आम्ही कोण?
अनुभव 

केन झकरमनच्या गावात!

  • वंदना अत्रे
  • 01.11.25
  • वाचनवेळ 9 मि.
ken zuckerman

स्वित्झर्लंडच्या बासेलमध्ये त्या दिवशी तापमानाचा आकडा एकावर स्थिरावला होता, इतकी थंडी! तिथलं कॅफेचं छोटं अंगण मात्र भारतीय रागसंगीतावरील चर्चेने, रियाझाने तापायला लागलं होतं. सकाळी सुरू होणारी ही सत्रं कित्येकदा रात्री नऊपर्यंत चालायची. भारतीय रागदारीचे सूर कानांना तृप्त करत होते. सरोदच्या धीरगंभीर स्वरांबरोबर तेथील युरोपीय विद्यार्थी भारतीय पद्धतीने हातावर ताल देत होते. सांजेच्या वेळी यमनच्या रागदारीत आम्ही पुरते बुडून गेलो. हा राग संध्याकाळचा असला, तरीही त्याच्या स्वरांमध्ये गोडी इतकी, की तो कधीही गायला तरी हृदयापर्यंत भिडणारा.

बासेलच्या म्युझिक ॲकॅडमीतले प्रसिद्ध सरोदवादक गुरू आणि त्यांचे विद्यार्थी डोळे मिटून त्या रागदारीची आराधना करत होते. कुठंही न चुकता हा राग असा आळवला जात होता, की त्याने आत्मानुभूती देत त्या रागातील भावभावनांची, उत्कटतेची, आनंदाची जणू पखरणच केली आमच्यावर! आपण भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या एका युरोपीय देशात ही सुंदर मैफल ऐकतोय, यावर विश्वासच बसत नव्हता. सरोदच्या स्वरांत आम्ही हरवलो होतो. ते युरोपीय सरोदवादक होते, केन झकरमन. या सुरांनी देशांच्या भौगोलिक सीमा ओलांडून ‘विश्वचि माझे घर’चा अनुभव दिला होता.

गेली ३८ वर्षं भारतीय रागसंगीत शिकवणाऱ्या स्वित्झर्लंडमधील बासेलमधल्या गुरुकुलाला भेट देण्याची संधी गेल्या वर्षी अनपेक्षितपणे मिळाली ती प्रशांत जोशी यांच्यासारख्या उमद्या मित्राने सर्वार्थाने पाठबळ दिल्यामुळे. बासेलमधील म्युझिक अकादमीमध्ये जाताना मनात शंका होती, ती भाषेचा अडसर येण्याची. सीमेच्या एका बाजूला फ्रान्स आणि दुसऱ्या दिशेला जर्मनी अशा दोन देशांना एकाच वेळी हस्तांदोलन करणारं हे शहर. चार कोस दूर गावाकडून शहरात कामाला यावं, तशी इथे फ्रान्स-जर्मनी या दोन देशांमधून माणसं रोज कामासाठी ये-जा करतात. रस्त्यावरून चालताना ऊन-सावलीसारख्या या देशांच्या दोन भाषा आपल्या मागे-पुढे चालत असतात. त्यामुळे पहिल्या दिवशी म्युझिक अकादमीमध्ये जाताना मनात एकच प्रश्न होता, कसा असेल पहिला दिवस?

अकादमीच्या कार्यालयात असलेल्या फ्रेंच माणसाशी बोलताना उडालेली त्याची आणि माझी तारांबळ जाम रडकुंडीला आणणारी होती; पण या हातघाईच्या संभाषणानंतर जवळच्या टेबलवर काम करत बसलेली हसरी, स्पॅनिश ज्युलिया भेटली आणि झळझळीत ऊन अंगावर पडावं असं मन प्रसन्न झालं. तिच्या अवतीभवती वेगवेगळ्या देशांची, वेगळ्या ध्यासाने पछाडलेली तरुण माणसांची नुसती गजबज होती. खरं सांगायचं, तर एखाद्या संगीतशाळेत तरुणांची एवढी गर्दी बघण्याची सवय नसल्याने काहीशी भांबावूनच गेले होते, पण गप्पा सुरू झाल्या. काही वेळात घसा सुकल्यावर अकादमीमधील कॉफी आणि बरोबर नेलेल्या चिवडा नामक इंडियन स्नॅक्सचा क्षणार्धात चट्टामट्टा उडाला!

पहिल्याच संध्याकाळी सरोदवादक केन झकरमन यांची मैफल होती. त्यांना चाळीस वर्षं तबलासंगत करणारे पंडित स्वपन चौधरी यंदाही साथ करणार होते. बाहेर शून्य तापमान, पण म्युझिक अकादमीचं सभागृह मैफलीपूर्वी अर्धा तास तुडुंब भरलं. सभागृहात गोरे श्रोते आणि मराठी रसिक बरोबरीच्या संख्येने होते. सर्वांची एकच ओळख- केन यांच्या सरोदवादनावर अमर्याद प्रेम करणारे रसिक! भारतीय संगीताने झपाटलेल्या परदेशी मंडळींच्या शोधाचा प्रवास मला या सुंदर वळणावर घेऊन आला होता.

या प्रवासाला सुरुवात झाली चार-साडेचार वर्षांपूर्वी. खरं तर लेख लिहायला बसले आहे केन आणि त्याच्या गुरूकुलाबद्दल. पण या प्रवासात भेटलेल्या भारतीय संगीताच्या परदेशी शिष्यांबद्दल थोडक्यात सांगितल्याशिवाय राहवत नाहीये.

भारतीय संगीतात रमणारे युरोपीय

मिशेल ग्वे नावाच्या फ्रेंच सतारवादकाचं नाव प्रथम कानावर पडलं ते मंजिरी असनारे-केळकर या ज्येष्ठ गायक मैत्रिणीकडून. संगीताच्या ओढीने, कोणालाही सुचणार नाही अशा त्याच्या एका भन्नाट प्रयोगात मंजिरी आणि प्रसिद्ध धृपद गायक पंडित उदय भवाळकर हे सहभागी झाले होते. मिशेलने या दोघांना तीन आठवड्यांसाठी फ्रान्सला आमंत्रित केलं. स्थलांतरित लोकांच्या आयुष्यातील अस्वस्थतेवर भारतीय रागसंगीत काय परिणाम करू शकतं, ते मिशेलला या प्रयोगातून आजमावून बघायचं होतं. हा अनोखा प्रयोग करण्यापूर्वी मिशेलने स्वतः या रागसंगीताचं शिक्षण घेतलं होतं. प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नान्ते गावातील काही हजार लोकांना या संगीताचे धडे दिले जाणार होते. प्रयोगाचा दुसरा, ‘सांगता’चा टप्पा फारच रोमांचकारी होता. त्यात गावातील संगीताचे शिक्षण घेतलेल्या या काही हजार लोकांनी सामुदायिकपणे गावती रागाची बंदिश आणि तराणा या भारतीय रागसंगीतातील वाणीची परीक्षा बघणाऱ्या गानप्रकाराचं सामुदायिक गायन करायचं होतं. असा प्रयोग भारतात तरी झाला असेल की नाही, शंकाच आहे. हा अनुभव केवळ गाणाऱ्या लोकांच्या नव्हे, तर गुरूंच्याही डोळ्यांत पाणी आणणारा होता.

मंजिरीमुळे मिशेलशी ओळख झाली. हा अवलिया भारतीय रागसंगीत शिकण्यासाठी 1980पासून पुढे दहा वर्षं भारतात येऊन राहिल्याची नोंद मनाने घेतली आणि पाठोपाठ त्या अनुभवांच्या नोंदींचा ‘लव्हिंग, लर्निंग अँड प्रॅक्टिसिंग : ‘अ जर्नी इन इंडियन म्युझिक’ हा स्पायरल बाइंड केलेला तब्बल तीनेकशे पानांचा ऐवज वाचायला मिळाला. त्याच्यामुळे अशा आणखी ‘मिशेल’ना भेटण्याची उत्सुकता वाढू लागली. मग त्यानेच बोलेझ नावाच्या हंगेरीमधील तरुण जिओफिजिसिस्टची ओळख करून दिली. पखवाज शिकण्याच्या वेडाने पछाडलेल्या आणि संस्कृत शिकणाऱ्या बोलेझने ते शिक्षण सुरू झाल्यावर त्यात सफाई यावी यासाठी हंगेरीत पखवाजचं शिक्षण देणारी संस्था काढली आहे. त्यानंतर डी. के. पट्टमल या बुजुर्ग कर्नाटक संगीत गायिकेचा शिष्यच नव्हे, तर ‘मानलेला नातू’ बनून गेलेला चीनचा चोंग चू सेन भेटला. पंडित सुरेश तळवलकर यांचा अतिशय लाडका शिष्य- व्हिएन्नाचा बर्नहार्ड शिम्प्लसबर्गर तसंच स्कँडिनेव्हियामध्ये गेल्या १५ वर्षांपासून फक्त भारतीय रागसंगीताचा समावेश असलेल्या स्टॉकहोम संगीत महोत्सवाचा संस्थापक-आयोजक सतारवादक के. जी. वेस्टमन अशी बरीच माणसं पाठोपाठ भेटत गेली.

मिशेलच्या नान्ते प्रयोगाबद्दल लेख लिहिताना मनात पडलेल्या या बीजाला कोविडच्या अर्थहीन, रिकाम्या दिवसांत धुमारे फुटले आणि बघता बघता त्या दिवसांना एकाएकी नवे, झळाळते रंग आले! पत्रकार असूनही आजवर या माणसांकडे आपलं कधीच कसं लक्ष गेलं नाही, हा प्रश्नाचा किडा स्वस्थ बसू देईना. मग प्रवासबंदीची कुलुपं उघडताच भारतीय रागसंगीत ज्या शहरांमध्ये सतत वाजत असतं, त्यावर चर्चा होत असतात, बैठका रंगत असतात, अशा कोलकाता आणि वाराणसीमध्ये भटकंतीसाठी गेले. त्यामुळे डोळे आणखी उघडले. भारतीय रागसंगीताचा 30-40 वर्षांपासून ध्यास घेऊन अभ्यास करणारे ऑस्ट्रेलियातील संगीतशास्त्र संशोधक ॲड्रियन मॅकनील कोलकात्यात भेटले. गंगेच्या घाटावर संकटमोचन हनुमान मंदिरात होणारा संगीत महोत्सव, धृपद मेळा या पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात रात्र-रात्र जागणाऱ्या परदेशी कलाकारांमध्ये धृपद शिकत असलेली इटलीची कियारा आणि तिच्या तिघी मैत्रिणी होत्या. या भेटी, गप्पांमधून दिसणारे संदर्भ यातून त्यांनी मिळवलेला भारतीय रागसंगीताचा समृद्ध तपशील थक्क करत होता, कोड्यात टाकत होता. रुद्र वीणा, सरस्वती वीणा, सूर बहार या भारतीय मैफलींमधून जवळजवळ हद्दपार झालेल्या वाद्यांचा शोध या कलाकारांना कुठे लागला असेल? ही वाद्यं शिकण्याची, त्यासाठी संस्कृत, हिंदी, तमिळ अशा भारतीय भाषा शिकण्याची गरज त्यांना वाटली असेल? मुळात या संगीताच्या असं खोलवर प्रेमात पडावं इतकी या संगीताशी त्यांची मैत्री कशी, कधी झाली असेल?

भारतीय संगीत युरोप-अमेरिकेत नेण्याचं श्रेय निःसंशयपणे पंडित रवी शंकर, त्यांचे भाऊ व नृत्याची आधुनिक शैली निर्माण करणारे उदय शंकर, उस्ताद अली अकबर खाँ आणि विसाव्या शतकातील प्रतिभाशाली व्हायोलिन वादक येहुदी मेनुहिन यांच्याकडे जातं. त्याकाळी दोन महायुद्धं आणि अणुबॉम्बने केलेला भयावह विनाश बघितलेली युरोप अमेरिकेतली माणसं आपापल्या परीने जगण्याचा अर्थ आणि शांतता याचा शोध घेऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर या कलाकारांनी पाश्चिमात्य देशांना भारतीय संगीताची ओळख करून दिली. प्रगत ध्वनिमुद्रणाच्या तंत्रज्ञानामुळे ते शक्य झालं, हेही विसरून चालणार नाही. कित्येकांनी ते आधी रेकॉर्डवर ऐकलं आणि मग प्रत्यक्ष मैफलीत, पण दोन्ही गोष्टींचा त्यांच्यासाठी परिणाम एकच होता, सुकून! हे संगीत फक्त चार घटका मनोरंजनापुरतं नाही तर त्यापलीकडे जाऊन मनाचा ठाव घेणारं, हृदयाला भिडणारं आहे अशी प्रबळ जाणीव या गोऱ्या समुदायाला होऊ लागली, असं या बदलाचा वेध घेणारे पीटर लाव्हाझोली यांनी आपल्या ‘द डॉन ऑफ इंडियन म्युझिक इन द वेस्ट’ या भल्या थोरल्या ग्रंथात लिहिलं आहे. युरोप-अमेरिकेतील कलाकार हळूहळू भारतीय संगीताच्या शोधात भारताची वाट धरू लागले. हे घडण्याचा वेग सावकाश होता, पण तो वाढत गेला, आजही वाढतोच आहे!

अर्थात, या मार्गावर आधी काही भारतीय पूर्वसूरींनी बी पेरून ठेवलं होतंच. बी पेरण्याचं काम करणाऱ्या काही लोकांकडे वळून बघताना आठवतात ते कोलकात्यातील (तेव्हाच्या) सौरिन्द्रमोहन ऊर्फ राजा टागोर. धनाढ्य अशा टागोर कुटुंबातील या संगीतवेड्याने पियानो आणि पाश्चिमात्य संगीताचं शिक्षण घेतलं होतं. जगातील अन्य देशांमध्ये भारतीय रागसंगीताचा अभ्यास व्हावा, त्याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं यासाठी पौर्वात्य व पाश्चिमात्य वाद्यांचा संकर करून विकसित केलेली अतिशय देखणी, वैशिष्ट्यपूर्ण वाद्यं १८८४ साली त्यांनी अनेक युरोपियन देशांना भेटीदाखल पाठवली होती. त्यात लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ म्युझिकचाही समावेश होता. १९१० साली हजरत इनायत खाँ पठाण भारतीय रागसंगीताच्या मैफली करण्यासाठी युरोप आणि अमेरिकेत गेले होते. पुढे त्यांनी संगीताच्या बरोबर सुफी तत्त्वज्ञान पण काही देशांमध्ये रुजवलं. ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर जागतिक संगीत संमेलनात सहभागी होण्यासाठी युरोपमध्ये गेले, तेव्हा इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी याच्यासाठी त्यांची एक खासगी मैफल झाली होती. निद्रानाशाच्या विकाराने त्रस्त असलेल्या मुसोलिनीला त्यांनी, या संगीतात त्याला या त्रासातून मुक्त करण्याचं सामर्थ्य असल्याचं आश्वासन दिलं. भारावलेल्या मुसोलिनीने ओंकारनाथ यांनी आपल्या देशातच राहावं, या सुप्त हेतूने त्यांच्यापुढे इटलीमधील एका संगीत अकादमीच्या प्रमुखपदाचं रसरशीत गाजर धरलं होतं, असं म्हणतात. ओंकारनाथ यांनी अर्थातच ते विनम्रपणे नाकारलं.

स्वरांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या कलाकारांना भौगोलिक सीमांच्या पलीकडे असलेल्या संगीत परंपरेबद्दल जशी उत्सुकता असते, तशी आपली परंपरा देशाच्या सीमा ओलांडून नेण्याची उत्कट इच्छाही असतेच. यातूनच तर नवं, कोणत्याही देशाचा शिक्का नसलेलं अनवट असं काही निर्माण होत असतं. झाकीरभाई, रवीशंकर आणि अली अकबर खाँसारख्या कलाकारांनी अमेरिकेत रुजवलेलं भारतीय रागसंगीत आज चहुदिशांनी जगभरात फोफावलं आहे. त्याचा अनुभव घेणं हा माझ्यासाठी या शोधातील पुढचा अगदी स्वाभाविक टप्पा होता. भारतात दहा-बारा वर्षं गुरुकुलात रागसंगीत शिकणारे हे शिष्य आपल्या देशात गेल्यावर या शिक्षणाचं नेमकं काय करतात? त्यांनी कमवलेल्या संगीताचं शिक्षण देणारं एखादं तरी गुरुकुल परदेशात चालू असेल, तर ते बघण्याची इच्छा मनात होती. तसा ईमेल मी आजवर भेटलेल्या या सगळ्या परदेशी मित्रांना लिहिला. दोनच दिवसांत बासेलहून सरोदवादक केन झकरमन यांचं उत्तर आलं. बासेलमध्ये त्यांनी सुरू केलेल्या अली अकबर म्युझिक कॉलेजची माहिती त्यात होतीच, पण ३८ वर्षं अविरत सुरू असलेल्या तिथल्या म्युझिक अकादमीमध्ये होणाऱ्या भारतीय रागसंगीतावरील दहा दिवसांच्या सेमिनारबद्दलही त्याने लिहिलं होतं. मी ईमेल पुन्हा नीट वाचला. ३८ वर्षं? छे, हे निव्वळ अविश्वसनीय होतं! पण केनने त्यात स्पष्ट लिहिलं होतं, या सेमिनारमध्ये शिकवायला पहिली काही वर्षं त्याचे गुरू उस्ताद अली अकबर खाँसाहेब स्वतः येत होते. केनकडून आलेलं हे आमंत्रण नाकारणं अगदी अशक्य होतं!

(संपूर्ण लेख वाचा, यंदाच्या अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात..)

अंक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे-

१. इंस्टामोजो

२. बुकगंगा

३. ॲमेझॉन

वंदना अत्रे | vratre@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results