आम्ही कोण?
ले 

मरणातही भारत-इंडिया?

  • हेरंब कुलकर्णी
  • 16.06.25
  • वाचनवेळ 4 मि.
heramb insurance header

पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरचा जुना पूल नुकताच कोसळला. या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना सरकारने ५ लाख जाहीर केले आहेत. गुरुवारी अहमदाबाद येथील विमान अपघातात २५० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. हे मृत्यू विलक्षण वेदनादायक आहेत. या दुर्दैवी अपघातातील बळींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं एअर इंडियाने जाहीर केलं आहे. मानवी जीवनाची किंमत अमूल्य आहे. शिवाय या व्यक्ती संपत्ती निर्माण करणाऱ्या आणि करोडो रुपये मिळवू शकणाऱ्या असल्याने खरं तर ही रक्कम कमीच म्हणावी लागेल. त्यामुळे त्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही. सरकारने अद्याप नुकसान भरपाईचा आकडा जाहीर केलेला नसला तरी यानिमित्ताने वेगवेगळे सरकारी विभाग आणि विमा कंपन्या मृत्यूनंतर किती नुकसान भरपाई देतात, याचा धांडोळा घेतल्यावर त्यातही भारत-इंडिया असा फरक असल्याचं लक्षात येतं.

गरीब कुटुंबातील एखादी व्यक्ती अकस्मात मृत्यू झाल्यास 'राष्ट्रीय कुटुंब सहायता निधी' असं भारदस्त नाव असलेल्या योजनेमार्फत त्या गरीब कुटुंबाला फक्त २० हजार रुपये मिळतात. त्यातही ते कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असावं आणि त्यांच्याकडे दारिद्र्य रेषेखाली असल्याचं कार्ड असावं, अशी अट असते. मुळात दारिद्र्यरेषेचा शेवटचा सर्व्हे २००७ साली झाला. त्यानंतर २० वर्षांमध्ये सुधारित दारिद्र्य रेषा लागू झालेली नाही. त्यामुळे ते कार्ड खूप कमी जणांकडे असतं. परिणामी बहुतेकांना ही योजना मिळतच नाही. अनेकांना त्याबद्दल माहितीही नसते. एखाद्या अधिकाऱ्याने या योजनेतील जाचक अटींकडे दुर्लक्ष केलं तरच हा लाभ मिळतो. खरंतर गरीब कुटुंबातील कमावती व्यक्ती गेल्यावर ते कुटुंब उघडं पडतं, त्यामुळे त्याचा विचार करून नुकसान भरपाईची रक्कम वाढवली गेली पाहिजे. पण तसं झालेलं दिसत नाही.

विमान कंपनीने जास्त रकमेचा विमा उतरवला असल्याने त्यांना मिळणारी नुकसान भरपाई जास्त आहे, त्यामुळेच अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी रक्कम जास्त आहे, असा युक्तिवाद केला जातो. ही नुकसान भरपाई सरकारने नव्हे, तर विमान कंपनीने जाहीर केली आहे, हेही बरोबर. पण मुद्दा असा की रेल्वे आणि एसटीनेही जास्त रकमेचा विमा उतरवून तशी तरतूद का करू नये?

रेल्वे अपघातात मृत्यू झाला तर १० लाख आणि कायमचं अपंगत्व आल्यास ७ लाख ५० हजार मिळतात. एस टी अपघातात मृत्यू झाल्यासही १० लाख रुपये मिळतात. म्हणजे विमानात मृत्यू आणि एस टी रेल्वे यातील मृत्यू यात १० पटीचा फरक आहे. खरं तर एसटी किंवा रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी तुलनेने कनिष्ठ आर्थिक वर्गातील असल्याने त्यांना या भरपाईची जास्त गरज असते.

अलीकडेच बिबट्या किंवा वन्य जीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये देण्यात येऊ लागले आहेत. वास्तविक जंगलातील हल्ल्यात मरण पावणारे बहुतेक आदिवासी किंवा शेतकरी असतात. त्यांची आर्थिक स्थिती बहुतेक वेळा हलाखीची असते.

विजेचा शॉक लागून मृत्यू झाला तर वारसदारांना फक्त चार लाख रुपये मिळतात. पूर्वी विविध कारणांनी शेतकऱ्यांचे शेतात मृत्यू व्हायचे, तेव्हा त्यांना कोणीही वाली नसायचं. अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडे अपघात विमा सुरू झाल्यापासून शेतात कोणत्याही कारणाने, म्हणजे विहिरीत पडून, साप चावून, उंचावरून पडून मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मिळतात. अपंगत्व आल्यासही दोन लाख रुपये मिळतात.

शेतकरी आत्महत्येनंतर कुटुंबीयांना मिळणारी मदत तर केवळ एक लाख आहे. त्यातही ३० हजार रुपये रोख दिले जातात आणि ७० हजार रुपयांची ठेव पावती केली जाते. शेती परवडत नसल्याने कर्जबाजारी झाल्यामुळे मृत्यू जवळ केलेल्या शेतकऱ्याच्या मरणाची किंमत फक्त एक लाख. त्यातही तो शेतकरी कर्जबाजारी आहे, हे सिद्ध व्हावं लागतं. कर्ज खासगी सावकाराचं असेल तर ती आत्महत्या नुकसान भरपाईसाठी अपात्र ठरते. (आत्महत्यांचा आकडा मोठा दिसू नये यासाठी जास्तीत जास्त आत्महत्या अपात्र ठरवा, असे तोंडी आदेश दिलेले असतात ते वेगळंच.)

सर्वांत कमी विमारक्कम लहान मुलांची आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांचा मृत्यू झाला तर ७५ हजार रुपये मिळतात. तीच बाब जनावरांच्या नुकसान भरपाईचीही. वाघाने गाय-बैल-शेळी खाल्ली तर कृषी उत्पन्न बाजार समिती त्या जनावराची जी किंमत ठरवेल, त्याच्या फक्त ७५ टक्के रक्कम मिळते. शेतकऱ्याची काहीही चूक नसताना २५ टक्के रकमेचा भुर्दंड पडतो. अनेकदा शेतकरी खूप दुरून गाय खरेदी करतात. त्यासाठीचा प्रवास खर्च मोठा असतो. गाय मेल्यानंतर पैसे मिळून नवीन गाय खरेदी करण्यात वेळ जातो. त्यामुळे दुधाच्या धंद्यातही नुकसान होतं, ते पाहता गाईच्या किमतीच्या दीडपट रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळायला हवी.

थोडक्यात, नुकसान भरपाईच्या रकमांमध्ये भारत-इंडियात मोठीच तफावत दिसते. इंग्रजीत Death is a leveller असं म्हटलं जातं. म्हणजे मृत्यू हा सर्वांना एकसमान पातळीला आणतो. मग तो राजा असो की रंक. पण प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाही.


हेरंब कुलकर्णी | 8208589195 | herambkulkarni1971@gmail.com

हेरंब कुलकर्णी हे निवृत्त प्रयोगशील शिक्षक, तसंच वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी झगडणारे कार्यकर्ते आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

Tayyab Khan16.06.25
फारच छान!

सुहास गुर्जर16.06.25
अद्न्यानभरीत लेख

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results