आम्ही कोण?
काय सांगता!  

पायलट मेडे कॉल कधी देतात?

  • युनिक टीम
  • 14.06.25
  • वाचनवेळ 2 मि.
may dare

अहमदाबाद दुर्घटनेत विमान कोसळण्याआधी पायलटने 'मेडे'चा कॉल दिला होता.. कुठून आला हा शब्द?

मेडे हा शब्द आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणि सागरी क्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती दर्शवण्यासाठी वापरला जातो. मेडे हा शब्द “m’aider” (मदद करा) या फ्रेंच शब्दापासून आला आहे. या शब्दाचा उच्चार 'मेडे' असा होतो. १९२३ मध्ये लंडनच्या क्रॉयडन विमानतळावरील रेडिओ अधिकारी फ्रेडरिक स्टॅनली मॉकफोर्ड यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला. त्यावेळी क्रॉयडन आणि पॅरिसमधील ले बूर्जे हवाई वाहतुकीसाठी एक स्पष्ट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समजणारा संकट सिग्नल आवश्यक होता. यामुळे “मेडे” हा शब्द १९२७ मध्ये आंतरराष्ट्रीय रेडिओटेलिग्राफ अधिवेशनात अधिकृतपणे स्वीकारला गेला.

मेडे कॉल हा अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीतच वापरला जातो. उदा, विमानाचं इंजिन बंद पडणे, आग लागणे, नियंत्रण गमावणे किंवा गंभीर वैद्यकीय आणीबाणी. मेडे सिग्नल तीन वेळा सलग उच्चारला जातो—“मेडे, मेडे, मेडे”. इतर संदेशांमध्ये तो हरवून जाऊ नये हा यामागचा उद्देश असतो. यानंतर पायलट विमानाचा कॉल साइन, स्थान, आपत्तीचं स्वरूप, इंधनाची स्थिती, प्रवाशांची संख्या आणि आवश्यक मदत याबाबत माहिती देतो. हा सिग्नल १२१.५ मेगाहर्ट्झ किंवा २४३ मेगाहर्ट्झ या आपत्कालीन फ्रिक्वेन्सीवर प्रसारित केला जातो. एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून या फ्रिक्वेन्सी सतत तपासल्या जात असतात. मेडे कॉलला प्राधान्य देऊन इतर सर्व संदेश त्यावेळी थांबवले जातात. खोटे मेडे कॉल देणे हा कायद्याने गुन्हा आहे, ज्यासाठी दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो.

१३ जानेवारी २०१२ रोजी, इटलीजवळील कोस्टा कॉन्कॉर्डिया क्रूझ जहाज खडकावर धडकले. कॅप्टनने मेडे कॉल जारी केला. तात्काळ बचाव कार्य सुरू झाले. या कॉलमुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले, तरीही ३२ जणांचा मृत्यू झाला.

अहमदाबाद दुर्घटनेत टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत कॅप्टन सुमित सभरवाल यांनी “मेडे” कॉल दिला होता, परंतु त्यानंतर विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. विमान मेघनीनगर परिसरात कोसळले. स्फोट झाला आणि मोठी जीवितहानी झालीच. पण मेडे कॉलमुळे किमान तातडीने बचाव कार्य सुरू झाले.

८ मार्च २०१४ रोजी क्वालालंपूरहून बीजिंगला जाणारी मलेशिया एअरलाइन्सची फ्लाइट MH३७० गायब झाली. या विमानाने स्पष्ट “मेडे” कॉल प्रसारित केल्याचा कोणताही पुरावा नाही. या घटनेने मेडे कॉलच्या महत्त्वावर प्रकाश टाकला, कारण असा कॉल मिळाला असता तर कदाचित बचाव कार्य लगेच सुरु करता आले असते.

हेही बघा: MH-370 चं नक्की काय झालं?

युनिक टीम







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results