“मोझेस!” देवाने हाक दिली. “मोझेस, मी आजारी असताना तू मला भेटायला का आला नाहीस?”
“देवा, नाही समजलो मी!” मोझेस म्हणाला. “देवा, तुम्ही सर्वशक्तिमान आणि परिपूर्ण असताना आजारी कसं पडाल?”
देवाने उत्तर तर टाळलं आणि वरून पुन्हा प्रश्न केला. “मोझेस, मी बिछान्यात तळमळत असताना तू माझी चौकशीसुद्धा केली नाहीस. असं का?”
“देवा! आता काय म्हणू! मला तर काहीच कळत नाही. तुम्ही आजारी, तुम्ही बिछान्यात! अशक्यच! नाही समजत मला.” मोझेस कळवळून म्हणाला.
“माझे अनुयायी आजारी तर मी आजारी, जेव्हा माझी लेकरं अस्वस्थ तर मी बेचैन. तू भेटला का नाहीस?”
मोझेसच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. गुडघ्यावर येत तो म्हणाला, “देवा परमेश्वरा, आता मला समज आली. आता जेव्हा तुझे आत्मज आजारी-अस्वस्थ असतील तेव्हा मी सेवेत कसूर करणार नाही.”
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.