दुपारच्या भर उन्हात मी क्लिनिकला निघाले होते. रिक्षात घाम गाळत त्यादिवशीच्या क्लायंट्सची यादी बघत होते. कोण कधी येणार आहे, कुणाबरोबर कशावर काम सुरू आहे, या सगळ्याचा मनातल्या मनात आढावा घेत होते. त्या यादीतल्या एका नावाचा मी जरा जास्त विचार करू लागल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यांना आपण ‘क्लायंट पी.एल.’ म्हणू या.
त्यादिवशी त्यांच्याबरोबरचं पहिलंच सेशन होतं. माझ्याकडे थेरपीसाठी माणसं येतात तेव्हा प्रत्येकजण आधी एक प्राथमिक गूगल फॉर्म भरून देतात. आणि मग आमचं पुढे बोलणं सुरू होतं. पण या गृहस्थांनी अनेकदा माझ्याशी फोनवर बोलून मगच पहिल्या सेशनची तारीख, वेळ इत्यादी ठरवण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे त्यांच्याबरोबरचं पहिलं सेशन कसं पार पडेल हा विचार सतत डोक्यात येत होता.
मी क्लिनिकला पोचले. ‘हुशश!’ करत पाणी पिऊन होईतोवर पहिल्या क्लायंट आल्या. थोड्यावेळातच त्यांचं सेशन सुरू झालं. एक तास झाला, ते सेशन संपलं.
पुढचा नंबर होता क्लायंट पी.एल.चा. मी त्यांना आत बोलावून घेतलं. एकदम टापटीप, शर्ट-टाय-बूट घातलेले, साधारण चाळीशीचे गृहस्थ होते. आपली ब्रीफकेस शेजारी ठेवत ते समोरच्या खुर्चीत बसले. सुरुवातीला काही सेकंद कुणीच काही बोललं नाही. कोणताही क्लायंट पहिल्यांदा थेरपिस्टला भेटतो तेव्हा दोन्ही बाजू एकमेकांचा अंदाज घेत असतात. तोपर्यंत फोनवर किवा चॅटवर झालेल्या संभाषणाचा चष्मा लावून समोरच्याचा आढावा घेतला जातो. तसंच काहीसं सुरू होतं. शेवटी मी बोलायला सुरुवात केली.
मी – ‘‘हॅलो, गुड आफ्टरनून! वेल्कम टु यॉर फर्स्ट सेशन ऑफ थेरपी विथ मी! पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला?’’
क्लायंट पी.एल. - ‘‘गुड आफ्टरनून. नाही, मला या एरियाचा अंदाज होता.’’
मी – ‘‘ग्रेट! सो, आज आपलं पहिलंच सेशन असल्यामुळे आपण नक्की काय काय करणार याबद्दल मी थोडं सांगते...’’
पी.एल. - ‘‘एक मिनिट, आधी मला एक विचारायचं आहे.’’
मी - ‘‘हो, अवश्य...’’
पी.एल. - ‘‘हे बघा मॅडम, मी फोनवर म्हटल्याप्रमाणे मला पडलेला प्रश्न काही फार मोठा नाहीये... म्हणजे, मी वेडा वगैरे नाहीये. (त्यांच्या चेहऱ्यावर आता ‘काहीही करून तुम्ही माझ्या ‘हो’ला ‘हो’ म्हणा!’ असा भाव होता.) पण हे बाकीच्या लोकांना कळणार नाही. त्यामुळे तुम्ही मला आश्वासन देता का, की मी तुम्हाला येऊन भेटतो हे तुम्ही बाहेर कोणालाही सांगणार नाही?’’
आजवर मला अनेक पेशन्ट्सनी अनेकदा हा प्रश्न विचारला आहे. मानसोपचारांबद्दलचे इतके गैरसमज पाहून मला आजही तितकंच थक्क व्हायला होतं!
चेहऱ्यावर एक आश्वासक हसू ठेवून मी म्हणाले, “मुळीच काळजी करू नका. आपल्यातलं काहीही या खोलीच्या बाहेर जाणार नाही. पण... मी तुमच्याकडून emergency contact घेऊन ठेवणार. तुम्ही स्वतःच्या जिवाचं काही बरंवाईट करून घेऊ शकता अशी चिन्हं जरी मला दिसली तरी मी त्यांना फोन करणार.’’
असं म्हटल्यावर ते थोडे रीलॅक्स झाल्यासारखे वाटले, म्हणून मी पुढचा प्रश्न विचारला, “मला सांगा, तुम्ही थेरपी घेण्याचा निर्णय का घेतलात?”
पी.एल. - “कसंय ना मॅडम, तसा मी मनाने एकदम कणखर आणि स्ट्राँग आहे – माझा खरंतर थेरपी वगैरेवर विश्वासही नव्हता. पण मला नुकताच हाय बीपीचा खूप त्रास झाला, तेव्हा माझे डॉक्टर म्हणाले की बीपीच्या औषधांबरोबरीनेच तुम्हाला तुमच्या रागाकडे, अती विचार करण्याच्या स्वभावाकडेही लक्ष देण्याची गरज आहे – म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला.’’
मी – “अच्छा, गुड डिसिजन. थेरपी म्हणजे नक्की काय असं तुम्हाला वाटतं? म्हणजे, या आधी तुम्ही त्याबद्दल काही वाचलं, ऐकलं आहे का?”
पी.एल. - ‘‘तुम्ही सल्ले देता, काही टिप्स वगैरे सांगता असं मला वाटतं. याबद्दल मी फार काही वाचलेलं नाही.’’
मी – ‘‘ओके. हे बरोबर आहे, की थेरपिस्ट बऱ्याचदा एखाद्या समस्येवर काही प्रॅक्टिकल, सहज करण्यासारखे उपाय सांगतात. पण हा थेरपीचा फक्त ‘टिप ऑफ आइसबर्ग’ आहे. एक चांगला थेरपिस्ट आणि एक चांगला डॉक्टर यांच्यात काहीही फरक नसतो. आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा ते आपल्याला जादूने बरं करत नाहीत, बरोबर ना?’’
त्यावर त्यांनी होकारार्थी मान डोलावली, म्हणून मी पुढे विचारलं, “मग ते आपल्याला बरं करतात म्हणजे नक्की काय करतात?’’
पी.एल. - “औषधं देतात, टेस्टस् हव्या असतील तर त्या करून घ्यायला सांगतात.”
मी – ‘‘Exactly! म्हणजे ते आपल्याला बरं करण्याची वेगवेगळी साधनं देऊ करतात. ती साधनं किती प्रमाणात, कधी, कशी वापरायची त्याची माहिती देतात. डॉक्टरचं काम असतं फक्त ३०-४० टक्के, बाकी पथ्य वगैरे आपणच पाळतो ना?’’
पी.एल. - ‘‘हो, बरोबर आहे.’’
मी – ‘‘झालं की मग! हेच सगळं आपण स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी करतो तेव्हा त्याला ‘थेरपी’ म्हणतात.’’
पी.एल. - ‘‘बरं, पण मग नक्की या सेशन्समध्ये काय करणार आपण?’’
मी - ‘‘सर्वप्रथम मी तुमच्या प्रश्नांच्या पलीकडचं तुमचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तुमचं आत्तापर्यंतचं आयुष्य, त्यातल्या ठळक घटना आणि त्यांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर, आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर झालेला परिणाम, तुमच्या आवडीनिवडी इत्यादी गोष्टींबद्दल समजून घेणार. मग तुमच्या समस्या लक्षात घेऊन मी एक क्लिनिकल अनॅलिसिस करणार. जोडीनेच आपण काही psychometric tests देखील करू. असं एक संपूर्ण चित्र उभं राहिलं की आपण आपल्या सेशन्ससाठी काही ध्येयं ठरवणार.’’
पी.एल. - ‘‘ध्येय म्हणजे मला यातून काय हवंय वगैरे का?’’
मी – ‘‘बरोबर! तुम्ही स्वतःला असं विचारा, की या प्रोसेसच्या शेवटी तुम्हाला स्वतःत कोणते बदल झालेले बघायला आवडतील?’’
पी.एल. - ‘‘पण मी तुम्हाला म्हटलं ना, मुळात मला काही फार त्रास नाहीच्चे.’’
मी - ‘‘आणि ती चांगलीच गोष्ट आहे, पण आणखी काही गंभीर होण्याची वाट पाहायची आहे का तुम्हाला?’’ (मी जरा मिश्किलपणे असं विचारल्यावर तेही जरासे हसले.) सो, तुम्हाला या प्रोसेसच्या अंति काय मिळणार, तुमच्यात किती बदल होणार हे ultimately तुमच्यावरच अवलंबून आहे – मी फक्त तुमच्यासमोर एक आरसा घेऊन उभं राहण्याचं काम करणार. तर, बाकी थेरपीबद्दल आता सांगू?’’
ते आता खुर्चीत निवांत होऊन बसले होते. त्यांनी होकारार्थी मान डोलावल्यावर मी आतल्या आतच ‘हुर्रे!’ म्हणून त्यांना पुढची माहिती द्यायला सुरुवात केली...
ईश्वरी मराठे | 9833734619 | ishwarimarathe@ahamtherapy.com
ईश्वरी मराठे मानसोपचार तज्ज्ञ आणि ‘अहम् सेंटर फॉर थेरपी’च्या संस्थापक आहेत.
