'हायवे' या सिनेमामध्ये एक हृदयस्पर्शी प्रसंग आहे. महाबीर (रणदीप हुड्डा) आणि वीरा (आलिया भट्ट) एकत्र बसलेले असतात आणि वीरा अचानक महाबीरला मिठी मारते. कोणताही विचार न करता, त्याची परवानगी न घेता. त्या मिठीत लैंगिक भावना नसते. केवळ सहवेदना आणि जिव्हाळा असतो. पण महाबीरला त्या स्पर्शाचं काय करायचं हे कळत नाही. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ, भीती आणि लाज सगळं एकत्र दिसतं. वीराला काय प्रतिसाद द्यायचा, हे त्याला उमगत नाही.
जून महिना ‘Men’s Mental Health Month’ म्हणून साजरा होतो. पुरुष आपल्या शारीरिक आरोग्याबाबत काही प्रमाणात जागरूक असतात. पण, मानसिक आरोग्याबाबत अजूनही संकोच आहे. ‘पुरुष रडत नाहीत’, ‘मन कमजोर असणं म्हणजे मर्दपणाला कमीपणा’, अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुजलेल्या आहेत. त्यामुळेच पुरुषांना स्वतःच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देणं म्हणजे आपल्यात काहीतरी कमी आहे असं वाटतं. एखादी व्यक्ती मानसिक आरोग्यावर काम करत असेल, तर त्यांच्याकडेही पुरुष वेगळ्या नजरेने बघतात. माझा एक सहकारी होता, आम्ही सगळे मानसिक आरोग्यासंबंधित एका ॲप्लिकेशनवर काम करत होतो. तो म्हणाला, ‘आम्ही मनाने इतके कमजोर नाही की मानसिक आरोग्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतील.’
स्त्रीचा स्पर्श म्हणजे लैंगिक संकेत असतो, अशीच शिकवण पुरुषांना लहानपणापासूनच नकळत मिळत जाते. त्यामुळे इतर कोणत्याही प्रकारचा स्पर्श, मग तो प्रेमाचा असो, मायेचा असो किंवा नुसत्या, सद्भावनेचा असो, तो ओळखण्याची आणि स्वीकारण्याची पुरुष मनाची तयारी नसते. स्त्रियाही सामाजिक चौकटींमध्ये अडकलेल्या असतात. पुरुषांशी प्रेमाने वागणं धोकादायक असू शकतं, असंच त्यांनाही शिकवलं जातं तिऱ्हाईत पुरुषाशी सहज बोलणं, त्याच्या पाठीवर हात ठेवणं इतकंच काय पण बोलताना टाळी देणं हे योग्य नाही, असंच अजूनही (काही अपवाद वगळता) मानलं जातं त्यामुळे मुली वयात आल्या की त्या मुलगे आणि पुरुष यांच्याशी सावधगिरीने वागायला लागतात.
जगभर पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण महिलांपेक्षा सुमारे चारपट अधिक आहे. यामागे अनेक कारणं असतील. तरी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक आधार, संवाद आणि समजून घेणाऱ्या स्पर्शाचा/माणसाचा अभाव. ‘मुळूमुळू रडतोस काय’ अशा वाक्यांतून मुलगा लहानपणापासून सहज भावनांना आणि स्पशार्ला पारखा होतो. तुम्ही आठवून बघा, आपल्याकडे कोणी गेलं तर त्या कुटुंबातल्या स्त्रियांच्या पाठीवर सांत्वनाचा हात सहजपणे फिरतो. पुरुष मात्र एका कोपऱ्यात उभे राहून सहन करत असतात. जणू सांत्वनाची गरज फक्त स्त्रियांनाच असते.
बाळ जन्मल्यानंतर त्याला आईच्या छातीशी ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामागे केवळ भावनिकच नव्हे तर वैद्यकीयही कारणं आहेत. त्वचेचा स्पर्श बाळाला ऊब देतो, त्याची हृदयगती आणि श्वसन स्थिर करतो, मेंदूच्या विकासाला चालना देतो आणि सुरक्षिततेची भावना बाळामध्ये निर्माण करतो. पण जसजसं वय वाढतं तसतसं विशेषतः मुलग्यांच्याबाबतीत हा स्पर्श कमी होत जातो. समाज जणू त्यांना जिव्हाळाच नाकारतो. ‘मोठा झालास आता, आईच्या कुशीत शिरू नकोस’, ‘रडू नकोस, तू मुलगा आहेस’, ‘आईचा पदर सोड, काय बायकांसारखा वागतोयस’ असं त्याला ऐकवलं जातं. त्यामुळे मुलगा ‘मोठा’ झाला, की त्याचं आयुष्य स्पर्शशून्य होत जातं. ही मुलं पुढे जाऊन ‘Touch starvation’ म्हणजेच ‘स्पर्शाची उपासमार’ अनुभवतात. आपल्याला प्रेमळ, सुरक्षित स्पर्श नियमित मिळत नसल्याचं अमेरिकेत २०२०मध्ये झालेल्या एका अभ्यासात ५४ टक्के प्रौढ पुरुषांनी कबूल केलं. ब्रिटनमध्ये २०१९मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ४० टक्के पुरुषांनी सांगितलं की, कोणीतरी प्रेमाने गळाभेट कधी दिली होती, ते आठवतही नाही.
भारतातही परिस्थिती वेगळी नाही. National Mental Health Survey (2015-16) नुसार भारतातील १३.७ टक्के लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित काही ना काही त्रास आहे. त्यातही पुरुषांमध्ये ‘अज्ञात तणाव’ आणि ‘भावनिक तुटलेपणा’ ही लक्षणं अधिक आढळतात. मानसिक आरोग्याबाबत आज स्त्रिया अधिक खुलेपणाने बोलू लागल्या आहेत. आपणहून मदत मागण्यात त्यांना कमीपण वाटत नाहीये. थेरपी, सपोर्ट ग्रुप्स, संवाद यामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढतोय. पण बहुतांश पुरुष अजूनही थेरपीकडे / मानसिक आरोग्याकडे कमकुवतपणाचं लक्षण म्हणून पाहतात. ते स्वतःच्या भावना उघडपणे मांडू शकत नाहीत, ‘मला कुणीतरी मिठी मारावी असं वाटतं’, हे व्यक्त करणं त्यांच्यासाठी अवघड जातं.
अलीकडे तर पुरुषांना पुरुषांचा स्पर्शदेखील नको वाटतो आहे. माझा एक मित्र आजारी होता. त्याच्यासोबत राहणारा त्याचा मित्र त्याची काळजी घेत होता. त्यावेळी होणारा त्याचा सहज स्पर्शही माझ्या मित्राला नको वाटला. ‘अबे में गे हूं क्या?’ असं त्याचा त्यावरचा सवाल होता. पुरुषांच्या साध्या गळाभेटीलाही आता पुरुष संकोचतात. कोणी गळाभेट दिलीच, तर दुसरा पुरुष लगेच हात झटकतो आणि ‘मी गे नाही’ असं स्पष्ट करतो. असे स्टिरिओटाइप तयार होण्यात हिंदी सिनेमांचाही मोठा हातभार आहे.
यापुढे जाऊन आपण पारलैंगिक समुदायाचा विचार कधी करणार? समलैंगिक, ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी पुरुषांच्या बाबतीत हे स्पर्शविषयक नियम आणखी कडक आणि भावनिकदृष्ट्या त्रासदायक ठरतात. समाज त्यांचं अस्तित्वच नाकारतो, त्यांच्या भावनिक गरजांना ‘चूक’ ठरवतो. अशा पुरुषांना ना स्पर्श मिळतो, ना आधार. त्यांचं मानसिक आरोग्य हे अधिक असुरक्षित परिस्थितीत असतं.
स्पर्श ही मूलभूत मानवी गरज आहे. ती केवळ लैंगिक संबंधापुरती मर्यादित नाही. त्यामध्ये आपुलकी, सुरक्षितता, विश्वास आणि मानवी संबंध टिकवण्याचं सामर्थ्य असतं. मानसिक आरोग्यावर काम करताना शाब्दिक संवादाबरोबरच सहज-निर्मळ स्पर्शाच्या गरजांबाबतही नव्याने विचार करणं आवश्यक आहे.
अरुंधती गडाळे | 9850425671 | gadale.arundhati@gmail.com
अरुंधती गडाळे या पत्रकार आणि ‘साजो’ संस्थेच्या संस्थापक संचालिका आहेत. महिलांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्या ‘साजो रिसिलियन्स रिसर्च फाउंडेशन’द्वारे प्रयत्नशील आहेत.
