आम्ही कोण?
लेखमालिका : उकलता गुंता

मनःस्वास्थ्याच्या ‘बेबी स्टेप्स'- लहान मुलांच्या मनोविश्वाची ओळख

  • गौरी जानवेकर
  • 18.02.25
  • वाचनवेळ 13 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
ukalata gunta gauri janavekar lekhmalika

‘टीव्हीचा रिमोट दिला नाही म्हणून एखाद्या मुलाने आत्महत्या केली,' किंवा ‘बहिणीची छेड काढली म्हणून शाळकरी मुलाने आपल्याच शाळेतील मुलाला जबरी मारहाण केली,' अशा बातम्या वाचल्या की आपण हादरतो. मुलांचं नेमकं काय बिनसतंय हे आपल्याला समजत नाही. ‘मुलांना कसलं आलं नैराश्य आणि पॅनिक अटॅक! हल्लीची फॅडं आहेत सगळी! खायचं, प्यायचं खेळायचं- उगीच नखरे कशाला?' असंही आपल्या मनात येतं. पण या वरवरच्या प्रतिक्रिया आहेत. काही तरी चुकतं आहे, हे त्यामागचं खरं कारण. मुलांचं मन मोठ्या माणसांपेक्षा वेगळं चालतं का? तर नाही.

अगदी लहान मुलांच्या भावना गुंतागुंतीच्या नसतात, मात्र पुढे वयानुरूप भावनिक गुंतागुंत बदलत जाते. मुलांच्या मानसिक समस्यांची विभागणी तीन गटांत करायला हवी. पहिला गट म्हणजे वाढीच्या संदर्भातील समस्या. दुसऱ्या गटात भावनिक आणि त्यातून निर्माण झालेल्या वर्तनाच्या समस्या येतात. तर तिसरा गट म्हणजे अत्यंत असुरक्षित वातावरणामुळे होणारे मानसिक आजार.

मुलाच्या जन्माच्या आधी मेंदूचा विकास नीट झालेला नसेल तर वाढीच्या काळात अनेक अडचणी येऊ शकतात. उदा. बौद्धिक विकलांगता, स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी किंवा अतिचंचलता. या सगळ्या समस्यांना ‘वैकासिक समस्या' म्हणतात. या समस्या पूर्ण बऱ्या होत नाहीत, मात्र मानसोपचारांनी त्यांची तीव्रता कमी करणं शक्य असतं. यात अतिचंचलता अशी समस्या आहे की जी औषधोपचार आणि मानसोपचार यांनी बरीच कमी होऊ शकते. पण बौद्धिक विकलांगता, स्वमग्नता यांचं प्रमाण किती आहे त्यावर या समस्या बऱ्या होणार की नाही हे बरंच अवलंबून असतं. प्रमाण कमी असेल तर मूल जगण्यासाठी आवश्यक अनेक गोष्टी करू शकतं. उदा. बुद्धिमापन करून बौद्धिक विकलांगता अत्यल्प असल्याचं दिसलं तर ते मूल कमी बौद्धिक गुंतागुंत लागेल असं व्यावसायिक शिक्षण घेऊ शकतं.

पण यातील प्रमुख अडचण असते ती म्हणजे पालकांचा स्वीकार. बहुतेकदा आपल्या मुलाला एखादी वैकासिक अडचण आहे हे स्वीकारायला पालकांना खूप वेळ लागतो. दरम्यान मुलांची काही कौशल्यं शिकायला सुरुवात करण्याची महत्त्वाची वर्षं वाया जातात. भारतासारख्या देशात स्वमग्नता या समस्येबद्दल अजूनही अनेकांना व्यवस्थित माहिती नसते. स्वमग्न मूल बऱ्याचदा बौद्धिकदृष्ट्या विकलांग असू शकतं, पण ते नेहमीच तसं असतं असं नाही. स्वमग्नतेचा स्पेक्ट्रम असतो. काही स्वमग्न मुलांच्या भाषिक विकासात अडचणी येतात, काहींना सामाजिक संबंध प्रस्थापित करता येत नाहीत, काही एकाच कामात खूप वेळ गुंतून राहतात, तर काहींना तीव्र संवेदनांचा टोकाचा त्रास होतो. कोणत्या मुलाला कोणतं लक्षण आहे त्याप्रमाणे त्याला मदतीची गरज असते.

सगळ्याच वैकासिक अडचणींवर काम करताना मुलांमध्ये कौशल्यं विकसित करण्यावर जास्त भर दिला जातो, पण म्हणून त्याला आपण उपचार म्हणू शकत नाही. ते अत्यंत नियोजनबद्ध, टप्प्याटप्प्याने जाणारे वैकासिक उपक्रम असू शकतात. ते करताना समजा एखादं मूल अतिचंचल असेल किंवा संतापी असेल, त्याचं वर्तन एका साच्यातलं असेल, तर ते कमी करण्यासाठी औषधं दिली जातात; परंतु बौद्धिक विकलांगता आणि स्वमग्नता यावर कोणतंही औषध नाही.

लहान मुलांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या समस्या शारीरिक नसून भावनिक आणि वर्तनाशी संबंधित असतात.

लहान मुलांचा शारीरिक आणि मेंदूचा विकास अपेक्षेप्रमाणे, वयानुरूप असतो; मात्र त्यांच्यात वर्तनाच्या समस्या आढळतात. मुलाच्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे, त्यांना कसं वाढवलं जातं त्यानुसार या समस्यांमध्ये फरक आढळून येतो. हे समजून घेण्यासाठी आपण मानसशास्त्रज्ञ एरिक एरिकसन याने मांडलेल्या ‘मनो-सामाजिक सिद्धांतां'ची मदत घेऊ या.

मुलांचं पहिलं वर्ष

अगदी जन्मापासून आपला मेंदू प्रत्येक गोष्ट टिपत असतो. (काही लोक असंही मानतात, की जन्माच्या आधीपासून घडणाऱ्या गोष्टींचा मनावर परिणाम होतो, पण मानसशास्त्र प्रत्यक्ष दिसणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणावर आधारित असतं. ‘पॅरा सायकॉलॉजी' हा दिशाभूल करणारा शब्द आहे असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात, आपण जन्मानंतरच्या गोष्टींबाबत चर्चा करू.) तर जन्मानंतर मूल किती वेळाने दूध पितं, त्याला कसा स्पर्श मिळतो, आईची (महत्त्वाची संरक्षक व्यक्ती) मनःस्थिती कशी आहे यावर मुलाचा स्वत:वर आणि जगावर किती विश्वास बसेल हे ठरतं. आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यावरून आपला स्वीकार कसा होतोय हे मूल जोखत असतं. या विश्वासावर पुढील अनेक गोष्टी ठरत असतात. त्यामुळे वयाचं पहिलं वर्ष मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. आई सतत तणावग्रस्त असेल, तिची नीट काळजी घेतली जात नसेल तर त्याचा परिणाम मुलांच्या मनःस्थितीवर होत राहतो.

मुलांचं दुसरं वर्ष

पहिलं वर्ष पूर्ण होता होता मूल अर्थपूर्ण शब्द बोलायला लागतं. त्याला अनेक शब्द बोलून पाहायचे असतात. या काळात मूल एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतं, कारण त्याच्याकडे शब्दसंपत्ती नसते. त्याला पुन्हा पुन्हा तेच उत्तर देणं, त्याच्याशी बोलत राहणं यातून केवळ भाषिक विकास नव्हे, तर भावनिक विकासही साधला जातो. ‘आपण इतर लोकांना हवे आहोत; इतर लोक आपल्यावर न वैतागता, न चिडता आपल्यासोबत असणार आहेत,' हा विश्वास मुलांच्या मनात निर्माण होतो. वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी मूल आजूबाजूच्या गोष्टी हातात पकडून ओढू लागतं, तोडू लागतं, लहान कपाटावर ठेवलेल्या गोष्टी पाडू लागतं. अशा वेळीसुद्धा त्याच्याशी झालेला संवाद फार महत्त्वपूर्ण असतो. सतत चिडलेले, वैतागलेले पालक असतील तर नवीन गोष्टी हाताळायला मूल घाबरू लागतं.

मुलांचं तिसरं वर्ष

मूल तिसऱ्या-चौथ्या वर्षी लाजेची भावना अनुभवू लागतं. याच वयात पालक त्याला शिस्त लावायला सुरुवात करतात. अनेकदा पालकांना स्वत:ला अनेक गोष्टींची घाण वाटत असते. त्यामुळे मूल कोणत्याही प्रकारे ‘अस्वच्छ' असलेलं त्यांना चालत नाही. अशा वेळी मुलाचं ‘टॉयलेट ट्रेनिंग' ही अत्यंत त्रासाची गोष्ट होऊन बसते. मुलाने शी-शू केली की दरवेळी पालक अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र प्रतिक्रिया देऊ लागतात. अशा वेळी मुलांमध्ये स्वत:बद्दल लाज किंवा शरमेची भावना मूळ धरू लागते. आपल्याला बऱ्याच गोष्टी पालकांच्या अपेक्षेप्रमाणे जमत नाहीत असंही त्याला वाटू लागतं. त्याच्या मनात न्यूनत्वाची भावना मूळ धरू लागते. अशी मुलं स्वत:चे आवेग रोखून धरायला लागतात. पुढे आपल्याला जे वाटतं ते व्यक्त करायलाही त्यांना अडचणी येऊ शकतात. त्यातून पुढे काहीजणांना ‘ओ.सी.डी.' किंवा ‘ओ.सी.पी.डी' या मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो.

अति काळजी घेणारे पालक

काही मुलांना याच्या अगदी विरुद्ध अनुभव येतात. त्यांचे पालक अति काळजी घेणारे असतात, दुसरीकडे त्यांच्या शिस्त लावण्यात नियमितता आणि सातत्य नसतं. मुलाच्या एखाद्या वागण्यावर ते टोकाची प्रतिक्रिया देतात, तर दुसऱ्या एखाद्या प्रसंगी काहीच बोलत नाहीत. मुलाचे अति लाड करतात, त्याच्या सर्व जबाबदाऱ्या घेतात, मुलाला स्वतंत्रपणे कोणताही अनुभव घेऊ द्यायला तयार होत नाहीत. उदा. अनेक पालक मूल पाच-सहा वर्षांचं होईपर्यंत त्याला स्वत:च्या हाताने खाऊ घालतात. याचादेखील उलट परिणाम होऊ शकतो. नवीन गोष्टी करून पाहण्याची मुलाची इच्छा त्यामुळे मारली जाऊ शकते. एकंदर, कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातले सुरुवातीचे अनुभव फार महत्त्वाचे असतात.

मागील लेखात आपण पाहिलं, की प्रत्येक माणसाच्या दोन भावनिक गरजा असतात- आपण एखाद्या गटाचा भाग असणं आणि त्यात आपल्याला महत्त्वाचं स्थान असणं. लहान मुलांनाही या दोन्हींचा अंदाज आलेला असतो. ज्या मुलांना घरात कायम केंद्रस्थानी ठेवलं जातं त्यांना तो त्यांचा अधिकार वाटू लागतो, तर ज्यांना घरातली मोठी माणसं सतत रागावतात ते दुसऱ्यांची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागतात.

मुलांचं सहावं वर्ष

सहाव्या वर्षी खऱ्या अर्थाने सामाजिक आयुष्य सुरू होतं तेव्हा हे प्रयत्न दिसू लागतात. अल्फ्रेड ॲडलर आणि नंतर रुदाल्फ द्रायक्रूस या अभ्यासकांनी अशी मांडणी केली आहे, की आपली दखल घेतली जाण्यासाठी किंवा आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, अशी नोंद मेंदू घेतो तेव्हा मूल चारप्रकारे व्यक्त होत राहतं-

१.अनावश्यक लक्ष वेधून घेणं : सुरुवातीच्या काळात मूल घरच्या वातावरणात भीती अनुभवतं तेव्हा आपण शांत राहण्यासाठी इतर लोकांनी आपल्यावर खूष असलं पाहिजे, हे समीकरण त्याच्या मनात पक्कं होत जातं. लोक आपल्यावर खूष आहेत किंवा त्यांना मी हवी आहे/हवा आहे हे सिद्ध होण्यासाठी त्यांनी माझ्याकडे सतत लक्ष द्यायला हवं, हेही समीकरण पक्कं होत जातं. त्यातूनच सतत लक्ष वेधून घेण्याचा एक पॅटर्न तयार होत जातो. मूल वर्गात सतत बोलत राहतं, वेगवेगळे आवाज करत राहतं, वर्गात शिक्षकांनी सांगितलेलं प्रत्येक काम स्वतःकडे घेतं. घरातल्या मोठ्यांचं सतत आपल्याकडे लक्ष असलं पाहिजे यासाठी धडपडतं. आपलं आपण शांतपणे काम करत राहावं, खेळात रमावं हे अशा मुलाला जमत नाही.

आपण सतत प्रयत्न नाही केले तरी लोक आपल्या आजूबाजूला असणार आहेत, आपल्यावर प्रेम करणार आहेत ही खात्री त्याला वाटत नाही. उदा. तिसऱ्या इयत्तेत शिकणारा तेज शाळेत इतर वर्गांसमोरून जाताना सतत शिक्षकांना हाक मारत राहतो, घरी असताना आई-बाबांना सतत त्याच्या पाप्या घ्यायला सांगतो, त्याला सोडून आई-बाबांनी एकमेकांबरोबर वेळ घालवलेला त्याला पटत नाही. या वर्तनाकडे लक्ष दिलं नाही तर अशा व्यक्ती पुढे आयुष्यभर अनावश्यक लक्ष वेधत राहतात. सार्वजनिक आयुष्यात अंगावर भरपूर दागिने घालून फिरणं, बाइकचा सायलेन्सर काढून फिरणं ही याचीच उदाहरणं. ही गरज खूप वाढते तेव्हा मनोकायिक आजारही (मानसिक कारणांमुळे शारीरिक आजारांची लक्षणं दिसणं) जडतात.

२.सत्ता गाजवणं : आपण इतरांवर सत्ता गाजवली नाही तर आपलं काही खरं नाही, इतर लोक आपल्याशी नीट वागणार नाहीत, अशी मुलाच्या मनाची समजूत होते. विशेषत: पौगंडावस्थेमध्ये हे वर्तन अधिक दिसतं, पण याची मुळं सुरुवातीच्या काही वर्षांत असतात. आपल्या वर्गातील इतर मुलांची खिल्ली उडव, गटाने काय करावं हे स्वत:च ठरव, पालक-शिक्षकांना वेठीस धर, अशा प्रकारचं वर्तन मूल करू लागतं. उदा. नववीतला सोहम शिक्षकांना प्रत्येक गोष्टीत आव्हान देऊ लागला आहे. वर्गातले, घरचे कोणतेही नियम त्याला पाळायचे नसतात. आपण सगळे नियम पाळले तर आपलं अस्तित्वच राहणार नाही असं त्याला वाटतं. अनेकदा दादागिरी करणाऱ्या माणसांमध्ये आत्मविश्वास असेल असं आपल्याला वाटतं; पण असं वर्तन भीतीतून आलेलं असतं. त्या भीतीला दूर करण्याचे प्रयत्न केले तर ते कमी होऊ शकतं.

३.सूड उगवणं : आपल्याला जितका त्रास झाला तितकाच त्रास समोरच्या व्यक्तीला झाला तरच आपली किंमत कळेल, आपलं महत्त्व पटेल असं मुलाला वाटायला लागतं. तरी दखल घेतली जावी यासाठी या प्रकारचं वर्तन इतर तीन प्रकारांच्या तुलनेत कमी आढळतं.

४.स्वत:मधील कमतरता गृहीत धरणं : आपल्यामध्ये कमतरता असेल तर आपल्याला मदत करण्याच्या हेतूने लोक आपल्याकडे लक्ष देतील असा मुलाचा समज झालेला असतो. त्यामुळे कितीही वेळा शिकवलं, समजावलं तरीही आपल्याला समजत नाही, असंच ते दाखवत राहतं. आपण कायम दुय्यम भूमिका घेतली तर आपली ‘काळजी' घेतली जाईल असं त्याला मनोमन वाटतं. उदा. सातवीतली साक्षी कोणत्याच उपक्रमात सहभागी होत नाही. तिला कोणकोणत्या गोष्टी चांगल्या जमतात याची तिला सतत आठवण करून द्यावी लागते. अशा सतत दुय्यम भूमिकेत राहणाऱ्या व्यक्ती सतत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींच्या शोधात असतातच. काही मुलं या प्रकारात शांत होतात. शांत मुलांना समंजस मानलं जातं पण अतिशय शांत आणि समंजस मूल बऱ्याचदा चिंताग्रस्त असू शकतं.

या चारही वर्तनप्रकारांना मानसशास्त्रात ‘चुकीची ध्येयं' असं म्हटलं जातं. मूल योग्य पद्धतीने सुरक्षित राहू न शकल्याने चुकीच्या पद्धतीने स्वत:ला सुरक्षित वाटून घेण्याचा हा त्याचा प्रयत्न असतो. यातूनच शिस्तीचे अनेक प्रश्न निर्माण होतात.

मुलांचं सहा ते बारावं वर्षं

सहा-बारा वर्षं हा काळ समाजात मिसळण्याचा, टोळीत राहण्याचा, टोळीचे नियम शिकण्याचा असल्याने त्याला ‘टोळीचं वय' असंही म्हणतात. टोळीत मुलांनी घेतलेल्या भूमिकांची मुळं त्यांच्या लहानपणात असतात. याकडे तेव्हाही लक्ष दिलं नाही तर या भूमिका आयुष्यभर कायम राहतात.

मुलांचं तेरा ते एकोणीसावं वर्षं

तेरा ते एकोणीस वर्षं म्हणजे स्वत:ची ओळख समजण्याचा, ओळख निर्माण करण्याचा काळ. हाच वयात येण्याचा काळ. लैंगिकतेची सुरुवात माणसाच्या जन्मापासूनच झालेली असते. या वयात प्रजननक्षमतेचा विकास व्हायला सुरुवात होते. बालपणी त्यांनी भावनिक समायोजन कसं केलं आहे त्यानुसार या वयात त्याचे परिणाम दिसतात. भिन्न व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण, प्रेम, जोडीदाराची निवड या सगळ्या गोष्टींना या वयात सुरुवात होते. मुली स्त्रियांप्रमाणे वागू लागतात, तर मुलगे पुरुषांप्रमाणे.

माणसाच्या बाबतीत या केवळ लैंगिक गोष्टी नाहीत. लहानपणापासून झालेला स्वत:चा स्वीकार किंवा धिक्कार, तयार झालेले न्यूनगंड किंवा अहंगंड, चुकीची ध्येयं या सगळ्याचा परिणाम त्याच्या लैंगिक वर्तनावर दिसतो. त्यानुसार त्याचे आयुष्यावर होणारे परिणामही ठरतात.

लैंगिकता हा फारच मोठा विषय आहे. त्याबद्दल चर्चा पुन्हा कधी तरी. पण तेरा ते एकोणीस हा काळ अनेक अर्थांनी महत्त्वाचा असतो. याच काळात मेंदू पूर्णपणे बदलत जातो. मेंदूतील पेशींची संख्या झपाट्याने वाढते. (माणसाच्या एकूण आयुष्यात चेतापेशी वयाच्या दुसऱ्या वर्षी सगळ्यात जास्त असतात, त्याखालोखाल पौगंडावस्थेत त्यांची संख्या सर्वाधिक असते.) ज्या पेशी वापरल्या जात नाहीत त्यांची काटछाट होते. संप्रेरकं तयार होतात. हे इतके बदल घडतात म्हणूनच याला ‘वादळी वय' म्हणतात.

हे सगळे शारीरिक बदल होत असताना मन शांत असेल तर स्वतःची ओळख निर्माण करण्यात अडथळे येत नाहीत, पण मानसिक गोंधळ असेल तर मात्र स्वत:बद्दल इतर अनेक गोंधळ निर्माण होऊ शकतात. ज्या मुलांना करियरचे निर्णय घेणं अवघड जातं त्यांना सहजपणे आळशी म्हटलं जातं. पण बहुतेकदा या वयात न्यूनगंड आळसाचं रूप घेऊन आलेला असतो. पौगंडावस्था हादेखील एक संपूर्ण वेगळ्या लेखाचा विषय आहे. आपण पूर्वीच्या लेखात पाहिलं, की मानवाच्या अस्तित्वाचा बराचसा काळ जंगलात गेला आहे. तेरा वर्षांनंतर मुलगे शिकारीला बाहेर पडत. त्यामुळे शिकारीसाठी आवश्यक असणारे डावपेच शिकणं, प्रश्न सोडवणं याच काळात होत असे. आता असं आयुष्य राहिलेलं नाही, पण मेंदू फारसा बदललेला नाही. म्हणून अनेक मुलं मोबाइल गेम्सकडे वळतात. आव्हानं समजून घेऊन प्रश्न सोडवण्याचे विधायक पर्याय त्यांना उपलब्ध करून दिले तर मोबाइल गेम्स खेळण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.

निरोगी आणि आनंदी बालपण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे; पण वेगवेगळ्या मार्गांनी मुलाला आनंदी करण्याच्या नादात मूल निरोगी आहे ना हे पाहणं राहून जातं. हल्ली पालकत्वाचे अनेक वेगवेगळे क्लासेस घेतले जातात, त्यात मुलासाठी काय काय करायचं हे सांगितलं जातं. पण ते करताना पालकांची मनोवस्था किती महत्त्वाची असते याबद्दल अगदी कमी वेळा बोललं जातं. पालक स्वत: मनाने अस्वस्थ असतील तर त्यांची वागणूकही मानसिक अनारोग्याची असू शकते. उदा. सतत सगळ्यांची मर्जी राखण्यासाठी धडपडत राहणं, सतत इतरांशी स्पर्धा करणं, त्यासाठी मुलांनाही स्वस्थ बसू न देणं, इतरांचं शोषण करणं, इतरांना फसवणं, आपण कमी आहोत असा सतत विचार करणं. या सगळ्यांचा परिणाम मुलांवर होत राहतो. पालक स्वत:ला स्वीकारू शकत नसतील तर ते मुलांनाही स्वीकारू शकत नाहीत. मग माणूस आयुष्यभर इतरांनी आपल्याला स्वीकारावं, इतरांची मान्यता मिळावी यासाठी धडपडत राहतो.

मुलांमधल्या अशा मानसिक समस्यांवर कोणते उपाय असू शकतात?

१. मूल जन्मल्या क्षणापासून त्याला आलेल्या अनुभवाचा अर्थ लावत असतं. त्यामुळे बाळाला काय कळतंय, या विचारापेक्षा त्याच्या आकलनक्षमतेवर विश्वास ठेवल्यास त्याच्याशी कसं वागायचं हे समजू शकतं. विनाअट मिळालेलं प्रेम प्रत्येक मुलाला समजतं.

२. लहानपणी मुलांमध्ये खूप कुतूहल असतं. त्याला पोषक वातावरण आजूबाजूला असेल तर मूल स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करू शकतं. मुलासाठी आनंद निर्माण करण्याची जबाबदारी मोठ्या माणसांची नाही. पण आनंद निर्माण करता येईल असं सुरक्षित आणि विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं काम मात्र मोठ्यांचंच.

३. मोठ्यांनी मुलाच्या वाढीचा टप्पा लक्षात घेऊन त्यानुसार त्याच्याकडून अपेक्षा कराव्यात.

४. शिस्त लावण्याचा उद्देश काय हा प्रश्न मोठ्यांनी जरूर विचारावा. मुलाची मानसिक पडझड न करता आवश्यक वर्तनबदल घडवणं म्हणजे सकारात्मक शिस्त लावणं.

५. शिस्त लावताना मूल त्या प्रक्रियेत सहभागी आहे ना, त्याच्या वर्तनाचे परिणाम त्याला आधी माहीत आहेत ना, हे प्रश्न जरूर विचारावेत.

६. मुलाच्या चुकांकडे गुन्हा म्हणून न पाहता शिकण्याची संधी म्हणून पाहावं.

७. शिस्तीच्या पद्धती मूल आणि मोठी माणसं दोघांचा आदर ठेवणारी आहेत ना याकडे लक्ष पुरवावं.

काही वेळा मुलांचं वर्तन याच्या पलीकडे जाणारं असतं. अशा वर्तनाचं आजारात रूपांतर होऊ शकतं. हे आजार कशा प्रकारचे असतात? संताप आवरता न येणं, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणं आणि असं नुकसान करेपर्यंत मनाला स्वस्थता न मिळणं, दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तू आवश्यक नसताना लंपास करणं, गरज नसताना चळ लागल्याप्रमाणे खोटं बोलणं. थोडक्यात, मनातील उबळ रोखता न येणं आणि त्यामुळे त्याचे परिणाम भोगायला लागणं, असं या सगळ्या आजारांचं स्वरूप असतं. यासाठी औषधोपचार आणि मानसोपचार या दोन्हींची आवश्यकता असते.

मुलांच्या मानसिक समस्या, आजार या सगळ्या पलीकडे मुलाचं मूलपण महत्त्वाचं आहे. मूल मोठेपणी कसं होईल या चिंतेत प्रत्येक क्षण खरंच घालवायला हवा का, याचा पालकांनी अवश्य विचार करावा. मुलाला त्याचं बालपण नीट जगता आलं तरच त्याचं मोठेपण आनंदी आणि निरोगी असणार, हा विश्वास बाळगावा.


गौरी जानवेकर | gjanvekar@gmail.com

या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. त्या या विषयावर लेखन करतात, कार्यशाळाही घेतात.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Lata Shinde20.02.25
खूप छान लिहिलंय. सर्व कमी शब्दात आणि जास्तीत जास्त माहितीमध्ये समाविष्ट आहे. या लेखासाठी धन्यवाद. पालकत्वाच्या प्रवासात प्रत्येकासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल
See More
navi-pidhi-navya-vata.webp

Select search criteria first for better results