येशीदा नावाचा एक सुफी फकीर होऊन गेला. जन्मभर देवाची उपासना केल्यानंतर वृद्धावस्थेत तो मृत्युशय्येवर पडला होता. त्याचा शिष्यवर्ग शेवटचा संदेश ऐकण्यासाठी त्याच्याभोवती जमा झाला. अचानक येशीदा धडपडून आपल्या शय्येवरून उठला. सारे शिष्य कळवळून म्हणाले, ‘काय झालं.. असं काय करता?'
येशीदा म्हणाला, "काय सांगू? माझ्या स्वप्नात देव आला आणि त्याने मला तीन प्रश्न विचारले. दोनची उत्तरं मी दिलीत, मात्र तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ, या विचाराने मला कापरं भरलं आहे."
सारे स्तंभित झाले. आपल्या गुरूला गर्भगळीत करणारा प्रश्न काय असावा, याचं सगळ्यांना कोडं पडलं. एकच गदारोळ उठला.
शांत राहा असं हाताने खुणावत, मोठा श्वास घेत येशीदा म्हणाला, "देवाने मला पहिला प्रश्न विचारला, ‘येशीदा, तू मोझेससारखा का नाही झालास?' यावर मी म्हणालो, की ‘हे परमपित्या, तू मला मोझेससारखी कर्मठ निष्ठा आणि कणखर आज्ञापालन करणं दिलं नाहीस म्हणून मी मोझेससारखा झालो नाही.' देवाचं समाधान झालं.
त्याचा दुसरा प्रश्न होता, 'येशीदा तू येशूसारखा का झाला नाहीस?' मी लगेच म्हणालो, 'हे दयाघना, तू मला येशूसारखं प्रेमळ मन आणि सर्वांप्रती ममत्व प्रदान केलं नाहीस म्हणून मी येशूसारखा नाही होऊ शकलो.' देवाचं समाधान झालं.
आता देव तिसरा प्रश्न काय विचारणार याचा मला अंदाज आला आणि मी घाबरून-दचकून ताडकन उठून बसलो''.
शिष्यांनी विचारलं, ''तुम्ही पहिली दोन उत्तरं योग्य दिलीत. मग आता का तगमग?'' येशीदा म्हणाला, आता देव मला विचारणार, की ‘येशीदा तू येशीदा का झाला नाहीस? मी तर तुला येशीदा होण्याचे सर्व गुणधर्म दिले होते की नाही? मग दे उत्तर!' यावर काय उत्तर देणार मी? सारं आयुष्य मी कुणाचं ना कुणाचं अनुकरण करण्यात घालवलं, स्वत:कडे कधीच बघितलं नाही, आणि आता शेवट जवळ आला, काय तोंड दाखवू त्या परमपित्याला?''
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.