आम्ही कोण?
काय सांगता!  

सीड व्हॉल्ट्स - पृथ्वीवर सर्वनाश झाला तर...

  • प्रीति छत्रे
  • 16.07.26
  • वाचनवेळ 2 मि.
seed vault

समजा, एखादा नैसर्गिक (अथवा मानवनिर्मित) महाप्रलय आला, सर्व झाडं, जंगलं, शेतं, पिकं नष्ट झाली तर माणसाला खायला काहीच उरणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या बी-बियाणांचे नमुने सुरक्षित राखून ठेवले तर त्यातून पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल, अशा विचाराने जगभरात अनेक देशांमध्ये बियाणांची विशिष्ट शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करण्यात येते. त्याला ‘सीड व्हॉल्ट’ असं म्हटलं जातं.

भारताचा असा ‘सीड व्हॉल्ट’ लडाखमध्ये चांग-ला खिंडीजवळ आहे. २०१० साली त्याची निर्मिती झाली. चांग-ला खिंड समुद्रसपाटीपासून १७ हजार फुटांहून अधिक उंचीवर आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांतील पाच-एक हजार पिकांच्या विविध जमातींची बियाणं इथे कडेकोट बंदोबस्तात साठवलेली आहेत. अतिशीत तापमानामुळे आणि कमी आर्द्रतेमुळे इथे बियाणं वर्षानुवर्षं साठवून ठेवणं शक्य होतं. ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अल्टिट्यूड रिसर्च’च्या नोंदींनुसार अशा प्रकारे साठवलेलं कांद्याचं बी ४१३ वर्षं टिकू शकतं, तांदूळ ११०० वर्षं, गहू १६०० वर्षं, तर वाटाण्याचं बी तब्बल ९००० वर्षं टिकू शकतं. एखाद्या पीकप्रकाराची जमात काही कारणाने नामशेष झाली तर इथली बियाणं वापरून त्या पिकाला पुनर्जन्म देता येईल, अशी यामागची मूलभूत कल्पना आहे.

हेही वाचा - हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या लांडग्यांचं पुनरुज्जीवन

हा जगातला दुसर्‍या क्रमांकाचा मोठा ‘सीड व्हॉल्ट’ आहे. पहिला क्रमांक जातो ‘स्वालबार्ड ग्लोबल सीड व्हॉल्ट’कडे. स्वालबार्ड (Svalbard) हा नॉर्वेच्या उत्तरेकडचा द्वीपसमूह आहे. इथे २००८ साली मोठा जागतिक ‘सीड व्हॉल्ट’ उभारण्यात आला. इथे जगभरातल्या जवळपास सर्व देशांमधील विविध पिकांची बी-बियाणं जतन केलेली आहेत. त्यामागेही वरती म्हटलेलीच कल्पना आहे.

अशी वेळ कुठे येणार आहे, कशाला हा आटापिटा, असं एखाद्याला वाटू शकतं. तर, नुकतीच अशी एक वेळ आली होती. सिरियातील यादवी युद्धामुळे तिथल्या एका स्थानिक पीकप्रकाराची सर्व शेती नष्ट झाली. ना त्याचं बियाणं शिल्लक राहिलं. तेव्हा तिथल्या शेतकी संशोधकांनी ‘स्वालबार्ड ग्लोबल सीड व्हॉल्ट’मधून त्या विशिष्ट पिकाचं बियाणं बाहेर काढलं आणि लेबनॉनमध्ये त्याची पेरणी करून त्या पिकाला पुनरुज्जीवित केलं.

सजीवसृष्टीचा सर्वनाश झाला तर त्यातून पुढे तगून राहण्यासाठी तजवीज करणारी मनुष्यजमात त्या सर्वनाशात टिकून राहील हे गृहितक यामागे आहे, हे मान्य केलं तरी सिरियाच्या उदाहरणावरून अशा ‘सीड व्हॉल्ट्स’चं महत्त्व लक्षात यावं.

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results