काश्मीरमध्ये 'शेर-ए-काश्मीर कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ' ('स्कुआस्ट') नावाची एक संस्था काम करते. या संस्थेत संशोधनाचं काम चालतं. अलीकडच्या काही वर्षात ती संस्था चांगलीच नावारूपाला येत आहे.
या संस्थेतल्या सुहेल मार्गी या संशोधकाने मार्गदर्शक रियाझ अहमद शाह यांच्या मार्गदर्शनाखाली जनुक संपादित मेंढी पैदा करण्यात यश मिळवलं आहे. तब्बल सहा वर्षं आणि चारशे चाचण्यांनंतर त्यांना हे यश मिळालं. जनुक संपादित मेंढी, हा अशा प्रकारच्या संशोधनातील मैलाचा दगडच आहे. त्यामुळे श्रीनगर येथील 'शेर-ए-काश्मीर कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात कुंपणामध्ये ठेवलेली ही मेंढी बघण्यासाठी पाहणाऱ्यांची गर्दी होतेय. तिचे फोटो घेतले जात आहेत. ती मेंढी आता सेलिब्रिटीच बनलीय. शास्त्रज्ञ तिच्या प्रत्येक हालचालीची पाहणी करून नोंदी ठेवत आहेत, कारण ती भारतातील पहिलीच जनुक संपादित मेंढी आहे.
सुहेल मार्गी यांचे गुरू-मार्गदर्शक आणि काश्मीरमधील शास्त्रज्ञ आहेत रियाज अहमद शाह. त्यांनी २००९ मध्ये राष्ट्रीय डेअरी संशोधन केंद्रामध्ये पी.एच.डी. करताना म्हशीच्या पारडीला यशस्वीपणे क्लोन केलं होतं. नंतर क्लोनिंगद्वारे पश्मीना शेळीला जन्माला घातलं होतं. मार्गी हे त्यांचे विद्यार्थी. त्यांच्याच वाटेने जाऊन त्यांनी आता एक पाऊल पुढे टाकलं आहे.
मार्गी यांना मेंढीच्या एका जातीतील जनुकाला लक्ष्य करून मेंढीमधील स्नायूंचं वजन वाढवायचं होतं. त्यासाठी त्यांनी भारतीय शेती संशोधन मंडळाकडे प्रस्ताव पाठवला. तो मान्य झाला. भारतीय विज्ञान निधीकडून आर्थिक मदतही मिळाली आणि संशोधन प्रकल्पाला गती मिळाली. त्यानंतर पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ते प्रयोग करत होते. मार्गदर्शक शाह म्हणतात, "शास्त्रज्ञांच्या भाषेमध्ये डीएनए म्हणजे जीवनाचा ग्रंथच. सामान्यांना डीएनए म्हणजे केवळ अक्षरंच वाटतील. पण जनुक संपादन करताना तुम्ही या अक्षरांबरोबरच छेडछाड करता. या संशोधनात मेंढीच्या स्नायूंच्या वस्तुमानात वाढ करायची होती. त्यामुळे आम्ही मायोस्टेटिन जनुकाचा शोध घेतला आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं. हे जनुक स्नायूंच्या वाढीवर नियंत्रण ठेवणारं नकारात्मक नियंत्रक (निगेटिव्ह रेग्युलेटर) आहे. आमचं उद्दिष्ट मेंढीचं वजन वाढवायचं होतं."
'स्कुआस्ट'मधील पशुवैद्यक शास्त्र आणि पशुपालन विद्याशाखेच्या मेंढी-शेळी संशोधन केंद्राच्या कुंपणाने बंदिस्त केलेल्या विभागात दोन मेंढ्या एकमेकींचा पाठलाग करताना दिसतात. त्यांच्यामागेच एक फलक आहे: भारतातील पहिली जनुक संपादित मेंढी. नुसतं पाहिलं तरी त्यातील एक दुसरीपेक्षा आकाराने मोठी असल्याचं लक्षात येतं. तिचे स्नायू बळकट दिसतात. दुसरी मेंढी सर्वसाधारण मेंढीसारखीच आहे. दोघींची आई एकच. तिच्यातच जनुकीय बदल करण्यात आले होते, पण तिच्या दोन लेकींपैकी एकीमध्येच स्नायूंची वाढ करणारे जनुकीय बदल उतरले.
या बहिणी जन्मल्या त्यावेळी त्यांच्यात फारसा फरक नव्हता. शाह आणि मार्गी, रोज त्या बहिणींमध्ये काही फरक दिसतो का हे पाहत असत. लहानसा का होईना, पण फरक दिसेल अशी त्यांना आशा होती. त्या बहिणी भ्रूण अवस्थेत असतानाच त्यांच्यात जनुकीय संपादन करण्यात आलं होतं. त्यामुळे बदल लगेचच दिसले नाहीत. नंतर केलेल्या डीएनए सिक्वेन्सिंगमधून एकीमध्ये संपादित जनुक असल्याची पुष्टी झाली. काही आठवड्यांनंतर दोघींमधील फरक स्पष्ट दिसू लागला.
जनुक संपादनाचा प्रयोग सोपा नव्हता. मार्गी यांनी कित्येक रात्री जागून काढल्या. प्रयोगशाळेत नसताना ते आंतरराष्ट्रीय शोधनिबंध वाचून आपल्या प्रयोगात काय सुधारणा करण्याची गरज आहे, याचा शोध घेत. 'स्कुआस्ट'च्या प्रगत प्रजनन जीवतंत्रज्ञान प्रयोगशाळेत पश्मिना शेळी 'नूर'च्या जन्माच्या वेळी ही जम्मू-काश्मीर-लडाखमधील पहिली प्रयोगशाळा विकसित करण्यात आली होती. तेव्हापासून या प्रयोगशाळेने भ्रूण हाताळणी, कुशलतेने फेरफार, उबवणे आणि रेण्वीय कार्य (मॉलिक्यूलर वर्क) या कामांनाच वाहून घेतलं आहे.
'स्कुआस्ट'मध्ये २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये जनुक संपादनाचे प्रयोग सुरू झाले. २०२० मध्ये भ्रूण (अँब्रियो) संपादनानंतर क्लोनिंगची, 'क्रिस्पर' या क्रांतिकारक तंत्रज्ञानाशी सांगड घालून क्लोन्ड भ्रूण तयार केला. त्यासाठी केलेल्या २०० चाचण्यांपैकी जेमतेम दहा टक्केच यशस्वी झाल्या. दोन वर्षं हे भ्रूण प्राप्तकर्त्या, म्हणजे ते भ्रूण स्वीकारायला तयार असणाऱ्या शेळीमध्ये सोडण्यात येत होतं. पण एकाही वेळी मेंढी गाभण राहिली नाही. शाह त्यांना सांगायचे: "अपयश हे यशाचं पहिलं पाऊल आहे, कारण या अपयशाचा अर्थ तुम्ही प्रयत्न करत आहात."
या काळात केवळ मार्गीच चिंता करत नव्हते, तर शाहही आतुरतेने वाट पाहत होते. मग त्यांनी मृत मेंढीऐवजी जिवंत मेंढीतून मामूली शस्त्रक्रियेने अंडी मिळवली. त्यासाठी आचार समिती (एथिक्स कमिटी) कडून परवानगी घेतली. टीमला मेंढीला गर्भवती करण्यात यश मिळालं. पण सुरुवातीला गर्भपात झाले, मृत कोकरं जन्मली आणि त्यांच्यात संपादित जनुकही नव्हते. म्हणून विद्यापीठातील मेंढी फार्ममधील सर्व मेंढ्या प्रयोगासाठी आणल्या. पाचव्या वेळेला यश आलं. कोकरू जगलं आणि त्याच्यात संपादित जनुकही होतं. मार्गींनी शाह यांना फोन केला. मात्र शाह समाधानी नव्हते. दुसऱ्या दिवशी अनेक शास्त्रज्ञांकडून खातरजमा करण्यात आली. अखेर मार्गींना मान्यता मिळाली. त्यांना रडू कोसळलं. शाह त्यांची पाठ थोपटून म्हणाले: "हे मला मिळालेल्या यशाएवढंच महत्त्वाचं यश आहे."
हे संशोधन त्यांनी पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केलं आहे. मात्र, या तंत्रज्ञानासाठी सध्या काही नियम नसल्याने त्यांचे प्रयोग केवळ संशोधनाच्या दृष्टीने केले आहेत. यानंतर भारतात याबाबतचे नियम तयार होतील, तेव्हा मेंढ्यांचे स्नायू वस्तुमान (मसल मास) वाढेल, म्हणजे मटण उत्पादन वाढेल. स्नायूच मांसातील मुख्य भाग असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल, असं मार्गी यांचं मत आहे.
(संदर्भ: द वायर पोर्टलवरील सागरिका किस्सू यांचा लेख)
आ. श्री. केतकर | aashriketkar@gmail.com
आ. श्री. केतकर हे ज्येष्ठ पत्रकार असून ते प्रामुख्याने क्रीडा आणि सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
