ओशो सांगतात,
मोहम्मद पैगंबरांचे शिष्य हजरत अली यांनी एकदा पैगंबरांना विचारलं, “माणूस स्वतंत्र आहे की परतंत्र?”
पैगंबर म्हणाले, “माणूस स्वतंत्र आहे आणि त्या स्वातंत्र्याला मर्यादा आहेत.”
अली म्हणाले, “असं कसं? एकतर सगळं माणसाच्या करण्याने व्हायला हवं, नाहीतर सगळं ईश्वरी इच्छेने तरी व्हायला हवं. स्वतंत्र आहे, तर मर्यादा कशा?”
पैगंबर म्हणाले, “एक पाय उचलून उभा राहा.”
अलींनी डावा पाय उचलला, उजव्या पायावर भार देऊन ते उभे राहिले.
पैगंबर म्हणाले, “आता उजवा पाय उचल.”
अली हसून म्हणाले, “असं कसं शक्य आहे? दुसरा पाय उचलला तर मी पडेन ना?”
पैगंबर म्हणाले, “आता कळलं का? एक पाय उचलण्याचं स्वातंत्र्य तुला आहे. पण, तो उचलला की दुसरा उचलता येत नाही, ही त्या स्वातंत्र्याची अंगभूत मर्यादा आहे.”