आम्ही कोण?
ललित 

कथात्रयी

  • मेघश्री दळवी
  • 08.11.25
  • वाचनवेळ 7 मि.
meghashri dalawi

मूडगेम

“वॉव!” लीना चित्कारली.

सकाळी उठल्यावर सर्वांत आधी सगळ्यांसारखं तिने तेच बघितलं- मूडगेम आणि त्याचा स्कोअर.

किती छान गेम आहे! सुरू करून आपले डोळे स्कॅन करायचे. त्यावरून मूडगेम आपला अंदाज घेतो आणि आपल्याला एक कल्पित प्रसंग दाखवतो. जवळच्या मित्राचं प्रमोशन, आपला प्रेमभंग, अचानक मिळालेलं पारितोषिक किंवा मोठं अपयश- काहीही. तेव्हा आपण काय प्रतिसाद देणार याचा तात्काळ निर्णय घ्यायचा. त्यावरून मूडगेम आपल्याला पॉइंट्स देतो, काही उपयुक्त सूचना देतो.

रोज सकाळी एक छान निर्णय घेतला की स्कोअर चांगला मिळतो, डोपामाइन स्रवतं. मनात आनंदाचे तरंग उमटतात. प्रफुल्लित वाटतं. आणखी काय हवं? स्कोअर बघून ती खूष झाली. थोडा प्राणायाम करून त्या दिवसाच्या कामाला लागली. सजग, शांत, उत्फुल्ल. आदल्या दिवसाला विसरून.

लीनालाही माहीत होतं, की मूडगेम फक्त एक गेम आहे. पण मनाला शांती देणारा, स्थिर ठेवणारा हा उपयोगी गेम सर्वांच्या आयुष्यात कधी रुजून गेला कुणास ठाऊक! अगदी पाच वर्षांच्या मुलापासून थेट शंभरी पार केलेल्या सर्वांपर्यंत त्याचा वापर करायला मुभा होती. तशी सरकारी अनुमतीच होती. मूडगेम प्रत्येकाला अनुरूप असेच प्रसंग दाखवायचा. त्यात हिंसा नव्हती, चुकीच्या गोष्टी नव्हत्या की काही अनैतिक वा बेकायदा नव्हतं. उलट, त्याच्या वापराने आपलं व्यक्तिमत्त्व उमलतं, कठीण प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता वाढते, मानसिक ताण कमी होतो, हे साऱ्यांच्या लक्षात आलं होतं.

एके काळी मानसिक आरोग्याचे प्रश्न इतके बिकट झाले होते, की समाजात हिंसा, नैराश्य, एकटेपणा यांचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. तेव्हा लोकांच्या भावनिक तणावावर मात करण्यासाठी काही तरुण तंत्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी मिळून हा गेम विकसित केला होता. लीनासारख्या काहीजणांनी त्याला आणखी एक ॲप म्हणून हिणवायचा प्रयत्न केला. पण गेममागचा गट ठाम होता, की हे ॲप नाही, हा गेम आहे. यामध्ये सराव आहे. रोजच्या अशांत जगात तुमचं मन कसा निर्णय घेतं याचा सराव.

मग लीनाच्या लक्षात आलं, यात तुम्ही रोज नवीन प्रसंगांना सामोरं जाता, प्रतिसाद देता. ते प्रसंग कल्पित असले तरी ते तुमच्या आतले विचार बाहेर आणतात, मन कसं वागतं याचा पॅटर्न तयार करतात. इथे मनाला शिस्त लावायची, चुकांमधून शिकायची, सुरक्षित वातावरणात निर्णय घेऊन त्याचे परिणाम अनुभवायची संधी आहे.

आयुष्याचं गेमिफिकेशन!

गेममध्ये पॉइंट्स मिळवले की खऱ्या आयुष्यात इतका ताण वाटत नाही, अकारण स्पर्धा होत नाही की कुणावर कुरघोडी केल्याचं समाधान मिळवायचे प्रयत्न होत नाहीत. आदल्या दिवसाला विसरून नवा दिवस सुरू केल्याने मनावर कोणतंही ओझं नसतं. शिवाय दिवसातून एकदाच खेळायचं असल्याने ॲडिक्शन होत नाही. एकदम क्लीन, एकदम छान!

रिसर्च पेपर्सही सांगायला लागले, की या गेममध्ये हिंसा नाही, चुकीच्या भावनांना उगीच खतपाणी नाही. उलट, त्याचा काही तरी चांगला परिणाम आहे, मनःस्वास्थ्य आणि सामाजिक संतुलन वाढवण्याचं त्यात सामर्थ्य आहे.

प्ले स्टोअरवर मूडगेम हा सर्वाधिक वापरलेला गेम दिसायचा यात नवल नाही. ऑफिसमध्येही कोणी स्कोअर विचारल्याशिवाय राहत नसे. एकदा तर लीनाची मॅनेजर महत्त्वाच्या मीटिंगमध्येच मूडगेम स्कोअरवर बोलत बसली होती.

सगळ्यांसारखी लीनाही हसून स्कोअरविषयी उत्तर देत असे, पण आपल्या आयुष्यात या गेमचं नक्की स्थान काय, हा प्रश्न तिला पडायचा. कधी वाटायचं, आधी स्कोअरचं आपल्यापुरतं महत्त्व होतं तेच बरं होतं की काय? कारण एकदा त्याची व्याप्ती वाढल्यावर सार्वजनिक आयुष्य पार बदलून गेलेलं दिसायला लागलं. शाळांमध्ये मुलं आपला स्कोअर फुगवून सांगायची. आपल्याला किती बॅजेस मिळाले आहेत, कोणती लेव्हल पार केली आहे याची चर्चा सर्वत्र ऐकू यायची. आणि एरवीही लीडरबोर्डवर आपलं नाव वर गेलं की माणसं आणखी आनंदून जायची.

मूडगेमच्या लीडरबोर्डचे स्क्रीनशॉट्स, मीम्स, रील्स, छोट्या क्लिप्स, सगळं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होतं. वेगवेगळे हॅशटॅग्ज दररोज ट्रेंड होत होते. नवे स्कोअर हॅक्स, फॉर्म्युले, रिॲक्शन्स झपाट्याने व्हायरल होत होते. लीना रोज सकाळच्या खेळानंतर हे सगळं स्क्रोल करत राहायची; कधी उत्सुकतेने, कधी नुसत्या सवयीने.

सोशल मीडियावर चाललेला हा गाजावाजा इतका जोरदार होता, की लवकरच मूडगेमच्या आकडेवारीचा अहवालांमध्ये समावेश होऊ लागला. आणि हे सगळं इतक्या वेगाने सुरू होतं की त्या झंझावातात सगळेच ओढले जात होते.

मूडगेम स्कोअर आता फक्त गेमपुरता उरलेला नव्हता. कमी स्कोअरमुळे लीनाच्या नवऱ्याची चांगल्या नोकरीची संधी हुकली होती. एका मावसभावाला डेटिंग ॲपवर सतत नकार मिळाल्याचं कळलं, त्याच्यामागे मूडगेमचा कमी स्कोअरच होता. तिने त्याला काही युक्त्या सांगितल्या, पण तरीही त्याचा स्कोअर अपेक्षेइतका होत नव्हता.

हळूहळू लोक मूडगेम आणि खऱ्या आयुष्यातला फरक विसरत चालले. आयुष्याचं गेमिफिकेशन सहज स्वीकारत त्यात रमायला लागले.

सगळं इतकं चांगलं, सुरळीत चाललं असताना कुणालाच जाणवलं नव्हतं, की मूडगेम थोडा थोडा बदलत होता. वैविध्य आणि नव्या विचारांना प्रोत्साहन देणारा गेम एकसाची निर्णयांना जास्त स्कोअर देऊ लागला होता. अर्थात, हा बदल इतक्या सूक्ष्म पातळीवर होत होता की तो कुणाच्याच लक्षात आला नाही.

सकाळी गेम खेळून माणसं मोकळी व्हायची. नंतर दिवसभर त्या स्कोअरच्या छायेत जगायची. लीनालाही दिवसभरात एखादा निर्णय घेताना यावर मूडगेम काय स्कोअर देईल, असा मनात विचार यायचा. आपला सहकारी काय निर्णय घेईल, काका काय निर्णय घेतील यावर तिचं मन आंदोलत राहायचं. कधी कधी तिला वाटायचं, हा निर्णय माझा आहे की मूडगेमच्या फॉर्म्युल्याचा? पण लगेच तो विचार दूर सारत ती कामाकडे लक्ष द्यायची.

फक्त स्कोअरच नाही, तर विशिष्ट बॅजेस मिळवण्यासाठी आणि लेव्हल्स वेगाने चढण्यासाठीही लोक चतुरपणे फॉर्म्युले वापरू लागले. कुठे कुठे फोरम्सवर ते मिळायला लागले. मूडगेमचे प्रसंग नैतिकदृष्ट्या कठीण असतील तर काय करायचं याचे रील्स, पोस्ट्स, पॉडकास्ट्स दिसायला लागले. इतकंच काय, काय केल्याने स्कोअर वाढेल याचे कोर्सेसदेखील पटापट बाजारात आले.

योग्य निर्णयाचा अर्थ आता बदलला होता. योग्य म्हणजे जे मूडगेमला हवे असतात ते, बाकीचे चूक- एवढंच उरलं होतं.

मग मूडगेमने सहनशीलता, संवेदनशीलता आणि नवीन विचारांना कमी स्कोअर द्यायला सुरुवात केली. जवळच्या मित्राचा मृत्यू, प्रेमभंग, अपयश, अपमान यात काही आवेशपूर्ण निर्णय आल्यास स्क्रीनवर सूचना झळकू लागल्या : शांत राहा, हे स्वीकारणं शहाणपणाचं ठरेल. एकदा लीनाला सूचना मिळाली- तुमचा विचार इतरांपेक्षा वेगळा आहे, कृपया काळजी घ्या. दचकून तिने आजूबाजूला पाहिलं, पण सगळे आपल्याच नादात होते.

हळूहळू सर्वांच्या लक्षात आलं- स्थैर्य, एकरूपता, एकसमानता यांना जास्त स्कोअर मिळतो. मग पूर्वीचे विविधरंगी गुंतागुंतीचे नैतिक पेचप्रसंग मागे पडले. तिथे आता तेच तेच साचेबद्ध प्रसंग येऊ लागले. लोक त्या प्रसंगांत अपेक्षित असेच वागायला लागले. कधी स्कोअर कमी झाला तर पुढच्या दिवशी फारच सोपा प्रसंग समोर येई. अजिबात खोल विचार न करता स्कोअर वाढवायला संधी मिळते म्हणून सगळे खूष होत. त्यांचे विचार उत्स्फूर्त आणि वैयक्तिक राहिले नाहीत. ते एका ठराविक चौकटीत बंदिस्त होत चालले.

कधी तरी चुकून बाहेर पडलेल्या विचाराने स्कोअर घसरेल म्हणून लोक आता जास्त सावध झाले. आधीच्या निर्णयांचा विचार न करता दर दिवशीच्या प्रसंगावर सोपे निर्णय घेऊ लागले. विरोध टाळून जास्त स्कोअर मिळेल हेच बघत राहिले.

चौकट अधिक घट्ट होत गेली.

हळूहळू लोकांनी आतल्या आत विचार करणंही कमी केलं. बोलणं तर फारच कमी.

स्वतःचा आवाज ही संकल्पनाच थोडी थोडी फिकी होत गेली. लीनालाही जाणवायचं, की मनात काही वेगळं वाटलं तरी ते व्यक्त करण्याचं धाडस होत नव्हतं. तिचा एक सहकारी आधी जोरजोरात हसून पूर्ण ऑफिस दणाणून टाकायचा. एक मैत्रीण सतत भांडायच्या आविर्भावात असायची. पण आता खोडकर, भांडखोर, हट्टी, लाडिक असा कोणी आजूबाजूला उरला नव्हता. कुठेच. सगळ्यांची वाक्यं, प्रतिक्रिया, एकाच पठडीतल्या वाटायच्या. कुणाच्याच बोलण्यात काही वेगळं वाटेनासं झालं. सगळ्यांचा सूर एकसारखा होता शांत, सुसंगत, सौम्य. हसणंही मंद, राग जुजबी आणि आश्चर्यही मोजकंच.

तरीही एक दिवस लीनाने न राहवून विचारलं- आपण अजून माणूस आहोत ना? की माणसाचंदेखील पूर्ण गेमिफिकेशन झालं आहे?

पण तो आवाज फारसा कुणाला ऐकू गेला नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी नेहमीसारखा मूडगेम सुरू केला- आपापले स्कोअर वाढवण्यासाठी.

लीनानेही.

(उर्वरित कथा वाचा, यंदाच्या अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात..)

अंक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे-

१. इंस्टामोजो

२. बुकगंगा

३. ॲमेझॉन 

मेघश्री दळवी

मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results