आम्ही कोण?
काय सांगता!  

ड्रॅगन ब्लड ट्री - येमेनी कल्पवृक्ष

  • प्रीति छत्रे
  • 25.05.26
  • वाचनवेळ 2 मि.
dragon blood tree

आशियातल्या येमेन देशाच्या दक्षिणेला अरबी समुद्रातल्या सोकोट्रा (Socotra Island) नावाच्या बेटावर एक नैसर्गिक आश्चर्य पाहायला मिळतं - ड्रॅगन ब्लड ट्री. सोकोट्रा बेटावरच्या अंतर्गत भागातील एका पठारावर या झाडांचं जंगल उभं आहे. ही झाडं इथे ५०० वर्षांपासून उभी असल्याचं मानलं जातं.

या झाडांच्या बाबतीतली पहिली आश्चर्याची गोष्ट, म्हणजे त्यांचा आकार आणि रंगरूप. लांबून पाहताना या झाडांचा आकार छत्रीसारखा दिसतो. मोठं, जाडगेलं, ओबडधोबड खोड आणि वरती टोकाशी छोट्या छोट्या फांद्या आणि पानांची गच्च दाटी.

या झाडाची उंची ३० फुटांपर्यंत वाढू शकते. वरच्या पानांच्या छत्रीचा विस्तार साधारण ३५-४० फूट असतो. उंची आणि विस्ताराच्या तुलनेत याची पानं लहान वाटतात. मात्र प्रत्यक्षात पूर्ण वाढ झालेली पानं चांगली दीड-दोन फूट लांब असतात.

पण ही झाडं मुख्यत्त्वे ओळखली जातात ती एका वेगळ्या कारणासाठी. या झाडांमधून लाल रंगाचा चीक (sap/resin) निघतो. म्हणून या झाडांना ‘ड्रॅगन ब्लड ट्री’ हे नाव पडलं. स्थानिक लोकांमध्ये या चिकाचे अनेक उपयोग करून घेण्याची पूर्वापार पद्धत आहे. रंगनिर्मिती, पारंपरिक औषधं, सौंदर्यप्रसाधनं अशा अनेक उत्पादनांमध्ये याचा वापर होतो. आज हा चीक गोळा करून येमेनच्या मुख्य भूमीवर तसंच भारतात विक्रीसाठी पाठवला जातो. सोकोट्रा बेटावरच्या स्थानिकांसाठी याचं मूल्य मोठं आहे. ते त्यांच्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे.

हेही वाचा - 'बाओबाब'च्या ढोलीत मावतात तब्बल ४० माणसं

तसंच, या झाडांची पानं दणकट दोरखंड बनवण्यासाठी उपयोगी असतात. तर फळं गुरांसाठी खाद्य म्हणून वापरली जातात. आपल्याकडच्या नारळाच्या झाडाप्रमाणे तिथल्या लोकांसाठी ही झाडं म्हणजे कल्पवृक्षच म्हणायला हवीत.

मात्र आज या येमेनी कल्पवृक्षाचं अस्तित्व धोक्यात आहे. दुष्काळ आणि अतिरिक्त चराईमुळे नवीन झाडं उगवण्याचं प्रमाण घटत चाललं आहे. काही स्थानिक जुनीजाणती माणसं या झाडांचं संवर्धन करण्याची जमेल तशी थोडीफार खटपट करतात.

बाकी, येमेनसारख्या वर्षानुवर्षं युद्धाने जर्जर झालेल्या देशात वनस्पतीसंवर्धनाची फिकीर कोण कशाला करतंय... मग ते एकमेवाद्वितीय ‘ड्रॅगन ब्लड ट्री’ का असेना! 

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results