आम्ही कोण?
लेखमालिका : उकलता गुंता

अन्न तारी, अन्न मारी

  • गौरी जानवेकर
  • 10.03.25
  • वाचनवेळ 14 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
ukalata gunta gauri janavekar lekhmalika

‘अन्न तारी, अन्न मारी, अन्नासारखा नाही वैरी' अशा म्हणी आपण लहानपणापासून ऐकलेल्या असतात; पण बहुतेकदा त्यावरून ‘अन्न जगण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं' असा अर्थ घेतला जातो तो चुकीचा नाहीच. पण त्यापलीकडेही आपण खातो ते अन्न आपलं मन, बुद्धी, शरीर, नातेसंबंध या सगळ्यांवर परिणाम करत असतं. मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मन निरोगी राखणं नव्हे, तर संपूर्ण शरीराचं आरोग्य त्यात लक्षात घ्यावं लागतं. मन निरोगी आहे तरीही दीर्घकाळ शरीर आजारी आहे, पोट बिघडलंय, असं सहसा होत नाही. अगदी क्वचित एखाद्या प्रसंगी आवडीचा पदार्थ खूप खाल्ला गेल्याने पोट बिघडू शकतंच. पण सतत अपचनाचा त्रास होत असेल तर मात्र निश्चितच त्यामागे मानसिक कारणं असू शकतात. ती शोधावी लागतात. अन्नसेवनावर मनाचा परिणाम होतो, तसाच अन्नाचाही मानसिक स्थितीवर परिणाम होतो, असं आता अनेक अभ्यासांतून स्पष्ट होतंय.

खूप काळापासून लोक ताण आणि चिंता म्हणजे एकच असं मानत आले आहेत; पण आता या दोन्हींमधील फरक लक्षात येऊ लागला आहे. ताण म्हणजे बाहेरील परिस्थितीला दिलेली प्रतिक्रिया असते, तर चिंता ही भावनिक स्थिती असते. ताणामध्ये चिंतेचा अनुभव येऊ शकतो, पण चिंता म्हणजे ताण नाही. काही लाख वर्षांच्या उत्क्रांतीदरम्यान संकटांशी सामना करण्यासाठी माणसाने काही युक्त्या शोधून काढल्या- मोठं संकट आलं तर पळा, लहान संकट आलं तर लढा आणि अचानक संकट आदळलं तर थिजून जा. या युक्त्या आपल्या भावनिक मेंदूकडून (लिम्बिक सिस्टीम) साधल्या जातात. संकट लहान असो की मोठं, त्यामुळे ताण येऊ शकतो. संकटाने आलेल्या ताणामुळे माणसांचं अन्नासोबतचं नातं दोन प्रकारे बदलतं. काही लोक अति खातात. त्यालाच भावनिक खाणं (बिन्ज इटिंग) असंही म्हणतात. तर काही लोक खाणं पूर्ण विसरून जातात. दोन्ही परिस्थितींत बाहेरील परिस्थितीशी झगडा देण्यासाठी दिलेली ती प्रतिक्रिया असते. कोणत्या व्यक्ती अति खातील आणि कोणत्या खाणं सोडून देतील हे दोन गोष्टींवर अवलंबून असतं-

१. जनुक : ताणतणावाला दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया बहुतेकदा जनुकावर अवलंबून असतात. काही लोकांमध्ये डोपामीन या न्युरोट्रान्समीटरची पातळी कमी असते, अशी माणसं ताण असताना अन्नत्याग करतात.

२. लहानपणातील अनुभव : माणूस जन्माला आल्यानंतर साधारण पहिल्या अर्ध्या तासात दूध पितो. जन्माच्या वेळी निर्माण झालेल्या ताणानंतरचा तो पहिला सुखद अनुभव असतो याची नोंद मेंदू घेतो. काहीही खाल्लं की बरं वाटतं, म्हणून ताण निर्माण झाला की काही तरी खाण्याची सवय अगदी सुरुवातीपासून लागते. ज्या बाळांची अंगावर पिण्याची सवय नीट, सुरळीतपणे सुटत नाही त्यांच्यासाठी ही कायमस्वरूपी प्रतिक्रिया होऊन जाते.

ताणाचा निचरा करण्यासाठी खाणं हा पर्याय निवडला जातो तेव्हा पटकन उष्मांक तयार होतील असेच पदार्थ निवडले जातात. उदा. साखर. लवकर उष्मांक तयार करणारा कोणताही पदार्थ खाल्ला की मेंदूत डोपामीन स्रवतं. त्याने सुखद अनुभव येतो. तात्पुरत्या स्वरूपात ताण हलका झाल्यासारखा वाटतो. पुन्हा ताण आला की पुन्हा साखर खाल्ली जाते. साखर फार लवकर उष्मांक तयार करत असल्याने अनेक लोकांना साखरेचं व्यसन लागतं. डोपामीन अतिशय खोडसाळ आहे. सुरुवातीला थोडीशी साखर खाल्ल्याने ते स्रवतं. पण पुढे साखरेचं प्रमाण वाढवावं लागतं. (केवळ साखरच नव्हे, तर ज्याने डोपामीन तयार होतं अशा कोणत्याही पदार्थाच्या बाबतीत हेच घडतं. त्या पदार्थाचं प्रमाण वाढवलं नाही तर पुढे पुढे डोपामीन तयार होत नाही.) अशाप्रकारे माणसाचं त्यावरचं अवलंबित्व वाढत जातं. सतत जास्त उष्मांक घेतल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊन मधुमेहासारखे आजार किंवा त्वचा विकारासारखे त्रास सुरू होतात.

सोनल ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. वडील मोठे व्यापारी. त्यांना मुलगा होण्याची अपेक्षा होती. अनेकदा आई-वडिलांच्या भांडणात याचा उल्लेख होतो तेव्हा सोनल चिंताग्रस्त होते. स्वत:ला शांत करण्यासाठी ती लगेच जे मिळेल ते खाते. तेवढ्यापुरतं तिला बरं वाटतं. घरातच नाही तर बाहेर कुठेही आपण इतरांना नको आहोत, अशी जराही शंका आली तरी तिच्या वर्मावर बोट ठेवल्यासारखं होतं आणि मग ती साखरेसारखे पदार्थ खाऊ लागते. आता तिचं वजन खूप वाढलं आहे, थायरॉइडसारखे आजार तिच्यामागे लागले आहेत आणि तिचं लग्न ठरण्यात खूप अडचणी येत आहेत. तिला वाटतं की हे सगळं आनुवंशिक आहे. सोनलसारख्या बहुतेकांना असंच वाटतं; पण हे अर्धसत्य असतं. बहुतेकदा आयुष्य अत्यंत तणावग्रस्त असतं म्हणून हे आजार सुरू होतात.

जीवनचं उदाहरण याच्या बरोबर उलट आहे. थोडी जरी ताणाची परिस्थिती दिसली तरी तो कोषात जातो. कोणाशीही संपर्क ठेवत नाही. म्हणजे उत्क्रांतीमध्ये तयार झालेल्या तीन पर्यायांपैकी तो थिजून जाण्याचा पर्याय निवडतो. यात ऊर्जेची गरज कमी होते. त्यामुळे दिवस-दिवस तो काही खात नाही. कामाच्या ठिकाणी एखादी डेडलाइन जवळ आली की बऱ्याचजणांचं असं होत असेल. आपण शब्द पण कसे निवडले आहेत बघा ना- ‘डेड लाइन'. शरीर आणि मनावर परिणाम होणारच ना!

पण ताणाला तोंड देण्यासाठी जेवणखाण सोडून देणं हेदेखील चुकीचंच. खाल्लं नाही की चयापचय क्रिया बिघडते, पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स तयार होत नाहीत. तणावग्रस्त परिस्थितीत हायपोथॅलॅमस ग्रंथीमधून कॉर्टिकोट्रॉपिन नावाचं संप्रेरक स्रवतं. त्याने भूक मारली जाते. अशा वेळी इतर लक्षणंही जाणवतात, उदा. मळमळ, जुलाब, बद्धकोष्ठता. यामुळे अस्वस्थता वाढते. मग खाणं आणखीनच टाळलं जातं आणि एक दुष्टचक्र सुरू होतं.

वर आपण डोपामीनचा उल्लेख केला आहे, तसंच आणखी एक रसायन म्हणजे सिरोटॉनिन. हे रसायन भूक, झोप यांचं नियमन करणारं. चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक समस्यांमध्ये सिरोटॉनिनची पातळी कमी होते. त्याने भुकेचं आणि झोपेचं गणित बिघडतं. अनेकदा नैराश्यामुळे माणसाला भान राहत नाही, तो सतत खात सुटतो. लोक त्याची चेष्टा करू लागतात, सल्ले देऊ लागतात; मात्र, त्या माणसाचा मानसिक झगडा समजून घेतला जात नाही. म्हणजे काय, तर चिंता, नैराश्य, ताण या गोष्टींमुळे आपलं अन्नासोबतचं नातं पूर्ण बदलून जातं.

राग आणि चिंता या अनुक्रमे लढा आणि पळा अशा प्रतिक्रिया आहेत. दोन्हींमध्ये जास्त ऊर्जा लागते.

ऊर्जेची गरज वाढते, तसं ॲड्रिनॅलिन ग्रंथीतून कॉर्टिसॉल हे रसायन स्रवतं. अन्न जलद गतीने पचावं आणि आवश्यक कामासाठी ऊर्जा मिळावी यासाठी पोटात जास्त आम्ल तयार होतं, पण त्याच वेळी पचनासाठी आवश्यक असलेला रक्तपुरवठा मात्र होत नाही, कारण तो संरक्षणासाठी इतर अवयवांना पुरवला जातो. अशा सतत तयार झालेल्या आम्लाचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. यातूनच पित्त, आम्लपित्त किंवा पचनमार्गात जखमा होणं असे विकार होतात.

सौरभ हा मोठ्या कलाकाराचा मुलगा. त्याच्या वडिलांचं संगीत क्षेत्रात मोठं नाव. परंपरेनुसार तोही याच क्षेत्रात आला खरा; पण लोकांकडून केली जाणारी वडिलांबरोबरची तुलना त्याच्या मनात सतत ताण निर्माण करते. कोणत्याही मैफिलीच्या आधी त्याचं अन्न तुटतं, पित्ताचा त्रास होतो, अर्धशिशी छळते.

‘इरिटेबल बॉवेल सिण्ड्रोम' हा असाच आणखी एक आजार. वर लिहिल्याप्रमाणे ताणतणावामुळे रक्तपुरवठा बदलतो. त्याने पोटात होणाऱ्या हालचालींनी शी लागल्याची भावना होते. प्रत्येक तणावाच्या प्रसंगी असं होऊ लागलं की शरीराला त्याचीच सवय होऊ लागते आणि कोणत्याही नकारात्मक भावनेची किंवा संकटाची चाहूल लागली की व्यक्तीला संडासला जावंच लागतं. याने पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो.

तृष्णा नव्यानेच कंपनीमध्ये कामाला लागली आहे. कोणतीही नवीन मीटिंग आली की तिला आधी कंपनीच्या टॉयलेटमध्ये पळावं लागतं. कारण मीटिंगमध्ये नेमकं काय होईल, आपल्यावर काय शेरेबाजी होईल याची तिला चिंता लागून राहिलेली असते. पण तृष्णाचा हा पहिलाच अनुभव नाही. शहरातील बहुतेक सगळ्या हॉटेल्सच्या टॉयलेट्स तिला माहीत झाल्या आहेत. तिचं मन सतत चिंताग्रस्त असतं. पूर्वी घडलेल्या घटना किंवा वर्तमानातील ताण तिच्या पोटावर सतत परिणाम करत असतात. या सगळ्या समस्यांवर केवळ औषधोपचार पुरेसे ठरत नाहीत. मन शांत नसेल तर पोट अस्वस्थ राहणारच. यासाठी मानसोपचारांची गरज असते. मानसिक चिंता आणि प्रत्यक्ष संकट यातील फरक मेंदूला करता येत नाही. मेंदू प्रत्येक वेळी ते जैविक संकट म्हणून घेतो आणि प्रतिकारासाठी शरीर तयार करतो. तुम्ही चयापचायाच्या कोणत्याही समस्येने त्रासलेले असाल आणि केवळ औषधोपचार, डाएट आणि व्यायाम यांचा विचार करत असाल तर तुम्ही एक मोठा भाग दुर्लक्षित करत आहात- तो म्हणजे भावनिक नियमन.

चिंता, नैराश्य, राग यामुळे अन्नाशी असलेलं आपलं नातं कसं बदलतं हे आपण पाहिलं. दु:ख होतं आणि काही तरी अत्यंत प्रिय असं गमावलं जातं तेव्हाही हे नातं अगदी वेगळं होतं. प्रत्येक व्यक्तीचा दु:खाला सामोरं जाण्याचा एक क्रम असतो. जवळच्या कुणाचा मृत्यू झाला तर व्यक्तीला अतीव दु:ख होतं. यामध्ये ती व्यक्ती पाच टप्प्यांमधून जाते आणि प्रत्येक टप्प्यात त्या व्यक्तीचं अन्नासोबतचं नातं बदलतं. जवळची व्यक्ती गंभीर आजारी असते किंवा तिचा मृत्यू होतो तेव्हा सामान्यपणे त्याचा लवकर स्वीकार होत नाही. असं असूच शकत नाही असं खूप वेळ वाटत राहतं. आजाराची खात्री पटते तेव्हा भयंकर राग येतो. हे असं आपल्या बाबतीत घडूच कसं शकतं, हा विचार त्रास देतो. जगाचा, देवाचा राग येऊ लागतो. तिसऱ्या पातळीत माणूस वाटाघाटींकडे वळतो. उदा. नशीब बदलावं म्हणून नवस बोलणं, वगैरे. या पहिल्या तीनही टप्प्यांवर ती व्यक्ती अत्यंत यांत्रिकपणे अन्नसेवन करत असते. चौथी पातळी मात्र नैराश्याची असते. या टप्प्यावर माणूस खचतो. त्याची अन्नावरची वासना जाते. दु:खाचा हा टप्पा बराच मोठा असतो. दरम्यान संपूर्ण चयापचय बिघडून जातं, माणूस खंगू लागतो. सगळ्यात शेवटी तो घटनेचा स्वीकार करतो; पण त्याचं अन्न घेण्याचं प्रमाण पूर्ववत होण्यास खूप वेळ लागतो.

भीती ही आणखी अशी एक भावना ज्यामुळे आपल्या अन्नसेवनावर आणि चयापचयावर परिणाम होतो. ज्या माणसांच्या मनात भीती अधिक, त्यांची चरबी साठवून ठेवण्याची शक्यता अधिक असते. कारण मेंदूला सतत वाटतं, की संकट येणार आहे आणि त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. एकूणच, मन आणि अन्न यांचा खूप जवळचा संबंध आहे.

डायट करतानाही आपलं व्यक्तिमत्त्व, भावना आणि संप्रेरकं यांचा विचार केला नाही तर डायटचा परिणाम फार काळ टिकत नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते- गेला काही काळ डायटच्या बाबतीत दीक्षित की दिवेकर ही चर्चा आणि चेष्टा अनेक ठिकाणी होताना दिसते. दोन्ही प्रकारांना पाठिंबा देणारे आणि त्यावर टीका करणारे लोक दिसतात. मात्र, अशा डायट पद्धतींत संप्रेरकं आणि मानसिक स्थिती याचा विचार केलेला दिसत नाही.

छोटं उदाहरण घेऊ. स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरात वेगवेगळी संप्रेरकं असतात. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन असतं, तर स्त्रियांमध्ये ईस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन असतं. खूप वेळ पोटात अन्न जात नाही त्या वेळी ताण निर्माण होतो आणि ताणाशी झगडण्यासाठी शरीरात कॉर्टिसॉल हे संप्रेरक तयार होतं. प्रोजेस्टेरॉन आणि कॉर्टिसॉल एकमेकांना आवडत नाही. तसंच, गर्भधारणेसाठी शरीर तयार होत असतं तेव्हा उपाशी राहणं म्हणजे संकट असा अर्थ मेंदू काढतो. म्हणून जेवणाच्या वेळा स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला हव्यात. पाळीच्या सुरुवातीच्या काळात दोन जेवणांमध्ये खूप अंतर ठेवलेलं चालू शकतं. प्रोजेस्टेरॉन तयार होत असताना म्हणजे ओव्ह्युलेशननंतरच्या आठवड्यात मात्र दोन जेवणांत खूप अंतर ठेवलं तर चिडचिड, ताण, नैराश्य यांचा अनुभव येऊ शकतो. त्या काळात शरीराला पोषणाची गरज असते. म्हणून डायटचा कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा.

भावनांचा अन्नसेवनावर परिणाम होतो तसा अन्नसेवनाचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?

नक्कीच होतो. पोट रिकामं असेल किंवा खूपच भरलं असेल अशा दोन्ही वेळी तुम्हाला कधी अस्वस्थता, चिडचिड जाणवली आहे? त्याचं कारण आपल्या शरीरात मेंदूकडून पोटाकडे निरोप पाठवण्याची व्यवस्था आहे, तशीच पोटाकडून मेंदूकडे पाठवण्याचीही आहे. मेंदूमध्ये लाखो पेशींचं जाळं असतं, तसंच पोटातसुद्धा चेतापेशींचं जाळं असतं. फरक इतकाच, की मेंदूमधील पेशींमध्ये विचार करण्याची क्षमता असते तशी पोटातील पेशींमध्ये नसते, पण त्या धोक्याचा अंदाज घेऊ शकतात, मेंदूकडे मेसेज पाठवण्याचं काम करतात. इंग्रजीत त्याला ‘गट फीलिंग' असं म्हटलं जातं. मेंदू आणि पाठीचा कणा यांत असणाऱ्या पेशी केंद्रीय मज्जासंस्थेचा (सेंट्रल नर्व्हस सिस्टीम) भाग असतात. तर पोटात असणाऱ्या पेशींच्या जाळ्याला ‘एन्टरिक नर्व्हस सिस्टीम' म्हणतात. आपण आधी बघितलेल्या सिरोटॉनिनची निर्मिती इथेही होत असते आणि आपण जे खातो त्यानुसार या पेशी मेंदूकडे निरोप पाठवतात.

सतत निकस पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्वं मिळत नाहीत. त्यामुळे थकवा, चिडचिड होत राहते. मेंदूला लागणारी ऊर्जा अन्नातूनच मिळते, त्यामुळे आपण जे खातो त्याचा सरळ परिणाम मेंदूवर आणि त्यामुळे आपल्या मूडवर होतो. उदा. साखरेमुळे सगळ्या पचनसंस्थेवर अतिशय वाईट परिणाम होतो, साखर सतत खाल्याने नैराश्य येतं, यावर अनेक अभ्यास झाले आहेत.

अन्न आणि मेंदू यांचं आणखी एक नातं म्हणजे वाढीच्या काळात नीट पोषण झालं नाही तर मेंदूचा विकास नीट होत नाही. मागच्या लेखात आपण वाढीच्या समस्या बघितल्या. बुद्धिमत्तेच्या विकासासाठी नीट अन्न मिळणं गरजेचं असतं. काही लोकांना ते पिढ्यान्पिढ्या मिळत नाही. परिणामी, बुद्धीवर आणि शिक्षणावर परिणाम होतो. त्यातून गरिबी येते आणि पौष्टिक अन्न मिळण्याच्या शक्यता आणखीनच कमी कमी होत जातात.

‘पोषणातून मानसोपचार' (न्युट्रिशन सायकिॲट्री) अशी एक नवी शिक्षणशाखा सुरू झाली आहे. नैराश्य अथवा इतर मानसिक आजारांवर कोणतंही औषध देण्यापेक्षा आवश्यक पोषणसत्त्वं देऊन हे आजार बरे करता येतील का, यावर या शिक्षणशाखेत संशोधन चालू आहे. असं संशोधन यशस्वी झालं तर मानसिक आजारांच्या औषधांना प्रभावी पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

मन आणि अन्न यांच्यातल्या नात्याचं आणखी एक स्वरूप म्हणजे अन्नाशी निगडित मानसिक आजार. बहुतेकदा खाण्यासंबंधी मानसिक आजार किशोरवयीन आणि तरुण स्त्रियांना होतात. असे तीन प्रकारचे आजार आहेत.

पहिला, ‘अनोरेक्सिया नरवोसा'

या आजारात त्या व्यक्तीला आपलं वजन वाढेल आणि शरीराचा आकार बदलेल याची सततची चिंता लागलेली असते. यासाठी काही प्रकारचं अन्न पूर्णपणे वर्ज्य केलं जातं किंवा खूप कमी अन्न खाल्लं जातं. या लोकांची स्व-प्रतिमा वास्तवाला धरून नसते. सततच्या वजनवाढीच्या चिंतेने हे लोक खूप व्यायाम करतात. कित्येक वेळा इतरांना ते अत्यंत कृश झालेले दिसतात, पण त्यांना स्वतःला तसं वाटत नाही. आपण जास्त खाल्लं असल्याची थोडी जरी शंका आली तरी ही माणसं मुद्दाम उलट्या काढून ते अन्न शरीराच्या बाहेर काढतात.

दहावीत शिकणाऱ्या रुचाला ग्राऊंडवर खेळताना तिचा मित्र अगदी सहज, चेष्टेत म्हणाला, की तुझे पाय हत्तीसारखे दिसतात. तो एक प्रसंग तिच्या मनात घर करून बसला. तेव्हापासून ती जेवायला बसली की फक्त एकदाच ताटात वाढून घेते. दुसऱ्यांदा घ्यायचं झालं की तिला वजन वाढण्याचा ताण येतो. ती कमीत कमी अन्नावर राहण्याचा प्रयत्न करते. खरं तर दहावीच्या वर्षात अभ्यासात नीट लक्ष लागण्यासाठी व्यवस्थित पोषण होणं गरजेचं आहे. पण आपलं वजन वाढतं या भीतीने ती एकटी राहू लागली आहे, तिचं कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. दिवसेंदिवस ती अधिक कृश होत चालली आहे.

दुसरा प्रकार म्हणजे ‘बुलेमिया नरवोसा'

यात माणसांचं खाण्याचं आणि उलट्या करण्याचं चक्र सुरू होतं. ते ताणाच्या भरात खूप खातात त्याची जाणीव होते तेव्हा उलट्या करतात. कधी कधी खूप काळ उपाशी राहतात. मग खूप खातात. पुन्हा उलट्या करून काढून टाकतात. अर्चनाचं आतापर्यंतचं सगळं शिक्षण मराठी माध्यमात आणि ग्रामीण भागात झालेलं. ती नुकतीच मोठ्या कंपनीत कामाला लागली. हळूहळू तिथल्या लोकांसारखे कपडे, मेकअप, खाण्याच्या सवयी तिने शिकून घेतल्या. आपण या लोकांमध्ये शोभून दिसलो पाहिजे हाच विचार तिला सतत छळायचा. कोणतंही प्रेझेंटेशन जवळ आलं की मात्र तिला भयंकर ताण येत असे. अशा वेळी आधीचे दोन-तीन दिवस ती खूप खायची, पण पुन्हा आपलं वजन वाढेल, आपल्याला लोक चिडवतील या भीतीने ते अन्न ती काढून टाकायचा प्रयत्न करायची. यात तिच्या प्रकृतीवर खूप परिणाम व्हायला लागला आहे. यात वजनाच्या भीतीने खूप काळ उपाशी राहणं, खूप व्यायाम करणं, औषधांचा वापर करून वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणं, असे अनेक प्रकार ती करत राहते.

यातील तिसरा प्रकार आहे भावनिक खाणं (बिन्ज इटिंग)

यात थोड्याशा वेळात खूप खाल्लं जातं. खाताना अजिबात नियंत्रण राहत नाही. खाणं संपलं की भयंकर अपराधी वाटू लागतं. त्याने इतका त्रास होतो की त्यावर उतारा म्हणून पुन्हा खाल्लं जातं आणि ती व्यक्ती या दुष्टचक्रात अडकून जाते.

वरील तीनही आजारांत शेवटी मृत्यूचा धोका असतो. त्यामुळे त्यावर लवकर उपचार घेणं गरजेचं असतं. यात मानसोपचार हेच मुख्य माध्यम म्हणून उपयोगी पडतात.

या सगळ्या चर्चेवरून मन आणि अन्न यांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे हे लक्षात आलं असेल.

अन्नाबद्दल सजगता वाढवून मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी काय करायला हवं?

१. चिंता, नैराश्य, दु:ख, भीती या भावनांचं नियमन करण्याचं कौशल्य शिकणं. त्यासाठी आवश्यक असल्यास मानसोपचाराची मदत घेणं.

२. शक्यतो पौष्टिक अन्न खाणं. (यासाठी तुम्ही एक प्रयोग करून पाहू शकता- पंधरा दिवस साखर किंवा बाहेरील अन्न खायचं नाही. फक्त ताजं, पौष्टिक अन्न, सॅलड, फळं खायची. याने तुमचं मन आणि शरीर कसं बदलतं याचं निरीक्षण करायचं.)

३. जेवणाच्या वेळा निश्चित करणं आणि त्यात शक्यतो बदल होणार नाही याची काळजी घेणं.

४. जेवताना पूर्ण लक्ष जेवणावर राहील याची काळजी घेणं. उदा. जेवताना मोबाइल, टीव्ही पाहायचा नाही असा नियम करू शकता. तसंच येता-जाता अबरचबर खाल्लं जाणार नाही याची काळजी घेणं. यासाठी एक नियम करू शकता, की खाताना कायम खाली मांडी घालून बसायचं. असं केल्याने आपोआप आपल्या खाण्यावर बंधनं येऊ लागतात.

५. ज्या खाण्यात चव आणि पोषण दोन्ही आहे असंच अन्न आपण दीर्घकाळ खाऊ शकतो. त्यामुळे पौष्टिक अन्न बेचव असण्याची गरज नाही. बेचव अन्न फार काळ खाल्लं जात नाही.

शेवटी एक लक्षात घ्यायला हवं, की अन्न हे फक्त पोट भरण्याचं साधन नाही, तर त्याने मनही निरोगी राहतं. मन निरोगी असेल तर अन्नाची योग्य निवड होऊन शरीर सुदृढ राहू शकतं. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि आपला आहार याकडे स्वतंत्र बाबी म्हणून न पाहता त्यांचा एकत्र विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी.

"उकलता गुंता" या लेखमालिकेचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: "उकलता गुंता" 

गौरी जानवेकर | gjanvekar@gmail.com

या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. त्या या विषयावर लेखन करतात, कार्यशाळाही घेतात.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 3

Vidya Patwardhan13.03.25
गौरी, तुझी समज-उमज उत्तम आहे, ते शक्य तितक्या सहज भाषेत तू मांडतेस. तरी नीट समजण्यासाठी, अशा जागा असतात कि ' अरे, हे गौरी कडून आणखीन समजून घेतले पाहिजे असे वाटते.
यश 10.03.25
वा!! अतिशय अभ्यासपूर्ण मस्त लेख.
संगीता जोशी 10.03.25
अतिशय सुरेख, नेमकी मुद्दे मांडणी आणि जागरूकता वाढविणारा लेख आहे असे जाणवले.
See More
navi-pidhi-navya-vata.webp

Select search criteria first for better results