
छप्पन वर्षांपूर्वीची गोष्ट. 16 मार्च 1968 रोजी व्हिएतनाममधील माइलाई नावाच्या गावात अमेरिकन सैनिकांची एक तुकडी घुसते आणि दिसेल त्या माणसाला मारत सुटते. त्या दिवशी अमेरिकन सैनिक सुमारे पाचशे निष्पाप व्हिएतनामी गावकऱ्यांना कंठस्नान घालतात. त्यात बायका, मुलं, वृद्ध असे सर्व असतात. ते काहींना जागीच मारतात, काहींना मारून त्यांचे चेहरे-शरीरं विद्रूप करतात. सापडतील त्या बायका-मुलींवर बलात्कार करतात. जे जे कौर्य दाखवता येईल तेवढं दाखवतात आणि माणुसकी धुळीला मिळवतात.
अमेरिकन सैनिकांच्या या छळाला सामोऱ्या गेलेल्या गावकऱ्यांनी कोणताही गुन्हा केलेला नव्हता. दक्षिण आणि उत्तर व्हिएतनाममधील संघर्षात अमेरिकी सैन्य दक्षिण व्हिएतनामच्या बाजूने मैदानात उतरलं होतं. व्हिएतनामी बंडखोर लढाऊ सैनिकांचा माग काढत अमेरिकी सैन्याची एक तुकडी गावात पोहोचली. मात्र शोधाशोध करूनही त्यांना गावात एकही बंडखोर सापडला नाही. त्यामुळे चिडलेल्या सैनिकांनी या गावावरच हा अमानुष हल्ला केला. गावकऱ्यांनी बंडखोरांना लपवून ठेवल्याचा संशयही त्यामागे असावा.
या घटनेची पुढे चौकशी झाली. 25 सैनिकांवर मनुष्यहत्येचा खटला चालवला गेला. मात्र, शिक्षा त्या तुकडीचा प्रमुख कमांडर विल्यम कॅली (ज्युनियर) यालाच झाली. 22 निरपराध नागरिकांना मारल्याबद्दल त्याला जन्मठेपेची शिक्षा फर्मावली गेली. प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी ती शिक्षा कमी करून नजरकैदेची केली. तीही केवळ साडेतीन वर्षांची.
या घटनेची आठवण इतक्या वर्षांनी आता निघण्याचं कारण कमांडर कॅली याचं नुकतंच निधन झालं. त्यानंतर मीडियामध्ये हे गाव पुन्हा चर्चेत आलं. या अमानुष हल्ल्यानंतर बराच काळ कॅली आणि एकुणातच अमेरिकेविरुद्धही या परिसरात संताप धगधगत होता. पण त्यांच्या हातात काय होतं? इथली माणसं असहायपणे आपलं नैराश्य सहन करत राहिली. या युद्धात अमेरिकेला नामोहरम होऊन परतावं लागलं, एवढाच काय तो इथल्या देशवासीयांना दिलासा! त्यामुळे आजही तिथल्या गावकऱ्यांच्या मनात अमेरिकेबद्दल कटुता असणार, असं गृहीत धरून तिथे गेलेल्या पत्रकारांना मात्र वेगळंच चित्र दिसलं. छप्पन्न वर्षांपूर्वीच्या दु:खाचे न मिटणारे व्रण या गावावर होतेच, पण त्याचं ओझं किती काळ वागवणार, असं त्यांचं म्हणणं होतं. अमेरिकेविरुद्धचा द्वेष पिढ्यानपिढ्या मनात बाळगून आम्हाला काय मिळणार, असं ते विचारत होते.
अमानुष अत्याचार करून अमेरिकन सैनिक निघून गेले होते. त्या सगळ्यांना निर्दोष सोडून त्यांच्या म्होरक्याची शिक्षा कमी करण्याचा निर्लज्जपणाही त्यांनी केला होता. एवढंच नव्हे, तर व्हिएतनाम युद्धातून कोणताही धडा न घेता अमेरिका पुढेही अनेक देशांवर युद्ध लादतच राहिलं. आजही त्यांच्या वागणुकीतली दादागिरी तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळे अशा देशाविरुद्ध द्वेष बाळगण्याने आपलीच मनं धुमसत राहतात, असं इथल्या लोकांच्या लक्षात येत गेलं. त्यामुळे आपल्या मनःशांतीसाठी या द्वेषभावनेतून त्यांनी स्वत:ला मुक्त करून घेतलं असल्याचं पत्रकारांच्या लक्षात आलं.
एवढंच नव्हे, तर 1968च्या त्या हत्याकांडाचं क्रौर्य आठवण्याऐवजी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या इतर काही घटनांची आठवण इथले लोक काढत आहेत. अत्याचार चालू असताना अमेरिकन सैन्याचं एक हेलिकॉप्टर इथं आलं आणि त्यातल्या सैनिकांनी हा हिंसाचार थांबवला.. या अत्याचारात सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या एका अमेरिकन सैनिकाने स्वत:च्याच पायावर गोळी मारून घेतली..
एकाने डोळा फोडला म्हणून दुसऱ्याने त्याचा डोळा फोडला तर सगळं जग आंधळं बनेल, असं महात्मा गांधी म्हणत. थोडक्यात, हिंसेचं उत्तर हिंसेनेच दिलं तर प्रन सुटत नसतात, असं त्यांचं म्हणणं. हे म्हणणं दूर व्हिएतनाममधील माईलाई गावच्या लोकांना पटलेलं दिसतं. आजच्या हिंसेच्या, बदला घेण्याच्या, हिशेब चुकते करण्याच्या काळात माइलाई गावाचं उदाहरण महत्त्वाचं ठरावं.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.