व्यंगचित्रकार चित्रकार असतो का, हा प्रश्न अनेक वर्षांपासून समाजशास्त्रज्ञांना जरी पडत नसला तरी मला नक्कीच पडला आहे. रूढ अर्थाने बघितलं तर चित्रकार आणि व्यंगचित्रकार दोघंही पांढऱ्यावरती काळं करतात. लोकशाही तत्त्वाने जावं, तर व्यंगचित्रकला या शब्दामध्ये चित्रकला या शब्दाने दोन तृतीयांश जागा व्यापलेली आहे.
व्यंगचित्रकार अथवा विनोदी कलावंत हा मनातून एक सीरियस आर्टिस्टच असतो. सभोवताली दिसणाऱ्या विसंगती, अन्याय, दांभिकपणा यांचा त्याला राग असतो. पण ती चीड एखाद्या धीरगंभीर अग्रलेख किंवा गरळ ओकणाऱ्या व्हॉट्सअपच्या संदेशात लिहिण्याऐवजी कधी मिश्किलपणे तर कधी उपरोधाने तो समाजापुढे मांडायचा प्रयत्न करतो. अर्थातच ही झाली थियरी. पण विनोदी कलावंत हा माणूसच असतो. त्याच्या कलेतून त्याच्या रागाचा पुरेसा निचरा न झाल्यास तो राग त्याच्या मनात कधी कधी घर करू लागतो. त्याच्या विचारांना, त्याच्या वागण्याला प्रदूषित करू लागतो. त्यात वाढत्या वयाबरोबर हा कडवटपणा, चीड वाढण्याची शक्यता अधिक. ‘आमच्या काळात असं नव्हतं, तो काळच वेगळा होता, त्या काळात अमुक तमुक गोष्टीला किंमत होती', अशी वाक्यं वाढत्या वयाबरोबर जास्तच बोलली जाऊ लागतात. तळागाळाला नेणाऱ्या भोवऱ्यात समाज अडकला आहे याची खात्री देणारी उदाहरणं अवतीभोवती दिसू लागतात. जग अंधारून आल्यासारखं वाटतं.
आता या पुस्तकाचंच उदाहरण घ्या. मनात धाकधूक होती की ही व्यंगचित्रं आता जुनी झाली आहेत. त्यांचा सध्याच्या परिस्थितीशी फारसा संबंध राहिलेला नाही. वरवर बघितलं तर ते खरंही आहे. या व्यंगचित्रांत दिसणारा लँडलाइनचा फोन आता स्मार्टफोन बनून खिशात गेलाय, डेस्कटॉप कम्प्यूटर आता लॅपटॉप बनून बॅगेत गेलाय. पण हे झाले दिखाऊ बदल. चित्रं पाहताना माझ्या लक्षात आलं, की पंचवीस-तीस वर्षांपूर्वी काढलेली ही चित्रं आजच्या सामाजिक परिस्थितीला तितकीच लागू आहेत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बेकारी, बकालपणा, स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, गरिबी... या गोष्टींबद्दल जागरूकता वाढली असेल पण बदल झालेला नाही. तसं बघाल तर बऱ्याच गोष्टी जास्तच विदारक झाल्या आहेत. आता मी माझी चित्रं अजूनही कालबाह्य झाली नाहीत म्हणून आनंद मानू की आपल्या समाजाचं हे असं कसं झालं म्हणून निराश होऊ?
पण अशी निराशा मला येणार नाही. याचं कारण विजय तेंडुलकरांनी दिलेला माणुसकीवर प्रेम करण्याचा मूलमंत्र. कारण माणुसकीच्या चष्म्यातून पाहिलं तर आपल्याला समाजाचा, लोकांचा राग येत नाही. त्यांच्याबद्दल कुतूहल वाटतं, क्वचित कणव वाटते, पण मोस्टली त्यांचं हसू येतं. या संग्रहाकडे बघताना तुम्हीही हाच दृष्टिकोन ठेवावा असं मला वाटतं.
