भारतीयांच्या जागतिक पर्यटनाच्या नकाशावर व्हिएतनामचं नाव तसं अंमळ दुर्लक्षितच आहे. मात्र, जुनं राजधानीचं शहर हानोई खास आपली अशी एक प्रादेशिक आब राखून आहे. त्याची एक झलक.
व्हिएतनाम हा एक नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असा देश आहे. जायचं जायचं असं काही वर्षं घोकत होतो, तो यंदा उत्तर व्हिएतनाममधलं राजधानीचं शहर हानोईला जायचा योग आला. खरं सांगायचं तर पूर्व आशियातल्या सर्वच जागा प्रेक्षणीय आहेत. कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, तैवान, द. कोरिया, जपान.. हे सर्वच देश पाहण्यासारखे आहेत. शेवटी आपला खिसा, कौटुंबिक आवडीनिवडी आणि हाताशी असलेला वेळ यांचा ताळमेळ जमवणं महत्त्वाचं.
सहसा फक्त हानोईला कोणी जात नाही. दूरदेशातले पर्यटक नीट आखणी करून; निदान हानोई, दानांग, होचिमिन आणि कंबोडिया असं सगळं दहा-बारा दिवसांदरम्यान करतात. आमच्या कुटुंबात कोणीही आखणीकुशल नाही आणि तिघांच्या सुट्ट्या एका वेळेस घेता येणं हीच एक पर्वणी असते. किचकिचाट नसलेल्या सर्वच जागा आम्हाला मनापासून आवडतात.
व्हिएतनाम पर्यटकांना ऑन-अरायव्हल टूरिस्ट व्हिसा मिळतो. इंटरनेटद्वारे आधी नोंदणी मात्र करावी लागते. तसा तो आधीही काढता येतो, पण आवश्यक नाही. असा व्हिसा ही माझ्या लेखी मोठी जमेची बाजू. घाईगडबडीत व्हिसा अर्जाच्या रिसीटवर माझा पासपोर्ट क्रमांक चुकीचा भरला गेला होता. विमान तिकीट तपासनिसाने ते निदर्शनास आणून दिलं. मग आम्ही त्याला नवरा-बायको मराठीत कसं भांडतात त्याचं छोटंसं प्रात्यक्षिक करून दाखवलं. शेवटी त्यानेच ‘आता असं करा, तुम्ही जा; पण तिकडे प्रवेश दिला नाही तर युवर वाइफ विल हॅव टु कम बँक. ती आमची जबाबदारी नाही', असं म्हणून बोर्डिंग पास जारी केला. ‘काय एकेक लोक असतात' असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता आले. आमच्याकडेही दुसरा पर्याय नव्हता. एकदाचा (गॅसवर) प्रवास पूर्ण करून, हानोईला त्याच चुकीच्या पासपोर्ट क्रमांकावर व्हिसा मिळेपर्यंत धाकधूक. तो मिळाला एकदाचा. कधी कधी तिकडे फार गर्दी असते वगैरे ऐकलं होतं. तसं काही झालं नाही. पण तिथे फार निवांत काम करतात एवढं मात्र आहे.
एअरपोर्टबाहेर स्वच्छ आणि सुस्थितीतली प्रीपेड टॅक्सी लगेच मिळाली. प्रशस्त मोकळे रस्ते पाहून आमची कन्या म्हणाली- अमेरिकेसारखं वाटतंय! तिला जरा कुठे मोकळे रस्ते दिसले की अमेरिकेसारखं वाटतं. डायवरसाहेब अगदी हसतमुख, व्यावसायिक. त्याने तत्परतेने कामकाजी, जुजबी माहिती पुरवली. पोचायला किती वेळ लागेल, एकदा मध्यवस्तीला लागल्याबरोबर वाहतूक कशी तुंबते, वाहतुकीवर ताण येण्याचे पीक अवर्स, त्याची कारणमीमांसा वगैरे. चौकाचौकांतले म्युरल्स पाहून छान वाटत होतं. टुमदार घरं. फार फार तर दुमजली. आम्ही राहतो त्या हाँगकाँगमध्ये बिल्डिंगा अक्षरशः एकमेकींना स्टेपल केलेल्या. त्यामुळे मोकळ्या जागेचं अप्रूप. दुचाकीवर निवांत ट्रिपल सीट वगैरे लोक दिसू लागले तसं शहर जवळ येऊ लागल्याचं समजलंच.
हानोईत जुनं फ्रेंच कार्टर आहे, तिथे ‘होन किएम' तळं आहे. तळ्याभोवताली अनेक हॉटेल्स आहेत, त्यातल्या एका अतिशय सुंदर बुटिक हॉटेलमध्ये आम्ही राहण्याची व्यवस्था केली होती. शहराचा सर्व जुना भाग पायी फिरण्यासाठी ते ठिकाण उत्तम आणि मध्यवर्ती होतं. तिथून तीन किलोमीटरच्या परिघात सर्व काही होतं. एक नकाशा हातात घेतला की झालं. पायी फिरायची तयारी मात्र हवी. तिथले फुटपाथ मात्र आपल्यासारखे. लोक तिथे निवांत स्टुल-टेबलं टाकून जेवतात काय नि काय काय!
इथे रस्ता आपल्या जिकिरीवर ओलांडावा! कधी कधी रस्ता ओलांडायला पाच-सात मिनिटं सहज लागतात. दुचाकी चालवणाऱ्या लोकांनी हेल्मेट घातलं होतं एवढंच काय ते बरं होतं. त्यातही खास बायकांसाठी गुलाबी, पर्पल आणि ‘हेलो किटी'वाली हेल्मेटं पाहून धन्य झाले! शेवटी एक दिवस एका हेल्मेटच्या शोरूममध्ये मी घुसलेच. ज्ञानार्जन (भोचकपणा) करायचं होतं! विक्रेत्याने ती खास बायकांसाठीची छोटी आणि तऱ्हेतऱ्हेची फॅशनेबल हेल्मेटं मला दाखवली. यातून केस खराब होत नाहीत, वेणी नीट बाहेर काढता येते, छान दिसता येतं, असं त्याने मला आवर्जून सांगितलं. आता वेणीबिणी नीट बाहेर काढता येते हे खरं, पण डोक्याचं काय? डोक्याच्या खालच्या भागाला आवरणच नाही म्हणजे! मेंदू वाचेल का खरंच एखादी बाई अपघातात सापडली तर? पण जिवाचं काय एवढं? छान दिसणं महत्त्वाचं आहे हो! जिकडे-तिकडे या रंगीबेरंगी हेल्मेटांचा ताटवा, पोरांना मागे बसवून घेऊन जाणाऱ्या सुंदर बायका आणि दुचाक्यांचा सुळसुळाट. मात्र, चौकाचौकांत पोलिस नव्हते तरी लोक सिग्नल पाळत होते.
पहिल्या दोन दिवसांत आम्ही तो जुना फ्रेंच क्वार्टर पायी पिंजून काढला. जरा वाहनांचा त्रास होतो, पण त्याला काही इलाज नाही. डोक्यावर टोपी मात्र हवी. ऐन ऑगस्टात तिथे उन्हाने आणि घामाने पार कावलो होतो आम्ही. एखादी पावसाची सर पडून गेली की तेवढ्यापुरतं दोन-चार तास वाऱ्याच्या झुळुका. बाकी तुडुंब ऊन आणि दमट वातावरण. अमेरिकी सैन्याला त्या तशा हवामानात लढणं किती जड गेलं असेल त्याची सहज कल्पना यावी. अशा वातावरणामुळे पहाटेपासून लोकांची लगबग सुरू होते आणि सकाळी १० वाजेपर्यंत सर्व निवांत. झोपा काढायला आवडणाऱ्या सूर्यवंशी पर्यटकांनी आपल्या यादीतून हानोईला वगळावं हे बरं.
दरम्यान आम्ही एका टूर कंपनीद्वारे हालोंग बे सहलीचं बुकिंगही करून ठेवलं. रात्रभराचे, सूर्योदय पाहण्याचे क्रूझही असतात. आपल्या जे आवडेल आणि परवडेल तसं बुकिंग करावं. वाट्टेल तितक्या टूर कंपन्या आहेत. त्यातल्या त्यात ज्या कंपन्या जरा बऱ्या वाटतात, जिथे प्रश्नांची नीट उत्तरं देतात अशा कुठल्याही कंपनीचं बुकिंग करण्यास हरकत नाही. किमती सगळ्या यू.एस. डॉलरमध्ये. त्यात सहसा जेवणाचा समावेश असतो. शाकाहारी जेवणाचं नीट (तीनतीनदा) सांगितलं तर ती व्यवस्था करून मिळते. शाकाहारामुळे ठायी ठायी काम अडतं. त्याची सवय करून घ्यायला हवी. मोठ्या शहरात काही तरी खायला मिळतं; पण शहराबाहेर, तेही आपल्या पद्धतीचा शाकाहार कसा मिळणार? सवय नसलेल्यांना त्रास होतो- नाकाला आणि जिभेला. कधी तरी उपाशी राहायची वेळसुद्धा येऊ शकते. पण हे सर्व आपल्याच अट्टहासामुळे असतं. त्यामुळे करणार काय?
मांसाहारी लोकांची मात्र चंगळ असते. स्थानिक पदार्थांपैकी ‘बन चा' (ग्रिल्ड पोर्क नूडल्स) हा तिथला सर्वांत फेमस प्रकार नवऱ्याने खाऊन पाहिला. त्याला फार आवडला. ‘फो' हे व्हिएतनामी नूडल सूप जगभरात प्रसिद्ध आहे. खाऊ शकत असाल तर रस्त्यावरचे प्रसिद्ध व्हिएतनामी खाद्यपदार्थ वाजवी दरात मिळतात. गोगलगायीचं सूपही प्रसिद्ध आहे म्हणतात. तिथली ‘एग कॉफी' ही प्रसिद्ध आहे. शाकाहारातलं मला सर्वांत आवडलं ते म्हणजे रस्त्यात मिळणाऱ्या ताज्या फळांचे स्वादिष्ट रस आणि बारीक चिरलेली काकडी व तीळ-शेंगदाणे घातलेले कोल्ड नूडल्स.
हानोई म्हणजे सगळ्याच जुन्या शहरांप्रमाणे जुन्या-नव्याचं मिश्रण. जुन्या वास्तूंना संरक्षित ठेवायचा सरकार आपल्यापरीने प्रयत्न करते आहे. इथलं लाकडावरचं लाखेचं नाजूक आणि सुरेख काम जगप्रसिद्ध आहेच; पण तैलचित्रं, म्युरल्स, तलम सुती कापड, रेशीम, हातमागावर विणलेलं सुरेख कापडचोपड, लाकडावरचं कोरीवकाम, बांबूच्या वस्तू, सर्वच सुंदर आणि सुबक आहे. हानोईतल्या तळ्याभोवतीच्या परिघात सहज चालता चालता दहा तरी कलादालनं दिसतील. हीच सौंदर्यदृष्टी सगळीकडे पाहायला मिळत होती. साधंसं कॉफी शॉप का असेना, पण भिंतींवरची चित्रं प्रेक्षणीय होती.
हानोईचं ‘म्युझियम ऑफ फाइन आर्ट' हे एक अतिशय सुरेख संग्रहालय आहे. आवड असणाऱ्यांना एखादा दिवससुद्धा घालवता येईल नीट पाहायला. पण आमच्यासोबतची लहान आणि थोर मंडळी फार कटकट करतात (तरी मी त्यांना बखोटीला धरून नेतेच). दुर्दैवाने आत अगदी मोजके पर्यटक असतात, पण कलादालन अतिशय समृद्ध आणि आवर्जून पाहावं असं आहे. आतील ‘अंकल हो' (हो चि मिन्ह) या राष्ट्रपित्याला समर्पित अनेक चित्रं आहेत. युद्धाचीही अनेक चित्रं आणि मूर्ती आहेत; पण ती शांततेची प्रतीकं वगैरे नव्हेत, उलट सशस्त्र क्रांती आणि वीरश्रीला जरा जास्तच उत्तेजन देणारी वाटली.
हानोईतलं ‘वॉटर पपेट थिएटर' आणि त्यांचा कार्यक्रम आवर्जून पाहण्याजोगा असतो. ही परंपरा फार जुनी. लाखेचा मुलामा दिलेल्या लाकडी बाहुल्या काठ्यांच्या साहाय्याने पाण्यात नाचवतात. जुन्या काळी भाताच्या खाचरात अतिवृष्टीने पाणी भरलं की स्थानिक लोक हा खेळ खेळत असत असं म्हणतात. सादरकर्त्याचं त्या पपेट्सवरचं कौशल्य वादातीत असतं. साधारण टूरिस्टांना झेपेल इतपतच स्थानिक भाषा वापरली जाते. सुरुवातीचं निवेदन इंग्रजीत; बाकी फक्त झांजा, हार्प, इतर वाद्यं आणि गायक-गायिकांच्या ताफ्याच्या प्रत्यक्ष संगतीने आणि पपेट्सच्या अद्भुत सादरीकरणाच्या माध्यमातून लोककथा पुढे सरकते. एकंदरीत तो कार्यक्रम सुरेख आणि पर्यटकांच्या दृष्टीने आटोपशीर असतो. लोककलांना त्या निमित्ताने निदान रोजगार मिळतो. लहान मुलांनाही मजा येते. काही ठिकाणी लहान मुलांना पपेट्स हाताळू देतात. माहिती देतात. लाकडी बाहुल्या विक्रीसाठीही ठेवलेल्या असतात. बाकी, विविध देशांतले प्रेक्षक आपापल्या फोनांनी वैताग आणतात. तिथल्या अपुऱ्या प्रकाशात आपापल्या फोनवर तो कार्यक्रम ध्वनिमुद्रित करण्याची स्पर्धा चालू असते.
हानोईला जाणाऱ्यांसाठी ‘हालोंग बे' हे प्रमुख आकर्षण असतं. त्यासाठी शक्यतोवर एक-दोन दिवस ठेवायलाच हवेत. या खाडीत पाचूच्या रंगाचा शांत समुद्र आहे आणि भोवताली लाइमस्टोनची विविध आकारांतील नैसर्गिक शिखरं, त्यावर पर्जन्यवृक्षांची झाडी! झाडून सर्व व्हिएतनामी पर्यटनाच्या पोस्टरवर आणि चलनी नोटेवरही याचं चित्र समाविष्ट केलेलं आहे, इतकं त्याचं अनन्यसाधारण महत्त्व. या ठिकाणाला जगातलं आठवं आश्चर्य असं संबोधित करण्यात येतं. स्थानिक मिथकांनुसार ड्रॅगनच्या मस्तीतून ही खाडी आणि २,००० लहान-मोठे लाइमस्टोनचे डोंगर तयार झाले. हालोंग म्हणजे ‘ड्रॅगन डिसेंडिंग'. उत्तर व्हिएतनाममधलं हे नैसर्गिक आश्चर्यच म्हणावं लागेल.
पण प्रत्यक्ष तिथलं वातावरण आपण जाऊ त्या दिवशी कसं असेल ते सांगणं अवघड आहे. तिथे जाऊनही पावसामुळे काहीही पाहता न येणं असंही घडू शकतं. सहली रद्द होतात. पर्याय नसतो त्यांनाही. आम्ही गेलो त्या दिवशी डोळ्यांसमोर अंधारी यावी इतकं ऊन होतं. अक्षरशः भाजून निघालो. हानोईपासून तिथपर्यंत जायला आता एक्स्प्रेस वे केला आहे. तरीसुद्धा पोचायला तीनेक तास सहज लागतात. (जुन्या काळी एक दिवस लागत असे.) विविध प्रकारच्या टूर्स उपलब्ध आहेत. काही प्रचंड महाग, काही ‘क्रूझसमवेत सूर्यास्त आणि सूर्योदय पहा' प्रकारच्याही आणि ‘एका दिवसात हालोंग बे दाखवून परत' आणणाऱ्याही. बसमध्ये इंटरनेट असतं हेही बॅकपॅकर्सना एक आकर्षण असतं. एवढा छोटासा देश, पण तरी रस्ते भारतापेक्षा चांगले, हा नवऱ्याचा आवडता आणि खिन्न असूयेचा विषय होता.
पोराबाळांना घेऊन जाणाऱ्यांनी आणि बस-बोट लागणाऱ्यांनी सावधान! क्रूझ टर्मिनल म्हणजे अक्षरशः एसटीचा थांबा होता. आणि तिथली शौचालयंही बऱ्यापैकी वाईट होती. आमच्या गाइडने आधीच ‘तिथली तरी बरी, पण बोटीवर जाऊ नका' अशी मोकळेपणी सूचना केली. एकंदरीतच सर्व गाइड चांगले होते. व्यवस्थित हसत-खेळत, नेमकी आणि रंजक माहिती पुरवत होते. बोट चांगली सुसज्ज असते. आधी सगळेजण हौसेने बोटीच्या वरच्या मजल्यावर गेले, मग उन्हाच्या तडाख्याने गुमान डायनिंग रूममध्ये. बोटीवर मासे आणि शाकाहारी जेवण अर्थातच एकाच टेबलावर शेजारी-शेजारी. वाढलेल्या माशांभोवती उडणाऱ्या माश्या. ते पाहून अन्नावरची वासना उडाली. ती तशीही त्या उन्हाच्या काहिलीमुळे उडालीच होती.
एकदा ‘हालोंग बे'ला पोचल्यावर तिथे कयाकचा पर्याय उपलब्ध आहे, किंवा नावाड्यासोबत बांबू बोटीतली सैर. हे सर्व त्या टूर पॅकेजमध्ये समाविष्ट असतं. त्या सुंदर, संथ, हिरव्याशार पाण्यात बोटीत बसून लाइमस्टोनच्या डोंगरांना विळखा घालून विहार करणं हा खरोखर एक सुंदर अनुभव होता. काही साहसी पर्यटक पाण्यात उड्या वगैरे टाकतात. पण आमच्या टूर गाइडने आपला जेलिफिशच्या चाव्याचा व्रण दाखवून आधीच लोकांना धोक्याची घंटा दिली होती ती योग्यच होती म्हणा. १९९४ साली युनेस्कोने ‘हालोंग बे'ला विश्ववारसा म्हणून घोषित केलं. काही ठिकाणी थांबून पर्यटकांना डोंगरांमध्ये थोडं वर चढून ग्रोटोज (गुहा) पाहण्याचीही सोय आहे. डोंगराच्या आतल्या गुहेतलं अविरत ठिबकणारं पाणी, त्याने कातलेला तो दगड आणि त्यातून निर्माण झालेले विविध आकार अद्भुतरम्य दिसतात. थोडक्यात, हवामानाने हात दिला तर ‘हालोंग बे'ची सफर अविस्मरणीय ठरू शकते.
हानोईबाहेरच्या मोठ्या सहलींदरम्यान जमेल तसं हानोईत पायी फिरणंही सुरूच होतं. हो चि मिन्हचं भव्य स्मारक, ‘वन पिलर पॅगोडा', राष्ट्राध्यक्षांचा राजवाडा वगैरे बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत. शोध शोध शोधलेलं बोटॅनिकल गार्डन मात्र अगदीच यथातथा निघालं. जुन्या शहरातलं मला सर्वांत आवडलं ते ‘टेम्पल ऑफ लिटरेचर' (साहित्याचं मंदिर) असं अगदी समर्पक नाव धारण केलेलं इ.स. १०७० मधलं राजघराण्यासाठी नियुक्त केलेलं पुरातन विद्यापीठ. कन्फ्युशियस या तत्त्ववेत्त्याला आणि त्याच्या शिक्षणपद्धतीला हे मंदिर समर्पित केलं आहे. सुरुवातीला राजघराण्यातल्या व्यक्तींनाच इथे शिकता येई. मग हळूहळू सर्वांना प्रवेश दिला जाऊ लागला, कारण हानोईमधली विद्यापीठांची संख्या मर्यादित होती. राजा-महाराजांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून जमेल तशी आपल्यापरीने वास्तुरचनेत भर घातली. काळाच्या ओघात बरीच पडझड होऊन, अनेकदा पुनरुज्जीवित झाल्यानंतरही पाहणाऱ्याला त्या काळात अलगद घेऊन जाऊ शकणारी ही वास्तू. कडक परीक्षेनंतर डॉक्टरेट मिळवलेल्या पंधराव्या शतकातल्या १३०७ भाग्यवानांचं नाव-गाव कोरलेल्या कासवाच्या पाठीवरच्या शिळा ही इथली खास गंमत. ती नावं त्या शिळांच्या स्वरूपात अमर झाली आहेत आता. जागोजागी विद्यापीठाच्या रचनेबद्दल योग्य त्या ठिकाणी माहितीफलक लावलेले आहेत, त्यात पूरक माहिती उपलब्ध आहे.
हानोईहून थोडीशी दूर अशी एका दिवसभराची सहल म्हणजे ‘बाय दिन्ह' मंदिर आणि ‘अँग आन ग्रोटोज'. जुन्या राजधानीच्या जवळ हा बाय दिन्ह पॅगोडा वसला आहे. जुन्या पुरातन पॅगोडाजवळ तुलनेने मोठं आणि अतिशय प्रशस्त असं मुद्दाम बांधून घेतलेलं नवीन मंदिर आहे. मंदिर नवीन असलं तरी आतल्या मूर्तींची निवड विचारपूर्वक केलेली दिसून येते. उगाच फॅशन म्हणून विसंगत अशा संगमरवरी मूर्ती वगैरे अचाट मूर्खपणा दिसला नाही. पायाखालीसुद्धा दगडी फरशा, वर लाकडी छत.
दर महिन्याच्या सहाव्या दिवशी तिथे स्थानिक वारकरी येतात. आम्ही गेलो त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कसलासा प्रार्थना समारंभ सुरू होता. काळपट गडद करड्या रंगाचा गणवेष आणि गळ्यात जपमाळा घालून जथ्थ्याजथ्थ्याने अनेक वयस्कर स्त्रिया तिथे आल्या होत्या. त्यांना घेऊन येणाऱ्या स्वस्त स्थानिक बससेवा असतात. सामूहिक प्रार्थना, जेवण इत्यादी कामकाज आटपून दुपारच्या उन्हात बायका वामकुक्षीसाठी चटयांवर अंमळ लवंडल्या होत्या. जपमाळ ओढत होत्या अथवा हळू आवाजात गप्पा मारत होत्या. दुपारी चारची प्रार्थना आटपून मग त्या आपापल्या गावी प्रस्थान करणार होत्या. अगदी साध्या व्हिएतनामी ताई, माई, अक्का, काकू दिसत होत्या सर्वजणी. क्वचितच एखादे काका दिसत होते. त्या दिवशी तिथे निदान पाचसहाशे बायका सहज असतील. स्वयंसेवकांची जय्यत तयारी आणि लगबग सुरू होती. गडबड, गोंधळ, गलिच्छपणा आणि कचरा मात्र नव्हता. आपण एका प्रार्थनास्थळी आहोत त्याची पुरेशी जाण होती. गाइडला विचारलं- “कसल्या गप्पा सुरू आहेत?” तो म्हणाला “नेहमीच्याच सुखदुःखाच्या गोष्टी आणि सुनांच्या कागाळ्या'! मनात म्हटलं, ‘हा विषय बाकी अमर आहे- जगाच्या पाठीवर कुठेही जा.'
त्रँग आन ग्रोटोजच्या इथे नौकाविहार करणं हाही एक सुंदर अनुभव होता. बोटी वल्हवणाऱ्या अनेक नावाडी स्त्रिया तिथे पर्यटकांची वाट पाहत ताटकळलेल्या. ऐन उन्हाळ्यात अर्थातच पर्यटक कमी होते. तरी काठाला लावलेल्या बोटींची एकंदरीत संख्या पाहून मी अवाक झाले. त्या दिवशी दुपारी त्या व्हिएतनामी अवलोकितेश्वराने आमच्यावर कृपा केली बहुतेक. कारण अक्षरशः जादुई रम्य वातावरण होतं. हिरवंशार शांत पाणी, भोवताली लाइमस्टोनचे डोंगर, डोक्यावर थोडंसंच ऊन, वाऱ्याच्या झुळका, विविध प्रकारचे पक्षी आणि जवळजवळ दोनेक तास शांतपणे विविध नैसर्गिक गुंफांतून शांत सुरेख नौकाविहार. कवी अनिलांच्या ओळी आठवल्या-
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते,
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!
अंधाऱ्या गुंफेत शिरताना कधी कधी बोटीतल्या उंच माणसांना झुकून झाली बसावं लागतं. आम्हीही जमेल तसे वल्हवत होतो, त्या बाईला मदत म्हणून; पण वल्हवण्याचं तंत्र नीट जमेपर्यंत आम्ही तिला मदत करत होतो की तिचं काम वाढवत होतो, देव जाणे! मुलीच्या मते ‘द बेस्ट बोट राइड एव्हर'. या अशा सफरींची मानवनिर्मित अम्युझमेंट पार्कमधल्या नौकाविहाराशी तुलनाच होऊ शकत नाही. यातली मजा मुलांना कळली तर बरं.
आम्ही हानोईला जाणार म्हटल्यावर ‘तो देश अगदी घाणेरडा आहे. मला आणि माझ्या नवऱ्याला अजिबात आवडला नाही' असं ऑफिसातल्या फॅशनेबल चिनी मुलीने मला सांगितलं होतं. तिला मी आवर्जून ‘आम्हाला तिघांना आवडला' हे सांगून आले. कधी आयुष्यात पुन्हा योग आला तर पुढला थांबा- दक्षिण व्हिएतनाम!
(मुशाफिरी, दिवाळी २०१७च्या अंकातून साभार)
