आम्ही कोण?
ले 

उपायाचा अपाय? कसा काय?

  • डॉ. आरती रानडे
  • 07.10.25
  • वाचनवेळ 13 मि.
medicine side effects

डिसेंबर २०२२ मधल्या एका बातमीने भारतीय औषधनिर्माण व्यवसायात मोठी खळबळ उडवून दिली होती. नॉयडातल्या एका औषध कंपनीने तयार केलेलं खोकल्याचं औषध प्यायल्यानंतर उझबेकिस्तानमध्ये १८ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. या कंपनीतर्फे तयार केली जाणारी ‌‘डॉक-१ मॅक्स‌’ आणि ‌‘ॲम्ब्रोनॉल‌’ ही खोकल्याची दोन औषधं भारतात विकली जात नव्हती. त्यांची केवळ निर्यातच होत होती. या घटनेनंतर भारतातील ‌‘सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन‌’ने (सीडीएससीओ- औषधं, प्रसाधनं आणि वैद्यकीय उपकरणं क्षेत्रातील सर्वोच्च निर्णायक संस्था) या दोन औषधांची काटेकोरपणे चाचणी करण्याचा आदेश दिला. दोन्ही औषधांमध्ये डायइथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे दोन घटक अस्वीकृत प्रमाणात आढळून आले होते.

खोकल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बहुतांश औषधांमध्ये मुख्य औषधी घटक विरघळवण्यासाठी ग्लिसरॉल या द्रव्याचा वापर करतात. ग्लिसरॉलचे काही गुणधर्म मधासारखे असतात. वेदना कमी करणारं, घशावर वंगणासारखा लेप देऊन खवखव कमी करणारं, चवीला थोडंसं गोडसर असलेलं ग्लिसरॉल खासकरून लहान मुलांच्या खोकल्याच्या औषधातला एक महत्त्वाचा घटक असतो.

ग्लिसरॉलबरोबर किंवा ग्लिसरॉलऐवजी सहज उपलब्ध असलेले, पदार्थ विरघळवण्याची अधिक क्षमता असलेले, चवीला अधिक गोडसर आणि स्वस्त असणारे डायइथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल हे घटक भेसळ म्हणून वापरले तर त्यांचा घातक परिणाम होऊ शकतो. डायइथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल यांच्या प्रमाणाबाहेरील मात्रेच्या सेवनामुळे प्रचंड कळा येऊन पोट दुखणं, उलट्या, जुलाब, लघवीला अडथळा येणं आणि मूत्रपिंड निकामी होणं यांसारखे दुष्परिणाम होऊन मृत्यू होऊ शकतो. उझबेकिस्तानातल्या लहान मुलांचा मृत्यूदेखील डायइथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल या घटकांच्या प्रमाणाबाहेरील सेवनामुळे घडला. १३ जानेवारी २०२३ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ‌‘डॉक-१ मॅक्स‌’ आणि ‌‘ॲम्ब्रोनॉल‌’ या दोन्ही औषधांवर बंदी आणून त्यांचं उत्पादन थांबवण्याचा आदेश दिला.

‘दहा दोषी सुटले तरी हरकत नाही, पण निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये‌’ हे जसं कायद्याचं तत्त्व आहे, त्याच धर्तीवर औषधनिर्मिती करताना एक तत्त्व आहे, की एखाद्या औषधाचा उपाय झाला नाही तरी चालेल, पण त्याने अपाय होता कामा नये. ॲलोपथी औषधांच्या निर्मितीदरम्यानच त्या औषधात वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाच्या परिणामांचा आणि दुष्परिणामांचा अभ्यास केला जातो. म्हणूनच कोणतंही नवं ॲलोपथी औषध बाजारात येणं ही दीर्घकाळ (८-१० किंवा अधिक वर्षं) चालणारी, खर्चिक आणि गुंतागुंतीची प्रक्रीया आहे. जवळपास पाच ते १० हजार रासायनिक पदार्थांतून औषध म्हणून काम करण्याची शक्यता असलेली रसायनं निवडली जातात. ‌‘प्री-क्लिनिकल‌’ चाचण्यांमध्ये ती आधी पेशींवर आणि प्राण्यांवर तपासली जातात. यातून आजारावर निरुपयोगी ठरणारे पदार्थ बाद केले जातात, त्याचबरोबर आजारावर उपयोगी असूनही असुरक्षित किंवा विषारी परिणाम करणारे घटकही बाद केले जातात. या चाळणीतून उरलेले १००-२०० पदार्थच केवळ औषधनिर्मिती प्रक्रियेच्या पुढच्या पायरीवर जातात. या सगळ्या कडक प्रक्रियेतून एखादं नवीन ॲलोपथी औषध बाजारात आल्यानंतरही त्याचे काही प्रतिकूल परिणाम दिसले तर ते औषध बाजारपेठेतून मागे घेतलं जातं.

आयुर्वेदिक, नैसर्गिक किंवा इतर समांतर शास्त्रांत मात्र सरसकट इतके कडक नियम आणि कायदे अजूनतरी लागू होत नाहीत. म्हणूनच आयुर्वेदिक उपचारपद्धतीमध्ये मात्रा, पथ्य, औषध घेण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळाव्यात असं सांगितलं जातं. औषधी पदार्थांचे दुष्परिणाम होऊ नयेत यासाठीच ही काळजी घेतलेली असते.

उझबेकिस्तानच्या घटनेत औषधातल्या मुख्य घटकाने नव्हे तर द्रावक म्हणून वापरलेल्या पूरक घटकामुळे दुष्परिणाम झाले. वैज्ञानिक भाषेत याला ‌‘टॉक्सिसिटी‌’ (तीव्र विषपरिणाम) असं म्हणतात. पण केवळ अशी औषधंच नव्हे, तर (स्पर्श, श्वसन किंवा तोंडावाटे) आपल्या संपर्कात येणारी इतर किती तरी रसायनं, पदार्थ, वस्तूंमध्ये किंवा त्यातल्या ठराविक घटकांमध्ये ‌‘उपाय‌’ आणि ‌‘अपाय‌’ करण्याचीही क्षमता दडलेली असतो. याची अनेक उदाहरणं देता येतील. थर्मामीटरमधला निरुपद्रवी वाटणारा पारा वास्तविक एक अत्यंत विषपरिणामकता असणारा धातू आहे; पण हाच पारा योग्य त्या प्रक्रिया करून अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो. घराची साफसफाई करण्यासाठी वापरण्यात येणारी फिनाइल-डिटर्जंटसारखी रसायनं, सॅनिटायझरमध्ये वापरण्यात येणारी इथेनॉलसारखी रसायनं ही एका बाजूला आपल्या अनेक जीवनावश्यक गोष्टींचा भाग आहेत, पण दुसऱ्या बाजूला त्यांत कमी-अधिक प्रमाणात घातक गुणधर्मदेखील आहेत. (त्याबद्दल पुढे येईलच.)

...

विषविज्ञान (टॉक्सिकोलॉजी) म्हणजे आधुनिक (ॲलोपथी) औषधांच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणारी शाखा, असं समजलं जातं. मात्र, या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. ॲलोपथी औषधं मुख्यतः रासायनिक असतात हे खरंच, पण आता ‌‘जैविक‌’ किंवा ‌‘बायोलॉजिक्स‌’ प्रकारात मोडणाऱ्या प्रथिनांचाही औषधं म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. त्याशिवाय आयुर्वेद किंवा नैसर्गिक उपचारपद्धतींमध्ये धातू, रसायनं असतातच. थोडक्यात, या विषयातल्या अभ्यासाची गरज आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अन्नपदार्थ, औषधं असोत की सौंदर्यप्रसाधनं, त्यांतला एखादा घटक सरसकट ‌‘अपायकारक‌’ ठरवला जात नाही, तर त्याचे दुष्परिणाम आणि दुष्परिणामांची तीव्रता यानुसार त्यांचे प्रकार पडतात. सगळ्यात घातक विषकारक (टॉक्सिक) परिणाम, त्याखालोखाल प्रतिकूल परिणाम (ॲडव्हर्स इफेक्ट) आणि आनुषंगिक परिणाम (साइड इफेक्ट) यांचं प्रमाण सर्वाधिक असतं, अशी त्यांची प्रतवारी करण्यात येतो.

विषकारक (टॉक्सिक) परिणामांचं उदाहरण आपण लेखाच्या सुरुवातीला पाहिलंच. एखाद्या घटकामुळे किंवा औषधामुळे इच्छित उपाय साधला न जाता अनपेक्षित परिणाम दिसून येतो, तेव्हा त्याला ‌‘प्रतिकूल परिणाम‌’ असं म्हटलं जातं. प्रतिकूल परिणाम दिसू लागला तर वैद्यकीय सल्ल्याने औषध किंवा घटकामध्ये बदल सुचवला जातो किंवा पूरक उपाययोजना केली जाते. प्रतिकूल परिणामांवर वेळीच उपचार केले नाहीत, तर त्यांची तीव्रता आणि गुंतागुंत वाढून त्याची परिणती दीर्घकालीन आजारामध्ये देखील होऊ शकतो. एक उदाहरण व्हायॉक्स या औषधाचं. मर्क या कंपनीचं हे औषध जालीम वेदनाशामक म्हणून अनेक वर्षं बाजारात उपलब्ध होतं. त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता. भारतातदेखील रॅनबॅक्षीसारख्या कंपन्यांतर्फे या औषधाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि विक्री होत होती. मात्र, हे औषध १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ घेतलं तर हृदयावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचं प्रमाण वाढतं असं दिसून आलं. त्याला कारणीभूत होता या औषधातला प्रमुख घटक रोफेकोक्सिब. २००४ साली या औषधावर बंदी आणली गेली. (सप्टेंबर २०२२ मध्ये त्यावर पुन्हा सुनावणी झाली. त्यातही ही बंदी कायम राहिली.) या उदाहरणात हृदयविकाराच्या झटक्यांचं प्रमाण वाढणं हा ‌‘ॲडव्हर्स‌’ परिणाम होता.

तिसरा प्रकार- साइड इफेक्ट. हा शब्द आपल्या सगळ्यांच्या चांगलाच परिचयाचा आहे. एखाद्या घटकाच्या ‌‘ठराविक स्वीकृत मात्रे‌’मुळे हेतुपूर्वक योजनेचा आवश्यक परिणाम साधला जातो; पण त्याच्याच जोडीला अनपेक्षित किंवा अनावश्यक परिणाम दिसतो तेव्हा त्याला साइड इफेक्ट म्हणतात. बहुतांश वेळा साइड इफेक्टमुळे मुख्य परिणामांना धक्का लागत नाही. ‌‘आयुर्वेदिक औषधांचे किंवा नैसर्गिक पदार्थांचे साइड इफेक्ट्स होत नाहीत‌’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो; पण हा एक मोठा गैरसमज आहे. कार्यकारणभावाच्या तत्त्वाप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा, क्रियेचा परिणाम हा होणारच.

‘एक रोग बरा करताना दुसरा रोग निर्माण होणार नाही‌’ हा आयुर्वेदिक चिकित्सेचा पाया आहे. यासाठीच औषधं देण्यापूर्वी रुग्णाची, त्याच्या रोगांची सर्व माहिती विचारली जातो. रोग्याचे दोष, देह, बळ, काळ, अग्नी, प्रकृती, वय, सत्त्व, आहार अशा अनेक गोष्टी विचारात घेऊनच औषध सुचवलं जातं. परंतु, वैद्यकीय सल्ला न घेता, जाहिराती बघून, कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा इंटरनेटवर बघून अनेकजण आयुर्वेदिक औषधं घेत असतात. तो करताना ‌‘झाला तर होईल उपयोग, निदान त्रास तरी होणार नाही‌’ असा दृष्टिकोन ठेवतात. मात्र, अशा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आयुर्वेदिक औषधाचे साइड इफेक्टही दिसून येतात. पोट साफ होत नाही म्हणून अनेक वर्षं चूर्ण घेण्याने आतड्यांना कोरडेपणा येतो आणि बद्धकोष्ठता वाढत जाते. त्रिभुवनकीर्तीसारखी काही औषधं उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींना सहन होत नाहीत. मधुमेहासाठी कडुनिंब रस, जांभूळ बी किंवा मेथी पावडर जास्त घेतली तर उलट्या, जुलाब इत्यादी त्रास होऊ शकतो. मध शरीराला अत्यंत उपयुक्त असला तरी त्याचं उष्ण गुणाशी वाकडं आहे. म्हणजेच मध गरम करून किंवा गरम पदार्थासह खाल्ला तर शरीराला त्रासदायक होतो. उकाड्याच्या दिवसांत बाहेर फिरून आल्यावर तहान लागली असताना मध खाल्ल्यास तो शरीराला त्रासदायक होतो. पारा, शिसं, आर्सेनिक वापरलेली औषधं कोणत्याही मार्गदर्शनाविना घेतल्यास घातक ठरू शकतात. शिवाय, काही रुग्ण ॲलोपथी औषधं चालू असताना त्याच किंवा दुसऱ्या विकारांवर आयुर्वेदिक किंवा इतरही कुठली तरी औषधं घेतात. अशी एकत्रित औषधं घेण्यानेही दुष्परिणाम होऊ शकतात.

हळद सर्वगुणकारी म्हणून आपल्याला माहीत आहे, परंतु मधुमेही लोकांनी हळद काळजीपूर्वक वापरायला हवी. कारण हळद रक्तातील साखरेची पातळी कमी-अधिक करू शकते. ‌‘गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसऑर्डर (जीईआरडी)‌’ किंवा यकृताचा आजार असेल तर हळदीमुळे स्थिती बिघडू शकते. हळद शरीराच्या लोह शोषण्याच्या क्षमतेमध्ये हस्तक्षेप करते, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आधीच लोहाची कमतरता असेल तर हळदीचे दुष्परिणाम होऊ शकतात. (हळदीच्या पूरक गोळ्या घेतल्यानंतर यकृतावर गंभीर परिणाम झाल्याची उदाहरणं ऑक्टोबर २०२२ मध्ये समोर आली आहेत. यावर अधिक संशोधन सुरू आहे.) खोकल्याच्या काढ्यात वापरण्यात येणारी काळी मिरी प्रमाथी गुणधर्माची आहे. त्यामुळे पोटात घुसळणं, उलटीची भावना होणं आणि उष्णता वाढणं असे परिणाम दिसू शकतात. थोडक्यात काय, तर प्रत्येक गोष्टीने ‌‘उपाय आणि अपाय‌’ दोन्ही होऊ शकतं.

औषधांचेच नाहीत, तर अन्नातल्या घटकांचेदेखील ‌‘साइड इफेक्ट्स‌’ होऊ शकतात. उदा. अन्न टिकण्यासाठी आणि त्याला चव येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रिझर्वेटिव्हमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट (एम.एस.जी.) हा घटक असतो. काही व्यक्तींमध्ये हा घटक असलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यावर (सूप, चायनीज पदार्थ) झिणझिण्या येणं, थकवा येणं, झोप येणं असे दुष्परिणाम दिसतात. तुरीच्या डाळीमुळे कोणाला त्वचेवर पुरळ उठणं, त्वचा लाल होणं असे परिणाम दिसतात. अशी ॲलर्जी हा एक प्रकारचा साइड इफेक्टच असतो.

कोणत्याही घटकाचा परिणाम उपायकारक होणार की अपायकारक हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. त्या घटकाचे मूळ गुणधर्म, मात्रा (डोस), त्या घटकाशी आपला कोणत्या मार्गाने संपर्क झाला आहे (स्पर्श, श्वास, खाणं, टोचणं इ.), संपर्काची वेळ, कालावधी; याचबरोबर त्या-त्या व्यक्तीचं वय, वजन, लिंग, आधीपासून असलेले आजार, शरीराची त्या घटकावर मात करण्याची किंवा त्या घटकाला शरीराबाहेर टाकण्याची क्षमता आणि त्यासाठी लागणारा कालावधी, या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे एका घटकाचा दुसऱ्या घटकांच्या उपस्थितीमुळे होणारा परिणाम, म्हणजेच परस्परक्रिया (इंटरॲक्शन).

यांपैकी घटकाची मात्रा, संपर्काचा मार्ग आणि कालावधी, वय, आधीच अस्तित्वात असलेला आजार किंवा अवस्था (उदा. गर्भावस्था) आणि परस्परक्रिया (इंटरॲक्शन) या गोष्टींबद्दल जाणीवपूर्वक माहिती करून घेऊन त्यांचे दुष्परिणाम टाळणं आपल्या हातात असतं. काही उदाहरणं बघू. ॲस्पिरिन हे रक्त पातळ ठेवणारं औषध जास्त प्रमाणात घेतलं तर नाकातून, कानातून, लघवीतून रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे त्याची मात्रा नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. अस्थमा, ब्राँकायटिस, फुप्फुसाचे आजार यामध्ये दिलं जाणारं औषध थिओफायलीन आणि अँटिबायोटिक सिप्रोप्लोक्सॅसीन ही दोन्ही औषधं एकत्र घेतली तर थिओफायलीनचा घातक परिणाम होऊ शकतो. थिओफायलीनचं विघटन करणाऱ्या यकृतातल्या संप्रेरकाला सिप्रोप्लोक्सॅसीन अडवून ठेवतं. थिओफायलीनचं विघटन न झाल्यामुळे रक्तातलं थिओफायलीनचं प्रमाण वाढतं आणि डोकेदुखी, चक्कर, रक्तदाब कमी होणं, हृदयाची अनियमित धडधड, फेफरं येणं असे प्राणघातक दुष्परिणाम दिसू शकतात.

आणखी एक नेहमी दिसणारी परस्परक्रिया म्हणजे रक्तदाब कमी करण्यासाठी देण्यात येणारी औषधं आणि सहज उपलब्ध असणारं वेदनाशामक औषध आयबुप्रोफेन. ही दोन्ही औषधं एकत्र घेतली गेली तर रक्तदाब कमी करणाऱ्या औषधांची क्षमता कमी होते. ही औषधं दीर्घकाळ एकत्र घेतली तर मूत्रपिंडाचे विकार उद्भवू शकतात. ॲलर्जीवर उपाय म्हणून वापरण्यात येणारं बेनाड्रीलसारखं औषध मद्यपान करत असताना घेतलं तर या दोन्हींचा एकत्र परिणाम फार अपायकारक ठरू शकतो. बेनाड्रीलमधला औषधी घटक आहे डायफेनहायड्रामाईन. हा घटक ॲलर्जी, खोकला, नाक-डोळे गळणे यावर उपायकारक तर आहेच, पण तो चेतासंस्थेला शांत करण्याचंदेखील काम करतो. मद्यही चेतासंस्थेवर परिणाम करतं. त्यामुळे मद्य आणि बेनाड्रील त्यांच्या एकत्र परिणामामुळे सुस्ती, शुद्ध हरपणं, डीहायड्रेशन, स्मृतिभ्रंश असे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

आयुर्वेद उपचार पद्धतीमध्येदेखील अशा परस्परक्रिया लक्षात घेतल्या जातात. गुग्गुळ हा घटक असलेलं कोणतंही औषध वापरत असताना तिखट, गरम मसाला असे उष्ण, तीक्ष्ण पदार्थ वर्ज्य करायला सांगतात. गंधक (सल्फर) असलेली औषधं घेताना आंबट, तिखट पदार्थ वर्ज्य करायला सांगतात, तसंच मिठाचं प्रमाण कमी करायचा सल्ला देतात. लसूण आणि मद्य यांच्या एकत्रित परिणामांमुळे उष्ण, तीक्ष्ण गुण वाढू शकतात, पित्त प्रकोप होऊ शकतो, तर काही वेळा रक्तदेखील खराब होऊ शकतं.

...

केवळ औषधंच नाही, तर घरगुती वापरातली अनेक रसायनं योग्य रीतीने आणि योग्य प्रमाणात, योग्य कारणासाठी वापरली नाहीत तर घातक परिणाम करतात. त्याने उपायांऐवजी अपायच होतात. म्हणूनच घरात लहान मुलं, वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती किंवा स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया असतील तर अशी रसायनंसुद्धा अधिक काळजीपूर्वक आणि सुरक्षित मार्गांनी वापरणं गरजेचं असतं.

आपल्या बहुतेकांच्या घरात फरश्या, बाथरूम स्वच्छ करण्यासाठी ‌‘फिनाइल‌’ वापरलं जातं. यामध्ये असलेली फिनॉल आणि कार्बोलिक ॲसिड ही रसायनं एका बाजूला जंतुनाशन करण्याचं महत्त्वाचं काम करतात, पण श्वसनसंस्था, रक्ताभिसरण आणि चेतासंस्थेवर ती घातक परिणामही करू शकतात. फिनाइल मोठ्या मात्रेमध्ये त्वचेच्या संपर्कात आलं, डोळ्यांत गेलं, तर घरच्या घरी त्वचा, डोळे पाण्याने वारंवार धुण्याचा उपाय करणं शक्य असतं; पण फिनाइल तोंडावाटे पोटात गेलं किंवा वायुरूपात नाकावाटे मोठ्या प्रमाणात शरीरात गेलं तर घरगुती उपाय न करता ताबडतोब वैद्यकीय मदत घेणं आवश्यक असतं, नाही तर जिवाला धोका उद्भवू शकतो.

घरातल्या साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या बहुतेक क्लीनर्समध्ये अमोनिया असतो. शिवाय डाग काढण्यासाठी, स्वच्छतेसाठी आपण व्हिनेगर, अल्कोहोल किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड यांचाही वापर करतो. अनेकांच्या घरात ब्लीचदेखील वापरलं जातं. असे स्वच्छता करणारे घटक एकात एक मिसळले तर अधिक स्वच्छता करता येईल, या गैरसमजातून अनेक वेळा अमोनिया + ब्लीच नाही तर व्हिनेगर + ब्लीच किंवा टॉयलेट क्लीनर + ब्लीच अशी मिश्रणं केली जातात. अशी मिश्रणं शरीरावर अत्यंत घातक परिणाम करू शकतात. ब्लीचमध्ये सोडियम हायपोक्लोराइट हा सक्रिय घटक असतो. ब्लीच अमोनियाबरोबर मिसळलं जातं तोव्हा क्लोरामाइन नावाचा वायू तयार होतो. तो नाकावाटे आत गेला तर खोकला, मळमळणं, श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत दुखणं इथपासून न्यूमोनिया आणि फुप्फुसात पाणी भरणं यासारखे वेगवेगळ्या तीव्रतोचे घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे स्वच्छता करण्याच्या कोणत्याही रसायनाबरोबर ब्लीच कधीही मिसळू नये.

आपल्या सगळ्यांच्या घरात आढळणारी आणखी एक गोष्ट म्हणजे डांबराच्या गोळ्या (मॉथबॉल). यांतले सक्रिय घटक म्हणजे नॅप्थलीन किंवा पॅराडायक्लोरोबेनझीन. आपल्याला डांबराच्या गोळीचा वास येतो, तेव्हा एका अर्थी हे दोन्ही कीटकनाशक घटक श्वसनमार्गाने आपल्या शरीरात प्रवेश करत असतात. ही दोन्ही रसायनं शरीरात गेल्यास त्यापासून इतर संयुगं तयार होतात. त्याने डोकेदुखी, मळमळणं, चक्कर येणं इथपासून यकृतासारख्या अवयवांचं आणि पेशींचं नुकसान होणं असे अनेक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे डांबराच्या गोळ्या ठेवलेले कपडे किमान दोन दिवस बाहेर काढून मोकळ्या हवेत ठेवावेत आणि मगच वापरावेत.

घरातल्या, अन्नपदार्थातल्या, औषधातल्या रसायनांच्या चांगल्या-वाईट परिणामांची इतकी चर्चा केल्यावर ‌‘मग निरोगी जगायचं तरी कसं?’ अशी चिंता वाटणं अगदी साहजिक आहे. पण आजूबाजूच्या गोष्टींविषयीच्या, शरीराविषयीच्या अशा ज्ञानाचा वापर सजग वागण्यासाठी झाला तर त्याचा फायदा आहे. मात्र, त्यामुळे नुसतीच काळजी करू नये. कारण त्यामुळे पुन्हा रक्तदाब, निद्रानाश असे दुष्परिणामच होणार. थोडक्यात, ‘काळजी घेणं‌’ आणि ‌‘काळजी करणं‌’ यामधला फरक समजून घेतला आणि आचरणात आणला तर कोणत्याही गोष्टीपासून होणारा ‌‘उपाय‌’ फायदेशीर ठरू शकतो आणि त्यापासून होणारा ‌‘अपाय‌’ टाळलाही जाऊ शकतो.

‘अति सर्वत्र वर्जयेत‍‌’, ‘अति तेथे माती‌’ या म्हणी आपण अनेक वेळा ऐकतो, पण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे डोळसपणे पाहिलं तर या वचनातलं गांभीर्य आपल्याला लक्षात येईल. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपण नवनवीन आजारांना, समस्यांना आमंत्रण देत आहोत. यामुळे औषधांचा, रसायनांचा वापर वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम उघडपणे दिसायला लागले आहेत. पण त्याचबरोबर हवेचं प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण, सततची स्पर्धा, आयुष्यातला वाढत असलेला ताण; मोबाइल, सोशल मीडिया यांचा प्रचंड प्रमाणात वाढलेला वापर, माहितीचा भस्मासुर अशा अनेक ‌‘अति प्रमाणात‌’ असणाऱ्या गोष्टींमुळे होणारे अपाय आता दिसायला, जाणवायला लागले आहेत.

औषधांवर संशोधन करताना प्रत्येक औषधांची एक ‌‘उपचारात्मक कक्षा‌’ (थिएरापेटिक विंडो) ठरवली जातो. त्या कक्षेत औषधाचा सर्वोत्तम आणि आवश्यक परिणाम साधला जातो. ही ‌‘उपचारात्मक कक्षेची‌’ संकल्पना आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत लागू पडते. एखादी गोष्ट एका मर्यादेपेक्षा कमी असेल तर परिणामकारक नसते, पण एका मर्यादेच्या बाहेर गेली तर तिचे दुष्परिणाम होतात. म्हणूनच कोणत्याही बाबतीत ‌‘उपाय‌’ आणि ‌‘अपाय‌’ यांच्या सीमारेषा समजून घेणं आवश्यक ठरतं.

('अनुभव' मासिकाच्या मार्च २०२३च्या अंकातून साभार)

डॉ. आरती रानडे | aaratiranade@gmail.com

डॉ. आरती रानडे या स्टेम सेल्स आणि कॅन्सर या विषयांत पोस्ट-डॉक्टरेट असून वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात काम करतात. त्याचबरोबर त्या विविध विषयांवर लेखनही करतात. त्यांना व्यायाम, रनिंग, सायकलींग, हायकिंगची देखील आवड आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

Avinash Bhondwe 08.10.25
अतिशय सोप्या भाषेत औषधामागचं विज्ञान स्पष्ट केलं आहे. धन्यवाद.

Sonali Kulkarni08.10.25
Very well detailed and apt article

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results