अजित आणि अमित, दोघांनाही एकाच वेळी मधुमेहाचं निदान झालं. दोघांनाही डॉक्टरांनी एकच औषध सुचवलं. अजितचा मधुमेह लगेच नियंत्रणात आला, अमित मात्र अति ॲसिडिटीने हैराण झाला. त्याने दुसरं औषध लिहून घेतलं; पण त्याच्या रक्तातली ग्लुकोजची पातळी पूर्ववत व्हायला किती तरी महिने गेले.
अशा केसेस आपण अनेकदा ऐकतो. आजार झाला तर डॉक्टरला दाखवणं, सांगितलेल्या टेस्ट्स करून घेणं आणि मग लिहून दिलेली औषधं घेणं हा आजवर चालत आलेला सरधोपट मार्ग. पण मग असं दिसायला लागलं, की काही रुग्णांना दिलेल्या औषधांनी अजिबात फरक पडत नाही किंवा त्यांच्यावर औषधांचा परिणाम अत्यंत संथपणे होतो; तर काही औषधं एखाद्या रुग्णासाठी जीवघेणी ठरू शकतात. याचा माग काढताना लक्षात आलं, की रुग्णाची जीवनशैली, त्याची अंगभूत प्रतिकारशक्ती, यासोबत त्याच्या आनुवंशिक घडणीचा (जीनोटाइप) विचार करून त्याच्यावर उपचार करायला हवेत; अर्थात प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा औषधोपचार- पर्सनलाइज्ड मेडिसिन.
वैद्यकशास्त्रात हा अभिनव दृष्टिकोन हळूहळू रुजतो आहे. त्याने ‘एका आजारावर एक उपचार' ही पद्धत मागे पडणार आहे. पर्सनलाइज्ड मेडिसिन पद्धतीत रोगाचा प्रतिबंध, रोगनिदान आणि उपचार या तिन्ही टप्प्यांवर प्रत्येक रुग्णाच्या आनुवंशिक घडणीचा विचार होईल. त्यामुळे कमीत कमी औषधं वापरून रोगापासून लवकरात लवकर सुटका होईल. साइड इफेक्ट्सही टाळता येतील. आरोग्यसेवेच्या दृष्टीने पाहिलं तर वेळ आणि खर्च वाचेल, उपचारांच्या निश्चित परिणामाची खात्री असेल आणि उपचारांतलं धोके बऱ्याच अंशी कमी होतील.
मधुमेह, कर्करोग किंवा हृदयविकार यासारख्या रोगांसाठी आजही आनुवंशिकतेचा मुद्दा विचारात घेतला जातोच. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय सुचवले जातात. आहार, जीवनशैलीत बदल करण्याबाबत जागरूकता आणता येते. रोग होण्याची शक्यता आढळली तर नियमितपणे चाचण्या करता येतात. त्याने रोगनिदान लवकर होतं आणि व्यक्तीनुरूप उपचार लगेच सुरू करता येतात. भविष्यात इतर रोगांवरच्या उपचारांमध्येही हा विचार केला जाईल.
त्यातून रोग झालाच तर जीनॉमिक्सच्या मदतीने योग्य ते उपचार केले जातील. जीनॉमिक्स तंत्रज्ञानाने रुग्णाच्या जीनोमचं विश्लेषण करून रुग्णाचा प्रतिसाद कसा असेल याचा अंदाज बांधता येतो. उदाहरणार्थ, रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून देण्यात येणाऱ्या वॉरफेरिन या औषधाचा रुग्णांवर त्यांच्या आनुवंशिक रचनेनुसार वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रुग्णाच्या जीनोमचं विश्लेषण करून डॉक्टर वॉरफेरिनचा योग्य डोस ठरवू शकतात. या ‘मेरावाला मेडिसिन'मध्ये फार्माकोजेनॉमिक्स तंत्रज्ञानही वापरतात. त्यात रुग्णाच्या जीनोम विश्लेषणावरून औषध त्याला पचेल का, काही दुष्परिणाम होतील का, याची शक्यता समजते. मधुमेहासारख्या रोगासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधं उपलब्ध असतात. फार्माकोजेनॉमिक्ससारख्या पद्धतींमुळे रुग्णांनुसार त्यांतलं सर्वांत योग्य औषध कोणतं हे निश्चित करता येईल.
कर्करोगावर आज उपलब्ध असलेल्या उपचारांचे बरेच साइड इफेक्ट्स आहेत. तिथे आधी ट्युमरच्या वाढण्यामागे कोणतं आनुवंशिक उत्परिवर्तन (म्युटेशन) आहे हे तपासून पाहता येईल. त्यावरून विशिष्ट उत्परिवर्तनाला लक्ष्य करून उपचाराला सुरुवात करता येईल. कमीत कमी साइड इफेक्ट्समध्ये ट्युमरचा नाश करता येईल. त्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या रुग्णाला खूप दिलासा मिळेल.
पर्सनलाइज्ड मेडिसिनला नुकतीच सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सध्या महागडं असणारं जीनॉमिक्ससारखं तंत्रज्ञान उद्या सर्वसामान्यांच्या अवाक्यात येईल अशी अपेक्षा आहे. जीनॉमिक्सच्या जोडीने प्रत्येकाची जीवनशैली, पर्यावरण, प्रदूषण यांचाही विचार करायला हवा. त्या गुंतागुंतीच्या विश्लेषणात एआयची मदत होऊ शकेल. रोगनिदान आणि उपचारांत अधिक अचूकता येईल. सर्व चाचण्या सोप्या आणि कमी खर्चात होत असतील तर अनेकजणांना त्याचा फायदा होताना दिसेल. तेव्हा उद्या अमित त्याचं ‘मेरावाला मेडिसिन' घेऊन मधुमेहावर नियंत्रण ठेवेल आणि अजित त्याचं.
मेघश्री दळवी
मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
