
हिपॅटायटिस हा यकृताशी म्हणजेच लिव्हरशी संबंधित आजार आहे. दूषित अन्न किंवा पाणी सेवन केल्याने, संक्रमित व्यक्तीच्या रक्तातून किंवा अन्य शारीर स्रावांतून, दारू-विषारी पदार्थ-औषधांचं अतिसेवन वगैरे केल्याने हा आजार होऊ शकतो. या आजारात यकृताला सूज येते, पेशींचं नुकसान होतं आणि यकृत खराब होऊन यकृताचा कर्करोगही होऊ शकतो. थोडक्यात, हा आजार गंभीर स्वरूपाचा आहे. जगभर हा आजार दिसत असला तरी फक्त दहा देशांमध्ये जगातील तब्बल दोन तृतीयांश रुग्ण आहेत. त्यातही चीनच्या खालोखाल जगात सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार २०१९मध्ये हिपॅटायटिसचे जगभरात २५ लाख रुग्ण नव्याने नोंदले गेले. २०२२ मध्ये रुग्णांची संख्या थोडी कमी होऊन २२ लाख झाली. मात्र, २०१९ च्या तुलनेत दोन वर्षांनी या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मात्र ११ लाखांवरून १३ लाखांवर गेली.
भारतातली परिस्थिती काय आहे? जगात हिपॅटायटिसचे जेवढे रुग्ण आहेत त्यातील ११ टक्के रुग्ण भारतात आहेत. जगात २५.४ कोटी लोक या आजाराने ग्रस्त असून त्यातील २.९ कोटी रुग्ण भारतात आहेत. (चीनमध्ये सर्वाधिक ८ कोटी रुग्ण आहेत.) हे आकडे हिपॅटायटिस बी या विषाणुजन्य आजाराचे आहेत. याशिवाय जगभरात ५ कोटी रुग्ण ‘हिपॅटायटिस सी'चे आहेत. त्यातील ५५ लाख रुग्ण भारतात आहेत.
हिपॅटायटिस बी हा विषाणुजन्य आजाराला लस देऊन रोखता येऊ शकल्यास हिपॅटायटिस सी हा आजार औषधांनी आटोक्यात आणता येऊ शकतो. सी प्रकारचा आजार झालेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळाले ते ८० ते ९० टक्के रुग्ण पूर्ण बरे होऊ शकतात. बी प्रकारच्या रुग्णांना मात्र आयुष्यभर औषधं घेऊन त्यावर ताबा मिळवावा लागतो.

या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकार आधीपासूनच प्रयत्नशील आहे.२००७-२००८ मध्ये मुलांना ‘हिपॅटायटिस बी' ची लस देण्यास सरकारने सुरू केली; पण दहा वर्षं हा कार्यक्रम राबवल्यानंतरही जेमतेम निम्म्या मुलांपर्यंतच ही लस पोहोचली. त्यामुळे २०१८मध्ये या उपक्रमात काही सुधारणा केल्या गेल्या आणि हिपॅटायटिस बी आणि सी आजारावर आणि मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी काही पावलं उचलली गेली २०३०पर्यंत सी प्रकारच्या आजाराचं संपूर्ण निर्मूलन करण्याचं ध्येयही ठरवलं गेलं आहे. मोफत निदान आणि उपचार हे या कार्यक्रमाचं मुख्य सूत्र आहे.
हिपॅटायटिसचा विषाणू प्रामुख्याने या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाच्या रक्तातून किंवा दूषित सुईमधून होत असला, तरी भारतात हा आजार प्रामुख्याने नवजात बालकाला त्याच्या आईमार्फत संक्रमित होतो असं लक्षात आलं आहे. ‘हिपॅटायटिस बी' चे तब्बल ९० टक्के रुग्ण या रीतीने तयार होतात, असं या विषयातील डॉक्टर तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे बालकांचं शंभर टक्के लसीकरण करणं आणि नंतरही त्यांच्यावर लक्ष ठेवून औषधोपचार करणं हाच प्रमुख उपाय आहे.
जगात आणि भारतातही क्षयरोग (टीबी) निर्मूलनावर मोठा भर आहे. क्षयरोगामुळे भारतात २०२२ मध्ये ३.३ लाख लोक मृत्युमुखी पडले, तर हिपॅटायटिसमुळे १.२ लाख लोक मरण पावले. त्यामुळे क्षयरोगाचं आव्हान मोठं आहे हे खरंच. त्यामुळेच त्यावरील उपचारांवर जास्त लक्ष दिलं जातं हेही उघड आहे. पण त्याच वेळी क्षयरोग झाल्याचं निदान झालेल्या ९० टक्के रुग्णांना उपचार मिळत असताना ‘हिपॅटायटिस बी'च्या रुग्णांकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. भारतात औषधांचा तुटवडा नसताना आणि तुलनेने स्वस्त औषधं उपलब्ध असूनही असं दुर्लक्ष होत असेल तर २०३० पर्यंत सरकार या आजारावर नियंत्रण कसं आणणार हे त्यांनाच माहीत.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.