तेलंगणा-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला किनवट हा डोंगरदऱ्यांचा भाग. नांदेडच्या जिल्हामुख्यालयापासून १५० किलोमीटरवर असलेला हा मराठवाड्यातला एकमेव आदिवासी भाग आहे. एका बाजुला पैनगंगा नदी ओलांडली की विदर्भातल्या यवतमाळची हद्द सुरू होते. दुसऱ्या बाजुनं सागाचं घनदाट जंगल ओलांडलं की तेलंगणातला आदिलाबाद हा जिल्हा फक्त ३० किलोमीटरवर लागतो. त्यामुळेच यवतमाळ, नांदेडला जाण्याऐवजी अनेकदा इथल्या लोकांना वैद्यकीय उपचारासाठी अदिलाबादला जाणं सोपं वाटतं. मराठवाड्याच्या मागसलेपणाच्या इतक्या चर्चा आपण सगळीकडे पहात, ऐकत असतो. किनवट त्या मागासातलाही मागास! रस्ता आणि पाण्यासारख्या मुलभूत गोष्टीसाठी इथल्या एका गावानं सहा लोकसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकला होता. एवढ्यानंतरही त्यांना फक्त रस्ताच बांधून मिळाला. सागाच्या तस्करीनं कमीकमी होऊ लागलेलं जंगल आणि अपुऱ्या सोयीसुविधांच्या गणितात आजचा किनवटचा आदिवासी कसातरी जगण्याचा हिशोब मांडतोय.
लाखांची लोकसंख्या असणाऱ्या या भागात एकही मोठं रुग्णालय नाही. तीस वर्षांपूर्वी साने गुरूजी रुग्णालय सुरू झालं तेव्हा डॉ. अशोक बेलखोडे इथले एकमेवर एमडी सर्जन होते. आज तीस वर्षांनंतर अनेक खासगी दवाखाने आले असले तरी पूर्णवेळ काम करणारे तेच एकमेव सर्जन आहेत. ‘जिथं आरोग्याच्या कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, तिथं तू जा!’ असं बाबा आमटे डॉ. अशोक बेलखोडेंना म्हणाले होते. त्याची आठवण ठेवूनच किनवटसाठी नवं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचं महत्त्वाकांक्षी स्वप्न डॉ. बेलखोडे यांनी पाहिलं आणि पूर्णही करत आणलं आहे. परंतु त्यासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. वैद्यकीय उपकरणं, फिरता दवाखाना, ऑपरेशन थिएटर, रक्तपेढी, पॅलिएटिव्ह केअर विभाग या गोष्टी उभ्या करण्यासाठी सात ते दहा कोटींची आवश्यकता आहे. लोकसहभागातूनच ही रक्कम उभी राहावी म्हणून डॉ. बेलखोडे यांनी आवाहन केलं आहे.
डॉ बेलखोडे किनवटला कसे आणि कधी आले...
कृष्ठरोग्यांसाठी ‘आनंदवन’ सोबतच बाबा आमटेंनी ‘सोमनाथ’ आणि ‘अशोकवन’ ही सुरू केलं होतं. अशोक बेलखोडे यांचं जन्मगाव म्हणजे नागपूरमधलं कोतेवाडा. इथून अशोकवन फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलं तरी वैद्यकीय शिक्षणासाठी औरंगबादला येईपर्यंत बेलखोडेंना बाबा आमटे कोण हे माहीतच नव्हतं. त्यांच्या शिक्षक वडिलांचं वारकरी संप्रदायात मन रमायचं. “माझ्या जन्माआधी दोन दिवस गाडगे महाराज आमच्या घरी मुक्कामाला होते. माझे बाबा त्यांच्या भजनात पेटी वाजवायचे,” डॉ. बेलखोडे सांगतात.
औरंगाबादला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना त्यांना हॅलो फाऊंडेशनचे डॉ. शशिकांत अहंकारी भेटले आणि त्यांच्यामुळे त्यांची बाबा आमटेंशी ओळख झाली. “खेड्यात जाऊ शकणारा डॉक्टर कसा तयार करायचा यावर अहंकारी सर भर द्यायचे,” डॉ. बेलखोडे म्हणाले. बाबा आमटेंसोबत त्यांनी दोनवेळा 'भारत जोडो' यात्रा केल्या. भारतभर सायकलवर फिरले. १९८५ मध्ये पहिल्या यात्रेत कश्मिर ते कन्याकुमारी हा जवळपास ६००० किलोमीटरचा रस्ता पार केला. अरूणाचल प्रदेश ते गुजरात या बाबांच्या १९८९ च्या दुसऱ्या यात्रेचे तर डॉ. बेलखोडे अखिल भारतीय सन्मवयक होते. या सगळ्यात बाबांचा प्रचंड प्रभाव डॉ. बेलखोडेंवर पडला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जिथं कुणी नाही तिथं, म्हणजे किनवटला जायचं त्यांनी ठरवलं.
“मी किनवट निवडण्यामागे ऐतिहासिक, भौगोलिक आणि तांत्रिक अशी तीन कारणं होती. पहिलं, तांत्रिक कारण म्हणजे त्यावेळी इथं आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या. दुसरं भौगोलिक कारण म्हणजे या भागाचं मागासलेपण आणि तिसरं ऐतिहासिक कारण म्हणजे डॉ. अरूण गर्देंना आलेले अनुभव,” डॉ. बेलखोडे सांगतात.
१९८५ मध्ये डॉ. अरूण गद्रे यांनी किनवटमध्ये लोकबिरादरी हॉस्पिटल सुरू केलं होतं. त्यात त्यांना इतके वाईट अनुभव आले की हॉस्पिटल बंद करून परत जायची वेळ आली. रुग्ण रॅपर सहित औषधं खायचे. अनेकदा एकाच वेळी सगळा डोस घेऊन टाकायचे. डॉ. गर्द्रे इंजेक्शन देत नाहीत, नुसतं चांगलं खायचा, पुरेसा आराम करायचा सल्ला देतात म्हणून लोक त्यांना पैसे द्यायला काचकुच करायचे. एका टीबी झालेल्या बाईला झोलाछाप डॉक्टरनं बी कॉम्पलेक्सच्या बाटलीत टीबीचं औषध भरून दिलं होतं. पहिल्या १५-२० दिवसांच्या गोळ्या संपल्यावर बाई मेडिकलमध्ये ती बाटली घेऊन गेली आणि बी कॉम्पेलेक्सच्या गोळ्या खात राहिली. तिचा टीबी तसाच राहिला. दुकानदारानं आणि भोंदू डॉक्टरांनी आपले खिसे भरून घेतले. हे सगळे अनुभव गर्देंनी ‘किनवटचे दिवस’ या पुस्तकात लिहिले होते. “दुसऱ्या भारत जोडो यात्रेनंतर हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. एका चांगल्या डॉक्टरला परत जाण्याची वेळ आली अशा ग्रामीण भागात आपण जावं, हे आव्हान मला स्वीकारावं वाटलं,” डॉ. बेलखोडे सांगतात.
हा निर्णय झाला तेव्हा ते बाबा आमटेंना भेटायला गेले.
“काय ठरवलं?” खाटेवर झोपलेल्या बाबांनी डॉ. बेलखोडेंना विचारलं.
ते म्हणाले, “किनवट ठरवलं.”
डोकं हलवून त्यांच्याकडे बघायचा बाबा प्रयत्न करू लागले. बाबा म्हणाले, “मला तुला दोन प्रश्न विचारायचे आहेत. त्यातला पहिला, किती दिवस किनवटला घालवणार आहेस?”
डॉ. बेलखोडे सांगतात, बाबांच्या या अचानक आलेल्या प्रश्नानं त्यांच्या मनात प्रचंड खळबळ उडाली. एकदम काय बोलायचं ते कळेना. पण मग मनातून जो आवाज आला तोच उत्तर म्हणून त्यांनी देऊन टाकला, “बाबा, मी मरेपर्यंत किनवटला राहिन,” बाबांनी त्यांचे दोन्ही हात हातात घेतले. दोन मिनिट सोडले नाहीत.
“बाबा दुसरा प्रश्न कोणता?” डॉ. बेलखोडेंनी विचारलं.
“तुझ्या हातांनी मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तू यशस्वी होशील,” बाबा म्हणाले.
बाबांना दिलेला शब्द म्हणून डॉ. अशोक बेलखोडे किनवटला टिकून राहिले. त्यासाठी त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण संपल्यानंतर अनेक गोष्टी शिकून घेतल्या. अनेक चांगल्या डॉक्टरांकडे दोन-चार महिने विनामुल्य काम केलं. पुन्हा सर्जरी शिकून घेतली. डिलिव्हरी रूममध्ये जाऊन पुन्हा बाळंतपणं केली, त्वचेच्या रोगांबद्दलचं ज्ञान कमावलं, कान-नाक-घसा डॉक्टरकडे जाऊन प्रशिक्षण घेतलं. हाडं जुळवायची कसं ते शिकून घेतलं. डोळ्याच्या छोट्यामोठ्या आजारांचे उपचार शिकून घेण्यासाठी दोन महिने नेत्रतज्ज्ञांच्या ओपीडीलाही हजेरी लावली. “आता नाकात गेलेला शेंगदाणा, कानात गेलेला तुरीचा दाणा हे मी अतिशय चांगल्या रितीने काढतो. हार्ट ॲटॅकच्या रुग्णाला पुढे पाठवण्याआधी प्राथमिक उपचार करून स्थिर करतो. मी आता तिथला मल्टीस्पेशालिटी डॉक्टर झालोय,” डॉ. बेलखोडे सांगतात. सिझेरियन किंवा इतर कुठलीही सर्जरी करायची तर भूलतज्ज्ञ लागायचा. तेव्हा एकदा भूल देण्यामागे डॉक्टर २५०० रूपये मागायचे. ते परवडणारं नव्हतं. मग नांदेडला जाऊन डॉ. बेलखोडे स्वतः भूल द्यायला शिकले.
डॉक्टरला द्यावेत इतकेही पैसे इथल्या लोकांकडे नाहीत, हे अरूण गद्रे यांचं पुस्तक वाचून लक्षात आलं होतं. त्यामुळे डॉ. बेलखोडेंनी औरंगाबादला सरकारी नोकरी पकडली आणि किनवटला बदली मागून घेतली. किनवटच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून रहायला जागा आणि सरकारचा पगार दोन्ही व्यवस्थित सुरू झालं.
नोकरी सोडून स्वत:चं रुग्णालय सुरु केलं
किनवटच्या आसपासची दहा-वीस गावं दत्तक घ्यावीत आणि आजार होऊ नये याासाठी तिथं काम करावं असं त्यांच्या मनात होतं. पण वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असतानाच इतके रुग्ण येत होते की ते जमलंच नाही. काम करताना सरकारच्या अनेक मर्यादाही पाळाव्या लागत होत्या. त्यातून मार्ग काढायचा म्हणून डॉ. बेलखोडेंनी एका भाड्याच्या घरात १० खाटांचं छोटं रुग्णालयही सुरू केलं. त्याची नेमकी तारीख २३ मार्च १९९५. “किनवटला मुळातच लोक मोठी घरं वगैरे बांधायचे नाहीत. त्यात आम्हाला हॉस्पिटलसाठी जागा मिळवायला फार अडचणी येत होत्या. अंधश्रद्धा तर एवढ्या की तुम्ही एखाद्या माणसाचं ऑपरेशन केलं आणि तो मेला तर त्याचं भूत त्याच घरात राहिल असं लोकांना वाटे. डॉक्टर बडा आदमी होता है, तो आमचं घर हडपेल असंही लोक म्हणत. स्पिरीटचा वास येतो, बाळंतपणासाठी आलेल्या बायका जोरजोरात ओरडतात, अशी अनेक कारणं होती." डॉक्टर सांगतात.
शेवटी, एक कापडाचं दुकान रिकामं झालं होतं तिथं पहिलं हॉस्पिटल सुरू झालं. नंतर डॉ. बेलखोडेंनीही प्राथमिक आरोग्य केंद्रातली वैद्यकीय अधिकाऱ्याची नोकरी सोडली आणि पूर्णवेळ या साने गुरूजी रुग्णालयात काम सुरू केलं. पुढे एका वर्षात मोठं रुग्णालय बांधण्यासाठी नगर परिषदेची जागा कमी पैशात विकत घेता आली. लोकसहभागातून मिळालेल्या निधीतूनच आजचं साने गुरूजी रुग्णालय उभं राहिलं. ३५०० चौरस फुटांची इमारत, १२ खोल्या, दोन हॉल, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, एक्स-रे, सोनोग्राफी, पॅथोलॉजी, डेंटल विभाग, NICU, ब्लड स्टोरेज, २४ तास पाणी, वीज, चांगली ॲम्बुलन्स असं आजचं साने गुरूजी रुग्णालयाचं रूप आहे. हे सगळं हळूहळू उभं राहिलं.
“रुग्णच माझा प्रचार करत होते. त्यात सगळ्या प्रकारचे पेशंट होते. कुणाची साधी पोटदुखी बरी केली म्हणून त्यानं गावभर सांगितलं. त्याचं पाहून आणखी रुग्ण आले,” डॉ. बेलखोडे म्हणाले. त्यामुळे त्यांना रुग्णांकडे जावं लागलंच नाही. “आसपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मी स्त्री नसबंदीचं ऑपरेशन करायला जायचो. आता आधुनिक पद्धतीनुसार हे ऑपरेशन दुर्बिणीच्या मदतीनं सहजपणे करता येतं. पण त्यावेळी टाक्याचं ऑपरेशन होतं. ते करू शकणारा या परिसरात मी एकटाच होतो. त्यामुळे मी जास्त प्रसिद्ध झालो,” डॉ. बेलखोडे म्हणाले. आज एक लाख महिलांचं कुंटुंबनियोजनाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. त्यासाठी २.२५ लाख किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला आहे.
रुग्णालयाचा प्रवास
२०१५ च्या दुष्काळाच्या झळा महाराष्ट्रातल्या गावागावांना लागत होत्या. मराठवाड्याला तर रेल्वेनं पाणी पोहोचवण्याची वेळ आली होती. त्यावेळी साने गुरूजी रुग्णालयानं फिरता दवाखाना सुरू केला. एका जीपसारख्या गाडीत एक डॉक्टर आणि आवश्यक औषधांचा साठा घेऊन फिरता दवाखाना जायचा. जिथं रस्ते नाहीत, प्राथमिक आरोग्य केंद्रही नाहीत अशा गावागावातही हा फिरता दवाखाना पोहोचायचा. या फिरत्या दवाखान्याची कामगिरी बघून पुण्याच्या रोटरी क्लब या संस्थेनं डॉ. बेलखोडेंना मल्टी युटीलिटी मोबाईल मेडिकल यान (मम्मी) नावाची एक देखणी गाडी दिली. त्यात रुग्णाला झोपवून तपासायची सोय आहे. महिलांना तपासण्यासाठी पुरेसा आडोसा आहे. रक्ताच्या किंवा इतर चाचण्या करण्याची सोय असलेली ही मम्मी फक्त २० रुपये फी घेते. त्यात औषधं, गोळ्या, प्राथमिक उपचार मोफत होतात. आजही साने गुरूजी रुग्णालयात फक्त १५ हजारात सिझेरियन डिलिव्हरी होते. नॉर्मल डिलिव्हरी ५००० आणि त्यातही मुलगी झाली तर फक्त २१०० रूपये आकारले जातात. कोणत्याही बाळंत बाईला रुग्णालयातून घरी सोडताना साडी चोळी दिली जाते.
पण आरोग्य ही रोजच्या जगण्यातून वेगळं काढून बघण्याची गोष्ट नाही, हे डॉ. बेलखोडेंना माहीत आहे. आपल्या संस्कृतीशी, विचारधारेशी, राजकारणाशी, समाजकारणाशी, अर्थकारणाशी आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे. त्यामुळेच साने गुरूजी रुग्णालयातून इतरही उपक्रम घेतले गेले, जातात. त्यांनी नाम फाऊंडेशनचं काम केलं. नरेंद्र दाभोळकर येऊन गेल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम हाती घेतलं. त्यासाठी कॉलेजच्या मुलांचं प्रबोधन केलं. युवक क्रांती दलाचं काम साने गुरूजी रुग्णालयातून सुरू झालं. दरवर्षी शाळेतल्या मुलांसाठी विज्ञान साहस शिबीर इथं भरवलं जातं. छोट्या छोट्या गोष्टींतून मोठे मोठे बदल घडवून आणायचे म्हणून रुग्णांच्या केस पेपरवर वडिलांसोबतच पहिले आईचं नाव लिहिलं जातं.
ज्या विषयाचे डॉक्टर किनवटला नाहीत त्या विषयाच्या डॉक्टरला बोलावून त्याची ओपीडी त्यांनी दर महिन्याला सुरू केली आहे. मानसिक आरोग्याचा विचारही कुणी करत नव्हतं त्यावेळी जवळपास १०-१२ वर्षं मानोसोपचार तज्ज्ञ दर महिन्याला नांदेडवरून किनवटला येत होते. पण रस्ता इतका खराब की तेही शक्य होईना झालं.
यासोबतच, डॉ. बेलखोडे सरकारच्या वेगवेगळ्या समित्यांवरही नियुक्त झाले होते. सुकाणू समिती, राज्य (आरोग्य संसाधन गट) आणि कुपोषणाची गाभा समिती अशा अनेक राज्यस्तरीय समित्यांचे डॉ. बेलखोडे सदस्य राहिलेत. किनवट आणि मराठवाड्याच्या आरोग्याचे प्रश्न त्यांनी या माध्यमातून अनेकदा सरकारसमोर मांडलेत. “मराठवाड्याच्या वैधानिक मंडळावर असताना आश्रम शाळांचा प्रश्न पुढे मांडला. आश्रमशाळेचं संध्याकाळचं जेवण ५:३० वाजता होतं. त्यानंतर मुलांना थेट सकाळी ९:३० ला खायला दिलं जातं. मधल्या वेळात मुलांचं कुपोषण होतं. त्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. ४०० ते ५०० मुलामुलींना २० ते २५ बाथरूम असतात. या सगळ्यानं त्यांचं आरोग्य बिघडतं हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं,” डॉ. बेलखोडे सांगतात.
मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाचं स्वप्न
एका मोठ्या रुग्णालयानं लोकांच्या जगण्यात बरंच काही बदलतं. किनवटसारख्या आदिवासी, दुर्गम भागात एका मोठ्या रुग्णालयाने फार मोठा फरक पडतो. अशा रुग्णालयाच्या आसपासचा भाग विज्ञानाधारित विचार आपलासा करतो. आजारी पडूच नये यासाठी काय करता येईल, याचा विचार करतो. आरोग्याविषयीचं शहाणपण त्यात निपजतं. रुग्णालयात नियमित आरोग्य तपासण्या आणि उपचार मिळाले की लोकांचाही आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास वाढू लागतो आणि अंधश्रद्धा, वाईट परंपरा आपोआपच दुरूस्त होतात. एक चांगलं रुग्णालय लोकांचा राजकारणावरचा विचारही घडवू शकतं. आपल्यालासाठी रस्ते, पाणी, आरोग्य देणारा नेताच कसा महत्त्वाचा आहे याची जाण नव्यानं निर्माण होते.
आज किनवटची परिस्थिती आधीपेक्षा बरीच सुधारली असली तरी अजूनही अनेक रुग्णांना अदिलाबादला किंवा नांदेड, यवतमाळला पाठवावं लागतं. “२०१६ मध्ये आम्हाला ४८७ रुग्णांना किनवट बाहेर पाठवावं लागत होतं. तो आकडा २०१७ पर्यंत ६२३ पर्यंत वाढला. २०२४ साली ५९७ रुग्णांना बाहेर पाठवावं लागलं,” डॉ. बेलखोडे कागदावरची आकडेवारी वाचून दाखवत होते. त्यात कित्येकांचे जीवही जातात. हे सगळं टाळायचं असेल तर किनवटला एक मल्टी स्पेशालिटी अद्ययावत रुग्णालयाची तातडीनं गरज आहे हे डॉ. बेलखोडेंनी ओळखलं. त्यासाठी सरकारकडून गोकुंदा एमआयडीसी परिसरात त्यांना ५ एकर जागाही मिळाली. रुग्णालयाचं बांधकाम सुरू झालं.
लोकांसाठी लोहसहभागातून बांधलेलं हे रुग्णालय असणार आहे. त्यामुळे जसा निधी जमेल तसंतसं रुग्णालयाचं बांधकाम केलं जातं. गेल्या ५ वर्षांपासून ते सुरू आहे. या नव्या रुग्णालयात १०० खाटा असतील. सगळ्या सुविधा असलेले आयसीयू म्हणजेच विशेष अतिदक्षता वॉर्ड, मोठे ऑपरेशन थिएटर, ब्लड बँक, डायलेसिस आणि दातांच्या उपचारासाठीचा विभागही सुरू करायचा आहे. नव्या रुग्णालयात सिटी स्कॅन, कर्करोगावरचे उपचार, उपचारानंतरची काळजी घेणारा पॅलिएटिव्ह केअर विभाग, व्यसनमुक्ती केंद्र असा बराच विस्तार करायचा आहे. त्यासाठी निधीसोबतच वैद्यकीय साहित्याचीही नितांत आवश्यकता आहे. वैद्यकीय उपकरणांसाठी २.५ कोटी रुपये, फिरत्या दवाखान्यासाठी वार्षिक १८ लाख रुपये, ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्ससाठी १.५ कोटी रुपये आणि रक्तपेढीसाठी १.२५ कोटी रुपये एवढ्या निधीची सध्या गरज आहे. याशिवाय, पॅलिएटिव्ह केअर विभागासाठी १.८ कोटी रुपये आणि वेगवेगळ्या सामुदायिक आरोग्य प्रकल्पांसाठी १.५ कोटी रुपयांची मदत साने गुरूजी रुग्णालयाला हवी आहे. डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफ यांच्यासाठी कॉर्टर बांधण्याची नितांत गरज आहे. त्यासाठीही तीन ते चार कोटी रुपये हवे आहेत, असंही डॉ. बेलखोडे सांगत होते.
किनवट इथल्या मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाला मदत करण्यासाठी,
भारत जोडो युवा अकॅडमी, साने गुरुजी रुग्णालय, किनवट, जिल्हा-नांदेड, ४३१८०४
A/c Name: Bharat Jodo Yuva Academy
Bank: State Bank of India
Branch: Kinwat, Dist- Nanded
A/c No.: 39151090812
IFSC: SBIN0020057
PAN: AABTB8499F
रेणुका कल्पना | 9763484929 | renuka.kalpana98@gmail.com
रेणुका कल्पना या मुक्त पत्रकार आहेत. आरोग्य, महिलांचं जगणं आणि दुर्गम भागातील प्रश्नांची शोधाशोध करून लिखाण करण्याची त्यांना आवड आहे.
