आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

थोडक्यात काय, दु:खलोलुपता जिंदाबाद

  • निळू दामले
  • 13.12.25
  • वाचनवेळ 20 मि.
indians and development

जुलै-ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानात पूर आला. पाकिस्तानातल्या १२४ जिल्ह्यांपैकी ७९ जिल्हे पुरानं उद्ध्वस्त झाले. उत्तरेतून पख्तुनवामधे पाण्याचा लोंढा सुरू झाला आणि सिंध, पंजाब, बलुचिस्तान, गिलगिट, बाल्टिस्तान या विभागांत धुमाकूळ घालत तो अरबी समुद्रात विलीन झाला.

पुरानं-पाण्यानं ७००० शाळा, ३००हून अधिक आरोग्य केंद्रं, २३०० नागरी पाणीपुरवठा केंद्रं, २० लाख राहती घरं पूर्ण उद्ध्वस्त केली. ६००० कि.मी. रस्ते आणि १२०० पूल नाहीसे झाले. १४ लाख एकर म्हणजे पाकिस्तानच्या एकूण जमिनीपैकी जवळपास २० टक्के जमीन वाहून गेली. म्हणजे असं, की त्या जमिनीची वरच्या थरातली माती (टॉप सॉइल) वाहून गेली. जमिनीचा कस वरच्या थरात असतो. तो थर नाहीसा झाला तर पुन्हा तयार व्हायला किती वर्षं लागतात ते सांगता येत नाही.

दोन हजारपेक्षा जास्त माणसं मेली. दोन कोटी माणसं उद्ध्वस्त झाली. दोन लाख जनावरं मेली. कामातून गेलेली किंवा केव्हाही मरतील अशा जनावरांची संख्या एक कोटीच्या आसपास.

तालिबान, अल कायदा, दहशतवाद, हिंसा यांनी बेजार झालेला पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या पार खलास झाला आहे. आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट झालं आहे. ते उभं राहणार तेव्हा पाकिस्तानचं आर्थिक जीवन सुरू होणार. त्यासाठी पैसा लागणार. लोकांना वसवण्यासाठीही पैसे लागणार. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच कोलमडली होती. अमेरिकन पैशावर ती तग धरून होती. आता जगातून किंवा अमेरिकेतून किती पैसा येणार, तो किती पुरणार, त्यातून अर्थव्यवस्था केव्हा सावरणार, या प्रश्नांना आश्वासक उत्तरं मिळत नाहीयेत. थोडक्यात, पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त केलाय.

हा पूर सिंधू नदीला आला.

सिंधू नदी आता पाकिस्तानात आहे. फाळणीच्या आधी ती भारतवर्षात होती. सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक म्हणजे हिंदू, सिंधू नदीच्या खोऱ्यातला इलाखा तो हिंदुस्तान, असं लोक इसवी सनाच्या आधी म्हणत असत.

क्लाइव्ह पाँटिंग यांनी ‘वर्ल्ड हिस्टरी : न्यू पर्स्पेक्टिव्ह' या पुस्तकात सिंधू खोऱ्यातल्या संस्कृतीबद्दल सविस्तर लिहिलंय. पाँटिंग यांचं पुस्तक, त्यांचा इतिहासाकडे पाहायचा दृष्टिकोन नवा आहे, त्यातली माहिती नवी आहे, असं अभ्यासक आणि समीक्षकांचं म्हणणं आहे. पश्चिमेतले इतिहासकार पश्चिमी जग केंद्रात ठेवून जगाकडे पाहतात. पाँटिंग इतिहासाकडे स्वतंत्रपणे, जागतिक दृष्टी ठेवून पाहतात. त्यामुळे चिनी आणि भारतीय संस्कृतीवर त्यांनी या पुस्तकात विस्तृत लिहिलंय.

सिंधू खोरं ही एक समृद्ध संस्कृती होती.

इसवी पूर्व सहा हजार या काळात सिंधूच्या खोऱ्यात शेती सुरू झाली. गहू, बार्ली आणि कापूस ही पिकं घेतली जात. पैकी कापूस हे पीक त्या वेळच्या मेसोपोटामिया, इजिप्त इत्यादी कुठल्याही संस्कृतीत नव्हतं. शेती वाढली, पिकं वाढली, समृद्धी आली, त्याबरोबरच वस्त्या वाढल्या. वस्त्या वाढल्या त्या शहरात, नगरात. इसवी पूर्व सहा हजार ते चार हजार या काळात सिंधू खोऱ्यात, म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वाढत गेली. इसवी पूर्व चार हजारमधे नागरीकरणाने कळस गाठला.

इसवी पूर्व चार हजार ते तीन हजार या काळात मोहेंजोदारो, हरप्पा ही शहरं सिंधू खोऱ्यात तयार झाली. विटांची घरं तयार झाली.

शहरवस्त्यांना मोठा त्रास असे तो सिंधूच्या पुराचा. जून-जुलै महिन्यांत हिमालयातून उगम पावणाऱ्या सिंधूला प्रचंड पूर येत असत आणि त्यात शहरवस्ती वाहून जात असे, शेतीची वाट लागत असे. विटांचे बांध घालून पूरनियंत्रण करण्यात आलं. विटांचा वापर घरं, तटबंदी यासाठी करण्याची सुरवात झाली होती. त्याच विटा पूरनियंत्रणासाठी वापरण्यात आल्या.

इसवी सन पूर्व तीन हजार या काळात शेती, शहरं, व्यापार या बाबतीत सिंधू खोरं अत्युच्च शिखरावर पोचलं होतं. मोहेंजोदारो, हरप्पा ही त्या संस्कृतीच्या उत्कर्षाची चिन्हं होती. इराणमधून चांदी येत असे, मध्य हिंदुस्तानातून सोनं. बहारीनमधे पाडलेली नाणी जागतिक मुद्रा म्हणून वापरली जात. पश्चिमेतल्या मेसोपोटामियाशी सिंधू खोऱ्याचा व्यापार होता.

इसवीपूर्व तीन हजार उलटून इसवीपूर्व दोन हजारकडे वाटचाल सुरू असताना घोटाळा झाला. सिंधूचे पूर बांधांना दाद देईनात. नदीत फार पाणी येई. बांधांना टाळून नदी आपला मार्ग बदले. पिकं, शहरं उद्ध्वस्त करत नदी अरबी समुद्राकडे जाई.

पाँटिंग यांचा कयास आहे, की या प्रचंड पुरातच सिंधू संस्कृती गायब झाली. बहुधा मोहेंजोदारो, हरप्पा ही शहरं पुरात गाडली गेली. मुद्दा असा, की हरप्पा-मोहेंजोदारो ही विकसित संस्कृती अचानक पुरात, सिंधू नदीच्या पुरात, लयाला गेली. पाँटिंग या घटनेला त्या काळातली विटा करायची टेक्नॉलॉजी जबाबदार धरतात.

सिंधूच्या खोऱ्यात विटा करायचं तंत्रज्ञान इसवीपूर्व ४०००च्या सुमाराला विकसित झालं. भट्टी लावून विटा तयार होत. आजही तीच टेक्नॉलॉजी वापरली जाते. विटा थापायच्या. त्या एकावर एक अशा रीतीने रचायच्या. नंतर विटांचा ढीग बाहेरून लाकडांनी मढवायचा. नंतर ही लाकडं जाळायची. निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे विटा भाजल्या जातात, पक्क्या होतात.

याच काळात इजिप्तमधेही विटा करण्याचं तंत्र विकसित झालं होतं. तिथली पद्धत वेगळी होती. तिथे मातीमधे गवत व इतर गोष्टी मिसळून माती खूप मळली जात असे. मळल्यानंतर आवश्यक त्या लांबी, रुंदी, उंचीच्या साच्यात घालून विटा तयार होत. नंतर त्या जमिनीवर पसरल्या जात. विटांचे आकार वेगवेगळे असत. विटा उन्हात वाळवून पक्क्या केल्या जात.

सिंधू संस्कृती ऐन भरात होती तेव्हा घरं, तटबंद्या, नदीला वळण देणारे बांध, इत्यादी सारी बांधकामं विटांमधे करण्याच्या नादात प्रचंड वृक्षतोड झाली. वृक्ष माती धरून ठेवतात. वृक्ष गेल्याने हिमालयातली माती मोकळी झाली. पुराबरोबर प्रचंड माती येऊ लागली. नदीचं पात्र बदललं. बांध निरुपयोगी झाले. मातीमुळे पाण्याचा निचरा करणारी जमिनीची व्यवस्था कोसळली. पिकावर परिणाम झाला. पूर आणि दुष्काळ, दोन्ही एकत्र येऊ लागले. यातून समाजाचं आर्थिक व सामाजिक संतुलन बिघडलं. बाहेरून येणाऱ्या टोळ्यांच्या आक्रमणांना तोंड देण्याची ताकद या संस्कृतीत उरली नाही. याच स्थितीत बहुधा एखादा सुनामीसारखा प्रचंड पूर आला आणि त्यात मोहेंजोदारो आणि हरप्पा गाडली गेली.

विटा करायचं इजिप्तचं तंत्रज्ञान हाताशी असतं तर कदाचित सिंधू संस्कृती टिकली असती.

तंत्रज्ञान आणि माणसाचं जगणं यात सुईदोऱ्यासारखा संबंध आहे.

माणसाला चांगलं जगायचं असतं. माणसाला चांगलंचुंगलं खावं-प्यावंसं वाटतं. छान छान कपडे घालावेसे वाटतात. मनोरंजन करावंसं वाटतं. सेक्स छान उपभोगावासा वाटतो. आपण श्रेष्ठ आहोत असं समाजात सिद्ध करावं असं त्याला वाटतं. त्यासाठी तो सत्ता मिळवतो, लढायाबिढाया करतो. हे सर्व करायचं म्हणजे वस्तू हव्यात. वस्तूंचं उत्पादन करायला हवं. वस्तू तयार करण्याचं एक तंत्र असतं. त्या मिळवायचं एक तंत्र असतं. उपभोग घ्यायचा म्हणजे एक व्यवस्था असावी लागते. तर वस्तू आणि सेवा तयार करून, उपभोगण्यातून तयार होतो अर्थव्यवहार, आणि वस्तू व सेवा तयार करणं म्हणजे झालं तंत्रज्ञान.

तंत्रज्ञान आणि अर्थव्यवहार या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत. तंत्रज्ञानातून अर्थव्यवहार आकारतो, अर्थव्यवहारातून तंत्रज्ञान आकारतं.

सिंधूच्या खोऱ़्यात लोकांना चांगलं जगायची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पश्चिमेकडून, म्हणजे इराण, इराक, इजिप्त, ग्रीस इत्यादी भागांतून नाना गोष्टी मिळवल्या होत्या. शहरं उभारण्याची कला त्यांच्याकडून घेतली होती. नाना विद्या घेतल्या होत्या. घोडे मिळवले होते. भाषा शिकल्या होत्या. मोहेंजोदारोमधे नाना देशांची माणसं गोळा झाली होती. नाना ठिकाणांहून माणसं आणि वस्तू गोळा झाल्या होत्या. ते जगणं शक्य व्हावं यासाठी आवश्यक तंत्रज्ञान त्यांनी स्थानिक पातळीवर तयार केलं होतं आणि जगातल्या इतर भागांतूनही घेतलं होतं. वस्तू आणि सेवांची जा-ये खूप होत होती.

सिंधू नदीच्या खोऱ्यात, त्या काळच्या भारतवर्षात कापूस होत असे. इसवीपूर्व सहा हजार ते इसवी पूर्व एक हजार या काळामधे तिथे एक अगदी आदिम-प्राथमिक अशा रूपाचा माग असणार, त्यावर कापड विणलं जात असणार. भारतात लोक कापसाच्या धाग्यापासून तयार झालेलं कापड वापरत असणार. म्हणजे कापड विणण्याची टेक्नॉलॉजी भारतात त्या काळात असणार.

नंतर काही हजार वर्षांनी म्हणजे ख्रिस्ताच्या जन्मानंतर भारतातून (गुजरात आणि बंगालमधून) तयार झालेलं रंगीत आणि तलम कापड अरब देशांत जात असे, तिथले श्रीमंत लोक भारतीय कापड वापरणं प्रतिष्ठेचं मानत असत. नंतर अरब ते कापड युरोपात विकून भरपूर पैसे मिळवत. अरब आणि युरोपीय लोकांना भारतात कापूस कसा पिकतो, त्याचं सूत कसं निघतं, त्याचं कापड कसं तयार होतं ते माहीत नसे. अरब लोक नाना गोष्टी सांगून पश्चिमी लोकांना शेंडी लावत. सांगत, की भारतात एका झाडाला, म्हणजे ज्वारी-बाजरीसारख्या झाडाच्या ताटाला, मेंढीसारखा एक प्राणी उगवतो आणि त्या प्राण्याची लोकर म्हणजे कापूस. दुसरी गोष्ट सांगत, की अरबी प्रदेशात उंच डोंगरावर कापूस मिळतो. वगैरे.

कापडानंतर मसाल्याचे पदार्थ भारतातून जगात जाऊ लागले. मसाल्याची चव पश्चिमेतल्या लोकांना (म्हणजे अरब, युरोपीय लोकांना) आवडे. पदार्थ टिकवण्यासाठी मसाल्याचा उपयोग होत असे. हा मसाला शोधण्याच्या नादात अरब, युरोपीय दर्यावर्दी इंडोनेशियात पोचले.

कापड आणि मसाले जगात इतरत्र जात होते खरे. पण त्यामुळे भारत श्रीमंत झाल्याचं दिसलं नाही. अरब व्यापाऱ्यांची गलबतं भारताच्या किनाऱ्याला लागली. त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडून मसाले घेतले. एडनला, इस्तंबूलला, पॅरिसला, लंडनला विकले. त्यातून भरमसाट पैसे मिळवले. अर्थातच ते पैसे भारतात आले नाहीत. त्या काळी कोणीही भारतीय व्यापारी किंवा उद्योजक एडन, इस्तंबूल, पॅरिसला जाऊन मसाल्यांचा व्यवहार पाहून आला नाही. ते जर पैसे मिळवतात, तर आपण तिथे पेढ्या आणि दुकानं उघडून पैसे मिळवावे असं भारतीय व्यापारी उद्योजकांना वाटलंही नाही. आखातातून येणाऱ्या गलबतांसारखी गलबतं आपणही बांधावी असं भारतीयांना वाटलं नाही.

कापडाचंही तसंच झालं.

व्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या ब्रिटिशांनी वखारी उभारल्या. वखारींच्या रक्षणासाठी सैन्य उभारलं. सावकाशीने भारतातली सत्ता काबीज केली. तिकडे औद्योगिक क्रांतीची सिद्धता झाल्यावर भारतातून कापूस उचलला आणि लिवरपूलला नेला. लिवरपूलहून मँचेस्टरला पोचवण्यासाठी रेल्वे उभारली. नंतर कापड तयार करायच्या गिरण्या तयार केल्या. नंतर ते कापड पुन्हा भारतातल्याच लोकांना विकलं. आणि जगात इतरत्रही. हा उद्योग साधण्यासाठी आर्थिक, दळणवळण, वाहतूक, ऊर्जा, इत्यादी घटकांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. कापड अधिकाधिक चांगलं व्हावं, टिकाऊ व्हावं, आकर्षक व्हावं याचं तंत्र शोधलं, यंत्रं तयार केली. त्यासाठी एक अख्खं विद्यापीठच तयार केलं. भारतातल्या कापसाचा वापर करण्यासाठी एक औद्योगिक व्यवस्था उभी केली. त्यातून कायच्या काय पैसे मिळवले. तिकडे हे सर्व चाललेलं असताना इकडे भारतातली माणसं काय करत होती? ब्रिटनमधून येणाऱ्या कापडावर आयात कर वाढवा, भारतातून बाहेर जाणाऱ्या मालावरचे कर कमी करा, असं म्हणत होती. एक काळ असाही आला, की जपानने उत्तम प्रतीचं कापड स्वस्तात तयार करायला सुरवात केली. मग भारतातली मंडळी जपानी लोकांची उत्पादनाची पद्धत कशी वाईट आहे वगैरे म्हणत जपानी कापड भारतात येऊ नये यासाठी खटपट करू लागली.

कोणत्याही नव्या घडामोडीकडे पाहण्याची आपली एक पद्धत ठरून गेली आहे. तक्रारी. आंदोलनं. मागण्या. भीक. त्या काळी फार म्हणजे फारच कमी माणसांनी कापड हा व्यवसाय प्रोफेशनल करण्याचा विचार केला. उत्पादनतंत्रात सुधारणा करून ते स्वस्तात तयार करावं आणि बाजारात विकून नफा कमवावा याची खटपट फार म्हणजे फारच कमी लोकांनी केली.

प्रत्येक माणसाला वस्त्र मिळालंच पाहिजे, तो प्रत्येकाचा हक्क आहे, वगैरे गोष्टी लोक तेव्हाही बोलत. त्यांचं म्हणणं काय असे? देशात गरीब माणसं फार आहेत. प्रत्येक गरिबाला किमान कापड मिळायलाच हवं. तो त्याचा हक्क आहे. ते त्याला परवडायला हवं. म्हणजे ते स्वस्त हवं, त्याच्या मिळकतीत ते बसायला हवं. त्याची मिळकत कमी असेल तर त्या मिळकतीत त्याला कापड देण्याची जबाबदारी उत्पादकांवर. ती जबाबदारी पुढाऱ्यांवर नाही. ते फक्त भाषणं मारणार, तत्त्वज्ञान सांगणार. पण ते कसं मिळवायचं त्याची जबाबदारी पुढारी-विचारवंतांवर नाही. ती जबाबदारी उद्योजकांवर. या गणितात फिट बसणारं कापड कसं असणार? अर्थातच हलक्या प्रतीचं, जाडंभरडं. पण आपण असे अजब लोक आहोत, की त्यामुळे आपल्याकडे जाडेभरडेपण ही गोष्टच प्रतिष्ठित झाली. म्हणजे भारतात जे दोन हजार वर्षांपासून इतर बाबतीत चालत आलं होतं तेच. देशात काळाच्या ओघात गरिबी निर्माण झाली होती. म्हणून गरिबीलाच प्रतिष्ठा. गरीब असणं, साधनहीन असणं प्रतिष्ठेचं. दुःखच ग्रेट. ‘परमेश्वरा मला दुःखच दे, त्यामुळे मला तुझी सतत आठवण येत राहील,' असा हा प्रकार!

दुःखलोलुपता.

सिंधू संस्कृती लोपल्यानंतर बहुधा संपत्तिनिर्मिती नावाचं एक कसब आपल्यातून गायब झालं. कापडनिर्मितीत एक यंत्र आणि तंत्रज्ञान असू शकतं, त्याद्वारे मोठ्या मात्रेने कापड तयार करता येतं, कापडावर अनेक प्रक्रिया करून त्याच्या नवनव्या जाती तयार करता येतात, इत्यादी गोष्टी ब्रिटनमधे, जगात इतरत्र होऊ लागल्या. मँचेस्टरमधे ‘युमिस्ट' नावाची संस्था एका माणसाने त्या काळात प्रचंड धन खर्च करून उभारली, जेणेकरून तिथल्या कापडनिर्मितीचा दर्जा वाढावा. भारतात मात्र फार तर फार व्हीजेटीआयची शाळा निघाली, प्रशिक्षित कामगार तयार करण्यासाठी. नवं तंत्र शोधणं, संशोधनाची व्यवस्था करणं यासाठी नव्हे.

जमशेटजी टाटा इंग्लंडमधे गेले होते आणि तिथे वीजनिर्मिती कशी होते याचा त्यांनी अभ्यास केला होता. परत आल्यावर त्यांनी भारतीय कापड उद्योजकांना सांगितलं, की त्यांनी गिरण्यांमधे वीज वापरली तर कापडनिर्मितीची कार्यक्षमता वाढेल आणि कापड अधिक स्वस्त होईल. मुंबईतलं प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. गंमत पहा... टाटांच्या आधी आणि नंतर अनेक भारतीय पुढारी ब्रिटनमधे जाऊन आले होते. पण त्यांनी कापडनिर्मितीचा अभ्यास केला नाही की मँचेस्टरला फेरी मारली नाही. भारतातले एक अग्रगण्य उद्योजक पुढारी लंडनला गेले होते. जाताना त्यांनी ब्रिटिश सरकारला कळवलं होतं, की त्यांच्यासाठी गायीचं तूप, मध, हातसडीचे तांदूळ इत्यादी गोष्टी तयार ठेवाव्यात. ब्रिटिश संस्कृतीच्या वाईट सवयींनी भ्रष्ट होण्याला त्यांचा विरोध होता. महान भारतीय संस्कृतीची शिकवण त्यांना ब्रिटिशांना द्यायची होती.

दुसरीकडे, वीज वापरायला मुंबईकरांचा विरोध होता. टाटांनी मुंबईला वीज मिळावी यासाठी मुळशीला धरण बांधून वीजनिर्मिती सुरू केली. तर त्याला लोकांचा विरोध. सेनापती बापट त्यात आघाडीवर. अण्णासाहेब सहस्रबुद्धे सांगत होते, की भारताची औद्योगिक प्रगती होणं हाच शेतीवरचा ताण कमी करण्याचा उपाय आहे. परंतु सेनापतींनी लढाई थेट सांस्कृतिक-भावनात्मक पातळीवर नेली. शेतकऱ्यांचं विस्थापन ही समस्या थोडं सबुरीने घेतलं असतं तर सुटू शकली असती. पण ‘जमीन म्हणजे आई' वगैरे पातळीवर मामला गेला.

स्वातंत्र्य मिळाल्यावर अगदी आजवर कापडउद्योग ढिम्म जागच्या जागी आहे. नवं तंत्रज्ञान आणणं, नवं व्यवस्थापन आणणं, नव्या बाजारपेठा शोधणं, या गोष्टी शेवटल्या अग्रक्रमावर राहिल्या. उत्पादन आणि व्यापार नीट झाला तरच कामगारांचं भलं होणार, हा साधा हिशोब मागे राहिला. ज्या कोणी हुशार लोकांनी यातून गुपचूप वाटा काढल्या ते कापड उद्योगात उत्तम आहेत. पण भारत नावाचा देश कापडाच्या हिशोबात जगाच्या मागेच आहे. कोरिया आणि थायलंड हे अगदी अलीकडे उदयाला आलेले देश भारताला मागे टाकून केव्हाच पुढे निघून गेले.

भारतात मात्र अजून घनघोर आध्यात्मिक, तात्त्विक चर्चाच चालू आहेत. हाव आणि लालसा या शत्रूंचा नायनाट करण्याचीच खटपट (गेली कित्येक हजार वर्षं) भारतात चालू आहे. अंगावर कपडा आणि तोही चांगला, ही एक प्रकारची हावच. तेव्हा कपडे न घालताच निसर्गाशी तद्रूप होण्याचं स्वप्न माणसं पाहत आहेत.

या पार्श्वभूमीवर जर्मनीची गोष्ट पहा.

१८४३ सालची. त्या वर्षी जर्मनीत एका वर्षात १४ हजार पुस्तकं प्रसिद्ध झाली. लाखो प्रती संपत होत्या. आणि पुस्तकं कुठली? कादंबऱ्या, कविता वगैरे होत्याच, जर्मनीचा उज्ज्वल इतिहास वगैरेही होता; पण त्या पुस्तकांच्या तुलनेत ॲकडमिक पुस्तकांची संख्या जास्त होती. १८४० पूर्वी जर्मनी हा श्रीमंत देश नव्हता, उद्योगांच्या हिशोबात जर्मनी जेमतेम होता. १८५० नंतर जर्मनीने उचल खाल्ली. तंत्रज्ञान विकसित केलं.

तंत्रज्ञान विकसित केलं म्हणजे काय केलं? रस्ते, वीज, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन देणारी यंत्रं आणि कारखाने उभे करण्यासाठी लागणारं तंत्र त्यांनी विकसित केलं. धातूंवर संशोधन केलं. यंत्रं तयार करू शकणारे कसबी, डोकेबाज कारागीर होते; पण त्यांना अडचणी येत. त्या अडचणी सोडवू शकेल असं संशोधन करणारी कॉलेजेस जर्मनीत निघाली. त्यात काम करणारे शिक्षक तयार केले. संशोधन, शाळा, शिक्षक अशी व्यवस्था निर्माण झाली आणि त्यांचा संबंध कारागिरांशी आला. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, पुस्तक प्रकाशन, कारागीर आणि उद्योगी यांची टोळी जर्मनीत तयार झाली. फटाफट, दहा-वीस वर्षांत जर्मनी हा युरोपमधला आघाडीचा उद्योगी देश झाला. ब्रिटनच्याही पुढे गेला.

त्या काळातली एक मोठी गंमत आहे. त्या काळात जर्मनीत कॉपीराइटचा कायदा नव्हता. एखादं चांगलं पुस्तक बाजारात आलं रे आलं की लोक त्याच्या दणादण कॉप्या काढत. स्वामित्वाची ऐशी की तैशी! त्यामुळे पुस्तकांच्या किमती कमी असत. मूळ लिहिणारा आणि कॉपी मारणारा दोघांचाही फायदा होईल इतकी पुस्तकं प्रसिद्ध होत. नंतर कधी काळी कॉपीराइटचा कायदा आला. लोकांनी तो धाब्यावर बसवला. असा तीसेक वर्षांचा काळ गेला. तेवढ्यात कारखाने, उत्पादन व्यवस्था, कॉलेजं वगैरे दणादण पुढे सरकली.

मुद्दा असा, की तंत्रज्ञान म्हणजे काय? तंत्रज्ञान म्हणजे अर्थव्यवहार. ब्रायन आर्थरचं एक पुस्तक प्रसिद्ध झालंय.

(द नेचर ऑफ टेक्नॉलॉजी, डब्ल्यू. ब्रायन आर्थर.) ब्रायन हा मूळचा इंजिनियर. नंतर तो अर्थशास्त्र शिकवू लागला. त्यानंतर तंत्रज्ञान (किंवा टेक्नॉलॉजी) या विषयाची परिभाषा तो नव्यानं करू लागला. त्याचं म्हणणं असं, की तंत्रज्ञान अर्थव्यवहाराला जन्म देतं आणि अर्थव्यवहार तंत्रज्ञानाला जन्म देतं. आधी कोंबडं की आधी अंडं, अशातला हा प्रकार. थोडक्यात, अर्थव्यवहार आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत.

समाजाला चांगलं जगावंसं वाटणं, उद्यम करावासा वाटणं हा मुख्य मुद्दा. तसं वाटलं की समाज खटपट करू लागतो. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटन हा काही श्रीमंत देश नव्हता. साम्राज्यातून मिळणाऱ्या (लुटलेल्या?) गोष्टींवर त्यांचं बरं चाललं होतं. प्रबोधनकाळानंतर युरोपच्या सामाजिक जीवनात नवे विचार आणि व्यवहार मूळ धरू लागले होते. धर्माचा पारमार्थिक प्रभाव कमी होत होता. विज्ञान, तंत्रज्ञान, विद्यापीठं आकाराला येत होती. लोकशाही आकार घेत होती. परंतु एकुणात देश श्रीमंत नव्हता.

मँचेस्टरमधल्या कोणाला तरी वाटलं की पैसे मिळवू या. त्याला वाटलं, की मँचेस्टरमधे वस्त्रोद्योग आहे, तोच वाढवता येईल. तिथे लोकर आणि फ्लक्सपासून होणारं लीनन तयार होत असे. भारतातून येणाऱ्या कापसावर प्रक्रिया करून कापड का करू नये, असं कोणाला तरी वाटलं. वाहत्या पाण्याची ऊर्जा वापरण्याचं तंत्र स्थानिक तंत्रज्ञांना माहीत होतं. त्या तंत्राशी सूत तयार करण्याचं, माग चालवण्याचं यंत्र जोडलं गेलं. त्यातून तयार झाला कारखाना. आधी कारागीर घराघरांत कापड विणत असत. आता असं विकेंद्रित रीतीने कापड विणणं शक्य नव्हतं. कारागिरांना गोळा करून कापड तयार करावं लागलं. त्यातून एक नवी समाजरचना तयार झाली. त्यातून एक शहर तयार झालं. पुढे शहर मोठं झालं. त्यातून समस्या निर्माण झाल्या. त्या सोडवण्यासाठी जगातली पहिली पालिका तयार झाली. कामगारांचे प्रश्न होते. ते सोडवण्यासाठी कामगारांचे कायदे तयार झाले. कामगारांनी वाचलं पाहिजे असं लोकांना वाटलं. त्यातून पहिलं सार्वजनिक वाचनालय तयार झालं. रेल्वे झाली. मँचेस्टर विद्यापीठ झालं.

एकाला एक लागून अशी नव्या प्रक्रियांची आणि व्यवहारांची साखळी तयार झाली. एक नवी अर्थव्यवस्था तयार झाली. तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था. रेल्वे, यंत्रमाग, कारखाने ही तंत्रव्यवस्था आली, त्याबरोबरच बँकिंग आणि व्यवस्थापन हे दोन नवे व्यवहार जन्माला आले.

जे ब्रिटनमधे झालं तेच मागे-पुढे जर्मनीत झालं.

आणि आता तेच कोरियात होतंय.

गंमत म्हणजे कोरियाच्या भरभराटीमधे टेक्सटाइल, वस्त्रोद्योगाचा वाटा मोठा आहे.

हे सर्व वाचल्यानंतर कुणालाही प्रश्न पडेल, की भारतातल्या माणसांना डोकं नाहीये का? अर्थातच तसं म्हणता येणार नाही.

भारतात सुबत्ता कधीच नव्हती का? तसंही म्हणता येणार नाही. कारण सुबत्तेचे कालखंड भारतात येऊन गेले आहेत.

मग तंत्रज्ञान भारतात नव्हतं का?

इथं गोची दिसते.

तंत्रज्ञान आणि अर्थव्यवहार यांची जोडी असते. अर्थव्यवहार म्हणजे केवळ कार्यक्षम उत्पादन नाही. केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ शोधणं आणि वस्तू नफ्यात विकणं, हाही अर्थव्यवहाराचा भाग आहे. आणि तंत्रज्ञान व अर्थव्यवहार यांना मदतकारक ठरणारी ज्ञानव्यवस्था, हाही एक महत्वाचा घटक असतो.

पहिली गोष्ट म्हणजे माणसाला दणादण चांगलं जगावंसं वाटणं. साधारण भारतीयावर आईबाप आणि गुरू यांच्याकडून होणारा संस्कार हा परलोकात चांगलं जगण्यासाठी असतो, ऐहिकात नव्हे. सारा खटाटोप जन्म-मरणाचा फेरा संपवण्याचा. श्रीमंतीपेक्षा गरिबी बरी, वगैरे शिकवण. आपल्याकडची रोल मॉडेल पहा. ज्यांनी ऐहिक जीवनात कामगिरी बजावली ते आमचे हीरो नसतात. अध्यात्म, धर्म, परलोक, फाटकं राहणं, खिशात पैसे नसणं, भीक मागून जगणं, पंचा लावून राहणं इत्यादी गोष्टींबद्दल आपल्याला फार आकर्षण. आरत्या, स्तोत्र, पूजापाठ इत्यादी गोष्टी तपासून पाहण्याजोग्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराज हे आपल्याकडचं विरळा उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी जाम कामं केली. महाराष्ट्राची एक आर्थिक व्यवस्था लावली. राज्यव्यवहार, आर्थिक व्यवहार याला एक उत्तम शिस्त लावली. शिवाजीच्या आधी जागोजाग सरदार असत. ते त्यांच्या प्रदेशातून जाणाऱ्या मालावर जकात वसूल करत. माल जितक्या हद्दीतून जाई तितकी जकात. व्यापार ही गोष्ट त्यामुळे महाराष्ट्रात शक्य होत नव्हती. शिवाजी या माणसानं यातला आर्थिक भाग लक्षात घेतला. एक राज्य, एकच जकात, असा प्रघात सुरू केला. ही आधुनिक व्यवस्था झाली. या व्यवस्थेमुळे मधल्या जकातीवर जगणारे वांध्यात आले. त्यांनीच शिवाजीशी वैर धरलं. शिवाजी महाराजांविषयी अशा कित्येक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. परंतु शिवाजीची लोकांच्या मनावर ठसवली जाणारी प्रतिमा ही हिंदू राष्ट्राचा निर्माता (म्हणजे धार्मिक वगैरे) अशी आहे. काय करणार?

तर मुख्य प्रश्न असा आहे, की भारतीय माणसाला छान ऐहिक जगायचं आहे की नाही?

भारतीय समाजाला सुबत्तेचे दिवस आले खरे. पण त्या सुबत्तेसाठी लागणारं तंत्रज्ञान, ज्ञान, संशोधन इत्यादी गोष्टींची खटपट भारताने केली नाही. इतरांनी केलेलं उपभोगायचं, आपण काही स्वतंत्रपणे, नव्याने निर्माण करायचं, ही खटपट नाही. ती खटपट सोपी नसते. विद्यापीठ आणि संशोधन ही गोष्ट महाकठीण असते. विशेषतः ज्या संशोधनाचा थेट जगण्यावर परिणाम होतो ते संशोधन फार कष्टाचं असतं. जगभर फिजिक्स, केमिस्ट्री, जीवशास्त्र, जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, वैद्यक, लस, जंतुनाशकं, धातू, शस्त्रक्रिया, औषधं इत्यादींमधे झालेलं संशोधन पहा. आणि या क्षेत्रांत आपल्याकडची स्थिती काय आहे ते पहा. तिकडे एमआयटी, स्टनफर्ड, ऑक्सफर्ड, प्रिन्स्टन, पॅरिस इत्यादी ठिकाणी संशोधनं झाली ती तिथल्या स्थानिक लोकांनी भरभरून देणग्या दिल्या तेव्हाच. तिथला उद्योजक भरपूर कमावतो आणि भरपूर पैसा संशोधनासाठी देणगी म्हणून देतो. उद्योग आणि संशोधन यात तिथे अतूट नातं आहे. दोघंही एकमेकांच्या मदतीवर वाढतात. अतुल गवांदे नावाचा एक चक्क मराठी वगैरे माणूस हार्वर्डमधे आहे. त्याने न्यूरो सर्जरीवर संशोधन केलं आहे. एका उद्योगपतीने तयार केलेल्या ट्रस्टने त्याला शे-सव्वाशे कोटी रुपये देऊन टाकले- तुला काय वाट्टेल ते कर असं सांगून. अटबीट नाही. अर्जबिर्ज नाही. बिल गेट्स, सोरोस, बफे इत्यादी मंडळी असे अब्जावधी रुपये ज्ञाननिर्मितीसाठी खर्च करतात. भारतात काय?

भारतात जे काही बरे दिवस आले ते भारताचा परदेशांशी बरा संबंध होता तेव्हाच. पुन्हा एकदा मोहेंजोदारो, हरप्पा, तक्षशिला. तक्षशिला ही एक वैभवशाली नगरी होती. बाहेरचं ज्ञान, तंत्रज्ञान, यंत्रं, वस्तू, माणसं, व्यापारी इत्यादी गोष्टी तिथे येत होत्या. ग्रीक तत्त्वज्ञ, आर्किटेक्ट्स, शिक्षक तिथे येत होते. बाहेरच्या गोष्टी आपल्या समाजात येतात आणि आपल्या गोष्टी बाहेरच्या समाजात विकल्या जातात तेव्हाच आपला समाज भरभराटतो. याउलट, समाज जगापासून तुटतो तेव्हा थिजतो. मेसोपोटामिया, ग्रीक, इजिप्शियन, चिनी इत्यादी सर्व संस्कृतींचा हा अनुभव आहे. समाज स्वतःत रमला की थांबतो.

भारतात कित्येक शतकं किंवा हजारो वर्षं एक पक्की समजूत आहे, की भारत हा जगातला सर्वांत महान देश आहे. जगात ज्या अन्य संस्कृती अस्तित्वात आहेत त्या कमी प्रतीच्या आहेत, असं भारताला फार फार पूर्वीपासून वाटत आलं आहे. श्रीमंती, तत्त्वज्ञान, विचार, विज्ञान इत्यादी इत्यादी गोष्टी भारतात जेवढ्या आहेत तेवढ्या इतरत्र कधीच नव्हत्या असं भारतीयांना वाटतं. इतर देश व संस्कृतींमधे कशा ना कशात तरी खोट आहे. अनेकांकडे पैसा आहे पण संस्कृती नाही, असं भारतीयांचं म्हणणं आहे. भारतीय माणूस असा स्वतःत मग्न आहे. स्वयंपूर्णता, स्वावलंबन हा भारतीय माणसाला भावणारा सांस्कृतिक व आर्थिक विचार आहे. आजही भारतीय सामान्य माणूस असो की पुढारी, परदेशात कुठेही गेला, की तिकडल्या लोकांना भारत कसा महान आहे व ती मंडळी कशी कमी प्रतीची आहेत (कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्यावर, केव्हा ना केव्हा तरी) याचा डोस पाजायची संधी शोधत असतात.

जगण्याची हौस, उत्पादन आणि व्यापाराची व्यवस्था, तंत्रज्ञानाला जन्म व मदत देणारी शिक्षणव्यवस्था, असे सर्व घटक एकत्र आले तर भरभराट होते. यातलं एखादं कमी पडलं की गोची होते.

औद्योगिक संस्कृतीला सुरुवात होईपर्यंत सारं जग शेतीवर आधारलेलं होतं. यंत्रयुग, औद्योगिक युग सुरू झाल्यावर एके काळी अगदीच सामान्य स्थितीत असलेले देश भराभर पुढे सरकले. भारत पुढे सरकला नाही. उद्योगांना विरोध, औद्योगिकरणातून तयार होणाऱ्या नव्या संस्कृतीबद्दल वाटणारा संशय आणि दुरावा, ‘एकला चलो रे' या विचाराचं आकर्षण यातून भारत बाहेर आला नाही.

१९९० नंतर माहिती तंत्रज्ञान आणि कॉम्प्युटरचं नवं युग सुरू झालं. कधी कल्पनाही करता आली नसती अशी माहिती, वास्तव, ज्ञान समोर आलं. त्यातून एक कायच्या कायच नवी शक्यता निर्माण होऊ पाहतेय. पूर्वी केवळ महाकाव्यात असलेल्या रम्य कल्पना आता वास्तवात येऊ पाहत आहेत. माणूस अधिक जगेल, अधिक निरामय जगेल, अधिक आनंदात जगेल, हे सारं १९९० नंतर दिसू लागलं आहे.

पण यातलं भारताच्या वाट्याला किती येईल?

आपली औद्योगिक क्रांतीची गाडी चुकली.

१९९० नंतरच्या नव्या जगाची गाडी अजून तरी चुकलेली नाही. जुनाट कल्पना, खोट्या समजुती, जगापासून दूर राहणं, इतिहासाचं ओझं, बंद मेंदू इत्यादी गोष्टी टळल्या तर ही गाडी अजूनही सापडेल.

(अनुभव, दिवाळी २०१०च्या अंकातून साभार)

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results