आम्ही कोण?
अनुभव 

एका ऊसतोड कामगाराची दिवाळी

  • सोमिनाथ घोळवे
  • 20.10.25
  • वाचनवेळ 5 मि.
ustod diwali

दिवाळी हा कृषी संस्कृतीतील आनंदाचा दिवस. या सणाला खरीप हंगामातील शेतमाल घरात येतो. शेतातल्या धान्याच्या राशी घरात आल्यानंतर तीन दिवस उत्साहात साजरे करून खरीप हंगामाला निरोप देण्याचा सण म्हणजे दिवाळी. घरात समाधान, समृद्धीचं प्रतीक म्हणजे दिवाळी.

लहानपणी गावी दिवाळी आनंदात साजरी व्हायची. घराची सजावट, खायला खमंग पदार्थ, वाजवायला फटाके, शेतात फिरायला मोकळं रान अशी गावात धमाल असायची. पण पुढे पुढे शेतात राबायचं किंवा स्थलांतर करून ऊसतोडणीसाठी जायचं, हेच सुरू झालं. सततची अंगमेहनत आणि मोकळा खिसा. त्यामुळे दिवाळीचा आनंद असा कमीच वाट्याला आला.

मी अलीकडे शेती, पाणी, मजुरांच्या समस्या या प्रश्नांवर लिहित असलो तरी मी मुळात ऊसतोड कामगारांचा मुलगा आहे आणि अनेक वर्षं आई-वडील आणि मोठ्या भावासोबत बऱ्याच साखर कारखान्यांवर ऊसतोडणीचं कामही केलं आहे.

दसऱ्याच्या दिवशी बॉयलर पेटवण्याची अनेक साखर कारखान्यांची परंपरा आहे. दिवाळीच्या आधीच पंधरा दिवस कारखाने सुरू होतात. त्यामुळे माझी दिवाळीही अनेकदा उसाच्या फडात झालेली आहे. ही दिवाळी पूर्ण पोरकेपणाची. अनेक मर्यादा, बंधनं, पैशाची चणचण. दिवाळी माझा सण आहे, असं त्यामुळे कधी वाटलंच नाही.

दसरा उत्सवानंतर मुकादमाच्या हट्टापायी लगेच चार दिवसांत कारखान्यावर जावं लागायचं. कारखान्याच्या परिसरात मोकळ्या जागेत, उघड्यावर राहण्याची सोय केलेली असायची. त्याला ‘कोप्यांचा फड’ किंवा ‘गट’ म्हणतात. या मोकळ्या जागेवरचं वाढलेलं गवत उपटून काढून झोपडीसाठी (कोपीसाठी) जागा करायची. त्यावर कारखान्याने दिलेल्या बांबूच्या विणलेल्या सहा चटया आणि दहा बांबूंचा वापर करून निवारा उभा करायचा.

गावी दिवाळी साजरी करताना आई किमान घराला पोचारा देणं, जांभळीच्या झाडाच्या फांद्या लावणं, विविध माळा तयार करून घराची हिरवी सजावट करणं, अशा गोष्टी करायची. पण कारखान्यावर गेल्यावर कोप उभारणी हीच घर सजावट. आकाशदिवा नाही अन् काही नाही. अनेकदा रस्त्यावरचा लाईट देखील नसायचा. त्यामुळे गोड्यातेलाचा दिवा लावायचा. झोपताना तो सुद्धा विझवायचा. देवघर नाही की देवघराची जागा नाही. त्यामुळे दिवाळी असल्यासारखं वाटायचंच नाही.

कारखान्यावर राहायला जागा मिळवून देणं, बैलगाडी देणं, कोपीसाठी चटई-बांबू देणं, अशी कामं आटोपून मुकादम दिवाळीसाठी गावी निघून जायचे. कारखान्यावर गेल्या-गेल्या पहिले दोन-तीन दिवस बागायतदारांच्या ऊसाच्या फडात शेतमजुरीला जावं लागायचं. दिवसभर ऊसाचा पाला साळायचा, ऊस खुरपायचा. निघालेलं गवत जनावरांना आणायचं किंवा संध्याकाळी ऊस खुरपून झोपडीवर येताना चाऱ्याचा भारा बांधून घेऊन यायचा.

कोपी बांधून झाली की पहिल्या दहा-बारा दिवसांमध्येच गावाकडून आणलेला किराणा संपून जायचा. तिकडे गावात दिवाळीसाठी रेशनचा तांदूळ आणि साखर मिळायची. पण तेव्हा आम्ही इकडे कारखान्यावर. त्यामुळे आहे त्या पैशात परवडेल तेवढं आणायचं आणि त्यातच भागवायचं. शिवाय ती कच्ची झोपडी. त्याच्या चारी बाजूंनी आत घुसता यायचं. मग आम्ही फडात गेल्यावर मागे सामान सांभाळणार कोण? भटक्या कुत्र्या-मांजरांनी खायला नको म्हणून खाण्याचे पदार्थ मोजकेच ठेवायचे. कुटुंबातल्या आम्हा चार लोकांचं सामान एका लाकडी पेटीत मावायचं.

दिवाळीच्या किराणामालाच्या खरेदीसाठी थोडेफार पैसे मुकादमाकडून घेतले जायचे. त्याच पैशांत काटकसर करून कसंतरी समाधान मानायचं. कारखान्यांवर गेलो तरीही अनेकदा ऊसाची पहिली खेप होईपर्यंत दहा दिवस निघून जायचे. तरीही आम्हाला दिवाळी साजरी करण्याची फुरसत नसे. कारण बैलं आणि दुभत्या जनावरांना चारा आहे की नाही, याची चिंता असायची. चारा शोधण्यात दिवस-दिवस जायचा. माणसाचं कसंही होईल, पण मुक्या जनावरांना खायला मिळायला हवं, म्हणून अनेकदा स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बांधावरचा चारा चोरून आणावा लागायचा. कारण या बैलांच्या जीवावरच पुढचा सगळा हंगाम आणि ऊसतोडणी अवलंबून असायची.

दिवाळीत सुद्धा आम्हा ऊसतोड कामगारांचा दिवस पहाटे ४ वाजता सुरू होऊन दुपारी ४ वाजेपर्यंत चालायचा. या काळात ऊसाच्या फडात जाणं, ऊस तोडणं, बैलगाडीत ऊस भरणं आणि कारखान्यापर्यंत वाहतूक करणं अशी कामं करावी लागायची.

अशातही दिवाळीचे तीन दिवस आई खायला गोडाधोडाचं करायची. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी नाश्त्याला शेवयांचा भात, दुपारी तांदळाचा भात आणि संध्याकाळी पुरणपोळी. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ऊसाची गाडी भरून आणायची, दुपारी किराणा माल घेऊन यायचा आणि मग करंजी, लाडू, कुरडई, पापड, बुंदी असे मोजकेच पाच-सहा पदार्थ थोडे थोडे केले जायचे. ते दोन दिवसात संपून जायचे. तिसऱ्या दिवशी तिखट काहीतरी म्हणून धपाटे, बेसन, तिखट पुऱ्या. नवनवीन आणि आकर्षित दिसणारे पदार्थ फारसे माहीतही नव्हते किंवा ते खाण्यास खिशाला परवडणारे नव्हते. पुरणपोळी, भात, आमटी, गुळवणी याचाच भर जास्त असायचा.

ज्या ऊस बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तोडण्यासाठी जायचो, त्यांच्या घरून मैद्याची करंजी किंवा पुरी-श्रीखंड मिळायचं. तेच खूप भारी वाटायचं. तिथली मुलं दिवाळीत फटाके उडवायची. आम्ही गुपचूप जवळ उभं राहून बघायचो. घरच्यांकडे फटाके मागितले, की 'पैसे नाहीत' असं उत्तर मिळायचं. त्यामुळे हळूहळू मागणंचं बंद करून टाकलं.

शिवाय ऊसतोडणीच्या कामांमध्ये संकटांची मालिकाच असायची. असंच एकदा ऑक्टोबरच्या मध्यात ऊसतोडणीसाठी कराडला गेलो होतो. त्यावर्षी दिवाळी ३० ऑक्टोबरला होती. पण परतीचा पाऊस काही केल्या उघडायला तयार नव्हता. सकाळी ११ वाजताच आभाळ भरून यायचं. ऊसाच्या फडात असताना पाऊस सुरू झाला आणि बैलगाडी फडातच रुतली तर, या भीतीने लवकर तोडणी करून कोपीवर यावं लागायचं. एका दुपारी बैलगाडी भरून कारखान्याच्या जवळ आलो आणि पाऊस सुरू झाला. काय करावं कळेना. बैलगाडी थांबवली. बैलांच्या मानांवरील जू कसाबसा काढला आणि बैलगाडीच्या आडोशाला थांबलो. पावसात वीज चमकली की मोठा बॉम्ब फुटल्यासारखा आवाज होत होता. दोन तास पाऊस कोसळला. ओढे, नाले भरून वाहू लागले. पाहावं तिकडे पाणीच पाणी. कसबसं कोपीवर आलो, तर कोप्या पाण्यात पोहत होत्या. कोपीतलं सगळं सामान भिजलं होतं. कपडे, खाण्याचे पदार्थदेखील भिजले होते. रोजच्या स्वयंपाकाच्या जागेवर गुडघाभर पाणी साचलं होतं. मग दिवाळीचं खायला काय करणार? कसातरी दुकानातून तांदूळ आणि साखर आणली. तीन दगडांची चूल मांडून भात शिजवला. भातात साखर टाकून खाल्ली. झोपायचे सुद्धा वांदे होते. मग त्या रात्री मी बैलगाडीत झोपलो.

अनेकदा इकडे ऊसतोड सुरू झाली तरी तिकडे गावी खरीप हंगामातली शेतातली पिकांची काढणी-कापणी झालेली नसायची. मग वडील किंवा आई गावी राहायचे. त्यामुळे अर्धं कुटुंब कारखान्यावर तर अर्धं गावी. मग सर्व एकत्र आल्यावर दिवाळी साजरी करू, असं ठरवायचो. गावाकडची शेतातली कामं संपवून वडील कारखान्याला आले की 'आता कुठे दिवाळी राहिली आहे' असं म्हणायचे. सगळंच राहून जायचं.

हीच कहाणी कमीअधिक फरकाने सगळ्या कामगारांची. कुणी कुणाला काय सांगायचं! घरोघरी मातीच्या चुली. 

सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com

सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 5

हेरंब कुलकर्णी22.10.25
अलीकडच्या काळात कष्टकरी आणि गरिबांच्या जीवनाविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण व तपशीलवार लेखन करणाऱ्यांमध्ये तुम्ही आहात याचे नेहमीच कौतुक वाटते इंडियापर्यंत भारताचे दुःख अभ्यासपूर्ण रीतीने पोहोचवणे महत्त्वाचे काम तुम्ही करत आहात त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा

प्रदीप पुरंदरे 21.10.25
सोमिनाथजी, ऊसतोड मजुराचे आत्मचरित्र लिहून तुम्ही मराठी साहित्यात एक नवा प्रवाह निर्माण करा -जसा कधी दलित साहित्याचा होता.

Shriniwas Bhong21.10.25
काय प्रतिक्रिया देणार सोमीनाथ,तुम्हांला सलाम

Shriniwas Bhong21.10.25
काय प्रतिक्रिया देणार सोमीनाथ,तुम्हांला सलाम

कुंडलिक दत्तात्रय कांबळे21.10.25
डॉक्टर घोळवे साहेब आपण स्वतः जगलेले आयुष्य कथन केलेले आहे ऊसतोड कामगारांची जीवन खूप कष्टमय आहे आजही आताही धुळे नंदुरबार येथून ऊसतोड कामगार माझ्या गावात आले आहेत त्यांना कसलाही दिवाळीचा गंध नाही जुनो काही दिवाळी हा सण आपला नाहीच असे त्यांना पाहून वाटते तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिथे कोपऱ्या बांधले आहेत चे त्याच्या आसपास काही का मिळते का ते पाहून काम करत आहेत मासे खेकडे पकडणे सरपंच गोळा करणे अशी कामे चालू आहेत त्यांच्याबरोबर अनेक लहान शालेय वयातील मुले आहेत याचाच अर्थ ही मुलं सहा महिने शाळेत जाणार नाहीत ही समस्या तर फार वाईट आहे अनेक वेळा थंडीमध्ये रात्री बारा दोन चार वाजता ट्रक ट्रॅक्टर भरायला येतो यावेळी अतिशय क** याची थंडी असते तरीही स्थळ कामगारांना उठून म** भरावा लागतो आपली लहान लहान मुलं सहा महिन्याची एक वर्षाची उसाच्या फडात पाचोळ्यावर झोपून महिलांना काम करावे लागते अनेक वेळा चार-पाच वर्षाची मुलं पोपट्यांवर एकटी असतात हल्ली त्यांना बिबट्या सही त्रास होत आहे. हंगामाच्या शेवटी ऊन पडायला चालू होते त्यावेळी ऊसतोड करणे खूप कष्टाचे असते माणसाला साधे उन्हात उभाही राहू वाटत नाही त्याचमुळे ऊस कामगार फळांमध्ये ऊस तोडत असतो त्याच्या अंगातून रामाच्या धारा लागलेल्या असतात आणि पूर्ण हाता पायांवर चेहऱ्यावर उसाने कापलेले असते त्याची आगाख होत असते आणि मनामध्येही विचार चालू असते हा व्यवसाय आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आता जे काही कष्ट करायचे ते करूया व आपल्या मुलांना खूप खूप शिकूया असा विचार करत असते आज यांत्रिक पद्धतीमुळे काही प्रमाणात ऊसतोड कामगारांचे जीवन सुखमय होण्यास हातभार लागलेला आहे.

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results