आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

दंतेवाडामध्ये सेंद्रिय क्षेत्र उभं करणारा - आकाश बडवे

  • शिल्पा दातार
  • 26.12.25
  • वाचनवेळ 8 मि.
akash badave

दंतेवाडा, छत्तीसगडमधला दुर्गम आदिवासी भाग. इथल्या गोंड आदिवासींसाठी भूक, कुपोषण, गरिबी आणि शोषण पाचवीला पुजलेलं. कारण बाजारकेंद्री व्यवस्था आणि रासायनिक खतांमुळे नापिक झालेली शेतजमीन. मात्र गेली काही वर्षं हे आदिवासी सेंद्रीय शेती करू लागले आहेत. तांदळाची देशी बियाणं तयार करणारी बँक, जैविक खतं आणि कीडनाशकांचे प्रयोग, अशा गोष्टी इथे प्रत्यक्षात उतरल्या आहेत. इतकंच नव्हे, तर इथे ‘भूमगादी’ ही शेतकरी उत्पादक कंपनी उभी राहिली आहे. एकेकाळी रेशनचं धान्य घेणारे इथले आदिवासी आता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहेत. तसंच, ते खास जंगलातल्या भाज्या, कंद आणि आपल्याला माहीतही नाहीत अशा पौष्टिक तांदळाचे प्रकार देशभरात वितरीत करू लागले आहेत. गोंड आदिवासींना आत्मविश्वास, आत्मसन्मान मिळवून देणारा, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणारा हा बदल घडवलाय नाशिकमधल्या आकाश बडवे या तरूणाने!

आकाशचं बारावीपर्यंतचं शिक्षण नाशिकला झालं. पुढे राजस्थानमधील बिट्‌स पिलानी संस्थेतून त्यानं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं. त्याबरोबरीने जीवशास्त्रात एम.एस्सी.ही केलं.

निर्मल ग्राम निर्माण केंद्राचे श्रीकांत नावरेकर हे आकाशचे मामा. त्यांनी क्लास वन ऑफिसरची नोकरी सोडून सफाईच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आकाशने पाहिलं होतं. सुटीला त्यांच्याकडे गेल्यावर निसर्गाच्या अधिक जवळ असल्याचं त्याला जाणवत असे. त्यामुळे आपणही पर्यावरणासाठी काहीतरी करावं असं त्याने ठरवलं होतं.

इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षी आकाशला अहमदाबादमध्ये इंटर्नशिप करायची होती. प्रो. अनिल गुप्ते यांनी त्याला गुजरातच्या आदिवासी भागात काम करण्याचं सुचवलं. दरम्यानच्या काळात, दुर्गम आदिवासी भागांमध्ये जाऊन काम करणाऱ्या तरुणांना भारत सरकारने एक फेलोशिप देऊ केली होती. त्यासाठी मुलाखत, निबंध, गटचर्चा अशा निवडफेर्‍या होत्या. हजारो मुलांमधून काही थोड्या उमेदवारांची निवड झाली, त्यात आकाशही होता.

इंटर्नशिप सुरू झाली. आकाशने पाहिलं, की आदिवासींचं जग पूर्ण वेगळं होतं. त्याच्या मनात विचार यायचे… शाश्वत विकास म्हणजे काय? अन्नधान्यात विष कुठून येतं? मातीवर रसायनांचा, प्लॅस्टिक वापराचा काय परिणाम होतोय? गुजराथमधल्या प्रशिक्षणाने त्याला शिकवलं, की निसर्ग व्यवस्थापनाबाबत आदिवासींकडची प्रगल्भता सुशिक्षितांकडेही नाही.

त्याची फेलोशिप २०१२ ते २०१४ अशी खरं तर दोन वर्षांचीच, पण त्याने ती आणखी दोन वर्षं वाढवून घेतली. आणि नंतर दंतेवाड्यात राहून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याला घरच्यांची समजूत काढावी लागली.

आकाशने दंतेवाडा निवडलं, पण महाराष्ट्रातून तिथे जाणं सोपं नसणार, त्याबद्दल आकाश सांगतो, ‘‘पहिल्यांदाच दंतेवाड्यात गेलो, त्या दिवशी ‘अवतार’ चित्रपट पाहिल्याचा फील आला. जागोजागी लष्कराचे तळ एके४७ पहिल्यांदा तिथंच पाहिली.’’

दंतेवाड्यात ७१ टक्के आदिवासी लोकसंख्या, त्यातली ५० टक्के मुलं कुपोषित होती. आकाशने तिथे पर्यावरणीय विकासाच्या पद्धती शोधून काढण्याचे प्रयोग सुरू केले. शेती, शेतकरी हा त्याच्या कामाचा महत्वाचा भाग झाला. आदिवासींसाठी शेती अन्नपोषणा इतकीच सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाची. म्हणूनच आकाशने विकासाच्या ‘सोशोकल्चरल’ पद्धतीचा विचार सुरू केला.

भरपूर शेतजमीन असतानाही आदिवासी पॅक्ड फूड विकत घेतात आणि त्यांच्या शेतातलं सकस अन्न शहरी माणसं जास्त पैसे देऊन विकत घेतात, ही विसंगती आकाशला दिसली. ही बाजारकेंद्री व्यवस्था बदलायला हवी, हे त्याने पक्कं केलं.

वेगळे प्रयोग, तंत्रज्ञान…

दंतेवाडातील आदिवासी गरजेपुरताच तांदूळ पिकवत. मात्र पारंपरिक वाण, खतं, कीडनाशकं असूनही रासायनिक खतं सर्रास वापरली जात होती. मात्र हळूहळू आकाशच्या मार्गदर्शनाखाली आदिवासींनी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पारंपरिक वाणांची लागवड सुरू केली. सीड बॉलमध्ये भाताची बियाणं टाकून रोपणी कशी केली जाईल, निंदणी प्रक्रियेत पुरुषांचा सहभाग कसा वाढेल, आलं-लसूण अशा गोष्टींपासून कीडनाशक कसं तयार होईल, अशा पर्यावरणीय आधुनिक तंत्रज्ञानावर आकाशने भर दिला. इथे परंपरागत तांदळाच्या दीडशेच्यावर जाती असल्याचं त्याला दिसलं. त्यांपैकी तीस जातींवर त्याने संशोधन सुरू केलं. रासायनिक खतं वापरायची नाहीत म्हणून जैविक शेतीविषयक प्रशिक्षण देणाऱ्या लोकांना दंतेवाड्यात बोलावलं. आदिवासी शेतकर्‍यांना त्यासंबंधी प्रशिक्षण देण्याची खटपट सुरू केली. त्या भागात गोंडी, हलबी या आदिवासी भाषा बोलल्या जात असल्याने संवाद साधणं अवघड जायचं. त्यातूनही त्याने या ना त्या प्रकारे मार्ग काढला. संपन्न निसर्गाचा हात धरून कुपोषण कसं दूर करता येईल, याचा अभ्यास करणं हे त्याचं मुख्य उद्दीष्ट होतं.

akash badave

बाजारातून महाग रासायनिक खतं, बियाणं विकत घेण्यापेक्षा नैसर्गिक संसाधनांवर आधारित (‘ॲग्रो इकॉलॉजी’) शेती केली तर जमीन व आजूबाजूचं वातावरण यात जेवढी विविधता असेल तेवढी शेती उत्पन्न देते, हे सोपं गणित. पण ते स्थानिकांच्या गळी उतरवायचं तर अधिकाधिक मनुष्यबळाची गरज होती. पण दंतेवाडा हा नक्षलग्रस्त भाग असल्याने माणसं येईनात. दुर्गम भाग, आरोग्य, शिक्षण यांसारख्या सुविधांचा अभाव, दळणवळणाची तोकडी साधनं या बाबींमुळे अजूनही इथे पुरेसं मनुष्यबळ नाही. त्या संदर्भाने आकाश आजच्या तरूणाईला ‘योग्य चॅलेंजेस स्वीकारा’ असं आवर्जून सांगतो.

तत्कालीन जिल्हाधिकारी देवसेनापती यांच्या संमतीने साडेतीन वर्षं काम केल्यानंतर पारंपरिक शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. आज आकाश दंतेवाड्याच्या १२० गावांमध्ये शेती व वनोत्पादनावर भर देतो आहे. त्यासाठी त्याला मदतनीस आणि स्थानिक आदिवासींचं सहकार्य मिळत आहे. इथली जमीन मुळात सुपिक आहे. ते जाणून घेऊन त्याने अन्नस्वयंपूर्णतेवर भर दिला आहे- प्रत्येक घराची अन्नस्वयंपूर्णता, सामाजिक अन्नस्वयंपूर्णता. अन्नस्वयंपूर्णता आली, की आदिवासीही परंपरा-आधुनिकतेची सांगड घालत बाजारपेठ मिळवू शकतील, त्यातून आर्थिक स्वयंपूर्णता येईल, असा त्याला सुरुवातीपासून विश्वास होता. त्यासाठी त्याने अंगणवाडीचा पोषक आहार, जलसंधारण यावर काम सुरू केलं.

पाड्यांवर जाऊन काम करणारे सरकारी कर्मचारी कमी असल्याने आकाशने जैविक कार्यकर्त्यांची एक फळी तयार केली. हे कार्यकर्ते गावागावांमध्ये जाऊन विविध कामं करतात. या कामांमुळे रासायनिक खतं, कीडनाशकांना आदिवासींकडूनच विरोध व्हायला लागला. २०१५ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री दंतेवाड्यात गेल्यावर तिथल्या शेतकऱ्यांनी ‘रासायनिक खतं, कीडनाशकांना बंदी घाला’, अशी मागणी केली. त्याचा परिणाम सरकारी पातळीवर दिसू लागला. पण खासगी विक्रेत्यांचं काय? त्यानंतर २०१८ मध्ये तिथे नीती आयोगाचे सीईओ आलेले असताना ‘खासगी दुकानातून मिळणारी रासायनिक खतं बंद करा.’ अशी ग्रामस्थांनी केलेली मागणी मान्य झाली. सेंद्रिय शेतीचं प्रमाण वाढवल्याने शेतीची उत्पादकता २० ते ५० टक्के इतकी वाढली.

akash badave

दंतेवाड्यातली किती गावं किती प्रमाणात सेंद्रीय शेती करतात हे मोजण्यासाठी रेड, यलो आणि ग्रीन झोन तयार केले गेले आहेत. उदा. रेड झोनमध्ये दहापेक्षा जास्त शेतकरी रसायनं वापरतात. असे दहापेक्षा कमी शेतकरी असतील तर तो यलो झोन मानला जातो. कुणीच रसायनं वापरत नसेल तर ग्रीन झोन म्हटला जातो. हळूहळू ग्रीन झोन्सची व्याप्ती वाढत गेली. आता दंतेवाड्यातील ११० गावांमधील एकही शेतकरी केमिकल वापरत नाही. यलो झोनमधली ऐंशीच्या आसपास गावंही पूर्णपणे सेंद्रिय शेती करतील यावर भर दिला जातोय.

प्रत्येक गावावर निगराणी, ग्रामसभा या माध्यमातून सरकारला विस्तृत माहिती दिली जातेय. त्याआधारे इथलं ६५ हजार हेक्टर क्षेत्र सेंद्रिय क्षेत्र म्हणून घोषित केलं गेलंय. इतकं मोठं सेंद्रिय क्षेत्र असलेला भारतातला हा पहिलाच भाग असून १५ हजार शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित केलं गेलंय. यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न तर वाढलंच, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सुमारे दीडशे ते दोनशे सुवासिक तांदळाच्या जातींचं पुनरुज्जीवन झालं.

दंतेवाड्यात २३४ गावांपैकी २२७ गावांमध्ये लोकवस्ती आहे. इतर दुर्गम भागात, तसंच इंद्रावती नदीच्या परिसरातही काम करायला हवं, असं आकाश सांगतो. संपूर्ण जिल्हा सेंद्रिय कसा होईल, याबाबत २०२० पासून त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भूमगादी एफपीओ

आदिवासींच्या आर्थिक गरिबीचं एकमुख्य कारण, म्हणजे त्यांचं बाजारपेठेतूनही होणारं शोषण. आदिवासींचा शेतमाल विकण्यासाठी त्यांची स्वतःची यंत्रणा उभी करायला हवी हे आकाशने ओळखलं. त्यातून निर्माण झाली ‘भूमगादी’ ही शेतकरी उत्पादक कंपनी.

akash badave

भूमगादी हा इथल्या आदिवासींचा पारंपरिक सण. जानेवारी, फेब्रुवारीत पीक काढणीनंतर सगळं गाव सण कधी साजरा करायचा, हे ठरवतं. जंग़लात गावाचं देवस्थान असतं, तिथे प्रत्येकजण थोडं थोडं धान्य घेऊन येतो. देवस्थानाची पूजा करून चिंच, आंबे, तत्सम रानमेवा खूप मिळूदेत अशी प्रार्थना केली जाते. ‘भूमगादी’ शेतकरी उत्पादक कंपनीही आदिवासींच्या या परंपरेशी जोडलेली आहे.

तांदूळ, डाळी, मूग, नाचणी आदी धान्यासाठी ‘आदिम’ नावाचा ब्रँड तयार केला गेला आहे. पारंपरिक वाण विशिष्ट प्रकारच्या पानांत जतन करून ठेवले जातात. म्हणून इथला शेतमाल अधिक पोषणमूल्य असणारा समजला जातो. विविध महोत्सवांतून या धान्याचे आरोग्यदायी गुणधर्म, पोषणमूल्यं याचं महत्त्व पटवून दिलं जातं. ‘आदिम’अंतर्गत भारतभरातील १४ राज्यांतील ४० शहरांत पंचवीस ते तीस प्रकारची उत्पादनं जातात. इथे एक जैविक प्रक्रिया युनिट आहे. बाजारभावासाठी ऑनलाईन ट्रेड पेज सतत पाहिलं जातं, त्यामुळे त्यासाठी कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही. भूमगादीचे २७२७ सदस्य असून ३ हजार शेअर होल्डर्स आहेत. दर महिन्याला जिल्हा पातळीवरील सदस्य एकत्र येऊन चर्चा करतात. दर ठरवतात. आदिवासींना त्यांच्या हक्काचे पैसे बाजारभावाप्रमाणे मिळवून देण्याचा हा प्रयत्न.

‘जैविक’ पिझ्झा

दंतेवाड्यात एक जैविक कॅफे दिसतं. ही संकल्पनाही आकाशचीच. हे कॅफे विशिष्ट प्रकारच्या दगडांनी बांधलेलं आहे. पारंपरिक चित्रांनी सजवलेलं आहे. आधुनिकता व परंपरा यांचा अप्रतिम मिलाफ इथं पाहायला मिळतो. इथे आदिवासी अन्नधान्याचं ब्रँडिंग करताना पारंपरिक अन्नाचं ब्रँडिंग होतं. इथे मिळणारा ‘जैविक’ पिझ्झा, बाजरीचे अप्पे, ब्राऊन राईसचे पोहे, रेड राईसपासून केलेला डोसा, जंगली भाज्यांच्या विविध चवी न्‌ प्रकार, कंदमुळं, मिलेट्स हे अन्नपदार्थ इकोसिस्टिमशी संबंधित असल्याचं सप्रमाण दाखवलं जातं.

इथे नेदरलँडमधील एका संस्थेची कार्यशाळा झाली. त्यात आकाशने आपण हे काम का करतोय, याची उपस्थितांसोबत चर्चा केली. पर्यावरणपूरक जीवनशैलीचं हस्तांतरण पुढील पिढीकडे करणं, हे महत्त्वाचं सूत्र मांडलं.

सजग नागरिक, आत्मशक्ती असलेली तरूणाई म्हणजे वेगळं कोण असतं? तरुणांनी मनावर घेतलं तर ते समाजोपयोगी मोठं काम उभं करू शकतात हे आकाश बडवे याने दाखवून दिलं आहे.

शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com

शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results