अधिवास, म्हणजेच राहण्या-फिरण्याची जागा सुरक्षित असणं ही प्रत्येक प्राणीमात्राची जगण्याची प्राथमिक गरज असते. निसर्गाने तशी बांधणीदेखील केलेली असते. मात्र जेव्हा हा अधिवास विस्कटतो, अस्थिर किंवा धोकादायक होतो, तेव्हा काय होतं? तर प्राण्याचं जगणं संकटात येतं. उदाहरणार्थ, सागर किनारी कासवं मरतात नि जंगलात वाघ बळी जातात!
गेल्या महिन्यात चेन्नईच्या सागर तटावर शेकड्यांनी मेलेली कासवं वाहून येत असल्याचं लक्षात आलं आहे. दुसरीकडे, चंद्रपूरच्या जंगलात २१ दिवसांत ११ वाघांचा बळी गेला आहे. हे नैसर्गिक मृत्यू नाहीत. मानवाच्या अन् त्याने निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या बेपर्वा वृत्तीनं घेतलेले हे बळी आहेत.
आधी कासवांच्या शोकांतिकेबद्दल...
भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात म्हणजे लाखोंच्या संख्येत ऑलिव्ह रिडले कासवं येतात. ओडिसा, आंध्र आणि तामिळनाडू येथील उष्ण किनारपट्टी ही ऑलिव्ह रिडले कासवांच्या पसंतीची ठिकाणं आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तमिळनाडू आणि विशेष करून चेन्नईच्या किनारी कासवांची झुंबड असते. साधारण २ फूट लांब आणि सुमारे ५० किलो वजन असणाऱ्या या कासवांची टणक पाठ ऑलिव्ह रंगाची असते. म्हणून त्यांना हे नाव मिळालेलं आहे. हा मीलन अन् प्रजननाचा हंगाम असतो. यावेळी कासवांच्या नर-मादी किनाऱ्यालगत भेटतात. त्यानंतर माद्या लहान लहान गटांत किनारपट्टीवर येऊन वाळूत अंडी घालतात. प्रत्येक मादी शंभरेक अंडी घालून वाळूतच घरटी करतात. नंतर ४५ ते ६० दिवसांनी यातून पिल्लं बाहेर पडून लगबगीने समुद्र जवळ करतात.
प्रजनन काळात कासवांचं मरणं ही नवी घटना नाही. मात्र यंदा ज्या संख्येने ती मरत आहेत ती अत्यंत काळजीची बाब ठरते. कासव-संरक्षक आणि प्रेमी संघटना यामुळे अस्वस्थ आहेत. आधीच तेल आणि कातडी काढण्यासाठी प्रौढ कासवांची शिकार केली जात असते. कासवाची अंडी खाण्याच्या नि विकण्याच्या हव्यासापोटी किनाऱ्यावरील जागांचा विचका केला जातो. त्यामुळे ही प्रजाती आधीच घोर संकटात आहे. यावर उपाय म्हणून सरकारने भारतीय वन्यजीव (संरक्षक) कायदा १९७२ मधील अनुसूची-१ अंतर्गत या कासवांना संरक्षित केले आहे. पण अंमलबजावणीच्या बाबतीत सगळी बोंब आहे. शिवाय किनाऱ्यालगत बेछूट मासेमारी करणाऱ्या यांत्रिक ट्रॉलर बोटीचा सुळसुळाट सुखनैव सुरू असल्यामुळेही कासवांचे जीव धोक्यात आहेत.
या कासवांचा अधिवास पाण्यात असला तरी ते श्वासोच्छवास नाकानेच करतात. त्यासाठी त्यांना वरचेवर जलपृष्ठावर यावं लागतं. त्यांच्या फुफ्फुसांची हवा साठवण क्षमता अधिक असल्यामुळे त्यांच्या दोन श्वासातील अंतर अधिक असतं. पण श्वास घेण्यासाठी त्यांना पाण्यावर तर यावंच लागतं. हेच त्यांच्या जिवावर उठतं. कारण वर येण्याच्या त्यांच्या मार्गात मच्छिमारांची दाट जाळी असतात. यात अडकून ही कासवं अक्षरश: गुदमरून तडफडत मरतात. यावर उपाय म्हणजे प्रजनन काळात किनाऱ्यालगत मच्छिमारी न करणं आणि होऊ न देणं. पण ऐकतं कोण? कारवाई करतं कोण? त्यामुळे कासवांचं मरण्याचं प्रमाण वाढतच चाललं आहे.
आता वाघांबाबत!
वाघांची संख्या वाढते आहे, त्यांच्या मृत्यूंची / शिकारींची संख्या ३७ टक्क्यांनी घटली आहे, म्हणजे गेल्या वर्षभरात ती १८२ वरून ११५ वर आली आहे, असं नॅशनल टायगर कौन्झरव्हेशन ॲथॉरिटी या केंद्रीय मध्यवर्ती संस्थेचा अभ्यास सांगतो.
महाराष्ट्रात तर वाघ मृत्यूदर ५० टक्क्यांनी कमी झाला म्हणून आनंददेखील साजरा झाला. अशा वातावरणात राज्यातच अवघ्या २१ दिवसांत ११ वाघांचा मृत्यू झालेला आहे. (२२ जानेवारी २०२५च्या आधीचे दिवस). या ११ वाघांमध्ये ५ बछडे आहेत. हे सर्व मृत्यू संशयास्पद आहेत. पण वनखातं मौनात आहे. त्यामुळे काय खरं मानावं? अभ्यास अहवाल की जंगल स्थिती? हा प्रश्नच आहे.
इथे नोंदवण्यासारखी गोष्ट म्हणजे ३० टक्के वाघांचे मृत्यूच नोंदवले जात नाहीत आणि त्यामुळे बहुसंख्य मृत्यूची दखलच घेतली जात नाही, अशी टिप्पणी अहवाल करतो. वनखातं मौनात का आहे, हे त्यामुळे कळू शकतं.
जंगलाचं वैभव असणाऱ्या या राजबिंड्या प्राण्याच्या सवयींबाबत, त्याचा अधिवास कसा असावा याबाबत प्रचंड अभ्यास झालेत. उपाय-योजनांचे ढीग रचले गेलेत, ‘कॉलर-आय' कॅमेरे वगैरे तांत्रिक गोष्टी दिमतीला जुंपण्यात आल्या आहेत, पण प्रत्यक्षात शिकाऱ्यांचं ‘जंगल राज' काही हटत नाही. वाघांच्या शिकारी होत राहतात. आई बेपत्ता झाल्यावर तिचे बछडे उपासमारीने मरतात. त्यांची प्रेतं कुजतात, पण याची गंधवार्ता नसते. जंगलाची खबरबात कळायची तर ‘ग्राऊंड इंटलिजन्स' नावाची चीज आवश्यक असते. त्यासाठी स्थानिक आदिवासी व इतर समाजाशी जवळीक हवी. ही बाब वनखात्याला का जमत नाही, हा प्रश्नच आहे. योजना, धोरणं आहेत; पण वृत्ती नाही, इच्छाशक्ती नाही, असा याचा अर्थ आहे.
या इच्छाशक्तीअभावीच प्राण्यांचा अधिवास धोक्यात येतो आणि प्राणी आपले प्राण गमावत राहतात.
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.
