मी चौथीत असतानाची गोष्ट. पुस्तकात आम्हाला विचारलं जायचं, ‘आपण दिवाळी का साजरी करतो?' अपेक्षित उत्तर असायचं, ‘याच दिवशी रावणाचा वध करून भगवान राम अयोध्येत पोहोचले होते.' तोवर आम्ही कित्येकदा रामकथा ऐकली होती. पण तरीही या कारणासाठी आपण दिवाळी साजरी करत असू हे मला कधीच खरं वाटायचं नाही. फटाके उडवण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते, असं उत्तर कुणी दिलं असतं तर मला ते नक्कीच जास्त आवडलं असतं. नवीन कपडे शिवण्यासाठी दिवाळी साजरी करतात, असं कुणी म्हटलं असतं तर त्यावरही मी चटकन विश्वास ठेवला असता. दिवाळी ही सुट्टीसाठी आणि मौजमस्ती करण्यासाठी असते हेही मान्य झालं असतं. त्या काळात शेतं पिकांनी लगडलेली असतात, असं कुणी म्हणतं तर तेही बरोबरच होतं. पावसाळ्यानंतर घरांची साफसफाई व्हावी यासाठी दिवाळी असते, याबद्दलही माझ्या मनात शंका आली नसती. कारण खरं तर दिवाळीत लोक अशाच गोष्टी करताना दिसायचे. पण तेव्हा असं वाटायचं, की या गोष्टी खऱ्या असल्या तरी त्याहूनही खऱ्या अशा काही गोष्टी असतात आणि त्या फक्त पुस्तकात लिहिल्या जातात.
त्या वेळी अल्लडपणामुळे कसकसले उटपटांग प्रश्न मनात उभे राहायचे. राजा म्हणजे फक्त आदेश देण्याचं काम करणारा माणूस, असं मला वाटायचं. जसे आमच्या घरात थोरले काका फक्त आदेश द्यायचे; कामाला हातही लावायचे नाहीत. आमचं आडनाव श्रीवास्तव असतं तर काकांचं नाव आदेश श्रीवास्तव ठेवता आलं असतं. काका घरी येत तेव्हा कुणी तरी त्यांच्यासाठी पाण्याचा तांब्या हातात घेऊन उभं राहिलेलं असायचं. कुणी त्यांची बैठक साफसूफ करत असायचं. कुणी त्यांचा टॉवेल शोधत फिरायचं, तर कुणी चिलीम. जोवर घरी असायचे तोवर त्यांच्या तोंडात केवळ हुकूम असायचे. माझ्या मनातली राजाची छबी अशीच काहीशी होती. काका कधी कधी दोन-चार दिवस गावाला गेले की आमची चैन असायची; पण ते परतले की त्यांच्यासोबत पुन्हा अशुभ काळ परतायचा. ते दोन दिवसांनंतर परतले तर कमी दुःख व्हायचं, पण चार दिवसांसाठी जाऊन परत आले की थोडं जास्तच दुःख व्हायचं. जगातलं सगळ्यात मोठं दुःख काय असेल याचा मी कधी विचार केलेला नाही, पण मला वाटतं, समजा आमच्या काकांना दहा वर्षांसाठी वनवासात पाठवलं गेलं आहे आणि दहा वर्षांनंतर ते परत आले आहेत तर कसं वाटेल, तसंच काहीसं जगातलं मोठं दुःख असणार.
राम राजा होता आणि तरीही चौदा वर्षांचा वनवास भोगून परतल्यावर त्याच्या प्रजेला कोण आनंद झाला होता. त्याच्या केवळ दर्शनाने लोक पावन झाले होते. एवढंच नव्हे, तर त्या आनंदातच लोक आजवर रोषणाई करत आले आहेत. ही गोष्ट माझ्या नजरेत रामाची इज्जत वाढवणारी होती. पण लहानपणापासून मी थोडा संशयीच आहे म्हणा ना. माझ्या मनात प्रश्न यायचा, की खरंच असं झालं असेल का? पण पुस्तकात लिहिलंय म्हटल्यावर काय बोलणार? कारण पुस्तकं म्हणजे सत्याच्याही वरचढ सत्यच असतात ना!
पण खूपदा पुस्तकं मला कोड्यात टाकायची. उदाहरणार्थ, गाईवरच्या निबंधात गाईबद्दल ज्या गोष्टी लिहिलेल्या असायच्या त्या अगदीच फुटकळ सत्य म्हणता येतील. म्हणजे, गाईला चार पाय असतात, दोन शिंगं असतात. (भांडणात त्यातलं एक तुटलं नसेल तर). गाय चारा खाते आणि दूध देते. खरं तर गाईशी माझं जवळचं, मोकळंढाकळं नातं होतं. तसं नातं अगदी जवळच्या माणसासोबतही जुळलं नाही. म्हणजे गाईसारखं मी कधी कुठल्या माणसाची शी उचललेली नाही. असो. माझी अशी अपेक्षा असायची की पुस्तकांनी मला गाईबद्दल वेगळं, मोठं सत्य सांगावं. ते पुस्तक आहे, तर त्याने गाईला चार पाय असतात हे सांगण्यापेक्षा तिला सहा पाय असतात, असं तरी सांगावं. चार पाय तर तिला असतातच की! तीन शिंगं असतात, असं सांगावं. खरं तर पुस्तकांनी ‘शेण' या शब्दाऐवजीही दुसरा कोणता तरी शब्द वापरायला हवा. म्हणजे मग कुठल्या मुलाला चुकून गाईचं शेण म्हणजे इतरांसारखीच ‘शी' आहे, असं वाटणार नाही.
लहानपणी माझ्या मनात यायचं, राम वनवासातून परतल्यानंतर अयोध्येतल्या सर्वांनाच आनंद झाला असेल का? चर्मकारांना, कोळ्यांना, बायका-पोरांना? समजा, काही माणसं दूर जंगलात राहत असतील आणि त्यांना आनंद झाला नसेल तर त्यांना जाऊन असं सांगितलं गेलं असेल का, की राम वनवासातून परतला आहे आणि आता त्याबद्दल तुम्हाला आनंद साजरा करायचा आहे?
माझ्या मनात प्रश्न यायचा, राम जेव्हा राजा होता तेव्हा देव कोण होतं? की राम राजा आणि देव दोन्ही होता? तसं असेल तर तो राजा केवळ अयोध्येचा असणार आणि देव साऱ्यांचा. मग रावणासाठीही तो देवच असला पाहिजे. मग रावणाला कोणी मारलं? राजा असलेल्या रामाने की देव असलेल्या रामाने? या सगळ्या प्रश्नांनी माझं डोकं गरगरायला लागायचं. मग मी शेंगा खायला लागायचो. शेंगा फोडतानाचा आवाज मस्तच वाटायचा. शेंगेतून मस्तपैकी दोन दाणे बाहेर यायचे. पण तेवढ्याने डोक्यातले प्रश्न थांबायचे नाहीत. ते पुन्हा डोकं वर काढायचे. राजा असणाऱ्या रामाला रावणासोबतच्या युद्धात असंख्य लोक मारले गेल्याचं दुःख झालं नसेल का? दु:ख झालं असेल तर त्याने आपल्या दरबारातल्या एखाद्या मंत्र्याला असं सांगितलं असेल का, की ‘प्रजेला म्हणावं, प्लीज उत्सव साजरा करू नका. वाटल्यास जे युद्धात मारले गेले आहेत त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवे लावा. पुन्हा युद्ध होऊ नये यासाठी दिवे लावा.' जर राजा असलेल्या रामाला युद्धानंतर दिवाळी साजरी करण्यात काहीच हरकत वाटली नसेल, तर देव असलेल्या रामाने त्याला काही सल्ला देऊ केला नसेल का? पण हा विचार मनात आला की मला आमच्या काकांची आठवण यायची आणि मी तो विचार गिळून टाकायचो.
आमच्या गावात एक महिना आधीच दिवाळीची चाहूल लागायची. कामं टाळण्यासाठीही दिवाळीचा महिनाभर आधीपासून उपयोग होऊ लागायचा. कुण्या माणसाने दुसऱ्याला एखाद्या कामाबद्दल विचारलं तर तो लगेच सांगून टाकायचा, “दिवाळीनंतर करून टाकू!” ही इतकी रामबाण सबब असायची की कामाचा तगादा लावणाऱ्यांनाही ती ऐकून घ्यावीच लागायची.
दिवाळीच्या आधी गावातल्या घरा-अंगणांची रंगरंगोटी पूर्ण व्हायची. पावसाळ्यात पोपडे उडालेल्या अंगणांची, भिंतींची अन् ओट्यांची सारवासारव केली जायची. मातीचा एक लेप लावून भिंती अन् जमिनी गुळगुळीत केल्या जायच्या. त्या वेळी गावात पक्कं घर नसायचंच. सगळी घरं लाकूड अन् मातीचीच बनलेली असायची. आम्ही पोरं खेळातही मातीपासूनच छोटी छोटी घरं, आतलं सामान वगैरे बनवायचो आणि घर-घर खेळायचो. दिवाळीच्या आधी घरांची आवराआवरी करण्यात गुंतलेली माणसं पाहिली की आम्हाला हाही ‘घर-घर'चा खेळ चाललाय असंच वाटायचं.
मातीची घरं मला कायम पृथ्वीवर उगवलेली मातीची झाडं वाटायची आणि माणसं म्हणजे त्या झाडावर राहणारे पक्षी. सगळं गाव जेव्हा मातीच्या घरांना सजवण्यात गुंतलेलं असायचं तेव्हा वाटायचं, की पृथ्वी अजूनही आकार घेते आहे. आमच्या गावातले लोकच तिला तयार आकार देताहेत. फक्त माणसं नव्हे, तर जेव्हा पक्ष्यांची घरटी बनायची तेव्हाही पृथ्वीच आकार घेत असायची. मुंग्यांच्या छोट्या वारुळातूनही पृथ्वीच बनत असायची. कदाचित मुंग्याच्या वारुळातून पृथ्वीची एक छोटी फोडच तयार होत असेल. असं वाटायचं, की या जगातल्या कुणाचंही घर तयार होणं बाकी असेल तर त्याचा अर्थ पृथ्वीही अजून पूर्ण तयार झालेली नाही. पृथ्वी सजीवातल्या प्रत्येक जीवाची असायची. त्यावर कोणताही जीव कुठेही बेलाशक आपलं घर बांधू शकतो. आमच्या गावातली मातीची घरं म्हणजे फक्त घरं नसायची. तो पृथ्वीचा एक भागच असायचा.
गुरुजींनी आम्हाला चौथीत असताना सांगितलं होतं की पृथ्वी फिरते आहे. हे सांगताना त्यांचे डोळे हे असे मोठ्ठे झाले होते. त्यांचे ते मोठाले डोळे बघता बघता आम्हा सव्वीस मुलांचे बावन्न डोळेही सताड उघडे राहिले होते. गुरुजींनी सांगितलेली ती बातमी ऐकून मला माझ्यावर मोठा अन्याय झाल्यासारखं वाटत होतं. पृथ्वी फिरते आहे, हे जर गुरुजींना आधीपासूनच माहिती होतं तर ही गोष्ट त्यांनी आम्हाला शाळेच्या पहिल्या दिवशीच का नाही सांगितली? अखेर, आम्हीही पृथ्वीवरच तर राहतोय ना! आमच्या घरी एक तुटकी खुर्ची होती. घरी आलेला पाहुणा त्या खुर्चीवर बसू लागला, तर आम्ही पटकन पुढे होऊन त्याला सावध करायचो की ही खुर्ची लुढकू शकते. एवढी छोटी गोष्टही आम्ही लपवत नसू आणि गुरुजींनी मात्र पृथ्वीएवढी मोठी गोष्ट आमच्यापासून कशी काय लपवून ठेवली? मुंगीच्या फिरण्याची गोष्ट असती तर ती लपवून ठेवता आली असती. पण पृथ्वी फिरते ही गोष्ट... आम्हाला वाटायचं, थोडीफार पृथ्वी तर आम्हीही पाहिली आहे. मग आम्हाला तिचं फिरणं कधीच कसं काय लक्षात आलं नाही? आणि गुरुजींना ते कसं काय कळलं?त्या दिवशीपासून कुठेही बाहेर गेलो की आम्ही पृथ्वीकडे बघत राहायचो. कोण जाणे कुठून तरी ती फिरताना दिसेल!
एक गोष्ट मला भारी वाटायची, की पृथ्वी फिरते तेव्हा तिच्यासोबत माझं घरही फिरतं. मग मी एकेका गोष्टीचा विचार करायचो. ज्या कंगव्याने मी भांग पाडतो तोही फिरत असेल. सुईही फिरत असेल. बादली पाण्याने काठोकाठ भरलेली असेल तर मी त्यातलं थोडं पाणी दुसऱ्या बादलीत काढून ठेवायचो. न जाणो पृथ्वी फिरत असताना चुकून बादली हेंदकाळली तर पृथ्वीच भिजायची. कधी वडील बाहेर जायचे अन् जाताना आईला म्हणायचे, की जरा फिरून येतो, तेव्हा मला फार आश्चर्य वाटायचं. वाटायचं, ‘फिरण्यासाठी वडिलांना बाहेर का जावं लागतंय? आज पृथ्वी फिरत नाहीये का?'
असो. तर दिवाळीआधी आमच्या गावातली मातीची घरं चकाचक होत असायची. आमच्या घरांत खूप सारे जीव येऊन राहायचे आणि त्या घरालाच आपली पृथ्वी मानून तिथे स्वतःचं घर तयार करायचे. कधी कधी आम्हाला चावणारी गांधीलमाशीही आमच्याच घरची थोडी माती घेऊन आमच्या घरीच राहायला यायची. एखादी चिमणी यायची आणि लाकडाच्या तुळईवर स्वतःचं घरटं टांगून जायची. ते बघून त्या लाकडाला आठवायचं, की एके काळी ते स्वतःही एक झाड होतं आणि चिमण्या त्याच्या फांद्यांवर अशीच घरटी करायच्या. आपापल्या घरांची सारवासारव करायला लोक आपापल्या शेतातून माती आणायचे. अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरात थोडं थोडं शेत राहायला यायचं. घरातही जणू शेतांचा-त्यातल्या पिकांचा वास भरून राहायचा. जेव्हा शेतात जायचो तेव्हाही तो गंध मनात दरवळत असायचा. त्यामुळे तासन्तास शेतात राहूनही आपण घरापासून लांब आहोत असं वाटायचंच नाही. घर आणि शेत जणू एकच होऊन जायचं.
शेत विकायला लागण्यापेक्षा दुसरं मोठं दुःख नसायचं. शेत विकल्यावर अनेकदा लोकांना आपल्याच शेतावर मजूर म्हणून जावं लागायचं. दिवाळी जवळ यायची पण ती नकोशी वाटायची. कारण घरांच्या दुरुस्तीसाठी मातीची गरज असायची. लोक माती आणायला विकल्या गेलेल्या शेताकडे चालू लागायचे, पण वाटेतूनच परत यायचे. हक्काच्या शेतातली माती न मिळाल्याने घर उखीर-वाखीर होत जायचं अन् एके दिवशी शेताप्रमाणे तेही हातातून निसटून जायचं.
दिवाळीत मित्रांची उणीव नसायची आणि मित्रांकडे किश्शांची! जुलैत गावातली बरीचशी भाकड जनावरं चार महिन्यांसाठी जंगलात जायची. पाच-सहा गुराखी पोरं या गुरांसोबत असायची. ही पोरं गुरांना घेऊन दिवाळीच्या आठवडाभर आधी गावी परतायची. त्यांच्या येण्याची खबर लागली की आम्ही काही पोरं त्यांच्या स्वागतासाठी पळत सुटायचो. आमच्या गाई-म्हशी-बैल परतत असल्याने आमच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत असायचा. पळता पळता मनात विचार यायचा, आता आपली गाय कशी दिसत असेल बरं? एक अशक्त म्हैस जंगलातून परत आली असेल ना? गुरांच्या त्या कळपातून आम्ही आमच्या गाई-म्हशी शोधत राहायचो. एकदा का गाय दिसली की वाटायचं, धावत जाऊन तिच्या गळ्यात पडावं. ही सगळी जनावरं आपली आपली स्वतःच्या घराच्या दिशेने चालू लागायची आणि थेट त्याच ठिकाणी जाऊन उभी राहायची जिथे त्यांना आधी बांधलं जात होतं. त्यांच्यासाठी नवीन दोर आणलेले असायचे. पण प्रत्येक वेळी एखाद-दुसरं जनावर जंगलाचंच होऊन जायचं. कुणाला वाघ खायचा, तर कुणी आजारी पडायचं. अशक्त जनावरंही पावसाळ्याचे ते चार महिने तग धरू शकायची नाहीत आणि जंगलातच मिसळून जायची. पण जंगलात गेलेल्या प्रत्येक जनावरासाठी एक दोर सजून तयार असायचा. कधी एखादं जनावर परतलं नाही तर त्या सुन्या झालेल्या दोराकडे पाहून डोळ्यांत पाणी यायचं. मग घरातलं कुणी तरी हळूच तो दोर काढून आत ठेवून द्यायचं.
जंगलातून परतलेल्या गुराख्यांकडे कहाण्याच कहाण्या असायच्या. वाघाला पाहिल्याच्या, गाई-म्हशींच्या कळपाने एकत्र येऊन वाघाशी सामना केल्याच्या, वाघाचा पाठलाग करण्याच्या, एखाद्या वासराला वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावल्याच्या. या कहाण्यांनी आमची दिवाळी मालामाल होऊन जायची. गुरं राखून परतले तरी त्यांची कामं संपायची नाहीत. त्यांना शेतात राबावं लागायचं. त्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर शेतातही जायचो. गवत कापता कापता ते आम्हाला गोष्टी सांगत राहायचे.
ही गुराखी पोरं आम्हाला भारी आवडायची. वाटायचं, कधी तरी आपल्यालाही या कहाण्या आपल्या डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळावी. जंगलातून परतलेल्या गुरांकडे पाहिलं की आम्हाला या गुराख्यांचीच आठवण यायची. त्यांच्यामुळेच आज आपली गुरं सुखरूप घरी आली आहेत हे जाणवायचं. या गुराख्यांशी कोणी उद्धटपणे वागलं की आम्हाला खूप वाईट वाटायचं. ते आमच्या घरी यायचे तेव्हा खूप बुजलेले असायचे. बऱ्याचदा अंगणातच उभे राहायचे. घरातून मिळालेलं उरलंसुरलं अन्न आपल्या पटक्यात बांधून घ्यायचे. म्हणायचे, घरी जाऊन खाईन. ते निघायचे तेव्हा गोठ्यातली गाई-वासरं हंबरू लागायची. ते गाईजवळ जायचे आणि तिच्या गळ्याजवळच्या मऊसूत पोळ्यावरून हात फिरवत राहायचे. गाय डोळे बंद करायची आणि त्यांच्या हातावर अलवार आपलं डोकं टेकवायची. ते दृश्य पाहिलं की मला वाटायचं, खरं तर गाय आमची नव्हे, त्यांचीच आहे. आमची शेतं आमच्यापेक्षा त्यांच्याशी जोडलेली आहेत. शेतातलं एक जरी रोपटं कोमेजलं तरी ते आमच्याआधी त्यांना कळायचं. माझी तर पक्की खात्री होती, की जशी आमची गाय त्यांच्याकडे पाहून हंबरते, तसंच आमचं शेतही त्यांच्याशी गुजगोष्टी करत असणार. शेताच्या पोळ्यावरूनही ते हात फिरवत असणार. आमच्या मनातलं त्यांचं स्थान आणखी आणखी उन्नत होत जायचं.
वाटायचं, आमच्या घरात त्यांनी इतर साऱ्या लोकांसारखं ताठ मानेने यावं. आमच्यासोबत दिवाणखान्यात बसावं. आमच्यासोबत जेवावं. ते आमची शेती बघतात, आमच्या गाई-म्हशींचं हवं-नको पाहतात. खरं तर तेच आमच्या जगातले खरे मालक आहेत. पण कधीच कुठली दिवाळी अशी उजाडायची नाही, जी त्यांना त्यांचा खरा हिस्सा मिळवून देईल. दिवाळी नेहमीच ‘मालकां'च्या घरात यायची. गुराख्यांसाठी कायम एकच ऋतू असायचा- ढोरमेहनत करण्याचा ऋतू.
दिवाळीची रात्र असायची. लोक शेजारपाजारांच्या घरी छोटे दिवे घेऊन जायचे. दिवे तिथेच ठेवून म्हणायचे, “मिजबान आये हैं, ध्यान रखियो। उन्हें ठंड ना लगे।” मी आजवर एवढं गोड वाक्य कधीच ऐकलेलं नाही. हे दिवे म्हणजे जणू घरी आलेले पाहुणेच. आज जेव्हा त्या वाक्यामागचा खरा अर्थ ध्यानात येतो तेव्हा त्या वाक्यातला गोडवा आणखी वाढल्यासारखा वाटतो आपल्या नात्यांतलं प्रेम असंच कायम राहावं. त्यात कधीही कमतरता येऊ नये.
बाहेर फटाके उडत असायचे आणि मी या दिव्यांची रोषणाई बघत बसून राहायचो. दिव्यांच्या आसपास नाना प्रकारचे किडे घोंघावत असायचे. आगीची पर्वा न करता ते ज्योतीशी खेळत असायचे. मला भीती वाटायची, की चुकून ते आगीच्या लपेट्यात यायला नकोत. त्या किड्यांना आगीपासून वाचवण्यात मी तासन्तास घालवायचो. आणि दिव्यांनाही. वाटायचं, या ज्योतीच्या माथ्यावर किड्यांना मारल्याचा कलंक बसायला नको.
आजही अमावस्येच्या अंधाऱ्या रात्रीच दिवाळी येते. मी स्वतःच माझ्या घराबाहेर पणती लावतो. हे दिवे पाहून वाटतं, आजच्या अंधाऱ्या जगात प्रकाशाची कापलेली मुंडकी थरथरताहेत. सगळीकडे मारकाट चालली आहे, युद्ध चाललं आहे. दुसरीकडे दिवाळीचा झगमगाट आहे. प्रकाशच प्रकाश! वाटतं, मी प्रकाश तर पुष्कळ गोळा केलाय, फक्त या प्रकाशाचं करायचं काय हेच मला माहिती नाहीये.
आज मनात येतं, या मोठ्या शहरातही शेजाऱ्यांच्या घरी जाऊन बाहेर दिवा ठेवून यावं आणि लहानपणी आमच्या शेजाऱ्यांकडून ऐकलेलं तेच स्निग्ध वाक्य पुन्हा एकदा म्हणावं- ‘मिजबान आये हैं, ध्यान रखियो। उन्हें ठंड न लग जाये।'
