आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचे, रानडे इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी. आमची परीक्षा नुकतीच आटोपली होती. त्याच वेळेस लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली होती. महाराष्ट्राबाहेर जाऊन निवडणुका समजून घ्याव्यात असं आम्हा मित्रांच्या मनात घोळत होतं. आम्ही बिहारला जायचं नक्की केलं. विद्यापीठात शिकत असताना राजकारणात गेलेल्या कन्हैया कुमारच्या उमेदवारीमुळे प्रसिद्धीस आलेल्या बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात जावं असं ठरवलं. रेल्वेची तिकिटं काढली आणि जाऊन पोहोचलो बेगुसरायला. हा मतदारसंघ गंगा नदीच्या किनारी पाटण्याच्या जवळ आहे. पंधरा दिवस या भागात मुक्काम ठोकल्यावर निवडणुकीबद्दलच नव्हे, तर इथल्या माणसांच्या जगण्याबद्दलही बरंच काही हाती लागलं. त्यातलं थोडं इथे.
दानापूर एक्सप्रेस : रेल्वेमधला बिहार
रात्रीचे पावणेनऊ वाजले होते. आमचं रिझर्व्हेशन असलेल्या दानापूर एक्सप्रेसच्या बोगीत कसाबसा प्रवेश मिळवला आणि आमच्या सीटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करू लागलो; पण कोणीच सरकायला तयार नाही की पुढे जाण्यासाठी जागा द्यायला तयार नाही. जागा देणार तरी कशी? डब्यात मुंगी शिरायला जागा नव्हती. ७२ आसनांची क्षमता असलेल्या या बोगीत त्या वेळी किमान २००-२५० लोक तरी भरलेले असावेत. टॉयलेटमध्येही सात-आठ माणसं कोंबून बसली होती म्हणजे बघा! त्यात प्रवाशांच्या मोठाल्या बॅगा, कमरेएवढे मोठे कॅन्स असं बरंच काही. वीस-पंचवीस मिनिटांच्या धडपडीनंतर आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो.
आपल्याकडेही रेल्वेत गर्दी असते, पण ती सहसा जनरलच्या डब्यात. राखीव डब्यांमध्ये एवढा गदारोळ आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. त्यामुळे आमची पहिली प्रतिक्रिया म्हणून या गर्दीचा फोटो-व्हिडिओ काढून तो थेट रेल्वे मंत्रालयाला ट्विट केला. पुढच्याच स्टेशनला रेल्वे अधिकाऱ्याला सोबत घेऊन दोन पोलिस आम्हाला शोधत आले. त्यांनी टॉयलेटमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं, त्यांच्याकडून दंड वसूल केला, आमच्याकडून कारवाई झाल्याबद्दलचा अभिप्राय लिहून घेतला आणि ते निघून गेले. थोड्याच वेळात रेल्वेच्या या कर्तव्यतत्पर कारवाईची माहिती त्यांच्या ट्विटरवर झळकली आणि इकडे डब्यात मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. खरं तर प्रवाशांकडून रेल्वेला दंड मिळवून देणं हा काही आमचा हेतू नव्हता, पण प्रत्यक्षात साध्य मात्र तेवढंच झालं.
हा गोंधळ संपल्यावर हळूहळू त्या गर्दीतले चेहरे आम्हाला दिसू लागले. आमच्या जवळच बसलेला एक तरुण आमच्याकडे बघून हसत होता. आमचं त्याच्याकडे लक्ष गेल्यावर तो म्हणाला, “इसमें हमारी कोई गलती नहीं। हमारे पूर्वज सहीको चुने नहीं ओर जिनको चुने उनसे सवाल भी नहीं पूछे।” नंतर बोलण्यातून समजलं की तो सीआरपीएफचा जवान होता. इंद्रजित पासवान त्याचं नाव. सध्या त्याची पोस्टिंग पुण्यातच होती आणि लोकसभेसाठी बायकोचा अर्ज भरायला तो बिहारला चालला होता. ‘काँग्रेस और भाजप दोनों एक जैसेही हैं। कोई तिसरा ऑप्शन खड़ा होना चाहिए', असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून स्वतःच्या बायकोलाच त्याने निवडणुकीला उभं राहण्यासाठी राजी केलं होतं. तिने काँग्रेस व भाजपाविरोधात केलेले काही ट्विट्स त्याने आम्हाला अभिमानाने दाखवले. काही दिवसांनंतर बायकोचे अर्ज भरतानाचे फोटोही त्याने आम्हाला व्हॉट्सॅपवरून पाठवले.
गाडीतली बहुतांशी गर्दी कामगारांची होती. निस्तेज चेहऱ्याने ते आली परिस्थिती सहन करत होते. बायका जवळपास नव्हत्याच. एक पंधरा-सोळा वर्षांचं पोरगं आमच्या पायात बसलं होतं. तीनजणांच्या सिटांवर सात-आठ जण बसलेले होते. धुसफूस-बाचाबाची-तडजोडी सुरू होत्या. त्यातच नीजानीज झाली. मध्यरात्री अचानक भांडणाच्या आवाजाने जाग आली. शब्दाने शब्द वाढत जाऊन लोक मारामारीवर आले. तिघांनी मिळून एका माणसाला धोपटायला सुरुवात केली. जो मार खात होता त्याचं रिझर्व्हेशन होतं. तो म्हणत होता, “ही माझी राखीव सीट आहे. मला झोपायला थोडी तरी जागा द्या. माझ्या अंगावर झोपू नका. एका सीटवर चौघांना कसं झोपता येईल?” त्या तिघांचं म्हणणं होतं, “सगळे ॲडजस्ट करताहेत. तुलाच एकट्याला काय प्रॉब्लेम आहे?” सकाळी बघितलं तर ज्याला मारलं तो गायब झालेला होता. तो कुठे गेला कोण जाणे! रात्री जो माणूस बराच वेळ उभा होता तो आणि आदल्या रात्रीच्या भांडणातले तिघे सीटवर निवांत बसले होते.
सकाळी उठल्यावर आसपासच्या लोकांशी आणखी थोड्या गप्पा झाल्या. त्यातली काही माणसं मतदानासाठीच आपापल्या गावी चालली होती. त्यामुळे आपसूकच विषय राजकारणाकडे वळला. बिहारमध्ये कोण जास्त जागा जिंकेल, असं विचारल्यावर बहुतेकांचं उत्तर एनडीए असंच होतं. आम्ही कारण विचारल्यावर त्यांचं म्हणणं पडलं, ‘महागठबंधनने उपेंद्र कुशवाह, मुकेश सहानी, जीतनराम मांझी यांच्या खूप छोट्या पक्षांना जास्त जागा दिल्या आहेत. त्याचा त्यांना तोटा होईल आणि नितीश कुमारांच्या मतांचा भाजपाला फायदा होईल.' काल ज्यांचे चेहरे आम्हाला निस्तेज वाटत होते ते लोक आता राजकारणावर भरभरून बोलत होते. त्यांना बिहारमधल्या घडामोडींची बिनचूक माहिती होती, याचं आम्हाला काहीसं आश्चर्यच वाटलं.
नंतर चर्चा बिहारमध्ये रोजगार का नाहीत, जगण्यासाठी महाराष्ट्रात काय यावं लागतं इकडे वळली. त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की घरी चार-पाच एकर शेती असणारेदेखील पुण्यात बिगारीकाम करत होते. म्हणाले, “खेतमें सिर्फ खानेका अनाज उगता है। उसमें गुजारा कैसे होगा?” आम्ही त्यांना विचारलं, “बिहारमें ज्यादा इंडस्ट्री क्यूँ नहीं है?” त्यावर ‘पोलिटिकल विल नहीं है' असं उत्तर मिळालं. दोघा-तिघा तरुणांनी सांगितलं, “समझो अगर आज हम चार-पाच लोग मिलकर कोई छोटा-मोटा कारोबार शुरू किये, तो कलसे हप्तावसुली शुरू हो जाती है। तो हमारा उद्योग चलेगा कैसे बताओ!”
आम्ही तरी त्यांना काय सांगणार होतो? उलट, बिहारला पोहोचल्यावर यातली आणखी गुंतागुंत आम्हाला दिसू लागली.
जीवघेणी वाहतूक
पहाटे पाच वाजता दानापूरला उतरलो. आम्हाला हाजीपूरला जायचं होतं. रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊन आम्ही पॅगो रिक्षात बसलो. ड्रायव्हरजवळ चारजण बसले होते. मधल्या सीटवर बसल्यावर आपण जिथे समोर हात ठेवतो त्या आडव्या बारला अरुंद सीट बसवली होती. त्याच्यावर चारजण, मधल्या सीटवर पाचजण आणि पाठीमागे पाचजण अशा वीसजणांना घेऊन तीन चाकी पॅगो रिक्षा तोल सांभाळत चालली होती. हाजीपूरच्या अलीकडे एका चौकात एकजण खुर्ची टाकून बसला होता. त्याने न थांबवताच रिक्षा त्याच्या जवळ जाऊन थांबली. ड्रायव्हरने खिशातून पैसे काढून मुकाट्याने त्या व्यक्तीला दिले. मग त्या व्यक्तीने आम्हाला खुणेनेच पुढे जाण्याची परवानगी दिली. आम्ही शेजारी बसलेल्यांना विचारलं तेव्हा धक्काच बसला. या भागातले दादा लोक तुमच्या सुरक्षेची हमी म्हणून असा टोल वसूल करतात. त्याला तिथे रंगदारी टॅक्स म्हणतात. म्हटलं, चला, वाहतूक सुरक्षेची खात्री नसली तरी किमान दादा लोकांकडून तरी अभय मिळालं!
बेगुसरायमध्ये पोहोचेपर्यंत पूर्णपणे उजाडलं होतं. रस्त्यावरून धावणाऱ्या खासगी बसमध्ये जेवढे लोक आत, तेवढेच बसच्या टपावर बसलेले दिसत होते. चौकशी केल्यावर कळलं की बिहारमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच अस्तित्वात नाही. बेगुसराय ते पाटणा किंवा इतर कुठल्याही दोन शहरांमध्येदेखील फक्त खासगी बस चालतात.
पुढे थोड्या दिवसांनी आम्ही समस्तिपूरहून बेगुसरायला जाण्यासाठी बसची वाट बघत होतो. नेहमीप्रमाणेच टपावर पंधरा-वीस प्रवासी घेऊन एक बस आली. आम्हाला कंडक्टर म्हणाला, “जल्दी गाड़ी में बैठ जाओ।” आम्ही विचारलं, “कुठे?” तर म्हणाला, “टपावर.”
त्याच्या आज्ञेनुसार आम्ही टपावर बसलो खरे, पण जीव मुठीत धरूनच. कारण गाडीचा वेग इतका सुसाट होता की कधीही आम्ही वाऱ्यासारखे भिरकावले जाऊ असं वाटत होतं. हायवेवरही डिव्हायडर नव्हते. ट्रॅफिक पोलिस नव्हते. प्रत्येक वेळी ओव्हरटेक म्हणजे हिंदी सिनेमातला स्टंट वाटायचा; पण इतर प्रवाशांना मात्र असं काही घडत असल्याचं जाणवतही नव्हतं, इतकं ते त्यांच्या अंगवळणी पडलेलं होतं.
मुबलक पाणी, नि:सत्त्व जमिनी
बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातून बूढी गंडक नावाची नदी वाहते. या नदीमुळे या भागात मुबलक पाणी आहे. सपाट किनारी मैदानी प्रदेश आणि नजर जाईल तिकडे गव्हाची अन् मक्याची शेतं. पण आश्चर्य म्हणजे सगळीकडची जमीन पांढरीधोप दिसत होती. चौकशी केली तेव्हा कळलं, की गंगा नदीच्या खोऱ्यात असल्यामुळे आणि मागील काही वर्षांमध्ये महापुराचे तडाखे बसल्याने इथली माती सुपीकता गमावून बसली आहे. साहजिकच गव्हाच्या दर्जावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. सगळीकडे गव्हाची प्रत खालावलेली दिसत होती.
आम्ही गेलो तेव्हा काही शेतांतली गहू कापणी नुकतीच झाली होती, तर काही ठिकाणी सुरू होती. गहू, तांदूळ, मोहरी, मका ही इथली प्रमुख पिकं आणि पारंपरिक पद्धतीने केली जाणारी हंगामी शेती हा इथला उत्पन्नाचा मुख्य स्रोत. उन्हाचा जबरदस्त तडाखा असल्यामुळे शेतकरी सकाळी लवकर शेतात काम करताना दिसत होते. सूर्य डोक्यावर येण्याआधी कामं आटपून घरी परतणारे, हापशाच्या पाण्याने अंघोळ करून दाल-चावल खाऊन झोपणारे शेतकरी दिसत होते.
रस्त्याच्या दुतर्फा आंब्याची झाडं होती. तुरळक ठिकाणी ऊस बघायला मिळत होता. काही ठिकाणी तुषारसिंचनाचा वापर होताना दिसला, परंतु बऱ्यापैकी ठिकाणी पिकांना पाणी देण्यासाठी पाट पद्धत वापरली जात होती. बूढी गंडक नदीवर गेलो असता तिथे काही शेतकरी नदीच्या कडेला उगवलेली पांढरी रताळी खोदून काढताना दिसले. सुरुवातीला ही रताळी आपोआप उगवलेली आहेत की काय असा आमचा समज झाला; पण नंतर कळलं की इथे पांढरं रताळं नावाचं पीक घेतलं जातं. खरीप हंगामात भात, मोहरी ही पिकं घेतली जातात.
कीमत पानीकी नहीं, प्यासकी होती है
बेगुसरायच्या उत्तरेला राज्य महामार्गाला लागून असलेल्या एका गावात तिथल्या एका मोठ्या उद्योजकाचं गोडाऊन होतं. आश्चर्य म्हणजे या गोडाऊनमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. त्यासाठी तिथे चार-पाच आचारी ठेवलेले होते. ते आम्हाला सांगत होते, इथे मोदीही येऊन गेलेत. गोडाऊनमध्येच वीस-पंचवीस टँकर एकाच वेळी भरले जातील एवढा मोठा वॉटर सप्लाय प्लांट होता. त्या भागात पिण्याचं पाणी विकण्यासाठी इथून पुरवठा होत होता. जवळपास प्रत्येक घरासमोर चपाकल (हातपंप) किंवा आड आहे; परंतु गावोगावी पिण्याचं पाणी विकत घेतलं जातं. त्यामुळे असे पाण्याचे प्लांट ठिकठिकाणी उभे राहिले आहेत. पण ज्यांना पाणी विकत घेणं परवडत नाही त्यांचं काय? अशा घरांमध्ये हापशाचंच पाणी प्यायलं जातं. पण या पाण्यात अर्सेनिकची मात्रा जास्त असल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम आरोग्यावर होत असल्याचं कळलं. काही गावांत आता कुठे नळ योजनेची कामं सुरू झाली आहेत, असंही कानावर आलं.
उत्पन्नाचे मर्यादित स्रोत आणि त्यावर तिथल्या तथाकथित उच्चजातीय भूमिहारांची मालकी हे बिहारच्या आर्थिक व सामाजिक मागासलेपणाचं एक मुख्य कारण आहे. बेगुसराय जिल्ह्यातल्या पन्नास-साठ गावांत फिरताना ते आम्हाला प्रकर्षाने जाणवलं. भूमिहार हा तिथला लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठा समुदाय आणि तथाकथित उच्चजातीयदेखील. भूमिहार शब्दाचा अर्थ जमिनीचा मालक. गावातील जवळपास सर्व जमीन भूमिहारांच्या मालकीची आहे आणि इतर सर्व मागासवर्गीय आणि दलित जनता भूमिहारांच्या शेतावर मजुरी करते. हा रोजगारदेखील हंगामीच असतो. वर्षातील जास्तीत जास्त तीन ते चार महिने मजुरी मिळते. मजुरी किती, तर दिवसाला १२० किंवा फार फार तर १५० रुपये. छोटे-मोठे उद्योगधंदेही भूमिहारांच्या मालकीचे आहेत. त्यामुळे तिथेही कामगार म्हणून राबण्याखेरीज इतरांच्या हातात काही नाही, असं ऐकायला मिळालं.
कम्युनिस्ट पार्टीचा एक नेता आम्हाला सांगत होता, भूमिहार आणि भूमिहीन हा इथला मुख्य संघर्ष आहे. भूमिहीनांना फुड प्रोसेसिंगच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. काही पत्रकारांच्या बोलण्यात असं आलं, की ‘राजकीय इच्छाशक्ती ही इथली मुख्य समस्या आहे; अन्यथा बेरोजगारीवर उपाय काढणं अशक्य नाही.' शेतात मजुरी करणाऱ्या एका बाईचं वाक्य तर आमच्या नीटच लक्षात राहिलं. बिहारमधल्या विषमतेबद्दल बोलताना ती म्हणाली, “कीमत पानीकी नहीं, प्यास की होती है। जिसके पास बहुत पानी है उसे प्यास की कीमत क्या पता चलेगी?”
नोटबंदीचे बळी
खोदावंदपूर गावात फिरत होतो. वाटेत असीम आणि सूरज या स्थानिक तरुणांशी ओळख झाली. पत्रकारितेचं शिक्षण घेतोय आणि बिहार समजून घ्यायला आलोय म्हटल्यावर ते आम्हाला एका वस्तीत घेऊन गेले. एक कोटी खर्च करून बांधलेल्या खोदावंदपूर ग्रामपंचायतीच्या शेजारीच ही गरीब घरांची वस्ती होती.
एका घरात शिरण्यापूर्वी असीम-सूरज म्हणाले, या वस्तीत दोन घरं आहेत ज्यांच्याकडे अजूनही मोठ्या रकमेच्या जुन्या नोटा शिल्लक आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे त्यांच्या नोटा बदलणं राहून गेलं होतं.
साध्या कुडाच्या झोपडीत ते राहत होते. आम्ही सायकली बाहेर लावल्या आणि आत शिरलो. घरात म्हातारे कुटुंबप्रमुख हरिहर महातो, त्यांची पत्नी आणि सून दिसत होते. आम्ही त्या चाचांना विचारलं, “किती पैसे बदलायचे राहून गेले? तुम्हाला माहिती नव्हतं का पैसे बदलण्याबद्दल?” चाचा म्हणाले, “साडेचौदा हजार रुपीया। मेरी एक बेटी शादी के बाद दिल्ली में रहती है। तो हम सारे दिल्ली में गये थे। बहुत देरसे पता चला और आते आते तो वक्त भी खत्म हुआ था। क्या करे, दस सालकी कमाई मिट्टी में चली गई।” आम्ही त्यांच्या तरुण सुनेला बोलतं करायचा प्रयत्न केला. तिलाही नोटा बदलून घ्याव्यात हे कसं कळलं नाही याचं आम्हाला आश्चर्य वाटलं. पण तिच्या बोलण्यावरून लक्षात आलं की सासऱ्यांसमोर तिचं काही फारसं चालत नाही. त्यामुळे सासऱ्यांकडे नोटा आहेत, हेच मुळी तिला माहीत नव्हतं, तर बदलणं लांबच. हरिहर आणि त्यांच्या कुटुंबाला अजूनही आशा होती की पैसे बदलून मिळतील.
हे भूमीहीन कुटुंब होतं. घरातली माणसं ढोल वाजवून आणि मजुरी करून जगत होती. मजुरी फक्त १०० रुपये रोज. काम रोज मिळेल, याची खात्री नाहीच. प्रधानमंत्री घरकुल योजना, घर घर शौचालय, उज्ज्वला योजना यातल्या कोणत्याच योजना त्यांच्यापर्यंत पोहचलेल्या दिसत नव्हत्या. त्या घरातून बाहेर पडलो तेव्हा मन उदास होऊन गेलं होतं.
ये बिहार है! यहाँ एक तो कटना पडता है या काटना पडता है!
एकदा संजीव नावाच्या स्थानिक तरुणासोबत बाइकवरून बेगुसरायमधल्या पेन्सल्ला गावी चाललो होतो. बिहारमधल्या मुसहरी गावचा संजीव बोले तो एकदम ‘गँग्ज ऑफ वासेपुर'मधल्या फैझल खानसारखं व्यक्तिमत्त्व. अंगाने कडका, पण रोब मात्र जबरदस्त. त्याचं मुसहरी गाव ओलांडून आमची गाडी शेतातल्या अरुंद रस्त्याला लागली. आसपास दूरदूरवर पसरलेली पांढऱ्या मातीची शेतं. आसपास एकही वस्ती नाही. नुकतीच गव्हाची कापणी झाल्यामुळे शेतात एकही माणूस नव्हतं. पेन्सल्ला गावाकडे जाणारा रस्ता कोणता हे विचारण्यासाठी आसपास कोणी दिसतंय का हे बघताना आम्हाला झाडाखाली बसून ताडी पीत असलेले पाच-सहा तरुण दिसले.
संजीवने गाडीवरूनच तिथल्या ठेठी भाषेत त्यांना पेन्सल्ला गावाकडे जायचा रस्ता विचारला. ताडीप्राशनामुळे त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागलेली होती. त्यातले दोघं म्हणाले, “तुम्ही खूपच चुकीच्या दिशेला आलात. दोन किलोमीटर पाठीमागे जा. मग येईल पेन्सल्लाचा फाटा.” संजीवला शंका आल्यामुळे त्याने खात्री करून घेण्यासाठी दोन-तीन वेळा विचारलं; पण उत्तर तेच. पाठीमागे फिरण्यासाठी आम्ही गाडी वळवू लागलो, तेवढ्यात त्यांच्यातला एकजण धावत आमच्याकडे आला आणि म्हणाला, “तुम्ही बरोबर चाललाय. सरळ पुढे जा, पेन्सल्ला लागेलच.” खरं तर इथे गोष्ट संपायला हरकत नव्हती. पण आता संजीवमधला ‘फैजल' जागा झाला. त्याचा स्वाभिमान डिवचला गेला होता. तो त्या तरुणांना थोड्या गुर्मीतच म्हणाला, “इधर आओ। हमें पेन्सल्ला छोड़ के आओ।” आता ते चौघंही जागेवरून उठले आणि शिव्या देत आमच्याकडे चालत येऊ लागले.
आसपास चिटपाखरू नव्हतं. मी बिहार फिरायला म्हणून आलेला विद्यार्थी आणि सोबत फाटका संजीव. मला भलत्या भानगडीत अडकायचं नव्हतं. मी संजीवला समजावू लागलो, “अरे जाने दे उनको, हम अपनी राह चलते हैं।” पण संजीव कुठे ऐकतोय! तेवढ्यात ते ताडी प्यालेले चारही धिप्पाड तरुण आमच्यापर्यंत पोहोचले आणि संजीवला बदडू लागले. माझं धाबं दणाणलं; पण संजीवच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना त्याच्या देहबोलीत नमतं घेण्याची तयारी. त्या तरुणांकडून बसणाऱ्या प्रत्येक ठोशानिशी त्याच्या चेहऱ्यावरचा खुनशीपणा वाढत होता. मला वाटलं, हे पोरगं आज आपल्याला ढगात पोहोचवणार. मी संजीवच्या वतीने त्या सर्वांची हात जोडून माफी मागू लागलो; पण ते ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मी हात जोडलेले बघून संजीवला मारता मारता ते मला एवढंच म्हणाले, “प्रणाम भैया, आपही बताइये गलती किसकी है?”
आता पुढे काय होणार हे मला कळेनासं झालं. पण तेवढ्यात एवढ्या वेळ बघ्याची भूमिका घेणारे उरलेले दोघं तरुण आमच्यापाशी आले आणि आपल्या मित्रांना बाजूला करू लागले. तेवढी संधी साधून मी संजीवला शांत केलं. गाडीला किक मारली आणि पुढे निघालो. पण संजीवचं डोकं शांत झालेलं नव्हतं. थोडं अंतर गेल्यावर तो पुन्हा थांबला आणि गाडीच्या टूलबॉक्समधून हत्यारं काढत त्यांना धडा शिकवण्याची भाषा बोलू लागला. मी त्याला समजावत होतो, की ‘आपल्याला पेन्सल्लाला जायचंय. कुठे या मारामारीत पडतोस!' पण तो पुटपुटला, “अब पेन्सल्ला कॅन्सल! पहिले इनका फैसला होगा।” तरीही मी त्याला शांत करत त्याच्या गावी घेऊन आलो. त्याला म्हटलं, “तू मला इथे सोड आणि तुझी तुझी माणसं घेऊन काय करायचंय ते कर.” त्यानेही फोन करून मित्रांना बोलवून ठेवलं होतं. मी त्यांच्यासोबत येत नाही याचं त्यांना आश्चर्य वाटत होतंच. ते सगळे गेले आणि अर्ध्या तासाने विजयी मुद्रेने परत आले.
संजीवने गाडीच्या चावीचा उपयोग चाकूसारखा केला होता. त्या गोंधळात चावी हरवली; त्यामुळे त्याला गाडी टो करून परत आणावी लागली. पण त्याचं त्याला काही नव्हतं. आल्यावर मला म्हणाला, “ये बिहार है। यहाँ एक तो कटना पडता है या काटना पडता है। मैं सिर्फ दो लोगोंके सामने झुकता हूं : एक मेरी माँ और दूसरी कोईभी औरत।” तिथून आम्ही त्याच्या घरी गेलो. घडलेला किस्सा त्याने भावांना सांगितला, पण त्यातल्या कुणालाही त्याचं काही विशेष वाटलं नाही की कोणी त्यावरून त्याला झापलं नाही. संजीव म्हणाला, “ये सब चीजें हमारे यहाँ नॉर्मल होती हैं। यहाँ मर्डर भी हो जाये ना, तो उसकी ज्यादा चर्चा नहीं होती।”
पोलिस आणि गुन्हेगारी
एका गावात निवडणूक प्रचाराच्या कार्यकर्त्यांबरोबर फिरताना आम्हाला एक मध्यमवयीन माणूस भेटला. कुठल्या तरी विवंचनेत पडलेला आणि कदाचित ती विवंचना मिटवण्यासाठी दारूत बुडालेला. त्याने सांगितलं, “मेरी बेटी पंधरा दिनसे लापता है। पुलिसमें एफआरआय की है, लेकिन आगेकी कारवाई करने के लिए पुलीस पैसा मांग रही है। क्या करें?”
नंतर आम्ही एका पोलिस स्टेशनवर पीएसआयलाही भेटलो. आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत हे कळल्यावर त्याने फटाफट आमच्यासाठी खुर्च्या-चहा मागवला. तो आम्हाला म्हणाला, “आप बिहार घूमने क्यूँ आये हो? किसी अच्छी जगह चले जाते।” मुलगी हरवलेल्या माणसाचा संदर्भ देऊन त्याला बिहारमधल्या गुन्हेगारीविषयी विचारलं, तर त्याचं म्हणणं पडलं, “बिहार ही क्यूँ, भारत में हर जगह पुलीस है, इसका मतलब हर जगह क्राइम है।”
दारूबंदीचं वास्तव
बिहारमध्ये दारूबंदी आहे, दारू विकणाऱ्यास आणि पिणाऱ्यास दोघांनाही कडक शिक्षा आहे, हे ऐकून माहीत होतं. आपल्याकडे दारूबंदी झालेल्या जिल्ह्यांमधल्या वास्तवाबद्दलही आम्ही ऐकून होतो. त्यामुळे बिहारमध्ये प्रत्यक्ष गावागावांत काय परिस्थिती आहे हे समजून घेण्याची आम्हाला उत्सुकता होती.
त्यामुळे ‘दारूबंदीसे क्या फरक पड़ा है' हा प्रश्न आम्ही बऱ्याचजणांना विचारला. त्यावरची उत्तरं मजेशीर होती. “बस, डिलिव्हरी घर पे मिल जाती है, सिर्फ दाम दुगना हो गया है।” “पहले लोग पीकर दुनिया को दिखाने के लिए सीना तान के चलते थे। अब शांतिसे पीते हैं और किसीको पता ना चले इसकी खबरदारी लेते हैं।” “ब्लॅकमें मिलती है इस वजहसे दाम बढ़ गये। फिर भी पीना किसीने छोड़ा नहीं है। फर्क सिर्फ यही हुआ कि रोज पीनेवाला मज़दूर आदमी हप्तेमें एक बार पीने लगा।”
इथल्या लोकांकडून कळलं, की उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल अशा राज्यांतून दारू आणली जाते. अर्थातच त्यासाठी पोलिस, प्रशासनापासून राजकारण्यांपर्यंत सर्वांचा हातभार लागत असणार. आम्ही बिहारला आलो त्याच दिवशी दैनिक भास्करला बातमी होती- एका गावच्या सरपंचाच्या घरातून पोलिसांनी दारूचा माल जप्त केला होता. बऱ्याच वर्षांपासून तो ब्लॅकने दारू विकत होता.
बंदी असतानाही खुलेआम दारू पिणं आमच्याही नजरेस पडत होतं. एकदा बेगुसराय शहरात रात्री दहाच्या सुमारास राज्य महामार्गावरच्या एका दुकानाच्या पायरीवर बसून काहीजण निवांत दारू पीत होते. आम्ही त्यांना विचारलं, “आता पोलिस आले तर काय होईल?” ते म्हणाले, ‘पुलीसवालोंसे हम नहीं डरते।'
ताडीवर बंदी नसल्यामुळे आणि ताडाची भरपूर झाडं असल्यामुळे गावोगावी ताडीची सर्रास विक्री चालते. नशा वाढवण्यासाठी ताडीमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. बिहारात गुटख्याच्या व्यसनाचं प्रमाणही प्रचंड आहे. यामध्ये बारा-चौदा वर्षांच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतल्या लोकांचा समावेश आहे. एका गावात ऐटीत गुटखा चघळणारा एक मुलगा नाक्यावर भेटला. त्याच्या खांद्यावर हात ठेवत आम्ही विचारलं, “क्या खा रहे हो?” तो म्हणाला, “च्युइंगम खा रहा हूँ।”
तो काय खात होता ते उघड होतं. त्याला विचारल्यावर कळलं, तो चौथीत शिकत होता.
टपरी- प्राथमिक उपचारांसाठी
‘दुःख निवारण केंद्र, हरि दी बाबा चौक, जयरामपूर' एका टपरीवर लिहिलेल्या या वाक्याने आमचं लक्ष वेधून घेतलं. ही नेमकी काय भानगड आहे हे बघण्यासाठी गेलो तेव्हा बऱ्याच गमतीशीर गोष्टी समजल्या.
तो एक टपरीवजा दवाखानाच होता. एक कंपाउंडर हा दवाखाना चालवत होता. साधारणतः पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये असे पाच ते सहा टपरी दवाखाने होते. सर्दी, ताप, खोकला अशा साध्या तक्रारींसाठी पेशंट हॉस्पिटलमध्ये न जाता अशा कंपाउंडरकडे येतात असं आम्हाला कळलं. हा कंपाउंडर इंजेक्शन देतो, सलाइन लावतो, लहान मुलांना वाफ देतो. फक्त रक्त-लघवीची चाचणी करायची असेल किंवा कंपाउंडरला निदान होत नसेल तरच पेशंटला डॉक्टरकडे जाण्याची गरज भासते.
धु्रवीकरणाच्या राजकारणात अल्पसंख्याक
बेगुसराय जिल्ह्याच्या उत्तरेला असणाऱ्या चिडिया बरियारपूर विधानसभा मतदारसंघातल्या काही मुस्लिमबहुल गावांतून आम्ही फिरत होतो. बेगुसरायमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने भूमिहारांपाठोपाठ मुस्लिम समाज (१५%) आहे. ‘आया रे आया, हिंदुओं का शेर आया!' अशा घोषणा देत भाजपचे उमेदवार गिरिराज सिंह यांनी हिंदूंच्या मतांचं धु्रवीकरण चालवलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदारांशी बोलणं गरजेचं वाटत होतं.
सागिडीह गावात पाच-सहा मुस्लिम तरुण कन्हैयाचा प्रचार करत फिरत होते. त्यांना विचारलं, “तुम्ही या वेळी तन्वीर हसनला (लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार. बिहारमधील मुस्लिम मतदार हे सहसा राजदच्या बाजूने असतात.) का पाठिंबा देत नाही?” ते म्हणाले, “तन्वीरको पिछली बार सब मुसलमानोंने वोट दिये थे, वे तीन बार विधानपरिषदपर थे, पर एक बार भी इस क्षेत्रमे आये नहीं।” आम्ही थोडी आणखी चौकशी केल्यावर कळलं, की त्यांच्या गावात ऐंशी टक्के मुस्लिम समाज होता, तर उरलेला वीस टक्के कुशवाह (इतर मागासवर्गीय हिंदू ) समाज होता.
या भागात हिंदू-मुस्लिमांचे संबंध कसे आहेत याबद्दल आम्ही विचारणा करत होतो. एका गावात एक हिंदू तरुण म्हणाला, “हम कितने सालोंसे एकसाथ रह रहे हैं मगर हिंदु और मुस्लिम को लेके यहाँपर कभी भी कोई झगड़ा नहीं हुआ। और ये सिर्फ हमारे गाँव की बात नहीं है। आप पूरे बेगुसरायमें जाके कहीं भी पूछ लीजिए, आपको यही सुननेको मिलेगा।” त्यानंतर बेगुसरायमधली नूरलापूर, विक्रमपूर, सौंथ, मान्जहौल अशी बरीच मुस्लिमबहुल गावं आम्ही फिरलो. तिथेही आम्हाला अशीच उत्तरं मिळाली.
इलियाज नावाचा एक मुस्लिम पत्रकार क्राइम रिपोर्टिंग सोडून कन्हैयाच्या प्रचारात उतरला होता. इस बार किसी मुल्ला-मौलवी का मत सुनना, असं सांगत तो मुस्लिम मोहोल्ल्यांतून फिरत होता. आम्ही थोडा वेळ त्याच्याबरोबर फिरलो. तिथल्या दलितांपेक्षा मुस्लिमांची परिस्थिती फारशी वेगळी दिसत नव्हती. मजुरी आणि किरकोळ विक्री-उद्योग करून दोन वेळच्या दाल-चावलसाठी धडपडणारे मुस्लिम आम्हाला भेटले. मतांच्या धु्रवीकरणाच्या खेळाशी त्यांना काहीही पडलेलं नव्हतं; पण तो खेळ त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार करत होता हे मात्र जाणवलं.
खानपान
दररोज सकाळी फिरायला बाहेर पडण्याआधी डाळ-भात हाच आमचा नाश्ता असायचा. त्यासोबत अख्खी हिरवी मिरची! आंब्याबरोबर फणसाची झाडंही तिथे मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे दर दोन दिवसांनी आमच्या ताटात फणसाची भाजी असायची. प्रत्येकाच्या घरात, प्रत्येक भाजीत बटाटे आणि कंटाळा आल्यावर बटाट्याची भाजी, एवढा बटाटा तिथे सर्वव्यापी आहे.
सत्तू नावाचं थंड पेय इथे बाराही महिने चालतं. सत्तू भाजलेल्या हरभऱ्याच्या पिठापासून बनवतात. भाजलेलं पीठ थंड पाण्यात टाकून त्यात जलजिरा, कांदा, मिरची आणि काळं मीठ टाकलं की झाला सत्तू तयार. या मसाल्यामुळे सत्तू खूप चविष्ट लागतो. आपल्याइकडे जसं पन्हं किंवा सरबत, तसं तिकडे आल्या-गेल्या माणसाला सत्तू पाजलं जातं.
दही-चुरा हाही आमच्यासाठी आगळा-वेगळा पदार्थ होता. कोणत्या ना कोणत्या घरी तो आम्हाला रोज खायला मिळत असे. ताटामध्ये कच्चे पोहे पसरवायचे, त्यावर पाणी शिंपडून ते ओले करायचे, त्यावर अर्धा किलो थंडगार दही आणि वाटीभर साखर टाकून हा काला एखाद्या भाजीबरोबर खायचा अशी पद्धत आहे. शक्यतो इथेही बटाट्याची भाजीच असते. गोड, तिखट, आंबट अशा सर्व चवी एकाच वेळी चाखायला मिळतात या पदार्थात.
बेगुसरायच्या परिसरात दुधाचं उत्पन्न भरपूर आहे. घरोघरी संकरित गाई दिसत होत्या. दूध उत्पादक शेतकरी डेअरीला दूध घालण्याबरोबरच त्याचे घरगुती पदार्थ करून विकत असल्याचं आणि घरच्यासाठीही राखून ठेवत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे गावोगावी घराघरांमध्ये रसगुल्ले, गुलाबजाम, पेढे आणि मिठाई मुबलक होती. गावात हे पदार्थ नाक्यांवर विक्रीला असलेले दिसत होते. दूध, दही, लस्सी, तूप यांचीही रेलचेल होती. आपल्याकडे जसा कुठल्याही चौकात वडापाव मिळतो, तसा तिकडे लिट्टी चोखा मिळतो. डाळीऐवजी फुटाण्याचं पीठ आणि स्वादिष्ट मसाला वापरून केलेला कचोरीसारखा पदार्थ आणि त्यासोबत छोल्याची पातळ भाजी म्हणजे लिट्टी चोखा.
बिहारमधली ‘ती'
बेगुसरायमधल्या एका गावातून असीम नावाच्या बिहारमधल्याच मुलासोबत फिरत होतो. मुख्य रस्त्यालगतच्या गोलाकृती बांधलेल्या, रहाट असणाऱ्या विहिरीकडे सहजच नजर गेली. तिथे काही बायका-मुली अंगावरच्या कपड्यांवरच अंघोळ करत होत्या. आमची नजर गेल्यावर त्यांनी अंग चोरून घेतलं. आम्ही असीमला विचारलं, “ये यहाँ क्यूँ नहा रही है?” तो म्हणाला, “उनके घर में चपाकल (हातपंप) नहीं होगा। पिछड़ी जातिकी औरतें जिनके घर में चपाकल नहीं होता वो ऐसेही सरकारी कुएँपे नहाती हैं।”
थोडं पुढे गेल्यावर त्याने एका घराकडे बोट दाखवत सांगितलं, “इस घरसे अभी इक लडका आयएएस बना है। डेढ़ करोड दहेज लिया है इन्होंने।” त्याला विचारलं, “बाकीयोंका क्या रेट है?” म्हणाला, “अगर कोई पीएसआय होता है या एसएससीद्वारा सिलेक्ट होता है तो पंधरह-बीस लाख आरामसे लेता है।”
मागासवर्गीय आणि दलित वस्त्यांमध्ये फिरताना बऱ्याच ठिकाणी लग्न झालेल्या अल्पवयीन मुली दिसत होत्या. त्याबद्दल असीमला विचारलं तेव्हा तो म्हणाला, “अभी तो उसका प्रमाण कम हो रहा है। लेकिन पिछड़ी जातिमें कुछ ऐसी शादियाँ होती हैं। अच्छा घर मिल जाये इसिलिए अभी लडकियोंको पढ़ा रहे हैं। नितीश कुमारने जो योजना लाई है उसका भी असर हो रहा है।”
नववीत शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल, दहावीत साठ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या मुलींना दहा हजार रुपये, बारावी पूर्ण करणाऱ्या मुलींना दहा हजार रुपये, तर पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या अविवाहित मुलींना पंचवीस हजार रुपये, अशी नितीशकुमार सरकारची योजना आहे. त्यामुळे बिहारमध्ये सायकलवरून शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुली आता गावोगावी दिसतात. ‘पण मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवण्याचं प्रमाण इथे फक्त दोन ते तीन टक्के आहे', असं असीम म्हणाला. तो बेगुसरायचा आहे, पण पाटण्याला राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. स्पर्धा परीक्षेसाठीही फक्त तीन टक्क्यांच्या आसपास मुली असतात.
सहसा बिहारमधल्या बायका डोईवरून पदर ढळू देत नाहीत असं दिसलं. निवडणूक प्रचाराच्या अनेक छोट्या-मोठ्या सभांना, प्रचारफेऱ्यांना आम्ही हजेरी लावली, पण कुठेही बायकांनी प्रचारात भाग घेतल्याचं दिसत नव्हतं. मात्र, पंचायत निवडणुकीत स्त्रियांसाठी पन्नास टक्के आरक्षण असून तिथे मात्र प्रामुख्याने स्त्रियाच प्रचार करतात, अशी असीमची माहिती होती.
जाणत्यांच्या घरीही बालकामगार
स्वातंत्र्य आणि समतेची भाषा बोलणाऱ्या आणि साठच्या दशकापासून विद्यार्थी संघटनेत-राजकारणात सक्रिय असणाऱ्या एका भूमिहार नेत्याच्या घरी आम्ही काही दिवस राहिलो. त्यांची बायको पंचायत समिती सदस्य आहे. गेल्या वेळेस ते स्वतः सदस्य होते. मुलगा सरकारी नोकरीत, घरची शेती, दोन-चार छोटे व्यवसाय, असं सुखवस्तू घर होतं. त्यांच्या जिल्ह्याचाच नव्हे, तर बिहारचा आणि देशाचाही राजकीय इतिहास त्यांना तोंडपाठ होता.
त्यांच्या घरात पहिले दोन-तीन दिवस आम्हाला बायका कुठेच दिसत नव्हत्या. पंचायत समिती सदस्य असणाऱ्या ताईही कधी स्वयंपाकघराबाहेर येत नसाव्यात. जेवणाची वेळ झाली की दहा वर्षांची एक छोटी मुलगी ताटं घेऊन यायची. मुलांना सांभाळणं, केर काढणं, फरशी पुसणं, कपडे वाळत घालणं अशी घरातली छोटी-मोठी कामं तीच करताना दिसायची. ही मुलगी त्यांच्या घरातली वाटत नव्हती. कपडे मळलेले, चेहरा सुकलेला आणि अशक्त शरीरयष्टी. थोडी चौकशी केल्यावर कळलं की तिचे आई-वडील दुसऱ्या गावाला राहतात आणि ती या कुटुंबाकडे कामाला आहे. अशी बालकामगारी आम्हाला अनेक ठिकाणी दिसत होती.
शेवटच्या दिवशी आम्ही विनंती केल्यावर पंचायत समिती सदस्य असलेल्या घराच्या मालकीणबाई आम्हाला भेटायला बाहेर आल्या. त्यांना आम्ही या मुलीबद्दल विचारलं, तर त्या अभिमानाने सांगू लागल्या, “बहुके मायकेवालोंने भेजा है इसे। बहुत गरीब घरसे है। इसके माँ-बाप दुसरे राज्य में मजदूरी करते हैं। आजकल छोटे बच्चे संभालने को कोई नहीं मिलता। यह छोटे-मोटे काम कर लेती है। ऊपरसे अच्छी जातसे है। वैसे हम किसी को भी नहीं रखते। महिनेके एक हजार और कपड़े देते हैं इसे।” या मुलीवर आपण उपकार करतो आहोत असं त्यांना ठामपणे वाटत होतं. त्या मुलीला काय वाटत होतं तिचं तिलाच माहीत!
प्रथा-परंपरांचं जंजाळ
त्यांच्याच घरातला आणखी एक किस्सा. घरातल्या मुलीचं लग्न झालं होतं. ती एम.ए., बी.एड. झाली होती. ती नवऱ्यासोबत व्यवसाय करत होती, पण सासरी तिला स्वातंत्र्य नव्हतं. ‘मी दिसायला फारशी चांगली नाही, त्यामुळे सासू त्यावरून सतत टोमणे मारत असते. शिवाय मला अजून मूल झालं नसल्यामुळे वडील मला भेटायला सासरी येऊ शकत नाहीत,' असं ती आम्हाला सांगत होती. एवढं शिकूनही अजून अशा प्रथांपोटी त्रास सहन करावा लागतो याची खंत तिच्या बोलण्यातून जाणवत होती, पण त्याविरोधात आवाज उठवण्याचं धाडस तिच्याकडे नव्हतं. नवरा समजून घेतो, एवढाच काय तो तिला दिलासा होता. एकुणात, सुखवस्तू पुरोगामी घरांमध्ये बायकांवर जास्त बंधनं होती. त्यामानाने तथाकथित खालच्या जातीतील महिला अधिक मोकळेपणाने वावरताना दिसत होत्या.
एका आडवळणाच्या गावात झोपडीवजा खोपटात चाळिशी ओलांडलेली एक भरभक्कम बाई जमिनीवर बसून ताडी विकत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा करारीपणा आणि डोळ्यांत धाक होता. तिच्या शेजारी बसून पाच-सहा जण ताडी पीत होते. ते पुरते झिंगलेले होते, पण त्या बाईच्या वाट्याला कोणी जात असताना दिसलं नाही.
बालकामगार
केस कापण्याच्या सलूनपासून ते सत्तूच्या गाड्यांपर्यंत हॉटेल्स, बसेस, रिक्षा अशा सर्व ठिकाणी बारा-तेरा वर्षांची मुलं काम करताना दिसत होती. गावागावांत शाळा होत्या, पण शाळेपेक्षा शाळेच्या बाहेर फिरणारी मुलं जास्त दिसत होती.
निवडणूक समजून घ्यायला गेलो खरे, पण बिहारचं एक रूप का होईना जवळून बघायला मिळालं. आता यापुढे बिहारबद्दलच्या बातम्या वाचू किंवा करू तेव्हा मनात त्यातल्या गुंतागुंतीचं किमान भान तरी असेल.
(अनुभव, जून २०१९च्या अंकातून साभार)
