आम्ही कोण?
आडवा छेद 

दसरा मेळावे ; पण सीमोल्लंघन किती?

  • सोमिनाथ घोळवे
  • 01.10.25
  • वाचनवेळ 5 मि.
dasara melava

देशभरात दसरा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मात्र महाराष्ट्रात समाज संघटन करण्यासाठी आणि राजकीय भूमिका मांडण्यासाठी दशहरा मेळावे भारावले जाण्याची जुनी परंपरा आहे. त्यात नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, मुंबईत शिवसेनेचे आणि भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांचे असे मेळावे प्रमुख.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा नागपुरात रेशीमबाग मैदानावर भरतो. तिथे संघाचे अनुयायी कवायती करतात आणि त्यानंतर सरसंघसंचालकांचं भाषण होतं. या भाषणाकडे देशाभरातील संघ स्वयंसेवकांचं लक्ष लागलेलं असतं. केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून या मेळाव्याचं महत्त्व वाढलं आहे. नागपूर मेळाव्यामधून जनतेच्या भावनिक मुद्द्यांना हात घालून हिंदुत्वाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या भाषणामध्ये सामाजिक समीक्षा कमी आणि भावनिक चर्चा जास्त असते. हिंदुत्वाचीही तीच ती ठराविक भाषणं वर्षामागून वर्षं होत राहतात. पूर्वी या मेळाव्यात बहुजन समाजाची उपस्थिती अल्प असत असे. मात्र आता बहुजन समाजातील स्वयंसेवकही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावायला लागले आहेत. अर्थात संघ हे पुरुषांचं संघटन असल्यामुळे इथे महिला सहभागी होत नाहीत. नागपूरप्रमाणेच देशभर संघ स्वयंसेवकांचं संचलनही शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरून होते.

मुंबईमधील शिवसेनेचा मेळावा :

शिवसेनेकडून घेण्यात येणाऱ्या मेळाव्याला जवळपास साठ वर्षं पूर्ण होत आहेत. १९६६ मध्ये पहिला दसरा मेळावा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर घेतला होता. पुढे शिवाजीपार्क आणि दसरा मेळावा असं समीकरण झालं. या मेळाव्याला मराठी अस्मितेची आणि हिंदुत्वाची किनार लाभलेली आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेने केलेल्या कामगिरीचा आढावा घेणे आणि पुढील वर्षभरात कोणत्या मुद्द्यांच्या आधारे शिवसेनेची वाटचाल राहील, याबद्दल तिथे बोललं जातं. या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक येतात. या मेळाव्यात तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असते. या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांना वर्षभर राजकीय प्रेरणा मिळते, राजकीय कार्यक्रम मिळतो, काम करण्यासाठी उत्साह वाढतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मेळाव्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातून शिवसैनिकांवर प्रभाव पाडल्याचं दिसून आलं. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारलं. नेतृत्वाशी संबंधित लोक नेतृत्वनिष्ठा दाखवण्यासाठी आणि नेतृत्वाच्या आदेशानुसार मेळाव्याला येतात.

एकनाथ शिंदे यांचा मेळावा :

२०२२ साली शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मेळाव्याची वेगळी चूल मांडली. त्यांचे आतापर्यंतचे मेळावे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर झाले. या मेळाव्यात मुळच्या शिवसेनेच्या मेळाव्याप्रमाणे उत्स्फूर्तता कमीच आढळते. शिंदेंच्या मेळाव्यातील भाषणांतूनही आरोप-प्रत्यारोपच जास्त ऐकायला मिळतात. उपस्थित शिवसैनिकांना पुढील वर्षाचा राजकीय कार्यक्रम वगैरे मिळतो, असा आजवरचा तरी अनुभव नाही. त्यामुळे या मेळाव्याचं स्वरूप सभेसारखंचं बनतं.

मुंडे भगिनींचा मेळावा :

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी १९८८ मध्ये पाथर्डीतील भगवानगड इथे दसरा मेळावा भरवण्यास सुरुवात केली. बीड आणि नगर जिल्ह्यांतील उसतोड मजुरांना संघटीत करणं हा त्यामागचा उद्देश होता. हा मेळावा म्हणजे साखर कारखान्यावर मजुरीला जाणाऱ्या ऊसतोड मजुरांना निरोपच (पाठवणी) असल्याचं बहुतांश उसतोड मजुरांचं मत असायचं. त्यामुळे मेळावा होईपर्यंत कोणीही उसतोड मजूर आपलं घर सोडत नसे. या मेळाव्यातून गोपीनाथ मुंडे अनेकदा राजकीय भूमिका मांडायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांनी भगवानगडावर मेळावा घेत मुंडे यांचा वारसा आपल्याकडे असल्याचं दाखवलं. मात्र, भगवानगडाचे महंत नामदेव (शास्त्री) सानप यांनी भगवानगडावर राजकीय मेळावा नको अशी भूमिका घेतली. परिणामी मेळाव्याची परंपरा बंद पडू नये म्हणून पंकजा मुंडे यांनी हा मेळावा संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी म्हणजेच पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील भक्तीगडावर घेण्यास सुरुवात केली. घेण्याचा निर्णय घेतला. अर्थात सावरगाव (ता. पाटोदा) येथील ग्रामस्थांनी याला पाठिंबा दिला.

या मेळाव्याला ग्रामीण प्रश्नांची किनार असते. पण दरवर्षी तेच प्रश्न आणि तेच-तेच लोक असं स्वरूप त्याला आलेलं आहे. पंकजा मुंडे उसतोड मजूर आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना दिसून येतात. प्रत्येक मेळाव्यात उसतोड मजुरांच्या अनेक समस्या मांडल्या जातात, प्रश्न सोडवण्याची आश्वासनंही दिली जातात. पण पाठपुरावा होत नाही. समस्या सुटत नाहीत. दुसरं, या मेळाव्यात कट्टर हिंदुत्वाचा उच्चार होत नसला तरी बहुजन समाजातील काही घटक या मेळाव्यामुळे हिंदुत्वाचे वाहक बनतात असं दिसून येतं. मुकादम लोक उसतोड मजुरांना या मेळाव्याला घेऊन येतात. तसेच मध्यम शेतकरी, पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते यांची उपस्थिती अधिक असते.

नव्याने सुरु झालेले दसरा मेळावे: 

मागील वर्षी मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा घेतला. हे ठिकाण 'धाकटी पंढरी' म्हणून ओळखलं जातं. या मेळाव्याला मराठा समाज मोठ्या संख्येने एकवटला होता. या वर्षी मराठवाड्यात पूर परिस्थिती असल्याने त्यांचा मेळावा मर्यादित स्वरूपात होईल अशी चर्चा आहे. दुसरीकडे गोपीचंद परळकर यांनी दसऱ्याआधीच दोन दिवस सांगलीतील आरेवाडी इथे दसरा मेळावा घेतला. धनगर समाजाचं आद्य देवस्थान असलेलं बिरोबा मंदिर आरेवाडीमध्ये आहे. या मेळाव्याला धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन मेळाव्यांमुळे महाराष्ट्रात जातनिहाय दसरा मेळाव्यांची परंपरा सुरू होणार का, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोच. 

अशारीतीने महाराष्ट्रात अनेक दसरा मेळावे घेतले जातात. मात्र त्यांची एक चाकोरी झालेली असल्यामुळे हे मेळावे सीमांमध्ये अडकलेले दिसतात. मेळाव्यांमध्ये मांडले जाणारे विषय, त्यांचं नेतृत्व, लोकांचा सहभाग या सर्व स्तरावर त्या त्या मेळाव्याच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादांच्या सीमा ओलांडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होताना अजूनही दिसत नाही. 

सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com

सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Sanjyot Raut01.10.25
मनसे मेळावा पाडव्याच्या दिवशी होतो. कम्युनिस्टांचे मेळावे १ मे रोजी होतात. आंबेडकरी अनुयायी ६ डिसेंबर रोजी चैत्यभुमीवर एकत्र येतात.

Select search criteria first for better results