
अलीकडच्या काळातील अस्वस्थ करणाऱ्या दोन घटना आपण बघितल्या. पहिली, मणिपूरमध्ये स्त्रियांची काढलेली नग्न धिंड आणि दुसरी म्हणजे महाडमध्ये दरड कोसळल्यामुळे झालेली मनुष्यहानी. एक आपत्ती मानवनिर्मित, तर दुसरी अर्धी मानवनिर्मित आणि अर्धी नैसर्गिक अशी म्हणावी लागेल. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार करता अशा घटना घडतात तेव्हा त्याची जी काही मानसिक प्रतिक्रिया असते ती फार महत्त्वाची ठरते.
आपत्तीचा अनुभव प्रत्येक माणसाला येत नाही, पण ज्याने ती अनुभवली तो माणूस पूर्वीचा राहत नाही. आपत्ती माणसाचं माणूसपण हिरावून घेते. काही माणसांच्या बाबतीत आपत्तीमधून होणाऱ्या आघाताचा परिणाम आयुष्यभर टिकणारा असतो. म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत माणसाचं होत्याचं नव्हतं होतं. भूकंप, पूर, दुष्काळ अशी संकटं बघता बघता माणसाला अस्थिर करून टाकतात. जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने जगण्याचे संदर्भ बदलतात. लैंगिक अत्याचार शारिरीक इजा करतातच, पण दूरगामी मानसिक आघातही करतात. याचे जे मानसिक परिणाम होतात त्यातून मानसिक समस्या आणि मानसिक आजार दोन्ही सुरू होऊ शकतात. इतर मानसिक आजार आणि आपत्तीमधून तयार झालेले आघात यातील प्रमुख फरक असा, की आपत्तींतून होणाऱ्या आघातांमुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारची लक्षणं दिसतात. वर लिहिलेल्या कारणांपालीकडे इतरही अनेक आघात असतात. पालकांचा मृत्यू, एका पालकाचं अचानक सोडून जाणं, शिक्षणासाठी म्हणून अचानक होस्टेलवर किंवा आई-वडिलांपासून लांब जावं लागणं, अशी अनेक कारणं त्यामागे असू शकतात.
फसवणुकीतून झालेला आघात (बिट्रेयल ट्रॉमा)
हा आघाताचा आणखी एक प्रकार आहे. जोडीदाराच्या अनेक वर्षांपासूनच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजणं, आपल्या पैशाचा आपल्याच जवळच्या व्यक्तीने न सांगता अपव्यय केला असल्याचं समजणं, जवळच्या नात्यात असलेले आणि समाजमान्य नसलेले संबंध अचानक समाजासमोर येणं आणि त्याचा कुटुंबीयांना धक्का बसल्याचं जाणवणं... एकूण काय, तर अचानक काही तरी घडणं आणि त्यामुळे एकूण आयुष्य अस्थिर होऊन जाणं याने आघात होतात.
माणूस काही लाख वर्षांच्या उत्क्रांतीमधून पुढे आला आहे आणि या सगळ्या काळात अनेक टप्प्यांमध्ये माणसाच्या मेंदूची जडणघडण झाली आहे हे आपण मागील काही लेखांत पाहिलं. मानवी जमातीचा खूप मोठा काळ संकटांशी सामना करण्यात आणि स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी उपाय शोधण्यात गेला आहे. जगण्यात स्थैर्य असेल तर आपण अधिक काळ जिवंत राहू शकतो हे माणसाच्या लक्षात आलं आणि त्यानुसार मानवी मेंदू आणि एकूण शरीराची रचना होत गेली.
पण त्यामुळे असं होतं, की जेव्हा आपत्ती येते तेव्हा माणूस पुन्हा स्वत:च्या आदिम स्वरूपात जातो. आपत्तीचा आघात मोठा असेल तर तो पुढेही कायम संकटात अडकल्याच्या विचारात आणि भावनेत जगतो.
सुमित अगदी लहान असताना जवळच्या नातेवाइकाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. मुलगा असल्याने त्याबद्दल तो कोणालाच कधी काही सांगू शकला नाही. त्याच्या जागी एखादी मुलगी असती तर असं काही झालं होतं यावर लोकांनी किमान विश्वास तरी ठेवला असता. सुमितवर झालेले लैंगिक अत्याचार इतके वेदनादायी होते की तेव्हापासून तो शांतपणे झोपू शकलेला नाही. तो सतत भीतीच्या सावटातच जगतो. जग सुरक्षित नाही अशी त्याची पक्की समजूत झाली आहे.
आघातामध्ये सगळ्यात जास्त परिणाम मज्जासंस्थेच्या कामावर होतो.
आपल्या मेंदूमध्ये भावनिक मेंदूची वेगळी जागा आहे हे आपण मागील लेखात पाहिलंच. कोणत्याही संकटाच्या वेळी भावनिक मेंदूमधील अमीग्डाला हा भाग उद्दिपित होतो आणि संकटापासून वाचण्यासाठी शरीराची तयारी करतो. संकट संपलं की अमीग्डाला शांत होतो आणि आपण नेहमीच्या गोष्टी करू लागतो, पण ज्यांनी आघात सोसलेला असतो त्यांचा भावनिक मेंदू शांतच होत नाही. तो कायमच संकटाला सामोरा जाण्यासाठी तयार असतो. विचार करा, मन कधीच शांत झालं नाही तर काय होत असेल? माणूस सतत जणू युद्धभूमीवर असतो.
आपल्या मेंदूची रचना अशी आहे, की भावनिक मेंदू उद्दीपित झालेला असतो तेव्हा विचार करणारा विवेकी मेंदू बंद पडतो. त्यामुळे परिस्थितीचा नीट अंदाज येत नाही. वास्तव नीट पाहिलं जात नाही. चिकित्सा जमत नाही. आपलं कोण, लांबचं कोण हे समजत नाही. एक तर टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या जातात किंवा अजिबातच प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत. प्रकाश, आवाज यांचा खूप त्रास होतो. त्रासदायक गोष्टी सतत डोळ्यांसमोर येत राहतात. अमीग्डाला सतत उद्दीपित असल्याने कॉर्टिसॉल नावाचं ताणाचं संप्रेरक सतत तयार होत राहतं. मेंदू सतत लढा, पळा, थिजून जा या यंत्रणेवर चालू राहतो. त्याचा इतर अवयवांच्या कामावर परिणाम होतो आणि त्या व्यक्तीला दमायला होतं.
आघाताचा परिणाम कोणाला जास्त सहन करावा लागतो?
इथे सर्वांत आधी युद्धाचा अनुभव घेतलेल्या सैनिकांचा उल्लेख करायला हवा. जगभरात असा अभ्यास आहे, की सैनिकांना आघातामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या सगळ्यात जास्त होतात. ‘पी.टी.एस.डी.'चं (पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) प्रमाण सैनिकांमध्ये जास्त आढळतं. आपल्याकडे सैनिक म्हटलं की प्रचंड आदराची भावना तयार होते. पण युद्ध अनुभवलेली व्यक्ती जिवंतपणी अनेकदा मरणयातना अनुभवते. युद्ध संपलं तरी पुढे अनेक वर्षं सैनिकाचा मेंदू युद्धाचा अनुभव घेत असतो. ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' हा सिनेमा जमलं तर नक्की पहा. सैनिक नेमके कशा परिस्थितीत असतात हे समजायला मदत होईल.
सैनिकांनंतर येतात शिस्तीच्या नावाखाली शिक्षा झालेली मुलं. शिस्तीच्या नावाखाली झालेल्या जबर शिक्षांबद्दल आपण अनेकदा पेपरमध्ये वाचतो. त्यात मूल कायमचं जायबंदी होतं किंवा त्याचा एखादा अवयव निकामी होतो. या मुलांच्या मनात कायमची भीती बसते. नवीन काहीही शिकणं त्यांना अवघड जातं. वर म्हटल्याप्रमाणे मूल कायम स्वत:चा बचाव करण्याच्या स्थितीत राहतं. काही मुलांना पुढे मानसिक समस्या आणि मानसिक आजार होतात.
घरात हिंसाचार सहन करणाऱ्या स्त्रियांनाही मानसिक आघातांना सामोरं जावं लागतं. घरगुती हिंसाचार कोणत्या कायद्याखाली आणावा हा अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहेच. कारण अनेकदा स्त्री आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे तिच्या नवऱ्यावर अवलंबून असते. पण केवळ कायद्याने पूर्ण प्रश्न सुटत नाही हे देखील आपण अनेकदा पाहतो. ५५ वर्षांची राजश्री गेल्या ३० वर्षांपासून घरगुती हिंसाचार सहन करत आहे. कधी कधी तो इतका त्रासदायक असायचा की तिला दोन-तीन दिवस अंथरुणातून उठता यायचं नाही. गेली अनेक वर्षं तिला शांत झोप लागलेली नाही. तसंच तिचं पोट कायम बिघडलेलं असतं. त्यावर कोणतेही उपचार केले तरी तिला उपयोग होत नाही. कारण मानसिक आघात हे त्यामागचं खरं कारण आहे. आघाताचे मनो-शारीरिक परिणाम असे कोणत्याही स्वरूपात दिसू शकतात.
आधी म्हटल्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, जवळच्या व्यक्तीपासून विलग होणं, मोठी आर्थिक फसवणूक, अशा अनेक कारणांनी मानसिक आघात होऊ शकतो.
मागील प्रत्येक लेखात आपण पाहिलं, की कोणत्याही मानसिक स्थितीची तीव्रता अधिक असेल तर त्याचं रूपांतर मानसिक आजारात होऊ शकतं. आघातही याला अपवाद नाहीत.
आघातानंतर तयार झालेला ताण (पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर), तीव्र स्वरूपाचा ताण (ॲक्युट स्ट्रेस डिसऑर्डर) यामध्ये आघात स्वत: अनुभवलेला असतो, पाहिलेला असतो. जवळच्या व्यक्तीवर आघात झाला असेल तरी असा ताण येऊ शकतो. यात पुन्हा पुन्हा आघाताच्या स्मृती जाग्या होतात आणि तो आघात परत परत अनुभवास येतो. मेंदूला स्मृती आणि प्रत्यक्ष अनुभव यातील फरक समजत नाही. स्मृती हाच आजाराचा स्त्रोत होतो. आघाताच्या आठवणी केवळ मेंदूमध्ये नाही तर संपूर्ण शरीरामध्ये असतात. म्हणून आघात झालेल्या व्यक्तीला सतत अंगदुखीचा त्रास होतो.
आघातामुळे स्वत:ची जाणीव विसरली जाते. आपण कोण आहोत, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपल्या नात्यांचं आपल्या आयुष्यातील नेमकं स्थान काय याचा गोंधळ होऊ लागतो. सतत भीती, चिंता, लाज वाटत राहते. झालेल्या आघाताबद्दल स्वत:लाच जबाबदार मानलं जातं. काहीही चांगलं होऊ लागलं तर शंका येऊ लागते. आपल्या बाबतीत चांगलं घडूच शकत नाही असं वाटू लागतं, किंवा काही तरी वाईट मुद्दाम घडवून आहे ती परिस्थिती ठेवली जाते. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे अत्यंत त्रासदायक स्वप्नं पडतात. त्यामुळे झोपण्याची किंवा रात्र येण्याची भीती वाटते. बहुतेकदा आघाताच्या कहाण्या रात्रीच्या वेळी जास्त सांगितल्या जातात. मी पूर्वी एका पुनर्वसन केंद्रात काम करायचे. तिथे आघात झालेल्या व्यक्ती स्वत:बद्दल रात्रीच्या वेळी जास्त बोलायच्या. दिवसा हीच माणसं स्थिर आणि स्तब्ध दिसायची.
आपल्या प्रत्येकाची इतरांशी नातं तयार करण्याची पद्धत अगदी लहानपणी तयार होते. आपल्या पालकांकडून आघात सोसलेली मुलं भावनिक बंध तयार करूच शकत नाहीत. कोणत्याही नात्याला ते घाबरतात. अशा लोकांना एकसंध विचार करता येत नाही. घटनांचे चुकीचे अर्थ काढले जातात. थिजलेपण राहतं. वर्तमानातील कोणत्याच घटनेचा आनंद घेता येत नाही. तसंच वाईट घटनांना योग्य प्रमाणात प्रतिक्रिया देता येत नाही. नात्यावर परिणाम होतो, प्रेम काय आणि ताण काय यात फरक कळत नाही, प्रेम हवंसं वाटतं, पण त्याबरोबर ताण येण्याची भीती वाटते. माणसाचं व्यक्तिमत्त्व एकसंध राहत नाही. आघाताशी संबंधित मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्तींना समयोजनात खूप अडथळे येतात. ज्या व्यक्तीमुळे (किंवा घटनेमध्ये) आघात सहन करावा लागला ती व्यक्ती (किंवा घटना) टाळली जाते. मनात सतत त्रासदायक विचार चालू राहतात. हताशपणा दाटून राहतो. काहीही केलं तरी आयुष्य बदलणार नाही असं वाटू लागतं.
आघाताची शारीरिक लक्षणं म्हणजे उलट्या होणं, सतत अंगदुखी असणं, पोट बिघडणं. असे त्रास होणाऱ्या व्यक्तींना सततचा दीर्घकाळ चालणारा ताण असू शकतो. लहान मूल पोट दुखत आहे असं सतत सांगत असेल आणि त्याला कोणतंही शारीरिक कारण नसेल तर त्याच्यावर एखादा आघात झाला असण्याची शक्यता असते, ज्याची पालकांना कल्पना नसते.
अशा आघातांवर आणि परिणामांवर उपाय काय?
आघात झालेल्या व्यक्तीला आधाराची गरज असते. यात सगळ्यात महत्त्वाचा नियम असा, की जोपर्यंत ती व्यक्ती आघाताची कहाणी सांगायला तयार होत नाही तोपर्यंत तिला त्याबद्दल विचारू नये. जेव्हा ती व्यक्ती तयार होईल तेव्हा तिला हव्या त्या क्रमाने, हव्या त्या गतीने तिचं म्हणणं ऐकून घ्यावं. त्याने त्या व्यक्तीला मदत होते. उपचार करताना घटनेपेक्षा त्या घटनेला दिलेल्या भावनिक प्रतिक्रियेकडे अधिक लक्ष दिलं जाणं महत्वाचं असतं. माणसाची भावना समजून घेणं महत्त्वाचं, त्याची कहाणी नंतर समजू शकते. उदा. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला असेल तर त्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलून त्रास अधिक वाढतो. म्हणून आधी उपचारांवर भर असावा. आपल्याला न्यायव्यवस्थेत मात्र याची जाणीव असतेच असं नाही.
आघात सोसलेल्या व्यक्तीशी नातं निर्माण करायचं असेल तर आधी भावनिक नातं निर्माण करावं, मग स्पर्शाचा आधार द्यावा. अशा व्यक्तींचं शरीर अगदी छोट्या गोष्टींनादेखील खूप तीव्र प्रतिक्रिया देतं. म्हणून स्पर्शाने सुरुवात टाळावी. आघात झालेली व्यक्ती नैराश्य आलेल्या व्यक्तीसारखी वागते, जगते. त्यामुळे निदान चुकू शकतं आणि उपचारांना खूप वेळ लागू शकतो. म्हणून उपचार तज्ज्ञ व्यक्तीकडून व्हायला हवेत.
आघातामध्ये संवेदना खूप कमी झाल्या असतील तर शांतपणे श्वास आत घेण्याचा सराव करायला सांगितला जातो. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने उपयोग होतो. आघातामुळे काहींच्या संवेदना टोकाच्या वाढलेल्या असतात. अशा वेळी उच्छ्वासाचा सराव करण्याने, त्यावर लक्ष केंद्रित केल्याने फायदा होतो. या उपचारांनी त्या व्यक्तीला वर्तमानात यायला मदत होते.
आपण वर पाहिलं त्याप्रमाणे आघातामध्ये मेंदू पूर्ण बदलतो. तो सतत जागरूक असतो. त्यामुळे त्याला शांत करणं गरजेचं असतं. अशा वेळी ध्यान उपयोगी पडतं. त्याने शरीराचं शिथिलीकरण होण्यास मदत मिळते.
आघातामुळे सुरू झालेल्या मानसिक त्रासासाठी वापरले जाणारे उपचार :
1. ई.एम.डी.आर. (आय मूव्हमेन्ट डिसेन्सिटायझेशन ॲन्ड रीप्रोसेसिंग)- यामध्ये आघाताच्या आठवणी येत असताना डोळ्यांची विशिष्ट हालचाल करून आघाताचे परिणाम कमी केले जातात. आघातावरील उपचारांसाठी या पद्धतीचा सगळ्यात जास्त वापर केला जातो.
2. बोधात्मक उपचार पद्धती- यामध्ये त्या व्यक्तीचं परिस्थितीबद्दलचं आणि स्वत:बद्दलचं मूल्यमापन बदलण्याचं काम केलं जातं.
3. कला, संगीत, नाटक यांचाही उपचारांमध्ये उत्तम उपयोग होऊ शकतो. कारण कोणतीही कला भावनांवर अतिशय प्रभावीपणे काम करू शकते. रंग आणि संगीत यांचा उपयोगही प्रभावीपणे होतो.
4. योगसाधनेचा उपयोग होऊ शकतो. योगसाधनेमुळे शरीर आणि मन शांत होऊन त्यात एकसूत्रता आणता येते.
5. इतर कोणत्याही आजाराप्रमाणे इथेही औषधोपचार महत्त्वाचे ठरतात.
कोणतीही नैसर्गिक आपत्ती, मोठे अपघात, किंवा दंगल झाली तर आपल्याकडे आर्थिक नुकसानभरपाईचा विचार पहिल्यांदा केला जातो. पण मेंदू, मन, शरीरावर झालेल्या आघातांवर आवश्यक असणारा दीर्घकालीन उपचार मात्र मिळत नाही. अगदी बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ‘पोक्सो'सारखा कायदा आला, तसंच आर्थिक मदतीची तरतूद झाली; पण त्या बालकावर झालेल्या मानसिक आघातासाठीही उपचारांची गरज असते, हा विचार क्वचित केला जातो. कोरोनाच्या काळात कित्येकांना आपल्या घरातल्या व्यक्तींच्या मृत्यूचे आघात सोसावे लागले. त्यांनी मानसिक उपचार घेतले असतीलच असं नाही. त्याचप्रमाणे मणिपुरमध्ये घडलेल्या घटनेचा परिणाम तिथल्या अनेक पिढ्यांवर राहील. म्हणून अशा घटनांकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांचा विचार व्हायला हवा.
गौरी जानवेकर | gjanvekar@gmail.com
या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. त्या या विषयावर लेखन करतात, कार्यशाळाही घेतात.