आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

माझी ढगाळ भटकंती....

  • प्रशांत खुंटे
  • 25.08.25
  • वाचनवेळ 11 मि.
dhag header

आज आपण ढग व्हावं. हळूहळू तरंगत निघावं. डोंगरावर जाऊन बसावं. असं सकाळीच मनात आलं. व्हाट्सअप स्टेटस् वर ओळ ठेवली - ‘मूव्हिंग स्लोली, टुडे आय एम अ क्लाऊड...’ बुट चढवून मी डोंगराकडे निघालो. पौषातला गारवा. वाटेभवतीच्या शेतात दवावर पुष्ट झालेल्या वाल-घेवड्या-पावट्याची रोपं. वांग्याची जांभळी नि तुरींची पिवळी फुलं. सवयीची पायवाट. अचानक एक साळुंक्यांचा जथा उडत आला. क्षणात मला ओलांडून बाभळीच्या झाडाकडे गेला. मी हसून त्यांना हॅलोही केलं. त्यांचं लक्ष नव्हतं बहुतेक. पण मी माझं काम केलं. त्यांनीही असं भुर्रकन् येऊन मला हॅलोच तर म्हटलेलं! फक्त त्यांच्याइतकं चटकन आल्या घटकेचं स्वागत मला जमत नाही. माझं मन गेल्या क्षणांसोबत अधिक रेंगाळतं.

माझ्यात हा एक दोष आहे, मला चटकन प्रतिसाद सुचत नाही. माझी ट्यूब उशिरा पेटते. मी ‘आफ्टर थॉट’वाला इसम आहे. सकाळी फिरायला जातो, तेव्हा वाटेत कुणीतरी पाहून हसतं, रामराम करतं. पण मी माझ्यातच इतका गुंग असतो, की तो माणूस पुढं निघून गेल्यावर मला त्याचं हसणं जाणवतं. कानात हेडफोन, मनात संगीताची धून असते. मग मनाला चुटपूट लागते. अपराधी वाटतं. वाटतं, आपल्या ध्यानातही नाही, अशांच्या लेखीही आपलं अस्त्तित्त्व असतं. नि आपण आत्ममग्न. आपण सृष्टीत नसून आपल्याच कोषात आहोत, सकल अस्तित्त्वाशी अनभिज्ञ. साळुंक्यांना मी ठाऊक असेनही. ओळख ठेवण्याच्या त्यांच्या धारणा वेगळ्याही असू शकतात. आपण नाव, गाव, जात, धर्म, देहयष्टीने माणसांना ओळखतो. तसं त्यांचं थोडीच असेल? परिचयाच्या खुणा आपल्या नकळतही आपल्या नि सृष्टीच्या अंतरंगात असण्याची शक्यता का नाकारावी?

आपण भेटलेलोही नाही, ओळखदेख नाही, अशांच्याही मनात आपल्या स्मृती असतात. अन्यथा अचानक अनोळखी नजरेतही ‘ओळख’ कुठून येते? आपल्या परोक्षही आपण कुठल्यातरी आठवणीत जिवंत असतो. हे विचार प्रकर्षाने आज का येताहेत? हा हेमंत ऋतू. सूर्य पृथ्वीपासून दूर जातो असा काळ. अशा काळात दूरच्या अस्पष्ट आठवणी आपल्या उबेला जवळ येतात का?

खूप पूर्वीचं एक आठवलं. मी तेव्हा ठाणे जिल्ह्यात खेडोपाडी फिरायचो. तिथे आदिवासींच्या प्रश्नांवर कार्यरत एका संघटनेचा मी जवळपास कार्यकर्ताच होतो. संघटनेचे लोक दिसले की गावकरी हाताची मूठ उंचावत झिंदाबाद म्हणत. मला पाहूनही लोक झिंदाबाद करत. लोकांनी या शब्दाचा काय अर्थ लावला होता माहीत नाही. कुणी ‘जिंदाबा’ उच्चारत, तर कुणी फक्त आकाशात मुठीतला अंगठा उंचावत नि तोंडाने झिंदाबाद पुटपुटत. हे लहानखुर्या शरीराचे वारली आदिवासी. ते झिंदाबाद म्हणत तेव्हा मला अनेकदा त्यात अपेक्षित जोर जाणवत नसे. ‘आपण जिंकणार आहोत’, याची जाणीव जागती ठेवणारं ते संबोधन होतं. लोकांसाठी मात्र केवळ अमुक प्रकारच्या माणसांना नमस्कार घालायचा तो एक ध्वनी असावा. त्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण ‘झिंदाबाद’ आठवलं.

शेणसरी नावाचं गाव होतं. मुख्य सडकेहून आत गेलं, की गावात शिरताना गचपण लागायचं. छातीइतक्या वाढलेल्या गवतातून ओबडधाबड वाट गावात जायची. तिच्यावरून टू व्हिलरचा तोल सांभाळताना कसरत व्हायची. नि अचानक त्या गवतातून ‘परशात भाऊ, झिंजाबाज’ असा आवाज यायचा. त्या आवाजाकडे लगेच माझा प्रतिसाद क्वचितच गेला असेल. ती हाळी देणाऱ्याचं नाव होतं सखाराम. त्याच्याजवळ गेलो की सखारामच्या डोळ्यात एक विशिष्ट ओळख जाणवायची. मी कधी शब्द दोन शब्द त्याच्याशी बोललो असेन.

हा सखाराम मुंबईत कुठेतरी बांधकाम मजूर होता. तिथे त्याला अपघात झाला. पाय निकामी झाले. उपचारांचा उपयोग झाला नाही. मग गावी आला. त्यानंतर काही दिवसांनी त्याची बायको त्याला सोडून गेली. मग तो या झुडपातच पडून असे. कुणीतरी भाकर आणून देत असे. तो खात असे. हळूहळू त्याचं मूळ नाव बदललं, नि लोक त्याला पांगळा म्हणू लागले. लोकांचं असं असतं, ते परिस्थितीवरून माणसांना लक्षात ठेवतात. माणूस दुबळा की श्रीमंत यावरून परिचयाची खूण आपल्या मनात बसते. सखारामचं नावदेखील लोकांनी बदललं. तो केवळ त्या गवतात पडलेला एक पांगळा म्हणून उरला. मला पाहताच त्याच्या नजरेत ओळख दाखवायची उर्मी जागी व्हायची.

एकदा असाच त्या वाटेवरून जात होतो. तेव्हा दिसलं, सखाराम निपचित निजलाय नि जवळ एक मातीचा खड्डा आहे. गावात मी कुणाकडेतरी त्या खड्ड्याबद्दल कुतुहलाने विचारलं. उत्तर मिळालं, ‘कधी भाकर मिळाली नाही, तर सखाराम माती उकरून खातो.’ ही आठवण मी विसरू शकत नाही. सखारामची ती ‘परशात भाऊ’ म्हणून हाक नि ‘झिंजाबाज’ उच्चारणं कधी आठवलं की विचित्रसं वाटतं. पोटात खड्डा पडतो.

२६ जुलै, २००५ ला मुंबईत घनघोर पाऊस झाला, त्या रात्री सखाराम मेला. सर्वत्रच त्या पावसाने थैमान घातलेलं. सखाराम तेव्हा रस्त्याकडेला एका जांभळीखाली रहायचा. धुव्वाधार पावसात तो अंधारात एकटाच ओरडत होता. पण इतक्या पावसात कोण जाणार? सकाळी थोडी उघडीप झाल्यावर लोकांनी रस्त्याकडेच्या नाल्यात त्याचं शव पाहिलं. मी ऐकलं, त्याच्या डोळ्यांच्या खोबणीत आणि तोंडावर तांबूस पावसाळी पैसाकिड्यांचे पुंजके होते. हे पैसेकिडे वाटेवर-गवतात अनेकदा दिसत. सुळसूळ पळणार्या या किड्यांवर फुंकर मारली की ते वेटोळे होतात. त्या किड्यांची तांबूस वेटोळी रिंगणं मी सखारामच्या डोळ्यांवर कल्पनेने पाहू शकतो. हा माझ्या अनुभवात नसलेला भूतकाळातला प्रसंग कसा कुणास ठाऊक कल्पनेने दिसतो. ते किडे सखारामच्या डोळ्यांवर त्या रात्री काय करत असतील? त्यांना कधीच मी माणसांजवळ पाहिलेलं नाही. त्या कीटकांनी सखारामची वेदना शमवण्याचा प्रयत्न केला असेल का? त्या अल्पायुषी जीवांनी सखारामचं प्राणोत्क्रमण अनुभवलं असेल का? असं म्हणतात, डोळ्यांतून आपले प्राण जातात. मला सखारामची आठवण आली की त्या कीटकांचं वागणं आठवतं. सखारामशी माझी अगदीच जुजबी ओळख. पण कुणास ठाऊक का, तो माझ्यात अजूनही आहे. माझ्या मनात अचानक त्याची आठवण सळसळते. माझ्या जीवात एक फुंकर येते, ती तांबूस याद पैसा किड्यांचं वेटोळं बनून आकुंचन पावते. हे दु:स्वप्नासारखं. स्वप्नात मला सखाराम होता येत नाही, त्या कीटकांना समजून घेता येत नाही. सखारामच्या डोळ्यांत माझी एक ओळख साकळली आहे, असं मला आजही वाटतं.

या साखळीतली आणखी एक आठवण. माझ्या वडलांचा मृत्यू मी जवळून पाहिलाय. ते रूग्णशय्येवर होते. त्यांना मी भाताची पेज पाजली. हे त्यांचं अखेरचं अन्न. मी वाटी बाजूला ठेवत होतो. इतक्यात त्यांचं शरीर अचानक विजेचा धक्का लागल्याप्रमाणं थरथरलं. त्यावेळी वडलांजवळ मी एकटाच होतो. मी गडबडलो. काही न सुचून कुणालातरी बोलवायला गेलो. पण जवळ कुणी नव्हतं. वडलांजवळ मिनीटभरात परत आलो, तेव्हा ते शांत झाले होते. त्यांचा एक डोळा फक्त उघडा होता. तो डोळा ते सरणावर गेले तेव्हाही तसाच अर्धवट उघडा होता. त्या डोळ्यात गांगरून पाहणारा मी गोठून राहिलो असेन का? डॉक्टरांनी थोड्या वेळाने वडलांच्या डोळ्यात टॉर्च मारला, तेव्हा तो उजेड आत किती दूरपर्यंत गेला असेल?

नंतरच्या काळात अनेक दिवस वडील माझ्या स्वप्नात येत. मी झोपलेलो असताना ते जवळ येऊन बसलेत असा भास होत असे. माझ्यातील दोष अशावेळीही जाणवायचा. मला त्यांच्या येण्याला प्रतिक्रिया सुचत नसे. हे स्वप्न अनुभवणं मला जमलं नाही. मग कधीतरी ते थांबलं.

श्युआंग त्झी नावाचा चीनमधील एक तत्त्वज्ञ होता. त्याला एकदा स्वप्न पडलं. स्वप्नात तो फुलपाखरू होता. ते फुलपाखरू फुलांवरून मजेत उडत होतं. वाऱ्याची झुळूक नि फुलांचा गंध फुलपाखराला जाणवत होता. श्युआंग त्झीनं हे स्वप्नात अनुभवलं. जागं झाल्यावरही त्याला तो फुलपाखराचा अनुभव आठवत होता. मग त्याला स्वप्नं आणि वास्तवाबद्दल प्रश्न पडला, मी फुलपाखराच्या स्वप्नात तर नसेन? फुलपाखरू स्वप्नात श्युआंगला अनुभवत नसेल कशावरून? श्युआंग त्झीने हयातभर याच प्रश्नाचा माग घेतला.

कधी वाटतं, झोपेने कृपा करावी. जागं करून स्वप्नांना संपवू नये. जागं झाल्यावर आपण पाहतो ते सगळं परिचितच असतं, स्वप्नातलंच क्वचित दिसतं. कधी कधी मला जाणवलंय, की स्वप्नात आता पुढे काय होईल, याचीही कल्पना मी स्वप्नं पाहतानाच करत असतो. अतिवास्तव अवस्थेत मी अतिकल्पनाही करतो. म्हणजे पुढे आता दरी येईल, असं वाटतं नि मी तळ नसलेल्या त्या दरीतून कोसळत कोसळत जागा होतो. दचकून उठलो नसतो, तर दरीच्या पुढे कदाचित फुलांचं पठारही असू शकलं असतं. कदाचित मी माझ्या स्वप्नातून दुसर्यांच्या स्वप्नातही प्रवेश करण्याची शक्यता असू शकते.

कुणीतरी मलाही स्वप्नात पाहत असेलही. साहिरने ‘हम आपकी आखों मे...’ गाण्यात म्हंटलंय ना - ‘हम आपको ख्वाबों मे ला,ला के सतायेंगे...’! खुळचट वाटेल, पण उचकी लागल्यावर माझीही तशीच भावना होते - कुणीतरी आठवण काढली असेल! पण कुणास ठाऊक कुणी? कुणाच्या आठवणीत आपण काय असू? आठवणींमध्ये राहताना आपण काय करतो? तो प्रदेश कोणता? सेलफोनवर मिस्डकॉल पाहिल्यावर आपण फोन करू शकतो. पण आठवण काढल्यावर काय करणार? सुचत नाही. मला हल्ली वाटतं, अनुभूतींच्या मितीची ही खिडकी उघडी ठेवावी.

कल्पनेतील जाणीवांचीही एक मिती असू शकेलच ना? अन्यथा कादंबऱ्यातली पात्रं मेल्यावर मी हुमसून हुमसून का रडतो? कोसलातील सांगवीकरच्या बहिणीचा मृत्यू मला नेहमीच विव्हळ का करतो? गो. नी. दांडेकरांचा पवनाकाठचा धोंडी मला का रडवतो? ज्या कवितांचा अर्थ उलगडून सांगू नये अशा कविता मनात का रूतून बसतात? हे कसलं गणगोत आहे?

•

मॉर्निंग वॉकची माझी ठिकाणं बदलत असतात. खूप दिवसांनी पुन्हा पहिल्या ठिकाणी गेलं, की तिथे कुणीतरी अचानक पाहून म्हणतं,‘हॅलो, कुठे होतास? दिसला नाहीस?’ यांना मी दिसलो नाही ते हे पाहत असावेत. पोकळीत असलेलं हे अस्तित्त्वच ना? हा दिसला नाही, म्हणजे मेला-बिला की काय? असंही वाटत असेल कुणाला. मेलेल्यांच्याही स्मृती सोबतच असतात नि मरेल त्याच्याही. मनात असाही एक प्रदेश असेलच, जिथे मेले न मेलेले एकत्र नांदतात.

पाखरांच्या थव्याला हॅलो म्हणून मी डोंगराची वाट धरली नि अचानक थबकलो. वाटेवर एक शव होतं. कालच जन्मलं असेल, असं हे वासरू. गाईच्या या बाळाचं सगळं शरीर पोखरलेलं. ते रात्री मेलं असावं. कावळ्या-कुत्र्यांनी त्याचं मांस न मांस सोलून नेलेलं. मणक्याचं उघडं पडलेलं हाड, नि त्याला बिलगलेली शाबूत शेपूट. पायांची खुरंही शाबूत. पुरातत्त्व विभागाच्या खोदाईत सापडतात तसा हा सांगाडा. पण अगदी ताजा. वासराच्या मुंडक्याला जराही इजा नव्हती. त्याचं नाक अजून ओलं गार असेल. नि डोळे उघडे. मान वळवून या वासराने त्याचं मांस नेणाऱ्याना पाहिलं असेल. ती मुद्रा तशीच गोठून राहिलीय. आता ते डोळे मला पाहत होते. मी गांगरून आजूबाजूला पाहिलं तर समोरच्या झुडपात एकच कावळा होता. वासराच्या नजरेतलं बुब्बुळ स्थिर होतं. वेदनेचा लवलेशही नाही. याचे हंबरडे कुणी ऐकले नसतील का रात्री? जवळ जाऊन केवळ हाडांची कमान उरलेल्या त्या पाठीवर हात ठेवला तर वेदनेने कंठ येईल का याला? मी ते डोळेच क्षणभर पाहत राहिलो.

मग एक आफ्टर थॉट आला, पंजाब प्रांतातले शेख फरीद नावाचे सुफी संत होते. त्यांच्या गुरूने सांगितलेलं, आपण ध्यानधारणेने ईश्वराला पाहू शकतो. ती दृष्टी विकसित होऊ शकते. ती नजर आली नाही, तर जन्मच व्यर्थ! गुरूची आज्ञा मानून शेख फरीद साहेबांनी आधी बसून ध्यान केलं. मग उभ्याने. तिष्ठत. पण त्यांना यातून ईश्वराच्या दर्शनाची आशा दिसेना. मग त्यांनी स्वत:ला विहिरीत झाडाच्या फांदीला उलटं टांगून घेतलं. या अवस्थेत ते बारा वर्षं राहिले. असं म्हणतात की, त्यांनी या बारा वर्षांत केवळ ५० किलो अन्न घेतलं. खाण्यापुरतं ते बाहेर येत नि पुन्हा टांगून घेत. कित्येक दिवस गेले. देहावर कातडी तेवढी उरली. एक दिवस ते विहिरीच्या काठावर येऊन पहुडले. एका कावळ्याला ते शव वाटलं. कावळा त्यांच्या मस्तकावर येऊन बसला. देहात मांस नव्हतंच. म्हणून कावळा डोळ्यात टोच मारणार तोच शेखसाहेब म्हणाले,

कागा कारंग धोडोलिया सगला खैय्यो मास

ऐ दो नैनन् मत छुछो पीर मिलन की आस...

इरशाद कामिल या माझ्या आवडत्या गीतकाराने याच ओळी उधार घेत म्हटलंय -

कागा रे कागा रे मोरी इतनी अरज तोसे

चुन चुन खईयो मास

खईयो ना दो नैना मोरे

पिया के मिलन की आस...

वासराचे डोळे हे असे जाणवले मला. न जगलेल्या जीवनाची आस असणारे डोळे. ती नजर मला पाहत होती. त्या क्षणात वासराचं नि माझं : असणंही नाही, नसणंही नाही! चराचर स्थिर झाल्याची स्थितीगत अवस्था. वासराचे कान अजूनही ताठ. आत्ता भुनभुन करत चिलटं आली तर हे कान त्यांना उडवून लावतील. प्राण नव्हता, तरी ते डोळे माझी ओळख-पारख करत असतील का? डोंगरात फिरायला जायचा माझा मूडच गेला. थोडं मागे पाहिलं तर आणखी एक वासरू पाय जवळ घेऊन झाडीत पडलेलं. यांची शवं अशी इथे कुणी सोडली असावीत? दुसऱ्या वासराजवळ नाही गेलो. वाट बदलली. दुसऱ्याच वाटेवरून चालायला लागलो.

वासराचे डोळे मला पाठमोरं पाहत असतील, वाट बदलून जाणारा माणूस त्यांना दिसला असेल. मला जाणवत होती ती दृष्टी. शेख फरिद साहेबांची ती नजर...खुदाची आस असेल, अशा दृष्टीसमोर मी पामराने कसं थांबावं? माती माखलेल्या पायांनी मी चालू लागलो.

चालताना मनात विचार आला, ऊन चढलं की मढं खाणारे किडे त्या पार्थिवातूनच जन्म घेतील. हाडामासावर बारीक पांढऱ्या ढबू किड्यांचा ढीग होईल. वासराची ती मान हळूहळू मातीत जाईल. त्या पार्थिवाचं चित्र मनात येता येता मीच मुंग्या मुंग्या होत गेलो. गजबजून वारूळ झालो. माझा ढग त्या वारूळाच्या इवल्याशा डोंगरावरच काही काळ राहिला.

('अनुभव' मासिकाच्या मार्च २०२२च्या अंकातून साभार)

प्रशांत खुंटे | prkhunte@gmail.com

प्रशांत खुंटे हे मुक्त पत्रकार असून समाजातील उपेक्षितांच्या प्रश्नांचे अभ्यासक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results