कल्पना करा, आपण डॉक्टरांनी सांगितलेल्या काही साध्या वैद्यकीय चाचण्या करून घेतो, आपल्या चाचण्यांचा डेटा तिथल्या तिथे एखाद्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रणालीला जातो आणि लगेच आपल्या रोगाचं निदान होतं. रिपोर्ट्स घेऊन ताटकळत बसायला नको, योग्य निदान होतं आहे का याचा संदेह नको, आणि या सगळ्यात आजार बळावत जायला नको. इतकंच नव्हे, तर आपल्याला शंका किंवा लक्षणं नसतानाही एखादा रोग असल्याची शक्यता असेल तर एआय प्रणाली तेसुद्धा दाखवते, आणि मग तत्काळ आपण तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतो...
सध्या याला कल्पना म्हटलं असलं तरी येत्या काही वर्षांमध्ये खरोखरच असं होऊ शकतं. पाश्चात्त्य देशांत वैद्यकीय रोगनिदान (मेडिकल डायग्नोसिस) क्षेत्रात एआय वापरल्याचा फायदा दिसून आला आहे. विशेषत: करोना महासाथीच्या काळात रुग्ण जास्त आणि वैद्यकीय स्टाफ कमी अशी परिस्थिती होती, त्या वेळी एआयची खूप मदत झाली. न्यूयॉर्कमधल्या माऊंट सायनाय रुग्णालयाने तेव्हा एक एआय प्रणाली वापरून पाहिली. ही प्रणाली रुग्णाच्या सीटी स्कॅनमधील फुफ्फुसांची स्थिती तपासत होती, त्याच्या इतर चाचण्यांचे निष्कर्ष पाहत होती. जोडीने रुग्णाचा पूर्ण डेटा, आधीपासून असलेले आजार आणि अलीकडे तो कोणा करोना रुग्णाच्या संपर्कात आला होता का याची माहिती घेत होती. या सगळ्याची सांगड घालत ती ए.आय. प्रणाली झपाट्याने त्या रुग्णाला करोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे निदान करत होती. महासाथ असल्याने रुग्ण वेळीच ओळखून विलग केले तरच साथीचा प्रसार आटोक्यात ठेवता येणं शक्य होतं. या दृष्टीने एआयची मदत किती मोठी होती हे लक्षात येईल.
एआय रोगनिदानात वापरता येईल का याची केवळ चाचपणी तोवर झाली होती. करोना महासाथीत त्याचं उत्तर मिळून गेलं आणि एआयच्या वापराला वेग आला. रुग्णात दिसणारी लक्षणं, त्याच्या चाचण्या, आनुवंशिक रोगांसाठी पूर्ण कुटुंबाची माहिती, रुग्णाची जीवनशैली या साऱ्या गोष्टींचा एकत्र विचार करून वेगाने निष्कर्ष काढणं, ही एआयची मोठी ताकद आहे. माणूस जसा अनुभवावरून शिकत जातो, तशीच एआय प्रणालीही शिकत जाते. त्यामुळे तिचा जितका जास्त वापर होईल तितका तिचा अंदाज अचूक होत जातो. रक्तदाब, रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण, हृदयाचे ठोके अशा नोंदी सतत पाहून त्यात जरा जरी विसंगती दिसली तरी एआय प्रणाली त्याची लगेच दखल घेऊ शकते. रुग्णाचे एक्सरे आणि सीटी स्कॅन यांचं सूक्ष्म निरीक्षणं करू शकते. अनुभवी डॉक्टरांच्या हातूनही राहून जाईल इतकी बारीकसारीक निरीक्षणं करण्याची क्षमता असल्याने एआय प्रणाली बऱ्याच आधी इशारा देऊ शकते. अक्षरश: सेकंदाला एक इतक्या वेगाने सीटी स्कॅनचा अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढणं आता शक्य झालं आहे.
गुगलची ‘डीप माइंड' एआय प्रणाली या बाबतीत आघाडीवर आहे. डोळ्यांचे रोग, मूत्रपिंडाचे विकार, स्तनांचा कर्करोग यांची लक्षणं वेळीच ओळखून तिने रोगाचं भाकीत करून दाखवलं आहे. त्याची माहिती ‘डीप माइंड'च्या साइटवर पाहायला मिळेल. लवकर निदान झाल्याने प्रतिबंधात्मक इलाज लगेच करता येतात. मूत्रपिंडाच्या विकारांमध्ये तर दोन दिवस आधी निदान झाल्यानेही प्रचंड फरक पडतो. याच तऱ्हेने डोळे निकामी होण्यापासून वाचवण्यासाठी किंवा कर्करोग पुढच्या टप्प्यात जाण्याआधी एआय प्रणालीने लवकर निदान करणं फायदेशीर ठरताना दिसत आहे.
मेक्सिकोमधील एका रुग्णालयात रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची आवश्यकता आहे का हे डॉक्टरांनी ठरवल्यावर त्यासाठी पुन्हा एआय प्रणाली वापरून पाहण्यात आली. त्यात एआयचा निष्कर्ष बराच उपयुक्त ठरलेला दिसून आला. जर्मनीतल्या एका रुग्णालयात एक्सरेवरून फुफ्फुसातल्या नाजूक जखमा शोधण्यासाठी एआय प्रणालीची मोठी मदत झाल्याच्या नोंदी आहेत.
या उदाहरणांवरून स्पष्ट होतं, की येत्या काळात बहुतांश मोठ्या रुग्णालयांमध्ये रोगनिदानासाठी एआय प्रणालींची मदत होईल. चाचण्या, तज्ज्ञांचं अनुमान आणि एआय प्रणालीचा निष्कर्ष या सर्वांचा एकत्रित विचार होऊन अंतिम निदान होईल. एआय माणसाची जागा घेईल का, असे प्रश्न अनेकदा उभे केलेले दिसतात. रोगनिदानात एआयची मदत किती अफाट प्रकारे होऊ शकते हे लक्षात आल्यावर बहुधा असे प्रश्न मागे पडत जातील.
(अनुभव जून २०२३ मधून साभार)
Meghashri Dalvi's article on AI in medical diagnosis highlights its growing importance.
AI systems can swiftly analyze medical data, from test results to CT scans, for accurate disease detection.
The technology gained traction during the COVID-19 pandemic, helping hospitals like Mount Sinai rapidly identify infected patients.
Companies like Google's DeepMind are pioneering AI for early detection of conditions like eye diseases, kidney disorders, and breast cancer. This integration of AI with human expertise promises a future of faster, more precise medical diagnosis, fundamentally changing healthcare.
मेघश्री दळवी
मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
