मी या बंद खोलीसमोर उभी आहे. तीस वर्षांपासून एक दिवस असा गेला नाही, की मी या खोलीचा विचार केला नसेल. या खोलीत काय आहे? मला माहीत नाही. माझ्याच घरातली ती एक अज्ञात बंद खोली. ती खुळी आजी याच खोलीतून दुसऱ्या जगात गेली म्हणे. या खोलीचा दुसरा दरवाजा बोळीत उघडतो. त्यालाही बाहेरून कुलूप लावलेलं आहे. खुळ्या आजीला जाऊन ५० वर्षं झाली, तरी त्या बोळीतल्या दरवाज्यापाशी म्हाताऱ्या बाईचा वावर आजही जाणवतो म्हणतात. ती येत असेल का अजून इथे? किंवा कदाचित त्या खोलीत काहीच नसेल, हीसुद्धा शक्यता आहेच की. मात्र, त्या नीलममावशीने हे खोलीचं खूळ माझ्या मनात घातलं.
माझ्या लहानपणी आम्ही तालुक्याच्या गावी भांबऱ्याला राहत होतो. घर भाड्याचं होतं. मातीच्या भिंती, अंगण, परस. आमचे घरमालक देसाई. गल्लीच्या टोकाला त्यांचा भला थोरला वाडा होता. तरी त्यांनी आमच्या चार खोल्यांच्या घरातली एक खोली कुलूप घालून बंद करून टाकली होती. त्यांची मुलगी अलका माझ्या वर्गात होती. तिने मला एकदा सांगितलं होतं, की तिची आजी खुळी झाली होती म्हणे. मग तिच्या वडिलांनी आणि काकांनी आता आम्ही राहतो तिथले तेव्हाचे भाडेकरू काढून टाकून आजीची रवानगी इथे केली. तिला बघायला दोन बाया ठेवल्या. आजी नऊवारी साडी नेसायची. तिचा चेहरा गोल होता आणि ती बुटकीशी होती, असं अलका सांगत होती. आजी तब्येतीने ठणठणीत होती म्हणे; पण तिच्या डोक्यावर परिणाम झाला. या खोलीच्या घरातल्या दरवाज्याला आणि बोळीतल्या दरवाज्याला त्या आजीने स्वत: कुलूप घातलं म्हणतात. त्यानंतर ती खोली कुणीच उघडली नाही.
आमच्या रोजच्या जगण्यात त्या खोलीचा उल्लेखही कधी व्हायचा नाही. सवयीने त्या खोलीचं अस्तित्वच सगळे विसरून गेले होते जणू. पिढी आणि काळ उलटला तसे तिच्याविषयीचे प्रश्न पडायचंदेखील बंद झालं असावं. पण नीलममावशीमुळे ती खोली जागी झाली आणि आज तीस वर्षांनी मी त्या खोलीसमोर पुन्हा उभी आहे.
आधी या सगळ्याची सुरुवात कशी झाली ते सांगते. तेव्हा मी १३-१४ वर्षांची असेन. दोन दिवसांपासून गावात प्रचंड पाऊस कोसळत होता. महादेवाचं मंदिर पाण्यात बुडालं. शाकंबरीच्या उंबऱ्याला पाणी लागलं. कुंभारगल्लीत पाणी शिरलं. आम्ही पूर बघायला गेलो. शाकंबरीच्या देवळातून पुराचं लाल पाणी सुंदर दिसत होतं. पाण्यातले भोवरे तर फारच ओढ लावत होते. त्या रात्री ते भोवरे माझ्या स्वप्नातसुद्धा आले. देवळाचे पुजारी आमच्या आजोबांचे मित्र. त्यांनी माझ्या लहान बहिणीला आणि मला कुवारीण आली म्हणून दूध वगैरे दिलं. नारळ दिला. देवळातल्या त्या गोड दुधाने मला मळमळायला लागलं होतं.
मी घरी आले तर आई-बाबा शेजारी जोश्यांच्याकडे गेले होते. पाऊस थोडा कमी झाला असला तरी वाऱ्याने चार वेळा छत्री उलटी झाली होती. भिजायला झालं होतंच. मी माझे आणि पियूचे कपडे बदलले. ती तर पेंगळूनच गेली होती. तेवढ्यात लाइट गेले. बॅटरीच्या उजेडात मी इमर्जन्सी लाइट शोधला; पण त्याचं चार्जिंग संपलं होतं. मग दोन मेणबत्त्या लावल्या. रेडिओ लावला. पियू दिवाणावर आडवी झाली ती झोपलीच. आता तिन्हीसांजेला झोपली म्हणून आई ओरडणार; पण मी तिला झोपू दिलं. त्या थकल्या चिमुकल्या जिवाला उठवणं मला पाप वाटलं. मी खिडकीतून पाऊस बघत गाणी ऐकत बसले. रात्र होईल तशी अंधाराची आणि पावसाची स्पर्धा सुरू झाली. अंधार अधिक गडद की पावसाच्या धारा अधिक ठळक असं त्यांचं सुरू होतं. मी बारीक डोळे करून कोण जिंकतंय ते ठरवत होते. तेवढ्यात नीलममावशी आली.
आजी तिला गावाने ओवाळून टाकलेली म्हणायची. पण ती आईची मैत्रीण होती. आईला सवयच आहे अतरंगी
माणसांशी मैत्री करायची, असंही आजी म्हणायची. आजी-आजोबा काकाकडे गेले असल्यामुळे नीलममावशी आली. नाही तर ती नाही यायची. अर्धवट भिजत घाईघाईने ती आली. तिच्या केसांत पावसाचे मोती विखरून गेले होते. मान ओली दिसत होती. पोटावर ओला पदर चिकटून गेला होता. पाठीवर ओघळ आले होते. पाय मातीने माखले होते. पदराने चेहरा पुसत ती हसत होती. तिला जणू
स्वतःचीच गंमत वाटत होती. मी तिच्याकडे बघत बसले. चेहरा पुसून, पाय धुऊन केसांच्या बटा कानांमागे सारत ती माझ्या शेजारी झोपाळ्यावर येऊन बसली तोपर्यंत माझी नजर तिच्यावरून हटली नव्हती. “आई-बाबा जोशीकाकूंकडे गेलेत,” तिने काहीही न विचारता मी तिला सांगितलं.
आता ती वळून माझ्या डोळ्यांत बघू लागली. काही तरी बोलू लागली. मला ते ऐकू येत नव्हतं. मला तिच्या डोळ्यांत बघायचं नव्हतं. मला तिच्या मानेपासून ते पायांपर्यंत तिच्याकडे बघायचं होतं. एकदम फुरसतीत. आणि तसंच मागूनही बघायचं होतं. तिची पाठ अजून ओली असेल का? की तिने पुसली असेल? तिच्या टाचा स्वच्छ झाल्या असतील का? पण मला यातलं काहीच बघता येईना. आता तिने डोळ्यांत बघितल्यामुळे मला डोळ्यांत बघणं भाग होतं.
तेवढ्यात दोन्हींतली एक मेणबत्ती वाऱ्याने विझली. एकदम अंधारल्यासारखं झालं. काही सेकंदांनी त्या कमी प्रकाशाची सवय झाली आणि नजर सरावली. मी समोर बघून झोका घ्यायला लागले. रेडिओवर ‘ए मेरे दिल कहीं और चल' गाणं सुरू झालं आणि दुसऱ्या ओळीला रेडिओसुद्धा बंद पडला. आता जग मागे पडून मी पुढे आले. माझ्या पायाला मघाचचं पुराचं पाणी आणि तेव्हा एखादं चिकटलेलं पान जाणवायला लागलं, हात थंड पडले, पोटात भूक साठायला लागली, जिभेला काही तरी गरम चमचमीत हवंसं वाटायला लागलं, कानांना पाऊस आव्हान द्यायला लागला आणि नाकाला नीलममावशीचा वास यायला लागला. ती आईसारखी अत्तर, पावडर वापरायची नाही. हा तिचा तिचा मूळचा वास होता. उग्र. आजी महाभारताच्या गोष्टी सांगते त्यात सत्यवती आणि द्रौपदीला त्यांचे त्यांचे वास होते म्हणे. नीलममावशी मागच्या जन्मी द्रौपदी असेल का, या विचारावर मी स्थिर झाले. माझी तंद्री लागली. आणि एकदम माझ्याजवळ येत कानात नीलममावशी खुसफुसली, “मी खोटारडी आहे!”
बाकी सगळे आवाज शांत झाले. जग थांबलं आणि कानात तो खुसफुसलेला आवाज घुमला, “मी खोटारडी आहे!”
एकदम लाइट आले. आई-बाबाही आले. मी स्तब्धच होते. माझ्या कानांत सन्नाटा होता. आई नीलममावशीशी बोलायला लागली; पण मला काहीच ऐकू येत नव्हतं. तिच्याशी बोलता बोलता आईने पियूला उठवलं. देवापाशी दिवा लावला. बाबा त्यांच्या त्यांच्या कामाला लागले. आई स्वयंपाकाला लागली. नीलममावशीला आत ये म्हणाली. पण ‘आले' म्हणून मावशी माझ्यापाशीच थांबली.
तिने मला तिचं एक गुपित सांगितलं- “माझ्या जिवाला त्याच्यापासून धोका होता म्हणून मी त्याला मारलं. मला जगायचं होतं म्हणून मी त्याला मारलं. हे माझं गुपित आहे. कुणाला सांगू नको.”
काही सेकंद शांततेत गेले. आम्ही दोघीही सरळ समोर बघत होतो. पाऊस कोसळत होता. झोका मागे- पुढे होत होता. वाऱ्याच्या झुळकेने अंगावर काटा येत होता.
“मग हे गुपित तू मला का सांगितलंस?”
“कारण मला ते माझं कर्तृत्व वाटतं.”
“काय कर्तृत्व? नवऱ्याला मारलंस हे?”
“नाही. ते गुपित राखलं, पचवलं, हे.”
“पण मग कुणाला कशाला सांगायचं ते?”
“त्याशिवाय ते कर्तृत्व कसं ठरणार? घटनेला साक्षीदार पाहिजे की! त्याशिवाय त्याला काय अर्थ आहे?”
तिचं म्हणणं मला फारसं समजलं नाही. मी तशीच झोका घेत विचार करत राहिले. मग तीच पुढे म्हणाली, “आता ही बंद खोली-”
“ती त्या अलकाच्या खुळ्या आजीने बंद केलीय ना?”
“ती खुळी होती असं कोण म्हणालं तुला?”
“अलका म्हणाली.”
“तुला माहितीय, जगात कुणीच खुळं नसतं. किंवा आपण सगळेच खुळे आहोत. एखादा माणूस खरंच वेडा झाला आहे का आणि एखादा नाहीय का हे कुणीच सांगू शकत नाही. हे सगळं संख्येचं गणित आहे, बस. आपली संख्या अधिक, म्हणून ती आजी खुळी!”
“पण तिला भास व्हायचे म्हणे काय काय..”
“आत्ता मी हे बोलते आहे ते तुझे भास नाहीत कशावरून?”
मी शांत झाले. मला हे झेपत नव्हतं, पण मजा येत होती. तेव्हाच्या त्या पौगंडावस्थेत मला माझ्या शरीरातल्या एकेका अवयवाच्या संवेदना जाणवायला लागल्या होत्या. ती अवयवांची जाणीव होण्याची प्रक्रिया भारी होती. आज पहिल्यांदा मला मेंदूची जाणीव झाली. वणवा पेटणं, वारा सुटणं, धबधबे कोसळणं, इमारती उलट्या-पालट्या होणं, बस-रिक्षा-मोटारी उधळणं, रस्त्यातून एखादा हत्ती चालत जाणं, असं काय काय व्हायला लागलं. बाकी शरीराची जाणीवच नाहीशी झाली आणि तरंगल्यासारखं, उंच चढ्यावर चालत निघाल्यासारखं आणि घरंगळल्यासारखं असं सगळं एकदमच वाटायला लागलं.
माझ्या तरंगणाऱ्या मेंदूला आणखी झोका देत मावशी म्हणाली, “आजीने ती खोली बंद करून ठेवली; पण तिला ती कुणाला उघडू द्यायचीच नव्हती तर किल्ली कशाला जपून ठेवली?”
“कुठंय किल्ली?”
“माझ्यापाशी आहे. मी पुजाऱ्याकडून मिळवली.”
“पुजारीकाकांकडे होती?”
“नाही. आजीने देवीला एक सोन्याचा हार घातला होता, त्या हाराची मागची कडी त्या किल्लीची होती.”
“कशी मिळवलीस?”
यावर तिने डोळे, भुवई आणि जीभ अशी काही फिरवली की मला समजलं तिने पुजारीकाकांसोबत काय केलं ते. आपल्याला हे समजलं याचं मला आश्चर्य वाटलं होतं आणि अभिमानही. एकदम मोठ्या बाईच्या थाटात मी तिला विचारलं, “कुठे?”
“मंदिरातच. देवीला प्रदक्षिणा घालायला मागे गेलीस की एकदम अंधार आहे बघ. तिथेच.”
“पण हे पाप नाही?”
“पुजाऱ्यासाठी पापच. मी पाप वगैरे काही मानत नाही.”
“ते पुजारी नास्तिक आहेत का?”
मावशीने माझ्याकडे एकदम कुतूहलाने पाहिलं आणि ती हसायलाच लागली. तिने हाताची बोटं फिरवून मी काय बोलतेय विचारलं.
“अगं, आई म्हणते, की देव बघतोय ही भीती ज्याला नाही तो नास्तिक.”
“त्या पुजाऱ्यांना हे माहिती नसेल. ते वेगळ्याच कशाला तरी नास्तिक समजत असतील.”
“असेल. पण मग ती किल्ली कुठंय?”
“माझ्याकडच्या गीतेच्या पुस्तकात.”
तेवढ्यात आई आली. मावशी आईसमोर यातलं अजिबात काही बोलली नाही. थोड्या वेळाने ती गेली. ती जी गेली ती परत मला अशी एकटी कधी भेटलीच नाही. पहिले थोडे दिवस मी तिच्या त्या गप्पांचा खूप विचार करायचे. त्यात तासन्तास डुंबून राहायला मला आवडायचं. शाळेतून एकटीने घरी येताना, अंघोळ करताना, झोपताना मी त्या खुळ्या आजीचा, धाडसी नीलममावशीचा आणि पापी पुजाऱ्याचा विचार करायचे. पण मावशीला ते करताना मजा आली असेल का? मावशीऐवजी किल्ली मिळवण्याचं काम आपल्याला करायला मिळालं असतं तर बरं झालं असतं का? माझे विचार भरकटत जायचे.
नीलममावशीने आपल्याला एक गुपित सांगितलं, तर आपणही एक गुपित सांगावं म्हणून मी एके दिवशी दुपारी शाळेला बुट्टी मारून तिच्याकडे गेले. मला तिथे माझे आजोबा आणि पुजारीकाका सापडले. त्या तिघांचं जे चाललं होतं ते मला एकीकडे किळसवाणं वाटलं, तर दुसरीकडे त्याचं जाम आकर्षणही वाटलं. एकीकडे राग आला, एकीकडे हेवा वाटला. मी गेल्या पावली परत शाळेत जाऊन बसले. शाळा सुटल्यावर पोहण्याचा दिवस नसूनही सारिकाच्या मागे लागून तिला घेऊन सोनारांच्या विहिरीत पोहायला गेले. मनसोक्त डुंबून, सारिकासोबत मजा-मस्ती करून मी दुपारचा अनुभव पाण्यात बुडवून टाकला. मी परत नीलममावशीशी कधीच बोलायला गेले नाही. ती कुणी वाईट बाई आहे असं मला वाटत होतं म्हणून नाही, तर मी तिच्यासारखी होत जाईन, मला तिच्यासारखी व्हावंसं वाटतंय, या कल्पनेने घाबरून मी तिच्याकडे गेले नाही.
पण त्या खोलीचं काय? तिच्याकडच्या किल्लीचं काय?
(संपूर्ण कथा वाचा, यंदाच्या अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात..)
अंक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे-
१. इंस्टामोजो
२. बुकगंगा
३. ॲमेझॉन
मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com
मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.
