आम्ही कोण?
लेखमालिका : पुढच्या हाका

पृथ्वीसंरक्षणासाठी टेहळणी

  • मेघश्री दळवी
  • 17.09.25
  • वाचनवेळ 3 मि.
near earth elements

मे २०२२ ची गोष्ट. गुजरातमधल्या काही गावांमध्ये अचानक धातूचे मोठमोठे तुकडे पडलेले दिसले. हे काय आक्रीत आहे या विचाराने तिथले गावकरी घाबरले. दरम्यान चीनच्या एका रॉकेटचे काही भाग पृथ्वीवर पडल्याची खबर आली. शेवटी या दोन्ही घटनांची संगती लागली आणि गुजरातमध्ये मिळालेले तुकडे खरोखरच चीनच्या रॉकेटचे भाग निघाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही अपाय झाला नाही. मात्र मागे फेब्रुवारी २०१३ मध्ये रशियात चेल्याबिन्स्क इथे अशनी पडून बरंच नुकसान झालं होतं. तशी वेळ पुन्हा आली तर? अशनी किंवा आपलेच जुने सॅटलाइट पृथ्वीवर आदळले तर? त्यातही अशनी मोठ्या शहरांच्या दिशेने येत असेल तर? तेव्हा आपलं संरक्षण कसं करायचं?

अवकाशात असंख्य गोष्टी फिरत असतात. त्यांच्या कक्षा अनिश्चित असतात. पृथ्वीच्या जवळ आल्यावर गुरुत्वाकर्षणाने त्यांचा मार्ग कधीही बदलू शकतो. अशा परिस्थितीत आपण गाफील राहू शकत नाही. त्यामुळे अवकाशातल्या अशा वस्तूंसाठी नासा एक खास टेहळणी प्रकल्प चालवते- ‘सेंटर फॉर निओ स्टडीज'. ‘निओ' म्हणजे ‘निअर अर्थ ऑब्जेक्ट्स', पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या वस्तू. अर्थात अवकाशातली अंतरं बघितली तर इथे ‘जवळ' याचा अर्थ पाच कोटी किलोमीटर. या अंतरावर एखादी वस्तू आली तर ती पृथ्वीवर आदळण्याची शक्यता बरीच वाढते, म्हणून त्यांच्यावर नजर ठेवण्याची गरज असते. आज तीस हजारांच्या वर निओ अशनींची आणि सुमारे शंभर निओ धूमकेतूंची नोंद आहे.

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर बहुतेक निओंचे तुकडे होतात आणि ते जळून जातात. पण साधारण ३० मीटरपेक्षा जास्त लांबीरुंदीचे निओ त्यातून वाचून पृथ्वीवर आदळू शकतात. येत्या १०० वर्षांमध्ये पृथ्वीवर अशनी आदळण्याचा धोका वास्तविक नगण्य आहे. तरीही उरलेल्या चिमुकल्या शक्यतेसाठी ही खबरदारी.

निओंची टेहळणी हा झाला एक भाग. पण त्यातून एखादी अशनी किंवा धूमकेतू पृथ्वीला धडकणार हे निश्चित झालं तर? अशा थरारक कल्पनांवर भरपूर ब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपट येऊन गेलेले आहेत. ‘आर्मगेडन' चित्रपटात त्यासाठी एक रोमांचक कल्पना वापरली होती, येणाऱ्या अशनीवर स्फोट घडवून तिची दिशा बदलण्याची. हा चित्रपट आला १९९८ मध्ये. त्यावेळी ही कल्पना सर्वसामान्यांना क्रेझी वाटली तरी नासा खरंच त्या दृष्टीने विचार करत होती. ही कल्पना २०२२ मध्ये यशस्वी झाली. आपल्यापासून एक कोटी किलोमीटरवर असलेल्या डायमॉर्फस अशनीला नासाने एक यान आदळवून बारकासा धक्का दिला. या ‘डार्ट मोहीमे'ने डायमॉर्फसची कक्षा किंचित बदलली आणि संकट टळलं.

पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी अशा पद्धतीची प्लॅनेटरी डिफेन्स व्यवस्था आता उभी राहत आहे. त्यात अमेरिकेसह अनेक देश सहभागी आहेत. भविष्यात एखादी अशनी किंवा धूमकेतू पृथ्वीवर आदळणार असेल तर अत्याधुनिक नवनवीन पद्धतीने पृथ्वीसंरक्षणासाठी सज्ज राहता येईल.

मेघश्री दळवी

मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results