मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन् घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते. “अरे साहेबा, तुझा हात दे', ‘लवकर हात दे, तुला बाहेर काढतो!' अनेकजण असं ओरडून त्याला म्हणत होते; पण तो अधिकारी काही केल्या हात देत नव्हता आणि गटांगळ्या खात होता.
“माझा हात घे.” नसरुद्दिन जोरात ओरडला आणि काय, त्या अधिकाऱ्याने लगेच मुल्लाचा हात घेतला आणि मुल्लाने त्याला पाण्याबाहेर काढलं. चकित नजरेने बघणाऱ्या लोकांकडे बघत मुल्ला म्हणाला, “अरे वेड्यांनो, तुम्हाला माणूस समजायला हवा. तो कर वसुली अधिकारी आहे. तो तुम्हाला कसं काही देणार? मात्र, तुम्ही त्याला ‘हे घे' असं म्हटलं तर तो चटकन समजेल अन् हात पुढे करेल.”
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.
