणूस डोळ्यांसमोर येतो. तो रोजच्या व्यावहारिक गोष्टी करताना भांबावत असेल, लहरी असेल असेही गैरसमज आपण बाळगून असतो. पण झालं उलटंच. डॉ. शाळिग्राम बरोबर ठरलेल्या वेळेवर आले. पांढरा शर्ट, ब्लू जीन्स, केसांची पोनीटेल, चेहऱ्यावर हास्य. त्यांच्या आविर्भावात मोकळेपणा होता. आम्ही एकमेकांशी ओळख करून घेतली. थोडक्यात पण छान गप्पा झाल्या. कोरोनापूर्वीचं ‘सिरम' आणि कोरोनानंतरचं ‘सिरम' यावर त्यांनी प्रकाश टाकला.

ते म्हणाले, “सिरम पाच दशकांपासून संशोधन आणि औषधनिर्मितीमध्ये आहे. कोरोनामध्ये ते लोकांना माहिती झालं इतकंच. आम्ही कोरोनामध्ये ज्या दृष्टिकोनातून काम केलं त्याच दृष्टिकोनातून सिरम गेली पन्नास वर्षं काम करत होतं.”

कोरोना टाळेबंदीमध्ये लोक घाबरलेले होते. अख्खं जग लशीच्या शोधात होतं; पण लस शोधल्यानंतरसुद्धा ती माफक दरात, दर्जाशी तडजोड न करता, कमी वेळात, जास्तीत जास्त उत्पादित कोण करू शकेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. पूर्वीच्या अनेक लशींच्या बाबतीत हे अशा पद्धतीचं काम ‘सिरम'ने केलेलं होतं. पूनावाला यासाठी सातत्याने पैसा आणि मनुष्यबळ गुंतवत आले होते, ते त्या वेळेला कामी आलं.

डिसेंबर २०१९मध्ये कोविड आला तेव्हा ‘सिरम'देखील त्याच्या भीषणतेपासून अनभिज्ञच होतं. जानेवारीमध्ये पुण्यात कोरोनाचा रुग्ण सापडला. महिन्याभरात कोरोना झपाट्याने पसरला. आता त्याचं गांभीर्य जाणवायला लागलं होतं. ‘सिरम'ने आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय क्षेत्रातल्या पूर्वापार सहयोगी संस्थांशी संवाद साधायला सुरुवात केली. कोविड लस संशोधन करताना भारत सरकारची याविषयीची भूमिका, धोरणं लक्षात घेणं आवश्यक होतं. यासाठी ‘सिरम'ची टीम १९ मार्च २०२०ला दिल्लीला जाऊन डेप्युटी सेक्रेटरी रेणुस्वरूप यांना भेटली. ऑक्सफोर्डने कोरोना प्रतिबंधक लस बनवण्यात काय प्रगती केली आहे आणि त्यांच्याशी कसे करार केले पाहिजेत याविषयी त्यांच्यामध्ये चर्चा झाली. सरकारने हिरवा झेंडा दाखवला. ऑक्सफोर्डसोबत करार केले गेले.

कागदोपत्री तयारी झाली होती. ‘सिरम'ची टीम दिल्लीवरून परतल्यानंतर ‘सिरम'ने युद्धपातळीवर इमारतीचं बांधकाम सुरू केलं. कारण लशीचा शोध लागेपर्यंत एकीकडे उत्पादन आणि साठा यांची सुविधा उभी करून ठेवणं गरजेचं होतं. त्याचबरोबर संशोधनासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आणली गेली. १५०० ते २००० नवीन कर्मचारी रुजू करून घेतले गेले.

तर अशा पद्धतीने फेब्रुवारी ते मेदरम्यान ‘सिरम' कोरोना लशींच्या उत्पादनासाठी सज्ज झाली. अवघ्या तीन महिन्यांमध्ये ६००० लिटर उत्पादनक्षमतेची यंत्रणा उभी करण्यात आली. तिकडे ऑक्सफोर्डमध्ये लशीची चाचणी झाली. लस प्रमाणित झाली. साधारण मे महिन्यात ऑक्सफोर्डकडून भारतात लशीचं बायोलॉजिकल मटेरियल आलं. आणि जुलै-ऑगस्टमध्ये ‘सिरम'ने लशींची पहिली बॅच बनवलीदेखील. यासाठी ‘सिरम'चा स्टाफ बारा-बारा तास काम करत होता. कित्येकांनी तर प्रसंगी सलग साठ तास लॅबमध्येच राहून काम केलं.

त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सिरमने ५ करोड डोस बनवून ठेवले. हे आत्तापर्यंतचं जगातलं सर्वांत वेगवान उत्पादन होतं. सुरुवातीला ३.२ अब्ज डोस लागणार होते. पैकी २ अब्ज डोस सिरमने पुरवले. जगभरात साधारण ६ अब्ज डोस दिले गेले. त्याचा परिणाम म्हणून २० कोटी जीव वाचले असं धरून चाललो तर त्यातले जवळपास २५ टक्के ‘सिरम'मध्ये उत्पादित लशीमुळे वाचले.

इतक्या प्रमाणात लस बनवण्याची यंत्रणा उभी करायला ऐन वेळी सुरुवात केली असती तर त्यासाठी २-३ वर्षांचा कालावधी लागला असता. त्या परिस्थितीत टाळेबंदी आणि कोरोनाचे बळी सुरूच राहिले असते. ही अतिशय गंभीर परिस्थिती होती. तेव्हा ‘सिरम' खंबीरपणे उभं राहिलं. याचं कारण पाच दशकांचा परोपकारी व्यवसायाचा पाया.

कोरोनाचं प्रमाण अतिशय वाढलं होतं तेव्हा ‘सिरम'मध्ये एका आठवड्यात ३० कोटी डोस बनत होते. ‘सिरम'मध्ये एकूण पाच प्रकारच्या कोरोना लशींचं उत्पादन केलं गेलं. त्यापैकी दोन सर्वाधिक वापरल्या गेल्या. भारतामध्ये ‘कोविशील्ड' लस दिली गेली, तर कोहोव्हॅक्स/ न्यू व्हॅक्सोएड या लशी अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इकडे पाठवल्या गेल्या. विकसनशील देशात तयार झालेली लस विकसित देशांमध्ये निर्यात केली जाणं, ही वैद्यकीय क्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना होती. अमेरिकेने या घटनेची नोंद घेतली आणि भारतीय दूतावासाला भेट देऊन ही घटना साजरी केली. या प्रकल्पाचा आपण एक भाग होतो याचं समाधान ‘सिरम'मध्ये भेटलेल्या सर्व स्टाफमध्ये दिसत होतं. डॉ. शाळिग्राम म्हणाले, “दर्जा, प्रामाणिकपणा, पारदर्शकता यामध्ये आम्ही कधीही तडजोड करत नाही. त्यामुळे आमच्यासोबत काम करण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्था उत्सुक असतात.”

या काळात अमेरिकेने ‘डी मास' सिस्टीम अमलात आणली होती. म्हणजे ‘सर्व अमेरिकी नागरिकांना लस दिल्यानंतरच बाहेरच्या देशांना मदत करणार'. भारताने असं केलं नाही. राष्ट्रीय पातळीवर लशीकरण चालू असतानाच भारताने लशींची निर्यातदेखील केली. अमेरिकेसारखे काही अपवाद वगळले तर कोरोना काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरही दृष्टिकोनात बदल जाणवत होते. बहुतांश कंपन्यांनी, देशांनी स्पर्धा, स्वार्थ बाजूला ठेवलेला आपण पाहिला.

कोरोनाचं संकट सध्या टळलं असलं तरी माणसाची ‘बग्ज व्हर्सेस अस' ही लढाई अखंड चालू असते. त्यासाठी ‘सिरम'सारख्या संस्थांना अविश्रांत काम करत राहावं लागतं. कोरोनामध्ये ‘सिरम' चर्चेत आलं असलं तरी ‘सिरम'च्या विस्ताराचं काम त्याच्या स्थापनेपासून अखंडित सुरू आहे. ‘सिरम'मध्ये तयार होणाऱ्या लशींना जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली आहे. ‘सिरम'मधून १७० देशांना लशींची निर्यात केली जाते. कोरोनापूर्वी ‘सिरम'मधून जगभरात पोचलेल्या लशींचा आकडा तीस अब्जपेक्षा अधिक होता. यामध्ये पोलिओ, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, बीसीजी, हीमोफिलस, एन्फ्लुएंझा, हिपॅटायटिस बी (विषाणुजन्य कावीळ), गोवर, गालगुंड, रुबेला आणि रोटाव्हायरस या लशी आहेत. जगातील ६५ टक्के बालकांना ‘सिरम'मध्ये तयार झालेली एक तरी लस दिलेली असते. स्टीफन कॉफमान या जर्मन शास्त्रज्ञाने हा सगळा डेटा इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे. पोलिओच्या समूळ उच्चाटनातही ‘सिरम'च्या नेदरलँडमधील शाखेचा मोठा हातभार आहे.

‘सिरम'च्या सर्व लशी अगदी माफक किमतीत उपलब्ध करून दिल्या जातात. ‘सिरम'च्या स्थापनेपासूनच पूनावाला यांनी प्रामाणिकपणा, दर्जा आणि माफक किमती ही त्रिसूत्री घालून दिली होती.

डॉ. शाळिग्राम यांच्या मते, ‘कोरोना लशीची किंमत आम्ही पन्नासेक रुपये जास्त ठेवली असती तर आम्हाला कोण प्रश्न विचारणार होतं? पण आमच्या तत्त्वात ते बसत नाही. सिरम माफक दरात लस उपलब्ध करून देऊ शकतं ते दोन कारणांमुळे. पहिलं म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं आणि दुसरं म्हणजे नफ्याचं प्रमाण कमी ठेवणं. १९६७मध्ये सिरम स्थापन झाली तेव्हापासून जागा, इमारती, यंत्रसामग्री, मनुष्यबळ सगळ्याचा विस्तार अव्याहत सुरू असतो. कोरोनाच्या आधी कधी कधी आम्हाला प्रश्न पडायचा, की कशाला हे एवढ्या इमारती आणि लॅब्ज बांधतायत. पण कोरोनामध्ये कळलं की ते किती काळाच्या पुढचा विचार करणारे आहेत!'

‘सध्या सिरम काय करतेय?' असं विचारल्यावर डॉ शाळिग्राम म्हणाले, “सिरममध्ये एक नवीन इमारत बांधून तयार होतेय. कोरोनामध्ये आमची इतर कामं थांबवून आम्हाला फक्त कोरोना लशीवर काम करावं लागलं होतं. त्यामुळे भविष्यात कोविडसारखा एखादा नवा रोग आला तर त्याच्या मुबलक लस उत्पादनासाठी ही राखीव इमारत आहे. पुढची अशी साथ आली तर किमान १० अब्ज डोस लागणार आहेत. पुन्हा तंत्रज्ञानही सतत बदलत असतं. त्यामुळे या नव्या इमारतीमध्ये भविष्यातील रोगांच्या लस उत्पादनासाठी सर्व प्रकारचं अत्याधुनिक तंत्रज्ञान सज्ज ठेवलं गेलं आहे.”

वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात येणाऱ्या तरुणांबद्दल बोलताना डॉ. शाळिग्राम म्हणाले, “नवीन पिढीमध्ये ‘गर्ल्स आर द स्टार्स' असं माझं निरीक्षण आहे. मेडिसिन क्षेत्रामध्ये मुली त्यांच्या कर्तृत्वामुळे आघाडीवर आहेत, हा चांगला बदल आहे. कोविड काळात आम्हाला मर्यादा होत्या. आपत्कालीन स्थितीमध्ये रात्री-अपरात्री काम करणं गरजेचं होतं. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते सोयीचं नव्हतं. त्यामुळे तेव्हा सर्व जबाबदारी पुरुष कर्मचाऱ्यांवर सोपवली होती. पण आता आम्ही अधिकाधिक मुलींना रुजू करून घेता येईल अशा पद्धतीने वेळा आणि येण्याजाण्याच्या सोयींची रचना करतो आहोत.”

सध्याच्या घडीला ‘सिरम'मध्ये साधारण शंभर पद्धतींच्या लशींवर काम चालू आहे. भारतामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचा धोका आहे. भारतात दरवर्षी साधारण ८० हजार ते एक लाख महिला सर्व्हायकल कॅन्सरने जातात. लशीकरणातून त्याचा समूळ नायनाट होऊ शकतो. टीबी हेदेखील मोठं आव्हान आहे. दरवर्षी जगभरात टीबीचे सुमारे अडीच कोटी रुग्ण सापडतात. देवी, पोलिओ, गोवरसाठी भारतात ज्या प्रमाणात काम झालं तसंच ते मागास देशांमध्ये तिथल्या रोगांसाठी करणं हादेखील ‘सिरम'चा उद्देश आहे.

काळाच्या पुढे जाऊन या गोष्टी करणारी ‘सिरम' ही आपल्याकडची एकमेव संस्था असेल.


‘सिरम' आणि विक्रमी लस उत्पादन

- लस उत्पादनाच्या बाबतीत सिरम जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकाची संस्था आहे. आताची सिरमची क्षमता पाच अब्ज लशींची आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची क्षमता सिरमच्या निम्म्याने कमी आहे.

- कोविड काळात १८ वर्षांवरील ९७ टक्के भारतीयांना सिरममध्ये तयार झालेली कोविशील्ड लस देण्यात आली.

- ‘सिरम'मध्ये एका दिवसात विविध रोगांवरच्या साधारण १५-२० लाख डोस तयार होतात.

- जगातील ६५ टक्के बालकांना सिरम इन्स्टिट्युटमध्ये तयार झालेली एक तरी लस दिलेली असते


लस कशी काम करते?

आपल्या शरीरामध्ये कुठल्याही संसर्गाला निष्फळ करण्याची क्षमता असते, परंतु संसर्ग झाल्यापासून प्रतिक्रिया देईपर्यंत शरीराला काही ठराविक वेळ लागतो. तो कालावधी लांबला तर संसर्ग प्रबळ ठरू शकतो. शरीर संसर्गाशी लढायला शिकणारच असतं. तो शिकण्यासाठीचा वेळ कमीत कमी करण्याचं काम लस करते. लस तुम्हाला बालवाडीमधून थेट पीएचडीच्या वर्गात नेऊन बसवते. कारण स्वत:च्या गतीने शरीराने त्या संसर्गाविरुद्ध तयार व्हावं एवढा वेळ नसतो. लस आपली शिक्षिका बनून येते आणि आपल्याला लढायला शिकवते. एका अर्थाने सूक्ष्म प्रमाणात तो संसर्गजंतूच लशीद्वारे शरीरात टोचला जातो. शरीर त्याच्याशी लढतं आणि शिकतं की लढायचं कसं. मग जेव्हा खरंच संसर्ग होतो तेव्हा शरीर त्यासाठी तयार असतं.

('अनुभव' मासिकाच्या ऑक्टोबर २०२४च्या अंकातून साभार)


युनिक टीम







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results