आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

पॉपअप

  • मेघश्री दळवी
  • 19.07.25
  • वाचनवेळ 14 मि.
pop up marathi book on science fiction stories

१९ जुलै, भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक 'जयंत नारळीकर' यांचा जन्मदिवस. अलीकडेच तो राष्ट्रीय विज्ञानकथा दिन म्हणून साजरा होऊ लागला आहे. त्यानिमित्ताने 'समकालीन प्रकाशन'च्या 'पॉपअप आणि इतर विज्ञानकथा' या पुस्तकातील 'पॉपअप' ही कथा खास युनिक फीचर्स पोर्टलच्या वाचकांसाठी!

 जाग आल्यावर मोबाइलकडे नजर टाकली तर डायरेक्ट दहा वाजायला आले होते. घाईघाईने डोळे चोळत खुर्चीवरचा एक टीशर्ट लटकवला आणि ऑफिसच्या मीटिंगसाठी थेट व्हिडिओ कॉलला बसलो. टीम लीडर विश्वासही जांभया देत होता. नॅचरली! रात्री उशिरापर्यंत क्लाएंट कॉल्स घ्यायचे आणि सकाळी इकडे परत पीठ पाडायला बसायचं!

“अरे, चैतन्य! शोस्टॉपर बग आलाय, काय करताय तुम्ही हे फायनल बिल्ड टाइमला? ऑफिसला ये आज. बारापर्यंत पोच.” विश्वास अपसेट दिसत होता.

“कशाला ऑफिसला! मास्क घालून बसणं जिवावर येतं. इकडून बघतो ना.”

“नो वे. मी येतोय. शिवानी आणि पृथ्वी पण येणार आहेत. आपल्याला एकत्र बसूनच करायला लागणार. जेवण मागवू तिथेच.”

शिवानी म्हटल्यावर जरा बरं वाटलं. पण बाहेर पाऊस बघितल्यावर महा वीट आला. उबर येणार का, वेळेवर नेणार का, परत येताना काय, झालंच तर कपडे कुठले घालायचे इथपासून सुरुवात.

माझं तोंड बघून रचना हसली. “कमऑन, चैतन्य. मागच्या आठवड्यात आम्ही टेस्टिंगवाले बसलो होतो की दोन दिवस. इट्स नॉट बॅड. घरात एकट्याने रडण्यापेक्षा एकत्र रडायला मजा येते. आणि शिव्या घालायला समोर लोक असले की जाम रिअल वाटतं बघ!”

शिवानी दिसली नाही कॉलवर. तयारी करत असेल. ती ऑफिसला येणार म्हणजे एकदम महा सजून येणार. आपल्याला पण बघायला हवं - दाढी, ब्रशिंग, डिओ.

“येतो मी.” म्हणून मी कॉल बंद केला. जाऊ दे. रचना म्हणते तसा जरा रीअल फील येईल खरा. नाहीतरी मार्चअखेरपासून घरात कोंडून वैताग आलाय.

नळ सुरू केला तर पाणी नव्हतं. सोसायटीच्या ॲपवर बघितलं तर आता बाराला येणार होतं. भर पावसाळ्यात हे पाण्याचे प्रॉब्लेम्स कसे येतात यांचे? फ्रीजमधून एक बॉटल काढून गार पाण्याने तोंड धुतलं. कपभर दूध मायक्रोवेव्हमध्ये टाकलं आणि उबर मागवायला बसलो.

बाहेर निघालो तर लिफ्ट बंद. कुरकुरत जिन्याने खाली आलो तर रस्त्यावर हे ट्रॅफिक. इतके लोक या पॅन्डेमिकमध्ये बाहेर पडतायत हे बघून आणखी डोकं फिरलं. ऑफिसमध्ये पोचेतो साडेबारा वाजत आले होते.

दहाजण ऑफिसला बघून मात्र बरं वाटलं. माणसात आल्यासारखं झालं. ऑफिस महाविचित्र दिसत होतं. खाली टाइल्सवर गोल गोल वर्तुळं अंतर राखण्यासाठी. खुर्च्या दूरदूर ठेवलेल्या. प्लेक्सिग्लासचं पार्टिशन. दोन रांगामधल्या जागेत रंगीत ओळी. तिथूनच चालायचं. लोकं हाय म्हणत होती, पण मास्कमुळे काही नीट ऐकायला येत नव्हतं.

माझ्या जागेवर पोचून लॅपटॉप उघडतो, तेवढ्यात बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली. चला, निदान ऑफिसमध्ये येताना भिजून आलो नाही हे नशीब. नाहीतर सर्दीने अगदी हैराण होऊन गेलो असतो! आणि मग ताप-खोकला म्हटलं की कोरोनाची भीती मागे लागली असती ती वेगळीच.

सुस्कारा टाकत मी तो शोस्टॉपर बग बघितला. पण डोकं चटकन काम करेना. मग मेल्स उघडल्या. नेहमीप्रमाणे फालतू मेल्स जास्त आणि कामाच्या कमी. मध्येच दोनचार अर्जंट मार्क केलेल्या. संतापाचा अगदी कडेलोट झाला.

माझ्या तोंडाची शेलकी विशेषणं ऐकून समोरून आवाज आला, “काय चैतन्य, काय झालं एवढं?” बघतो तर शिवानी! ही कधी आली?

“या मेल्स, आणखी काय? जंक साला. तुला येत नाहीत का?”

“अय्या, स्पॅमला नाही जात मेल्स?” तिने भुवया उडवून प्रश्न केला. पण माझं लक्ष तिच्या रेखीव मानेत आणि कानातल्या झोकावणाऱ्या डुलांमध्येच अडकलं होतं.

“स्पॅम सेटिंग्स बघ ना. तुझं घरचं वाय-फाय सिक्युअर असेलच ना?” तिने पुन्हा हसून एक सल्ला दिला.

“ते आहेच गं!” मी भानावर येत म्हणालो. “जाऊदे. आधी हा शोस्टॉपर बघूया.”

तेवढ्यात माझ्या लॅपटॉपवर एक पॉपअप आला.

“तुम्हांला तुमचं आयुष्य बदलायला आवडेल?” ठसठशीत चमकती अक्षरं. आता हा कसला नवीन बग? अर्थातच आवडेल मला माझं आयुष्य बदलायला. सालं घरात बसून कोड छापायचं हे काय आयुष्य झालं? शिवाय ती सबर्बमधली जागा काढून इथल्या नव्या पॉश कॉम्प्लेक्समध्ये घर हवं. चांगलं बाविसाव्या मजल्यावर. आणि खाली एक रुबाबदार कार पण हवी. मग फक्त दहा मिनिटांत ऑफिस! आणि ऑफिसमधून घरी गेलं की कॉम्प्लेक्समधल्या जिममध्ये जरा व्यायाम आणि मग मोठ्ठ्या टीव्हीवर उत्तमोत्तम वर्ल्ड सिनेमे. अर्थात हे सगळं ही डेंजर साथ संपल्यावरच.

‘काहीही विचारतात! म्हणे आयुष्य बदलायला आवडेल का... आवडेल ना, पण जे हवंय ते देणार कोण?' असं पुटपुटत मी तो पॉपअप बंद केला. मोबाईल वाजला, पण अनोळखी नंबर म्हणून तिकडे लक्ष दिलं नाही.

बाहेर पावसाचे ढग दाटून आले होते. भर दुपारी अंधार आणि ती महा दमट कोंदट हवा. एक नि:श्वास टाकून कामाला लागलो. पावसाळ्यात मुंबईत एक दिवस धड जाईल तर! पाऊस जास्त पडला तर पाणी तुंबणार. वर ट्रॅफिक आहेच. विश्वास पण लेट झालाय तोवर हे बघायला हवं..

“चैतन्य, तुला नेहमीचा पिझ्झा मागवलाय.” पियूष आल्या आल्या महत्त्वाच्या कामाला लागलेला दिसत होता. मी मान डोलावली. भूक तर लागलीच होती. सर्वांबरोबर बसून खायचं या कल्पनेनेही बरं वाटलं.

तोवर स्क्रीनवर आणखी एक पॉपअप आला.

“प्रयत्न तर करून बघा. तुमचं आयुष्य बदलून बघा.”

‘अरे, काय फालतूपणा आहे? असं आयुष्य बदलतं का कधी? हा व्हायरस आलाय तो आधी घालवून दाखवा आणि मग बोला!' रागाने पॉपअप बंद करायला मी जोरात क्लिक केलं.

“उत्तम! तुम्ही तुमचं जग बदलून पाहायला तयार झालात त्याबद्दल अभिनंदन!”

हे काय आता? मी दचकलो. हं, मी बहुधा चुकून येस बटनवर क्लिक केलं होतं. आता जरा मजा वाटली. कुतुहलाने मी पुढे बघितलं.

काही प्रश्न होते.

तुम्हाला काय बदलायला आवडेल?

१. हवामान

२. अर्थव्यवस्था

३. शतक

अरे वा! आता मला हसू आवरेना. खरंच या गोष्टी बदलता येतील का? आणि बदलता येत असतील तर आता निदान हे हवामान बदला! मुंबईचं हे कुंद, ढगाळ, चिकचिकीत हवामान बदलून दाखवाल तर मानेन मी!

हवामान लिहिलेल्या पर्यायासमोरच्या बटनवर मी क्लिक केलं. आता पुढचा स्क्रीन आला.

१. लख्ख सूर्यप्रकाश आणि थंड हवा

२. लख्ख सूर्यप्रकाश आणि उबदार हवा

३. थंड हवा आणि बर्फवृष्टी

आता मला हे सगळंच प्रकरण मजेशीर वाटायला लागलं होतं. हे पर्यायही भारी होते. मला अर्थातच लख्ख सूर्यप्रकाश आणि थंड हवा हवी होती. मुंबईत कधीतरी हे सुख लाभू दे, असं मनाशी म्हणत मी समोरच्या बटनवर क्लिक केलं.

स्क्रीनवर फक्त ‘ओके' उमटलं.

ओके? म्हणजे काय? काम झालं? मी वळून खिडकीबाहेर बघितलं. तिथे भरपूर उजेड होता. पाऊस पूर्ण बंद झाला होता, इतकंच काय तर रस्तेही कोरडे दिसत होते. अरेच्चा! हे कसं झालं?

इतर कोणाचं लक्ष नाही बघून मी हळूच उठलो, खिडकीजवळ गेलो, आणि ती किंचित उघडली. थंडगार वाऱ्याची झुळूक आत आली.

“अय्या! किती छान हवा आहे, नाही!” शिवानी जवळ येत म्हणाली. सोशल डिस्टन्सिंगची ऐसी की तैसी!

“हो, ना.” मी नर्व्हस हसून म्हणालो.

“सुपर वाटतं, ना? नाहीतर या पावसाने नुसता कंटाळा आला होता. दमट सगळीकडे!” असं म्हणत ती खिडकीपाशी आली. श्वासातून भरभरून हवा आत घेत तिथेच रेंगाळली.

मला उगीचच छान वाटलं. मास्कआड हसू आलं. इथे ऑफिसला आल्याचं बरं वाटायला लागलं. शिवानीचा मॅचिंग निळा प्रिंटेड मास्क तिला काय शोभत होता! मनात आलं, मघाशी तो बर्फवृष्टी पर्याय घेतला असता तर? तर मग हिच्याबरोबर बाहेर मस्तपैकी स्कीइंग वगैरे करायला गेलो असतो.

आणि एकदम मी दचकलो. म्हणजे खरंच त्या पॉपअपमुळे हा बदल झालाय? की असाच योगायोगाने पाऊस थांबलाय? आणि त्याचा गारवा तेवढा जाणवतो आहे? काहीही असो. तो पॉपअप परत आला तर यावेळी आपण बर्फवृष्टीचा ऑप्शन सिलेक्ट करून बघायचा. बघू तर काय होतं ते. खरीच बर्फवृष्टी झाली, तर आयुष्यात एकदा तरी अनुभव मिळेल, च्यायला!

जागेवर येऊन मी परत एकदा कामावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न केला. या बग्जचा उच्छाद नेमका आजच कुठून आला? डिलिव्हरीसाठी तो केव्हिन मागे लागलाय. पण सगळे घरून काम करताना हजार प्रॉब्लेम्स येतात, हे समजत नाही का त्याला? मान्य आहे आमच्याकडून उशीर होतोय. पण जग कशात अडकलंय ते तरी बघा. त्या पॅन्डेमिकच्या तुलनेत तुमच्या डिलिव्हरीची काय प्रायोरिटी? झाले एक दोन दिवस मागेपुढे तर काय जग बुडणार आहे? ते एवीतेवी बुडायलाच घातलंय!

क्लाएंटला चार शिव्या घातल्यावर आपोआप बरं वाटायला लागलं. समोरचा शोस्टॉपर सॉल्व्ह करायची आयडिया दिसायला लागली. रचना म्हणाली होती ते खोटं नाही. इथे ऑफिसमध्ये आलं की बरोबर त्या ट्रबलशूटिंग मोडमध्ये जातो आपण सगळे. ते वर्क फ्रॉम होम अधूनमधून ठीक आहे, पण ऑफिस ते ऑफिसच!

“विश्वासची कार मध्येच बंद पडलीय. तो तिथून कॉल घ्यायला सांगतोय.” पृथ्वी सांगत आला. “कॉन्फरन्स रूमला जाऊया, चल. शिवानी गेलीय तिकडे.”

एकीकडे पिझ्झाचा दरवळ, दुसरीकडे विश्वासचा कॉल, आणि इकडे स्क्रीनवर - अचानक तो पॉपअप!

“तुम्हांला तुमचं आयुष्य बदलायला आवडेल?” तीच ती ठसठशीत चमकती अक्षरं.

यावेळी मात्र मी वेळ न दवडता येसवर क्लिक केलं.

तुम्हांला काय बदलायला आवडेल?

१. शहर

२. जन्मदाते

३. शतक

अरेच्चा! ते हवामान कुठे गेलं? तो तर पहिला पर्याय होता. आता मात्र इथे शहर दिसतंय. हा कुठला पर्याय? मघाशी तर नव्हता. आणि मुंबई सोडून भारतात इतर कुठलं शहर घेणार? हां, मनालीसारखं हिल स्टेशन वगैरे असेल तर चालेल म्हणा, पण मोठं शहर दुसरं कुठलंच नको.

तेवढ्यात लक्षात आलं, शहर भारतातलं असलं पाहिजे असं थोडंच आहे? लंडन, न्यूयॉर्क देखील शक्य असलं पाहिजे. केव्हिनचं बॉस्टन सोडून कोणतंही मस्त मोठं शहर चालेल. तेवढीच गंमत. घेऊ या हा पर्याय?

थरथरत्या हाताने मी शहर पर्यायाच्या समोरचं बटन क्लिक केलं. एक भली मोठी यादी उलगडली. त्यात ओळखीची शहरं होतीच. ॲमस्टरडॅम, सिडनीसारखी. अमेरिका आणि कॅनडामधीलसुद्धा सात-आठ. पण कमी ओळखीचीदेखील होती. बर्न, रेकयाविक, लिस्बन अशी.

आता हा पॉपअपचा खेळ मला मनापासून आवडायला लागला होता. घरी असताना का नाही आला तो? सही टाइमपास झाला असता. बाकीचे गेम्स फिके पडले असते याच्यापुढे. हळूच आजूबाजूला बघत मी पर्याय निवडला इन्सब्रुक. होऊन जाऊदे मस्त स्कीइंग शिवानीबरोबर...

क्षणार्धात बाहेरचं दृश्य बदललं. आता तिथे भुरुभुरू बर्फ पडत होता आणि अंधारून आलं होतं. अधीर होऊन मी समोर नजर टाकली, आणि मला भयंकर धक्का बसला.

तिथे एक परदेशी माणूस शांतपणे आपलं काम करत बसला होता. म्हणजे? हा काय प्रकार आहे? आपली कॉन्फरन्स रूम कुठेय? कॉन्फरन्स रूममधली शिवानी कुठेय? आणि हा समोरचा चम्या असा चक्क मास्क न लावता का बसलाय?

दचकून जाऊन मी सगळीकडे पाहिलं. जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे अनोळखी चेहरे. गोरे, काळे, जाडे, बारीक, पिवळ्या केसांचे, काळ्या केसांचे, निळ्या डोळ्यांचे, हिरव्या डोळ्यांचे...

हे सगळे इतके लोक ऑफिसला? वर्क फ्रॉम होम नाही? सोशल डिस्टन्सिंगचं काय? आणि मास्क? तो तर कोणाच्याच तोंडावर दिसत नव्हता.

हे कसं शक्य आहे? मी तर केवळ शहर बदललं होतं. पण जगभरात थैमान घालणारी साथ नेमकी याच ठिकाणी नाही? मी स्वप्नात आहे की वेगळ्याच कुठच्यातरी काळात आलोय? करोनाच्या आधीच्या? की नंतरच्या? सगळाच गोंधळ वाटायला लागला. आता जेमतेम मिनिटभर आधी मी माझ्या मुंबईच्या ऑफिसमध्ये होतो. आणि आता अचानक?

भेदरून जाऊन मी माझ्या तोंडाकडे हात नेला. तिथेही मास्क नव्हता. मी वाकून स्वत:कडे बघितलं. माझे कपडेही वेगळे होते. अंगात एक जाड उबदार स्वेटर आणि पायात वेगळेच बूट. समोरचा लॅपटॉप तोच होता, पण आता त्याच्यावर माझा कोड नव्हता. वेगळाच काहीतरी मजकूर दिसत होता.

मग मी आता कोण आहे? माझ्या मनात प्रचंड धडकी भरली. उठून वॉशरूमला जाऊन आरशात निरखून घ्यायला हवं होतं, पण पाय उचलेनातच. मोबाईलच्या कॅमेऱ्यात बघायच्या विचाराने डेस्कवर नजर टाकली, तर मोबाईल तिथून गायब होता.

“हे चैतन्य, लिसन...” माझ्या दिशेने येत एक गोरी मुलगी बोलत होती, “तू ऐकलं नाहीस? वादळाची नि जोराच्या हिमवृष्टीची वॉर्निंग आलीय. लवकर निघणार आहेस ना?”

आता मी आणखीनच गोंधळून गेलो. म्हणजे मी अजूनही चैतन्य आहे? मग इथे सगळे मला ओळखतायत कसे?

“मी निघते आहे. येणार का माझ्याबरोबर?” ती विचारत होती.

“नको. मला हे काम पूर्ण करायलाच हवं.” मी चाचरत म्हणालो. वेगळ्याच ॲक्सेंटमधल्या माझ्या आवाजाने मी आणखी हादरलो.

“ओके. बट टेक केअर.” असं म्हणत खांदे उडवत ती निघून गेली.

आता परत पॉपअप आला की चुपचाप परत मुंबईला जायचं, बाबा! मी मनाशी म्हणालो. पुरे हे विचित्र खेळ. तो विश्वास बोंबलेल तिकडे. आणि जॉब गेला तर या कोरोना काळात आणखीच वांदे.

एक एक करून सगळे निघाले. काहींनी मला हात हलवून बाय केलं, तर काहींनी नुसत्या भुवया उडवून प्रश्नार्थक चेहरा केला. मी लॅपटॉपकडे बोट दाखवत वेळ निभावून नेली. माझी नजर मात्र तो पॉपअप पुन्हा कधी येतोय याच्याकडे होती. पण अख्खं ऑफिस रिकामं होईपर्यन्त तो पॉपअप आलाच नाही.

आता मात्र माझा धीर सुटायला लागला. आपण कुठे आहोत? काय करतोय इथे नक्की? आपला मोबाईलपण जवळ नाही. आणि परत जायचं म्हटलं तर जायचं तरी कसं? विचारांच्या तंद्रीत मी जागेवरून उठून चालायला लागलो. वॉशरूम आधी बघायला हवी म्हणत अंदाजे एक दिशा धरली. त्या परक्या देशातलं ते परकं ऑफिस आता अगदी नकोसं झालं होतं.

“हे चैतन्य, तू काय इथेच थांबणार आहेस?” सिक्युरिटी ऑफिसर माझ्या खांद्यावर हात ठेवून विचारत होता.

मी एकदम भानावर आलो. “अं, हो, असं म्हणतोय...”

“गुड. बरं केलंस. नाहीतरी तुझं घर दुसऱ्या टोकाला आहे. त्यात आज सगळ्यांनाच घरी जायची घाई असल्यामुळे ट्रॅफिक. पोचेपर्यंत वादळ आलं आणि गाडी बंद पडली तर पंचाईत!”

“हो ना,” म्हणजे या इन्सब्रुक शहरात माझं घर आहे? आणि गाडीदेखील? आता मी आणखीच गोंधळून गेलो.

“चल, मला चांगली कंपनी होईल.” तो तगडा ऑफिसर बोलतच होता. “ड्रिंक्स घेऊयात?”

“नको आज, मला काम आहे.” म्हणत मी मागे सरकलो. “जस्ट इकडे जाऊन येतोय.”

“शुअर.” ऑफिसर मान हलवत निघून गेला, तसा मी उजवीकडच्या बाजूला वळलो. थोडा चालत गेलो, तर तिकडे नेमका डेड एंड होता. वॉशरुम कुठे होती काय माहीत!

नाईलाजाने मी पुन्हा मागे जायचा निर्णय घेतला. पण आता मला माझी जागाच सापडेना. एखाद्या भूलभुलैयात अडकल्यासारखं झालं. एकदा इकडे, वळून परत तिकडेच. बऱ्याच चकरा झाल्या. बराच वेळ झाला. समोर बाहेर जायचा मार्ग दिसत होता, पण त्या मोठ्या हॉलबाहेर जायला मन घेईना. न जाणो आणखी भलतीकडे फसलो तर? त्यातून त्या आडदांड सिक्युरिटी ऑफिसरकडे मघाशी गन दिसली होती. मी कुठे चुकीच्या जागी गेलो आणि त्याने गन फायर केली तर?

तेवढ्यात दूर एका लॅपटॉपवर काही चमकलं.

आपला पॉपअप! मनाशीच म्हणत मी धावत तिकडे पोचलो. लगेचच खुर्चीत बसत स्क्रीनकडे पाहिलं.

“तुम्हांला तुमचं आयुष्य बदलायला आवडेल?”

उतावीळ होऊन मी येसवर क्लिक केलं.

तुम्हाला काय बदलायला आवडेल?

१. अर्थव्यवस्था

२. जन्मदाते

३. शतक

अरे! आता शहर पर्याय कुठे गेला? हे काय चाललंय? मी बावचळून बघायला लागलो. पॉपअप लुकलुकत होता. तो गेला तर? बापरे! अर्थव्यवस्था? च्यायला, ती बदलून काय होणार? जन्मदाते? ते कशाला? आहेत ते बरे आहेत की! मग शतक? मी घाईघाईने शतक पर्यायाच्या समोर क्लिक केलं. समोर आणखी तीन पर्याय आले.

१. न्यूटन

२. शेक्सपिअर

३. बॅबेज

न्यूटन! न्यूटन तर खूपच जुना झाला. आणि शेक्सपिअर कोणत्या शतकातला काय माहीत? बॅबेज नाव ओळखीचं वाटतं आहे. अरे हो - कम्प्युटरवाला तोच तो चार्ल्स बॅबेज असणार. त्याचं नाव वापरायचं बरं सुचलं या लोकांना! फँटास्टिक! तोच बरा पडेल. तारवटलेल्या डोळ्यांनी मी बॅबेजसमोर क्लिक केलं.

आता मी एका लाकडी केबिनमध्ये शेकोटीजवळ ऊब घेत बसलो होतो. जवळच कसल्यातरी तांबूस पेयाचा भला मोठा पेला होता. आश्चर्याने मी स्वत:कडे पाहिलं. मळकट रंगाचे जाडेभरडे लोकरी कपडे, जाड कातड्याचे जुने बूट, आणि हातात भडक रंगाचे जाड हातमोजे.

छातीत धडधडायला लागलं. आजूबाजूला बघितलं तर त्या छोट्या केबिनमध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. एका कोपऱ्यात जुनाट स्टोव्ह आणि काही एनॅमलची भांडी. काही चुकलं नसेल ना? मी कोणत्या शतकात येऊन पडलोय? कुठे आलोय? माझ्या छातीत एकदम पाकपुक झालं.

दबकत दबकत मी उठलो. त्या केबिनचं दार उघडलं. सभोवताली अंधुकसा संधिप्रकाश पसरला होता. एक एक पाऊल टाकत मी हळूहळू बाहेर आलो. त्या धूसर प्रकाशात बाहेरच्या दृश्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. मी एका उंच डोंगरावर उभा होतो. समोर पर्वतांच्या रांगाच रांगा होत्या, आणि उजवीकडे एक उभा कडा. समोर आणि डावीकडेदेखील उंच झाडं बर्फाच्या भाराखाली वाकलेली होती. जवळपास एकही घर दिसत नव्हतं की या केबिनसारखी दुसरी केबिनही कुठे नव्हती. फक्त झोंबरा वारा, बर्फाळ पर्वतराजी आणि स्तब्ध शांत एकांत.

आता मात्र मी पूर्ण शहारून गेलो. मनाला भयाने घेरलं. त्यापेक्षा मुंबईची दमट हवा परवडली. तिथली कोरोनाची आकडेवारी बरी. घरात काम करता करता बनवलेली मॅगी तर नक्कीच बरी. पोटात खड्डा पडायला लागला. इथून निघायला हवं. लवकरात लवकर. अजिबात वेळ न दवडता...

मी सगळीकडे पुन्हा एकदा नजर टाकली. इथे कोणी मदतीला मिळण्याची आशाच दिसत नव्हती. मग कसं जाणार? आणि दुसरीकडे कुठे जायचं तर तो पॉपअप हवा, पॉपअप...

धावतच मी केबिनमध्ये परत आलो आणि एकदम चरकलो. लॅपटॉप? तो इथे कुठाय? तो नसेल तर पॉपअप कशावर येणार? आणि पॉपअप नसेल तर...

माझी नजर चोहीकडे भिरभिरत होती. पण इथे कसा लॅपटॉप येणार? इथे तर साधी वीजही दिसत नाही. आणि इंटरनेट हवं, निदान टेलिफोन लाइन हवी; ती.. ती इथे कशी असणार?

आणि मग एक एक करून माझ्या ध्यानात यायला लागलं. हे बॅबेजचं शतक. बॅबेजने पहिला कम्प्युटर डिझाइन केला. पहिला. तो सुद्धा काय तो मेकॅनिकल. म्हणजे गिअर आणि लिव्हरवाला. तो तेव्हा चाललाच नाही म्हणतात. मग आता इथे आपल्याला लॅपटॉप आणि इंटरनेट कुठून मिळणार?

आपण आता इथे कायमचे अडकलो गेलो आहोत हे पूर्ण लक्षात येईतो मी अर्धाअधिक गोठून गेलो होतो.

लांबून कुठूनतरी एका बाईचा आवाज येत होता, “चैतन्य, चैतन्य! आपल्या सगळ्या मेंढ्या दिसत नाहीयत. चार कमी आहेत, त्यांना शोधायला हवं...”

ही कोण? मी धसकून पाय उचलायचा प्रयत्न केला.

आता समोर कोणत्याही पॉपअपचा पर्याय उरलेला नव्हता!

मेघश्री दळवी

मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Anita Kanitkar 24.07.25
Fantastic idea

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results