खरीप हंगाम संपून रब्बी हंगामाची सुरुवात होते आणि याच दरम्यान दिवाळीचा उत्सव येतो. किंबहुना, याच दिवसांचं महत्त्व सांगण्यासाठी दिवाळीची निर्मिती झाली असावी. पावसाळा संपलेला असतो. जमिनीने हिरवळीची चादर पांघरलेली असते. रब्बीची पेरणी होऊन पिकं बाल्यावस्थेत असतात, ती कोमल आणि नाजूक दिसत असतात. शेतात फिरायला गेलं तरी मन सुखावून जातं. नद्या, ओढ्यांचं नितळ पाणी संथपणे वाहत असतं. नद्या, नाले स्वच्छ होऊन आकर्षक दिसत असतात. विहिरी पाण्याने भरल्यामुळे निळ्याशार दिसत असतात. हिवाळ्याच्या थंडीची चाहूल लागत असते. या वातावरणाने शेतकरी उत्साहात असतो.
या शेतकऱ्यासाठी दिवाळी म्हणजे, शेतात पिकलेल्या धान्याच्या राशी घरात उंबऱ्याच्या आत आल्यानंतर तीन दिवस दिवाळी साजरी करून खरीप हंगामाला निरोप द्यायचा आणि रब्बी हंगामाची सुरुवात करायची. माझे वडील सांगतात की, दसरा साजरा झाला की थंडीला सुरुवात होते. दिवाळीपर्यंत थंडी शेतात पसरून वेशीवर येऊन थांबते. दिवाळीच्या दिवशी ती गावात, घरा-घरात शिरते. या थंडीला सामोरं जाण्यासाठी दिवाळीच्या पहाटे पहिली आंघोळ केली जाते. त्याला शहरात नरकचतुर्थीचं अभ्यंगस्नान म्हणतात.
दिवाळी हा कृषी संस्कृतीमधलाच उत्सव आहे. त्याचाच एक भाग म्हणजे शेतकरी ज्वारीच्या शेतात पांडव घालतात. ज्वारीच्या शेतात दगडाचे पांडव करून नैवेद्य दाखवला जातो. यामागे 'ज्वारीचं पीक चांगलं येऊ दे, कणसाची भरभराट होऊदे', अशी एक भावना असते. दुसरं, शेतात पांडव घालण्यामागे, 'वनवासाला गेलेल्या पांडवांचं शेतीने संरक्षण करावं, त्यांनी पिकांच्या शेतात राहावं, जेणेकरून काळीमाय त्यांना काहीच कमी पडू देणार नाही' असाही एक अर्थ आमचे वडील सांगतात. तिसरं म्हणजे काही जणांकडे घरच्या दारात गाईच्या शेणाच्या गवळणी घातल्या जातात. काहीजण त्यांना पांडव म्हणतात तर काहीजण गवळणी म्हणतात. शेतकरी घराच्या दारातल्या या गवळणीची पूजा करण्यासाठी 'सूर्या'च्या (एका गवताचा प्रकार) काड्या आणून दिवा बनवतात. तो दिवा पेटवून गवळणीसमोर उजेडासाठी ठेवला जातो. तसेच शेती, माती, घर, धन, संपदा हे आशय केंद्रस्थानी ठेवून गवळणीची गाणी म्हटली जातात.
शेतकरी कुटुंबात दिवाळीमध्ये गायी-वासराला महत्त्व असतं. दिवाळीच्या अगोदर १० दिवसांपासूनच गायीची पूजा करणं आणि ओवाळणं चालू असतं. या पूजेसाठी शेणाच्या गवरीच्या खंडावर गोडंतेल टाकून तो पेटवला जातो. चांगला पेट घेतला की, त्या गवऱ्यांच्या खंडाला दिवा समजून गायीची ओवाळणी केली जाते. त्यावेळी गायीला उद्देशून गाणं म्हणलं जातं,
“माझ्या बवळण गायीची कास, जशी सोन्याची रास”
“माझ्या बवळण गायीच्या मांड्या, जशा पालखीच्या दांड्या”
“माझ्या बवळण गायीचे डोळे, जसे की लोण्याचे गोळे....”
गायीची हळद-कुंकू लावून ओवाळणी केली जाते. याशिवाय काही परिसरात पाळीव प्राणी आणि माणूस यांचं नातं सांगणारी गाणीदेखील गायली जातात,
“दिन दिन दिवाळी,
गाई-म्हशी ओवाळी,
गाई-म्हशी कुणाच्या,
लक्ष्मणाच्या,
लक्ष्मण कुणाचा,
आई-बापाचा,
दे माई खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी”
एकूणच, घरात दूध-दुभतं राहावं आणि वासरापासून शेतीच्या कामासाठी बैल मिळावेत ही बाब लक्षात घेऊन गायींप्रति कृतज्ञता म्हणून ही पूजा केली जाते. अलीकडे काही शेतकरी गोठ्यातील धन म्हणून सर्वच पाळीव प्राण्यांची पूजा करताना दिसतात.
शेतमाल येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरात साफसफाई करणं, घराला रंगरंगोटी करणं, घर तोरणांनी सजवणं, दारात आकाशकंदील लावणं, घरासमोर पणत्या पेटवणं अशी घरा-दाराची सजावट केली जाते. तसेच खाण्यासाठी गोडाचे पदार्थ केले जातातच, शिवाय कुटुंबातील सर्वांना नवीन कपडे घेतले जातात. दुसरे म्हणजे, दिवाळीला घरा-दारात दिवे लावले जातात, त्यामागे घरात आलेल्या धान्याच्या राशीला कीड, पतंग लागू नयेत आणि तिचे संरक्षण व्हावे, असं कारण आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या दिवट्या पेटवल्या जातात. या दिवट्यांचा घराच्या अंगणात उजेड केला जातो. फटाके फोडून आनंद साजरा करतात. खरीप हंगामातील दु:ख, वाईट प्रसंग यात विसरले जावेत, असा उद्देश असतो.
दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी पूजेसाठी पूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि घरात आलेल्या धान्याच्या राशीची पूजा करतं. काही कुटुंबांत झाडूला लक्ष्मी मानून, तिच्यावर पाणी शिंपडून, हळद-कुंकू वाहून पूजा करतात. हा झाडू नंतर वर्षभर घराची साफसफाई करण्यासाठी वापरला जातो. दिवाळी सणातला पाडवा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा दिवस. शेतकरी सांगतात की, हा शेतकऱ्यांचा कल्याणकारी राजा बळीराजा याचं स्मरण करण्याचा दिवस आहे. तसेच भाऊबीजेचा दिवसही असतो.
अलीकडे हळूहळू दिवाळी उत्सवाचे स्वरूप बदलू लागलं आहे. पूर्वीप्रमाणे कृषी संस्कृतीनुसार दिवाळी साजरी करणं कमी होऊ लागलंय. नवीन पिढीने दिवाळीतील अनेक परंपरा सोडून देण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः शेती क्षेत्राची घसरण सुरू झाल्यापासून अनेक प्रथा, रूढी आणि परंपरा पाळणं कमी झालंय. ज्वारीची लागवड कमी झाल्याने पांडव घालणं कमी झालंय. गायीची ओवाळणी कमी झालीय, गायीची गाणी म्हणणं कमी झालंय. दिवट्या, दिवे लावणं हेदेखील बदलू लागलं आहे. एकूणच दिवाळीकडे फॅशन किंवा मनोरंजन म्हणून पाहण्याकडे कल वाढू लागला आहे.
सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com
सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.
