आम्ही कोण?
ले 

माहीत नसलेले जमनालाल बजाज

  • कमलनयन बजाज
  • 11.02.26
  • वाचनवेळ 10 मि.
jamanalal bajaj

एक वेळची गोष्ट आहे. पंजाब काँग्रेसमधील नेत्यांत काही बिनसले होते. डॉ. सत्यपाल आणि डॉ. किचलू आपसात भांडले होते वाटते. प्रकरण काँग्रेस कार्यकारिणीत गेले. भांडण सोडवण्यासाठी काकाजींना पंजाबात जायला सांगितले गेले. मीहि त्यांच्याबरोबर होतो. लाहोर स्टेशनवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जत्था त्यांच्या स्वागतासाठी आला होता. खाण्यापिण्याची आणि राहाण्याची काय व्यवस्था हवी ते काकाजींनी पूर्वीच कळविलेले होते. पण त्यांना उतरविले तेथील व्यवस्था अलीशान होती. त्यातील जबाबदार व्यक्तींना काकाजींनी दोष दिला आणि त्यांना जशी व्यवस्था हवी होती तशी करवून घेतली. अगदी झटपट आणि थोड्याशाच फेरफाराने त्यांनी सारे वातावरण कसे साधेपणाचे बनवून टाकले याचे आश्चर्य त्या घरातील लोकांना वाटलेच, पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवरहि त्याचा चांगला परिणाम झाला.

स्नान वगैरे आटोपल्यावर सर्वांबरोबर नाश्त्याला बसलो. नाश्त्यात कंदहारी डाळिंबे, द्राक्षे, काश्मीरी सफरचंदे अशी तऱ्हेतऱ्हेची बाहेरून मागवलेली फळे आणि मिठाया होत्या. ते म्हणाले मिठाई तर मी खातच नाही आणि प्रांताच्या बाहेरून मागवलेली फळेहि मी घेत नाही. त्यावेळी हाहि त्यांचा नियम होता आणि त्यांनी आधी तसे लिहून कळविले होते. लोक म्हणाले, या दिवसात पंजाबात काही विशेष फळे होत नाही म्हणून त्यांना ही फळे मागवावी लागली. ती पंजाबच्या बाहेरची आहेत पण मिळतात लाहोरच्या बाजारात. काही स्थानिक फळे असतीलच असा आग्रह धरल्यानंतर कोणी म्हणाले, या वेळी इथे बोरे आणि फ्रूट यांच्या-खेरीज दुसरे कोणतेच स्थानिक फळ मिळणार नाही.

काकाजी ताबडतोब म्हणाले, मग मला बोरे आणि फ्रूटच द्या. मी तीच खाईन. बाकीचे तुम्ही सर्वांनी स्नेहाने ग्रहण करावे. आपसातील भांडणाच्या वातावरणात हास्याचे फवारे अडाले आणि वातावरण निवळले.

नंतर कार्यकत्यांशी बोलत असता त्यांनी या सर्व घटनेचा उल्लेख केला. आम्ही काँग्रेसचे सेवक म्हणवतो आणि गरीबांच्या सेवेचे नांव घेतो. अशा तऱ्हेने विनाकारण खर्च करीत राहिलो आणि असा थाट आणि अवडंबर माजवीत राहिलो तर देशातील गरीब जनतेपर्यंत आपण कधी पोचूच शकणार नाही. आपली सेवा म्हणजे दंभच ठरेल. असे दुःखहि प्रकट केले. दोन्ही बाजूच्या लोकांवर याचा फार परिणाम झाला. नंतरच्या चर्चेत ते लोक म्हणालेहि की आम्ही तर जमनालालजींना एक मोठे शेठ मानत होतो आणि त्यांच्या इतमामाप्रमाणे आदर सत्कार करू शकू की नाही याबद्दल संकोचहि होता. पण त्यांचा साधेपणा, सरळपणा आणि खरेपणा पाहून आम्ही फार प्रभावित झालो आहोत. नंतर भांडणातील मुद्दा काय होता आणि त्यांच्या काय काय चुका झाल्या हे दोन्हीकडच्या लोकांनी येऊन स्पष्टपणे सांगितले. त्यांना जास्त समजावण्याची गरजच पडली नाही. काकाजींची बुद्धि किंवा प्रतिष्ठा यापेक्षा त्यांचे वरील गुण आणि सर्वांबद्दलचा समभाव यामुळेच सगळ्यांमध्ये स्वाभाविकपणे एकी घडून आली. नंतर जाहीर सभा झाली. त्यात काकाजींचे व्याख्यान तर झालेच पण दोन्ही पक्षांच्या पुढाऱ्यांची परस्पर सद्भावना व्यक्त करणारी भाषणेहि झाली.

याचा परिणाम जनतेवर आणि पत्त्रकारांवरहि चांगला झाला. एका पत्त्रकाराला बोलताना मी ऐकले, की आम्ही तर समजत होतो की काँग्रेस कार्यकारिणीने इथली भांडणे मिटविण्यासाठी एका बनियाला आणि शेठजीला पाठवून काय शहाणपणा केला ! इथले भांडखोर नेते धुरंधर आहेत. एखाद्या निष्णात वकील-बॅरिस्टरखेरीज हा रोग आटोक्यात यायचा नाही. पत्रकाराच्या या बोलण्यावर त्यांच्याचपैकी दुसरा कोणीतरी म्हणाला, आम्हालाहि तसेच काहीसे वाटत होते. पण जमनालालजी गांधींचा माणूस आहे हे विसरून चालणार नाही. गांधीजींनी असल्यातसल्या माणसाला आपल्याजवळ फटकूहि दिले नसते. काँग्रेसची प्रतिष्ठा अशाच नेत्यामुळे वाढलेली आहे. बाकी नुसते शिकलेले नेते तर पुष्कळ आहेत.

काकाजींच्या जीवनाला दिखावटीचा किंवा बनावटीचा स्पर्शहि झालेला नव्हता. त्यांचा पत्त्रव्यवहारहि साध्यासुध्या बोलचालीच्याच भाषेत होत असे. आजहि त्यांची पत्रे वाचताना वाटते की जणु काकाजीच बोलत आहेत. त्यांच्या भाषेत विद्वत्ता नसायची पण जीवनाची अनुभूति आणि व्यवहारातील जाण असे. दुसऱ्याचे दुःख-वेदना पाहून ते द्रवित होत असत. कोणालाहि आनंदात, सुखात पाहिले म्हणजे त्यांना प्रसन्नता वाटत असे. ईर्षा आणि द्वेष त्यांना कदाचितच कधी वाटला असेल.

आपल्यासाठी खर्च करतेवेळी एकेक पैचाहि पूर्ण विचार करीत असत काकाजी. स्वतःवर कसलाहि अनावश्यक खर्च त्यांना सहन होत नसे. पण दुसऱ्यासाठी खर्च करण्याचा प्रसंग असे तेव्हा ती व्यक्ती स्वतःसाठी कसा खर्च करते याचा विचार ठेवीत असत. त्याला अनुरूप, आपल्या सिद्धांतांच्या विरुद्ध न जाता खर्च करण्यात आम्हा मुलांकडून किंवा मुनिम गुमाश्त्याकडून काही उणीव राहिली तर ती त्यांना सहन होत नसे. आम्हाला रागवूनहि घ्यावे लागत असे.

काँग्रेसच्या आणि काही अन्य कामांसाठी काकाजी कानपुरला गेले होते. तिथले काम झाल्यानंतर, मला वाटते, आम्ही अलाहाबादला चाललो होतो. स्टेशनवर काँग्रेसची मंडळी आणि इतर मित्रहि पोचवायला आले होते. काकाजी बहुतेक तिसऱ्या वर्गातूनच प्रवास करीत असत. 'नवीनजी' (श्री वालकृष्ण शर्मा 'नवीन') काकाजींना म्हणाले, तुमचे तिसऱ्या वर्गात प्रवास करणे आम्हाला सहन होत नाही. याचा तुमच्या तब्येतीवर वाईट परिणाम होईल, तुमची काम करण्याची क्षमता घटेल. हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न नाही. तुमची कार्यशक्ति कमी होणे किंवा तब्येतीवर परिणाम होणे यात देशाची हानि आहे. तुम्ही स्वतःच्या बाबतीत इतकी काटकसर करावी किंवा निष्काळजीपणा करावा हे आम्ही सहन करू शकत नाही.

तिसऱ्या वर्गातील प्रवासाचा काकाजींना किती त्रास होत असे याची घरातील मंडळींना आणि आम्हा मुलांनाहि कल्पना होती. त्यांच्या थोराड शरीराला तिसऱ्या वर्गाच्या बाकावर झोपणेहि कठिण होत असे, कूस बदलणे तर दूरच. कित्येकदा दुसऱ्या कुशीवर वळण्यासाठी ते आधी उठून बसत मग कूस बदलून झोपत. पण असे असूनहि झोप त्यांना गाढ येत असे आणि चित्त प्रसन्न राहात असे. सह प्रवाशांबरोबर गप्पा, चेष्टा चालतच राही. त्यांच्यातील एखादा मनात भरला तर त्याला प्रभावित करून रचनात्मक, राजनैतिक किंवा व्यापारी कामासाठी पकडण्याचा प्रयत्नहि चालू असायचा. लांबच्या प्रवासात डब्यातील प्रवाशांचा एक परिवारच बनत असे. अशा प्रवासात काकाजींबरोबर राहाणाऱ्या आमच्यासारख्यांना खूप शिकायसवरायला मिळत असे.

आम्ही आग्रह करीत असताहि, इतकेच नाही, मोतीलालजी, मालवियजी आणि गांधीजी यांनी सांगितले असताहि तिसऱ्या वर्गाचा प्रवास सोडण्याची त्यांची तयारी होत नसे. तिसऱ्या वर्गाने प्रवास करण्याचा त्यांचा काही नियम नव्हता, तरीहि नेहमी ते तिसऱ्या वर्गातच प्रवास करीत. कधी काही खास कारणाने मध्यम, दुसऱ्या किवा पहिल्या वर्गातून जावे लागलेच तर ते जात असत. पण असे प्रसंग फार कमी येत, आणि येत तेव्हाहि त्यात शारीरिक श्रम अगर त्रास वाचविण्याचा इतका हेतू नसे, दुसरे काही अनिवार्य कारण त्यात असायचे. प्रवासात त्यांचा आहारहि अधिकतर शेंगदाणे, चणे, गुळ, मुळा, गाजर, टमाटू, पेरु, पोपई, केळे वगैरेच असे. डब्यातील जेवढे प्रवासी सहयोग देऊ शकत त्या सर्वांबरोबरचे ते एकप्रकारचे सामूहिक भोजनच होत असे.

नवीनजींच्या म्हणण्यावर उत्तरादाखल त्यांनी तिसऱ्या वर्गातील प्रवासाच्या फायद्यांची एक यादी सांगितली. १. श्रम करण्याची सवय होणे. २. कठिण प्रसंगी प्रसन्नचित्त राहाणे ३. जनतेशी सरळ संपर्क ठेवता येणे. ४. जनता, कार्यकर्ते आणि नेते यांमध्ये एक प्रकारची अभिन्नता आणि आत्मीयता जाणवणे, वगैरे. याशिवाय आपण सार्वजनिक कार्याची जबाबदारी घेतो तेव्हा केवळ कोणाचे प्रतिनिधित्व करतो, नेतृत्व करतो म्हणून त्यांच्यापेक्षा जास्त आरामात प्रवास करावा असा कोणताहि नैतिक अधिकार आपल्याला नाही. आम्हाला देशासमोर आणि जनतेसमोर अशी उदाहरणे ठेवायची आहेत की ज्यांचे ते आत्मसन्मानपूर्वक अनुकरण करू शकतील. शरीराला त्रास देण्याने तब्येत बिघडत नाही, उलट सुधारते. मानसिक दृष्टीनेहि, वरच्या वर्गातून प्रवास करण्याने मला घमेंड येऊ शकते, माझी नम्रता, माणुसकी कमी होऊ शकते.

एका गृहस्थांनी मोतीलालजी आणि मालवीयजी यांचे उदाहरण देऊन म्हटले, तेहि तर वरच्या वर्गाने प्रवास करतात. यावर काकाजी अतिशय नम्रतेने आणि श्रद्धेने म्हणाले, ते आमचे गुरुजन आहेत, श्रद्धापात्र आहेत. त्यांचे वय आणि कार्यक्षमता पाहता ते कोणत्या वर्गाने प्रवास करतात ही अगदी क्षुद्र आणि गौण गोष्ट ठरते. त्या महान व्यक्तींच्या बाबतीत आमच्या मनात असे काही येणेच अनुचित आहे. त्यांच्या कितीतरी गोष्टी आम्हाला शिकण्यासारख्या आणि अनुकरणीय अशा आहेत. त्यांचे जीवन बनून गेले आहे, पण आपल्याला तर आपले जीवन अजून बनवायचे आहे, पुष्कळ शिकायचे आहे, समजायचे आहे. त्याग आणि तपश्चर्येखेरीज शुद्ध आणि अखंड ज्ञान कसे मिळू शकणार ! कराची काँग्रेसमध्ये आम्हीच तर प्रस्ताव केला की स्वराज्य मिळाल्यावर कोणालाहि महिना पांचशे रुपयापेक्षा अधिक वेतन मिळू नये. याचा सरळ अर्थ असाच नाही का की आपण आपल्यासाठीहि पांचशेपेक्षा जास्त खर्च करू नये ?

ही गोष्ट आणखी स्पष्ट करण्यासाठी नवीनजींनी सांगितले तेव्हा काकाजी म्हणाले, कराची प्रस्तावानंतर त्यांचा स्वतःचा खर्च पांचशेच्या आतच होऊ लागला. यात त्यांचा सचिव आणि एक नोकर यांचा पगार, तिघांचा प्रवासखर्च, तार-पत्रे आणि कपडेलत्ते सर्व सामिल आहे. परिवारातील इतर सदस्यांचा आणि पाहुण्यांचा खर्च निराळा. आपली हार होते आहे हे पाहून नवीनजी म्हणू लागले, तुम्हाला समजणे कठीण आहे. पण तुमचा हा त्रास आम्हाला सहन होत नाही. नंतर माझ्याकडे बघत म्हणाले, कमलला विचारा, त्याला काही आराम मिळतो काय ?

काकाजी लगेच म्हणाले, याला आरामाचा विचार करायचा असेल आणि वरच्या वर्गातून प्रवास करायचा असेल तर माझा काहीच अडथळा नाही. पण याच्यामुळे मी आपली साधना सोडता कामा नये, आणि आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य साधनायुक्तच असले पाहिजे.

बोलण्यात थोडी गंभीरता येत चालली होती. नवीनजी माझा हात हलवीत म्हणाले, अरे बाबा तू तरी काही बोल.

मी म्हणालो, काकाजींचे जे मजबूत तर्क आहेत त्यांच्यावरच तुम्ही हल्ला चढवला आहे, तिथे ते हरू शकत नाहीत. त्यांचा स्वभाव तुम्हाला चांगला माहीत असता तर त्यांच्या कमकुवत बाजूवर तुम्ही वार केला असता. तुम्ही त्यांच्या तब्येतीवर होणारा परिणाम आणि देशाचा लाभ याविषयी म्हणालात. पण खरी गोष्ट अशी आहे, की काकाजी आहेत कंजूष. वरच्या वर्गाने प्रवास केल्याने खर्च त्यांचा होईल. त्याचा फायदा अप्रत्यक्ष का होईना देशाला होत असला तरी त्यातून यांना काय लाभ होणार ?

नवीनजी म्हणाले, शेवटी बनियाचा मुलगा बनियाच असणार.

गाडीची वेळ झाली होती. काकाजी आणि मी डब्यात बसलो. नवीनजी चिमटा काढण्याच्या हेतूने म्हणाले, जय पैशाचाच झाला. आमच्यासारख्या मित्रांच्या सल्ल्याला कोण विचारतो ! 'चमडी जाय पर दमडी न जाय' या म्हणीचे खरे मर्म आजच लक्षात आले. पूर्वीच लक्षात आले असते तर आम्हीहि शेठ बनलो असतो.

गाडीची शिटी झाली, गाडीने बावटा दाखवला, आणि गाडी निघाली. काकाजी म्हणाले, तूहि पैसे वाचवायला शीक. वाचवशील ते मला दे. मी ते चांगले व्याजी लावीन. अडीअडचणीत ते तुझ्या कामी येतील. जो पैसा मी वाचवतो किंवा वाचवू शकतो तो जनहितासाठी वापरण्याचा तुम्हा सगळ्यांना अधिकार आहे.

गाडीची गति वाढली. बोलणे तेवढ्यावरच थांबले. आदर आणि स्नेहयुक्त अशा या तकरारींमधून परस्परांबद्दलची किती आत्मीयता प्रकट होत होती. कार्यकर्ते आणि नेत्यांमधील असे स्नेहपूर्ण आणि निडर संबंधच आपल्या राष्ट्रीय आंदोलनाची एक फार मोठी शक्ति होती. नेते आपल्या अनुयायांकडून किंवा देशातील जनतेकडून कसलाहि त्याग, बलिदान करून घेऊ शकत होते त्याचेहि हेच कारण होते.

असे निर्भीक, निर्दोष, शुद्ध मानस देशात एक वातावरण बनवण्यासाठी आणि नैतिक शक्ति संचारित करण्यासाठी फार मदतगार झाले. आजच्या नेतृत्वात तो खरेपणा, त्याग, तपश्चर्या, तन्मयता आणि परस्परांवरील विश्वास व आत्मीयता यांच्या उणीवेमुळे देशातील वातावरण दूषित होत चालले आहे. संकुचित स्वार्थभावना आमच्यावर स्वार होत आहे, आणि कल्याणकारी शक्तींचा ऱ्हास होत आहे. मानवी आणि दैवी गुणांची किंमत राहिली नाही. समाजातील अविचार आणि दुर्गुण यांच्या विरोधात जो पुण्यप्रकोप जागृत झाला पाहिजे तो मृतवत् होत चालला आहे. या वातावरणाचा प्रसार थांबवण्यासाठी एकाद्या संत-महात्म्याच्या आह्वानाची गरज आहे.

गीतेत म्हटल्याप्रमाणे कदाचित शुद्धतेविषयीची ग्लानि अद्याप तेवढी आली नसेल की त्यासाठी दैविक शक्तींना अवतरित व्हावे लागावे. पापाचा घडा अजून काठोकाठ भरला नसावा. एका दृष्टीने हे आमचे श्रेयहि आहे तर दुसऱ्या दृष्टीने उणीवहि. आमच्यातील सुप्त सज्जनता सौजन्य संकटात आहे, गोंधळलेले आहे. काय करावे आणि कसे करावे हे त्याला समजत नाही. हीच अस्वस्थता आम्हाला त्रस्त करीत आहे. एकादे वेळी या ग्लानियुक्त वातावरणाच्या दाबाखाली सौजन्यच चक्काचूर होऊन जायचे. भारतीय मानसावर अंधारून आल्याप्रमाणे वाटते. पण त्याचा आत्मा अद्यापहि सत्याच्या प्रकाशाने प्रज्वलित आहे. या अंधारातून भावी भारताच्या उज्वलतेचा स्पष्ट भास होतो. गांधीजीहि शेवटच्या क्षणापर्यंत प्रार्थना करीत राहिले, 'सबको सन्मति दे भगवान !'

(परंधाम प्रकाशन, पवनार यांच्या १९७३मध्ये प्रकाशित झालेल्या 'काकाजी बापू विनोबा' या पुस्तकातून साभार.)

(अनुवाद – तारा भागवत)

कमलनयन बजाज







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results