ओशा सांगतात,
एका मंदिराच्या मागच्या परसात भोपळ्याचा वेल होता. त्याला बरेच भोपळे लागले होते. काही आस्तिक होते, काही नास्तिक. काही पुरोगामी, काही प्रतिगामी. काही एका धर्माचे, काही दुसऱ्या धर्माचे.
सगळ्यांमध्ये जोरदार झगडे सुरू झाले. एक दिवस एक साधू मंदिराजवळून चालला होता. त्याला सगळ्या भोपळ्यांनी थांबवलं आणि आपल्यापैकी नेमकं कोण श्रेष्ठ आहे, याचा फैसला करायला सांगितलं.
साधू म्हणाला, “मी कशाला सांगायला हवं. तुम्ही सगळे डोक्यावर उभे राहा. आपोआप कळेल.”
सगळे भोपळे डोक्यावर उभे राहिले. डोक्यावर त्यांना कडक कडक काही लागलं. ते त्यांचे देठ होते. त्यांना जोडणारी वेल होती. आपण एकाच वेलीवरचे भोपळे आहोत आणि भोपळेच आहोत, हे कळल्यावर सगळे भोपळे खजील होऊन हसू लागले.